अकीक : (ॲगेट). सिलिकेच्या (SiO2) गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिक असलेल्या) बहुरंगी जातीच्या खनिजाला ‘अकीक’ म्हणतात. अकीकातील रंग नियमित किंवा अनियमित वाटले गेलेले असतात. खनिज भंगुर असते. कठिणता ६ ते ७ भंजन शंखाभ [→ खनिजविज्ञान ]. वि. गु. २·६५ ते २·६६. चमक मेणासारखी व काचेसारखी. पारदर्शक ते दुधी काचेसारखी पारभासी. सामान्य अकीकात फिकट पांढऱ्यादुधी, राखी, आकाशी, पिवळसर, तपकिरी इ. रंगांच्या छटा असणारे, निरनिराळे व जवळजवळ समांतर पट्टे असतात. ते पट्टे सरळ, वक्र, नागमोडी किंवा संकेंद्री वर्तुलाकार (एकच केंद्र असलेल्या वर्तुळांच्या आकाराचे) किंवा अनियमित वर्तुलाकार असतात. अशा अकीकाला ‘सुलेमानी पत्थर’ असे नावही देतात. पाढंऱ्या व काळ्या किंवा तांबड्या अशा रंगांचे, निरनिराळे व सरळ व समतल पट्टे असलेल्या अकीकाला ‘पालंक’ किंवा ऑनिक्स म्हणतात.
ज्याच्यात सिलिका विरघळलेली आहे असे नैसर्गिक पाणी खडकांमधील पोकळ्यांत अधूनमधून येत राहिल्याने त्या पाण्यातील सिलिकेची एकानंतर एक अशी पुटे पोकळ्यांच्या भिंतीवर साचून अकीकातील पट्टे तयार झालेले असतात. ज्वालामुखींच्या लाव्ह्यांच्या घन होण्याच्या अखेरच्या अवस्थेत त्यांच्यातील पाणी व वाफ निघून जात असताना त्यांच्यातील पोकळ्यांत विशेषतः अकीकासारखी खनिजे निक्षेपित होतात. महाराष्ट्रातील खडकांत अशी खनिजे विपुल आढळतात.
अकीकातील पट्टे कमीअधिक प्रमाणात सच्छिद्र असतात व त्यांना कृत्रिम रंग देता येतात. बाजारात विकल्या जाणाऱ्या कित्येक अकीकांना असे रंग दिलेले असतात.
सब्जी किंवा मॉस ॲगेट:याच्यात पट्टे नसतात पण काळसर किंवा हिरव्या रंगाच्या पदार्थाचे सूक्ष्म कण किंवा पुंजके समाविष्ट झालेले असतात. ते शेवाळ्यासारखे किंवा झुडुपासारखे दिसतात. झिलई केल्यावर सब्जीमध्ये फांद्या फुटलेली झाडे किंवा झाडांची दाट गर्दी असलेली वने यांची चित्रे काढल्यासारखे दिसते.
उपयोग : पूर्वी मुख्यतः दागिने, पेले, डब्या, तरवारीच्या व सुऱ्यांच्या मुठी किंवा इतर शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी अकीक वापरला जात असे. आता अशा वस्तूंशिवाय प्रयोगशाळांतील खलबत्ते व सूक्ष्मग्राही तराजूंच्या दांड्या टेकण्याचे व दांड्यांच्या बैठकींचे भाग व कित्येक यंत्रांचे धारवे इ. वस्तू बनविल्या जातात.
भारत व इतर देशांतील कित्येक जागी अकीक सापडतो. गुजरातेतील राजपिपळालगतच्या रतनपूरजवळ, दक्षिणेतील ज्वालामुखी खडकांपासून आलेले अकीकाचे गोटे असणारा, एक तृतीयकल्पातील पिंडाश्म आहे. त्याच्यातील अकीक प्रसिद्ध असून तो दोन हजार वर्षांपूर्वीपासून खणून काढला जात आहे. खणून काढल्यावर अकीकाचे गोटे मडक्यात घालून भाजतात त्यामुळे त्याच्यातील पट्टे ठळक होतात. अकीकाचे तुकडे करणे, ते कापणे, त्यांना झिलई देणे, त्यांच्या वस्तू बनविणे इ. कामे खंबायत येथे केली जातात. अकीकापासून बनविलेल्या खंबायतच्या वस्तूंना मध्ययुगात यूरोप, अरबस्तान इ. भागांतही मोठी मागणी असे. अद्यापिही तेथे अशा वस्तू अल्प प्रमाणात बनविल्या जातात. प्रयोगशाळांना लागणाऱ्या अकीकाच्या वस्तू व उपकरणांचे भाग बनविण्याची कामेही आता तेथे केली जातात.
ठाकूर, अ. ना.