सूचि चिकित्सा : (सूचिवेध चिकित्सा). प्राचीन चिनी वैद्यकातील एक महत्त्वाची उपचारपद्घती. ही उपचार प्रणाली आता जगभर लोकप्रिय होत आहे. आधुनिक शरीरक्रियाविज्ञानाच्या आधारे तिचे विश्लेषण झाले असल्यामुळे पाश्चात्त्य वैद्यकानेही तिचा मर्यादित प्रमाणावर स्वीकार केला आहे. इ. स. पू. सु. ३००० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या चिनी वैद्यकात अनेक वनस्पतिजन्य आणि प्राणिज औषधांचा समावेश होता. त्यांच्या जोडीला सूचिवेध (सुईने टोचणे), मर्दन, व्यायाम व ज्वलन चिकित्सा यांचाही उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जाई.
पाश्चात्त्य जगाला सूचिचिकित्सेचा परिचय सतराव्या शतकात झाला. डच वैद्य व्हिल्हेल्म टेन राईन यांनी जपानमधील नागासाकी शहराला भेट देऊन आल्यानंतर या पद्घतीची माहिती यूरोपीय लोकांना करुन दिली व प्रथम ‘ॲक्युपंक्चर’ (सुईने टोचणे) ही संज्ञा प्रचारात आणली. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे उपचार प्रयोगाखातर करुन पाहिले असावेत. फ्रान्समध्ये १८१० मध्ये प्रथम सूचिचिकित्सा स्वीकारल्याची अधिकृत नोंद आढळते. परंतु खुद्द चीनमध्ये मात्र याच काळात पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे या तंत्राची पीछेहाट झाली. च्यिंग (मांचू) घराण्याच्या सम्राटांच्या काळात (इ. स. १६४४–१९१२) सूचिवेध हा प्रगतीला अडसर आहे, असे मानून शाही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा विषय प्रथम दुर्लक्षिला गेला आणि १८२२ मध्ये त्याची पूर्ण हकालपट्टी झाली. जनसामान्यांमध्ये प्रिय असलेली ही उपचारपद्घती १९२९ मध्ये पूर्ण बंद झाली. साम्यवादी राजवटीत पारंपरिक वैद्यकाला उत्तेजन मिळू लागल्यावर मात्र सूचिचिकित्सेचे पुनरुज्जीवन झाले आणि बीजिंग, शांघाय व नानकिंग येथे विशेष संशोधन संस्था सुरु करण्यात आल्या.
सूचिचिकित्सेचा प्रारंभ प्राचीन चिनी तत्त्वज्ञानामधील दोन मूलभूत गुणांच्या संकल्पनेतून झाला. यिन व यांग या दोन विरुद्घ गुणांच्या शक्ती शरीरात वास करीत असतात. त्यांच्यामध्ये पूर्ण संतुलन कधीच शक्य नसते. सतत चढ-उतार होत असतात आणि ‘की’ नावाची ऊर्जा (चैतन्य) मेरिडियन नावाच्या वाहिन्याजालांतून वाहत असते. त्यामुळे शारीरिक परिवर्तने होत राहतात. प्रत्येक दिवशी निराळी मनःस्थिती व शारीरिक स्थिती आढळते. परंतु असंतुलित अवस्था दीर्घकाळ टिकल्यास बाह्य विकारजनक शक्तींना संधी मिळते व रोगांची निर्मिती होते, असे या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन आहे. यिन या शक्तीचा संबंध स्त्रीत्व, शीतलता, प्रकाश, पृथ्वी, निष्क्रियता आणि स्थितिशीलता (आहे ते टिकवून धरणे) या गुणांशी जोडला आहे. तर यांग ही शक्ती, पौरुष, उष्णता, अंधार किंवा कृष्णवर्ण, स्वर्ग, आक्रमकता आणि नवनिर्मिती यांसारख्या गुणांशी निगडित आहे. प्राचीन शरीरविषयक चिनी विचारांनुसार प्रत्येक अंतर्गत इंद्रियांशी व ऊर्जा वाहणाऱ्या मेरिडियनशी संबंधित असे बिंदू त्वचेच्या पृष्ठभागावर असतात. त्यांच्यावर दाब देऊन किंवा त्यांना उत्तेजित करुन संबंधित इंद्रियांमुळे निर्माण होणाऱ्या विकारांपासून आराम मिळू शकतो. पाच प्रमुख भरीव इंद्रिये म्हणजे हृदय, फुप्फुसे, यकृत, प्लीहा व वृक्क (मूत्रपिंड) या प्रत्येक इंद्रियास जोडलेल्या पोकळ इंद्रियांचाही विचार केलेला आहे. उदा., रक्तवाहिन्या,श्वासनलिका, पित्तवाहिनी, मूत्राशय (प्लीहेच्या बाबतीत अशी वाहिनी वा पोकळ इंद्रिय आधुनिक शरीरशास्त्राच्या दृष्टीने शक्य दिसत नाही). या सर्व भरीव इंद्रियांचे व पोकळ इंद्रियांचे प्रतिनिधित्व त्वचेवरील बिंदूंनी होऊ शकते. त्वचेवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेखा (रेषा) म्हणजे ऊर्जेच्या वाहिन्या मेरिडियन असतात. त्यातून वाहणारी अतिरिक्त यिन किंवा यांग शक्ती सूचिवेधनाने काढून टाकली जाते आणि संतुलन साधण्यास मदत होते. प्रत्येक इंद्रियाच्या कार्यशीलतेसाठी दोन प्रकारची ऊर्जा आवश्यक असते : (१) बाह्य ऊर्जा जी अन्न, पाणी, वायू इ. जड पदार्थांतून मिळते. (२) ‘की’ नावाची आंतरिक ऊर्जा किंवा चेतना यिन किंवा यांगच्या स्वरुपात पदार्थबाह्य अशी असते. ही आंतरिक ऊर्जेची किंवा चेतनेची संकल्पना मोजमापाने अथवा प्रयोगाने सिद्घ करण्यासारखी नाही.
सूचिचिकित्सेचा विकास सु. ४००० वर्षांपूर्वीच्या दगडी तीक्ष्ण साधनांच्या उपयोगातून झाला असावा असे समजले जाते. त्वचेवरील गळवे फोडण्यासाठी व आतील द्रव काढून टाकण्यासाठी अशा तीक्ष्ण साधनांचा उपयोग होत असावा. बिअनस्टोन या नावाने ओळखले जाणारे हे दगड पुढे कालबाह्य होऊन त्यांची जागा चिनी मातीच्या भांड्यांसारख्या पदार्थांच्या उपकरणांनी व नंतर धातूच्या (चांदी, सोने, लोखंड) सुयांनी घेतली. विविध आकाराच्या २·५–२५ सेंमी. लांबीच्या ९ सुयांचा मूलभूत संच अनेक वर्षे प्रचलित होता. थंड किंवा तापविलेल्या सुया वापरल्या जात. सुई टोचण्याच्या ठिकाणी आणि अन्यत्र मोक्सा नावाच्या वनस्पतींच्या पानांच्या चूर्णापासून केलेले शंकूच्या आकाराचे ज्वलनशील गोळे किंवा सोंगट्या ठेवून त्यांना पेटविण्याचा उपचार (ज्वलन-चिकित्सा) पूर्वी प्रचारात होता. या सर्व उपचारांचे तात्त्विक अधिष्ठान सूचिचिकित्सेवरील पहिला ग्रंथ नाई चिंग सु वेन यापासून पुढे येऊ लागले. इ. स. पू. पाचव्या शतकापासून या ग्रंथाची निर्मिती अनेक लेखकांनी केली असावी. पीत सम्राट ह्वांग टी आणि त्याचा मंत्री ची पाय यांच्यामधील तत्त्वज्ञानविषयक चर्चा त्यात प्रारंभी असल्यामुळे या ग्रंथास पीतसम्राटाचा वैद्यकविषयक अभिजात ग्रंथ या नावानेही ओळखले जाते. इ. स. पू. ४७५ ते २२१ मध्ये या ग्रंथातील तत्त्वज्ञान मांडले गेले. पुढे हान घराण्यातील सम्राटांच्या काळातील नवकन्फ्यूशस विचारांचाही त्यावर प्रभाव पडला. विसाव्या शतकात आधुनिक शरीरक्रियाविज्ञानाच्या आधारे सूचिचिकित्सेचे परिणाम अभ्यासले जाऊ लागले. विशेषतः वेदनाहारक क्रियेचा अर्थ लावण्यात अनेक अभ्यासकांना यश मिळाले आहे.
सूचिचिकित्सेचे आधुनिक शरीरक्रियावैज्ञानिक विश्लेषण : संपूर्ण शरीरावर त्वचेच्या पृष्ठभागावर ३८८ स्थाने सुया टोचण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांपैकी योग्य त्या आणि कमीतकमी स्थानांची निवड चिकित्सक आपल्या वाहिनीविषयक ज्ञानाच्या आधारे करतात. या वाहिन्या अथवा रेखा विविध बिंदूंना जोडून तयार झालेल्या असतात आणि त्यातून ‘की’ ही जैव ऊर्जा वाहते असे प्राचीन चिनी वैद्यकाचे प्रतिपादन आहे. शरीरक्रियावैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे बिंदू त्वचेखालील निरनिराळ्या खोलीवर आढळणाऱ्या तंत्रिका शाखा दर्शवितात. त्यांच्या सूक्ष्म उत्तेजनाने संवेदी तंत्रिकांमध्ये निर्माण झालेले आवेग (संदेश) ए-डेल्टा प्रकारच्या तंतूंमधून मेरुरज्जूत अथवा मेंदूत पोहोचतात. उच्च तलसीमा असलेले (टाचणी टोचून उत्तेजित होऊ शकणारे किंवा जोराचा दाब दिल्यास उत्तेजित होणारे) हे ग्राही (किंवा तंत्रिकांची टोके) ज्या तंत्रिकांना जोडलेले असतात, त्या तंत्रिकांवर मायेलिनाचे पातळ आवरण असते. त्यामुळे ते वेगाने संवेदनावहन करु शकतात. याउलट ज्या वेदनांच्या उपचारासाठी सूचिचिकित्सा केली जाते त्या वेदनांचे संदेश मायेलिनविहीन व मंदगतीने संवेदना नेणारे ‘सी’ प्रकारचे तंतू वाहून नेत असतात [→संवेदना तंत्र]. कायम ठणका निर्माण करणाऱ्या काहीशा बोथट अशा या वेदना असतात. त्यांच्या मेरुरज्जूमधील प्रवेशानंतर त्या जिलेटिनी द्रव्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात प्रथम पोहोचतात. तेथून दुसऱ्या टप्प्यातील तंत्रिका कोशिकांचे कार्य सुरु होते. या टप्प्यात वेदनेचा मेंदूच्या दिशेने प्रवास सुरु होत असतो. त्यामुळे वेदनेचे आगमन अधोथॅलॅमस, थॅलॅमस इ. मध्यमस्तिष्कातील क्षेत्रात आणि पुढे जाणिवेच्या क्षेत्रात होऊ शकते. सूचिचिकित्सेमध्ये या दुसऱ्या टप्प्याच्या प्रवासावर नियंत्रण ठेवणारे ‘एन्केफॅलीन’ नावाचे पदार्थ तयार होण्याची क्रिया उत्तेजित होते. अफूमधील मॉर्फीनासारख्या अल्काभ द्रव्यांशी रासायनिक साम्य असल्यामुळे या पदार्थांना ‘अफूसदृश्य’ असे नाव मिळाले आहे. नेहमीच्या संवेदनानिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची निर्मिती अल्प प्रमाणात होतच असते. त्यामुळे अनेक प्रकारचे दु:खद संवेदन सुसह्य होत असते. नैसर्गिक शरीरक्रियेमध्ये उपयुक्त असणारे हे पदार्थ वनस्पतिजन्य द्रव्यांशी साम्य कसे निर्मितात, हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
आकृतीत दाखविल्याप्रमाणे एन्केफॅलीन निर्माण करणाऱ्या कोशिकांना मेरुरज्जूच्या प्रत्येक पातळीवर ए-डेल्टा तंतूकडून उत्तेजन मिळते. त्यामुळे त्या विशिष्ट पातळीवरील वेदनांपासून आराम मिळू शकतो. परंतु ही यंत्रणा इतक्या मर्यादित स्वरुपाची नाही. मेरुरज्जूमधून मेंदूच्या दिशेने जाणारे संदेश जेव्हा अधोथॅलॅमस या मध्यमस्तिष्कीय क्षेत्रात पोहोचतात, तेव्हा अशाच प्रकारचे कार्य घडू शकते. यासाठी उपयुक्त कोशिका मस्तिष्कनालेभोवती (मेंदूच्या आतील भागातील द्रवयुक्त पोकळ नलिकेभोवती) असलेल्या क्षेत्रात आढळतात. तेथेही एन्केफॅलिनाची निर्मिती होते. त्यामुळे निर्माण झालेली वेदना कमी करण्याचे संदेश परत खालच्या दिशेने प्रवास करुन मेरुरज्जूच्या अनेक पातळ्यांवर जिलेटिनी पदार्थांमध्ये पोहोचून वेदनाहरणाचे कार्य करु शकतात. यामुळे सूचि-चिकित्सेचा परिणाम केवळ स्थानिक वेदना तात्पुरत्या मर्यादित न राहता अधिक दूरगामी (परिणामकारक) कशा होऊ शकतात हे स्पष्ट होते. वेदना नसलेल्या परिस्थितीत आणि अंतर्गत इंद्रियांच्या (ज्यांच्या तंत्रिकांना स्वायत्त तंत्रिकात विविध केंद्रांकडून संदेश प्राप्त होत असतात) विकारांचे उपचार करताना, कोणत्या कोशिका कार्यान्वित होतात ते अजून स्पष्टपणे समजलेले नाही.
उपचार पद्घती : पारंपरिक सूचिचिकित्सेमध्ये रोगाचे निदान करण्यासाठी पूर्वेतिहास, नाडीपरीक्षा, जीभ पाहणे इ. लक्षणांच्या उद्भवातील दैनंदिन चढ-उतार यांसारख्या गोष्टींवर भर दिला जाई. आधुनिक चिकित्सकांना पाश्चात्त्य वैद्यकातील विविध शाखांचे (शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान, विकृतिविज्ञान, औषधवैद्यक इ.) ज्ञान असणे आवश्यक समजले जाते. प्रमुख तंत्रिका, रक्तवाहिन्या, प्रत्येक प्रकारच्या इंद्रियामुळे कोणत्या ठिकाणी वेदना निर्माण होतात किंवा पसरतात, स्पर्श असह्यता कुठे निर्माण होते इ. विचार करुन चिकित्सक उपचारासाठी बिंदूंची निवड करतात. यिन-यांग प्रणालीनुसार शरीराच्या पृष्ठभागावर १४ प्रमुख रेखा (मेरिडियन) कल्पिल्या आहेत. त्यांपैकी यिन व यांगच्या प्रत्येकी सहा जोड्या (डाव्या व उजव्या बाजूस) असून, उरलेल्या दोन शरीराच्या मध्यभागी (एक छाती व पोटाच्या बाजूस आणि एक पाठीच्या बाजूस) असतात. त्यांचे नियंत्रक कार्य साधारणपणे असे असते :
यिन : हृदय, हृदयाचे आवरण, फुप्फुसे, प्लीहा, यकृत, वृक्क.
यांग : जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मूत्राशय, पित्ताशय.
मध्यरेखा : इतर रेखांच्या कार्यांवर नियंत्रण.
यांशिवाय प्रत्येक रेखेपासून निघणाऱ्या इतर उपरेखा असून त्यांच्यातही बिंदू असतात. त्यामुळे उपचारासाठी उपलब्ध बिंदूंची संख्या निरनिराळ्या लेखकांच्या मते तीनशेपासून हजारपर्यंत असू शकते. प्रत्यक्षात सु. १०० बिंदू महत्त्वाचे मानले जातात.
उपचारासाठी निवडलेल्या रेखेवरील तीन किंवा चार बिंदुंवर सुया टोचल्या जातात. टोचलेली सुई २–३० मिनिटे तशीच ठेवून नंतर काढली जाते. अशा प्रकारची अनेक सत्रे थोड्याथोड्या दिवसांच्या अंतराने केल्यावर हळूहळू प्रभाव दिसू लागतो. साधारणपणे ६–८ सत्रांमध्ये उपचार पूर्ण होतो. दीर्घकालिक व ऱ्हसनी विकारांसाठी वर्षातून ३-४ वेळा उपचार सत्रांची पुनरावृत्ती करावी लागते. रक्ततपासणीसारख्या आवश्यक त्या परीक्षणांच्या मदतीने प्रगती पाहून पुन्हा उपचार करायचे किंवा त्यात फेरफार करायचे असल्यास ते कसे करावेत हे चिकित्सक ठरवू शकतात.
पारंपरिक पद्घतीत त्वचेच्या व अधस्त्वचीय ऊतकाच्या खाली सुईचे टोक पोहोचेल अशा बेताने काही सेंमी. पर्यंत सुई आत खुपसली जाते. या पद्घतीत अनेक बदल करता येतात. उदा., किमान (न्यूनतम) पद्घतीत सुई केवळ १-२ मिलिमीटरच आत घालतात विद्युत् सूचिचिकित्सेत सुईच्या बाहेरच्या टोकाला सौम्य विद्युत् प्रवाह जोडलेला असतो सूचिदाब पद्घतीत बिंदूच्या ठिकाणी सुईच्या ऐवजी बोटाने किंवा बोथट उपकरणाने केवळ दाब दिला जातो ज्वलन पद्घतीत सुई टोचण्यापूर्वी त्या ठिकाणी औषधी चूर्णाचा शंकू जाळून बिंदूच्या परिसरात उष्णता निर्माण केली जाते. याखेरीज केवळ कानाच्या बाहेरच्या बाजूस (कानाच्या पाळीवर) दाब देऊनही संपूर्ण शरीरावर उपचार होत असल्याचा दावा काही चिकित्सक करतात. प्रतिक्षेपशास्त्र या पद्घतीत संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त बिंदू (दाब देण्यासाठी ) हात व पाऊल एवढ्याच पृष्ठभागांवर एकवटलेले आहेत, असे मानते.
उपयुक्तता : सूचिचिकित्सेने डोकेदुखी, अर्धशिशी, स्नायूंमधून निर्माण झालेल्या वेदना, पाठदुखी, मान दुखणे यांसारख्या विविध वेदनांपासून आराम मिळू शकतो. श्वसनी दमा, मळमळणे यांसारख्या वेदना नसलेल्या परिस्थितीतही अनेक रुग्णांना उपयोग झालेला आढळतो. परंतु तीव्र व अल्पकालिक जंतुसंकाम्रणांमुळे निर्माण झालेला शोथ (दाहयुक्त सूज) कितपत नियंत्रणात येऊ शकतो याबद्दल शंका आहे. तसेच चेहऱ्यावरील वेदना, मानेचे मणके व त्यांमधील कूर्चा यांच्या विकारातून उद्भवणारी वेदना यांच्यापासूनही पूर्ण आराम मिळेल अशी खात्री देता येत नाही.
उपचारांपासून अपाय होण्याची शक्यता फारशी नसते. सुई टोचल्यामुळे घेरी येणे किंवा भीतीमुळे अस्वस्थता जाणवणे यांसारखे परिणाम रुग्णास विश्वासात घेऊन आणि या पद्घतीची नीट माहिती देऊन टाळता येतात. शरीररचनेचे पूर्ण ज्ञान नसलेल्या उपचारकर्त्याकडून अंतर्गत इंद्रियांस इजा होणे, रक्तवाहिनी फुटणे, तंत्रिकेस इजा झाल्याने पक्षाघात होणे असे अपघात क्वचित प्रसंगी होऊ शकतात. तसेच सुयांच्या निर्जंतुकीकरणात हयगय केल्यामुळे एचआयव्ही, कावीळ किंवा अन्य संक्रामणाची शक्यता नाकारता येत नाही. एकदा वापरुन टाकून देण्यासारख्या सुया वापरुन हा धोका टाळता येतो. या सर्व अपायांची शक्यता लक्षात घेऊन सूचिदाब चिकित्सा (ॲक्युप्रेशर) ही पद्घत अधिक लोकप्रिय होत आहे. यातील काही उपचार रुग्ण किंवा त्याचे आप्तही थोड्या प्रशिक्षणानंतर करु शकतात. त्यातील उपचारांचा प्रतिबंधक परिणामही आकर्षक वाटतो. विशिष्ट प्रकारे मर्दन करणे आणि त्वचेवर पसरट विद्युत्-अग्रे ठेवून त्याद्वारे आतील तंत्रिका ऊतकांचे उत्तेजन घडवून आणणे (त्वचापार विद्युत् उद्दीपन) या पद्घतीही सूचिचिकित्सेला पर्यायी, परंतु त्याच तत्त्वावर आधारित असल्यामुळे वापरल्या जातात.
पहा : चिकित्साशास्त्र विद्युत् चिकित्सा.
संदर्भ : 1. Bowsher, D. The Mechanism of Acupuncture in Medical Acupuncture, A Western Scientific Approach, Edinburgh, 1998.
2. Munafo, M. Trim, J. Chronic Pain, A Handbook for Nurses, Oxford, 2000.
3. परांजपे, आ. श्री. आधुनिक वैद्यकशास्त्राचा इतिहास, पुणे,१९७२.
श्रोत्री, दि. शं.
“