सुरवंट : लेपिडॉप्टेरा गणातील कीटकांच्या ज्या अळ्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना सुरवंट किंवा केसाळ अळ्या म्हणतात. बहुतेक प्रकारचे सुरवंट आर्कटिडी व लायमेंट्रिडी या कुलांत मोडतात. इतर कुलांतील काही प्रकारच्या कीटकांच्या अळ्यांच्या अंगावर कमी-जास्त प्रमाणात केस असतात परंतु सुरवंटावरील केस सर्व अंगावर दाट व लांब असतात. त्यांचे रंगही विविध प्रकारचे आणि आकर्षक असतात. या केसांचा उपयोग भक्ष्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी व बऱ्याच जातींमध्ये कोशावरण तयार करण्यासाठी होतो. बऱ्याच प्रकारच्या सुरवंटांच्या केसांच्या ग्रंथींतून विषारी पदार्थ बाहेर पडत असतो, यामुळे सुरवंट अंगावर घासल्यास अंगाची आग होते व फोड येतात.

या कीटकांचे पतंग मध्यम आकाराचे व मजबूत असून निशाचर असतात. अंडी बहुधा पुंजक्याने पोषक झाडांच्या पानांवर घातली जातात. काही जातींत मातीच्या ढेकळांवरही अंडी घातली जातात. अंडी 4—8 दिवसांत उबून अळ्या बाहेर पडतात. अळ्या अत्यंत खादाड असून त्या पानांच्या खालच्या बाजूचा हिरवा भाग खातात. बऱ्याच वेळा अळ्या संपूर्ण झाड पानविरहित करतात. अळी अवस्था ३–६ आठवड्यांची असते. त्या जमिनीत कोषावस्थेत राहतात व ही अवस्था सुमारे एक आठवड्याची असते.

सुरवंटांच्या बऱ्याच जाती पिकांना उपद्रव देणाऱ्या आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाच्या जातींची माहिती पुढे थोडक्यात दिली आहे : डाया-क्रिसिया ऑब्‌लिका या जातीच्या अळीला बिहार केसाळ अळी असेही म्हणतात.तिचा उपद्रव कापूस, ज्यूट, ताग, वाटाणा, एरंड, कोबी, लसूण-घास, मका, बाजरी, भुईमूग इ. पिकांना होतो. बंगाल, बिहार, ओडिशा आणि आसाम या राज्यांत ही ज्यूटवरील अत्यंत उपद्रवी कीड आहे. काही ठिकाणी डा.निग्रिफ्रॉन्स ही जातीही आढळून येते. ॲम्‌सॅक्टा मूरेई आणि ॲ. आल्बीस्ट्रीगा या जातींना तांबड्या केसाळ अळ्या म्हणतात. या अळ्यांचा उपद्रव कापूस, भुईमूग, चवळी, ज्वारी, बाजरी, एरंड इ. पिकांना होतो. युटेथेसा पलचेला हीसुद्घा तागावरील एक महत्त्वाची उपद्रवी जाती आहे. वेलचीवर अल्फी बिगुटॅटा आणि रताळी, एरंड, वांगी, कापूस, भोपळे इ. पिकांवर पेरिकॅलिया रिसिनी या जातीच्या उपद्रवी केसाळ अळ्या आढळतात. यूरोप व अमेरिका येथील प्रदेशांत अत्यंत उपद्रवी असलेल्या जिप्सी मॉथ, नन मॉथ, ब्राउन टेल मॉथ व गोल्ड टेल मॉथ या कीटकांच्या अळ्या सुरवंटात मोडतात. एरंडावरील युप्रोक्टीस फ्रॅटर्ना आणि गुलाब, कापूस, आंबा, ताग, चवळी इ. पिकांवरील पोरथेसिया सिन्टिलान्सनोटोलोफस पोस्टीकस या जातींच्या अळ्याही सुरवंटात मोडतात. तसेच बोरावरील थायॲसीडस पोस्टीका, द्राक्षावरील युप्रोक्टीस फ्रॅटर्नायु. ल्युनॅटा आणि दालचिनी व मसाला पिकावरील लेनोडेरा व्हिटॅटा इ. अळ्यांचा समावेशही सुरवंटात करतात.

या किडीचे नियंत्रण करण्यासाठी १०% बीएच्‌सी भुकटी हेक्टरी २० किग्रॅ. या प्रमाणात फवारतात.

संदर्भ : Nayar, K. K. Ananthkrishnan, T. N. David, B. V. General and Applied Entamology, New Delhi, 1976.

पोखरकर, रा. ना.