अंबपाली : (इ.स.पू.सु. ५ वे शतक). उत्तर मगध देशातील वैशाली नगरीत राहणारी एक गणिका. ‘आम्रपाली’ नावानेही ती ओळखली जाते. पतितांच्याही उद्धाराबाबत उदार धोरण बाळगणाऱ्या गौतम बुद्धांची ती एक उपासिका होती. विनयपिटकाच्या ‘महावग्गा’त तिच्यासंबंधी एक कथा सांगितली आहे. भगवान बुद्ध वैशालीला आले असता त्यांना निमंत्रण देण्याबाबत अंबपाली व वैशालीचे राजपुत्र यांच्यात चुरस लागली. तिने आपला रथ जोराने पुढे दामटला व वैशालीच्या राजपुत्रांना मागे टाकून बुद्धाला निमंत्रण दिले. बुद्धांनी तिचे निमंत्रण स्वीकारले. ह्यामुळे केवळ एका क्षुद्र गणिकेने आपला बेत हाणून पाडला, असे वाटून ते सर्व राजपुत्र खजील झाले. पुढे अंबपाली भिक्षुणी बनली. तिने यौवनातील स्वतःचे मादक शरीरसौंदर्य आणि वृद्धावस्थेतील त्याच शरीरातील गात्रांची जीर्णता, शिथिलता ह्यांमधील विरोध सुंदर शब्दांत वर्णिला असून तो थेरीगाथेत आला आहे.

बापट, पु. वि.