अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे गाव पूर्वीच्या अक्कलकोट संस्थानची राजधानी. लोकसंख्या २६,४८४ (१९७१). पुणे–रायचूर रेल्वेमार्गावरील अक्कलकोटरोड या रेल्वेस्थानकापासून गाव ११ किमी. ईशान्येस असून सोलापूरपासून सडकेने ३८ किमी. आहे. गावाशेजारून बोरी नदी वाहते व तिला येथे छोटे धरण बांधले आहे. गावाभोवती जुना पडका तट व अर्धवट बुजलेला खंदक असून गावातील जुना व नवा राजवाडा, राजांच्या छत्र्या, जुन्या राजवाड्यातील शस्त्रसंग्रहालय ही स्थळे प्रेक्षणीय आहेत. येथे होऊन गेलेले, दत्तावतार मानलेले श्री अक्कलकोटस्वामी यांचे मंदिर व मठ यांमुळे या गावाचे धार्मिक महत्त्व वाढले आहे. गावात कापसाच्या गिरण्या आणि विणकामाचा धंदा असून तालुक्यातील ज्वारी, गहू, अळशी, भात इ. पिकांची ही बाजारपेठ आहे.
जोशी, चंद्रहास