खोडमाशी :  या किडीचा उपद्रव मुख्यत्वेकरून ज्वारीच्या पिकाला होतो. याशिवाय गवताच्या बऱ्याच जातींना तसेच गहू, मका, बाजरी इ. पिकांवरही ही कीड आढळते. अलीकडेच म्हणजे संकरित ज्वारीची लागवड सुरू झाल्यापासून या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ लागला आहे, कारण या जाती किडीच्या उपद्रवास लवकर बळी पडतात. महाराष्ट्रात ज्वारीच्या पिकाला अथेरिगोना इंडिका या जातीच्या खोडमाशीचा उपद्रव होतो.

ही माशी साध्या माशीसारखी पण थोडी लहान म्हणजे ३-४ मिमी. लांब असते आणि शरीरावर गर्द ठिपके असतात. अळी फिकट पिवळसर रंगाची असून तिला पाय नसतात व ती तोंडाकडे निमुळती होत जाते.

मादी पानांच्या पाठीमागे चिरूटाच्या आकाराची लांबट पांढरी अंडी, एकेक अशी घालते. ती १-२ दिवसांत उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या खोडात शिरून आतला भाग खातात त्यामुळे मधला पोंगा वाळून जातो. या उपद्रवामुळेच या किडीला खोडमाशी म्हणतात. एका आठवड्यात अळ्या पूर्ण वाढून खोडातच कोषावस्थेत जातात. सु. ८–१० दिवसांत कोषातून माशा बाहेर पडतात. हंगामात या किडीच्या बऱ्याच पिढ्या पूर्ण होतात.

या किडीचा उपद्रव पीक लहान असताना म्हणजे साधारणपणे पेरणीपासून ३० ते ४० दिवसांतच होतो. उपद्रवामुळे मधला पोंगा जळाल्याने झाडाला फुटवे येतात. या फुटव्यांवरही या किडीच्या पिढ्या उपजीविका करतात. या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी खरीप पेरणी पाऊस सुरू होताच १० ते १५ दिवसांत पूर्ण करतात. पेरणीसाठी बी थोडे जास्त वापरतात. तसेच किडीने पोंगा जळालेली खोडे कापून त्यांचा नाश करतात. संकरित ज्वारीसाठी पेरणीच्या वेळी १० टक्के दाणेदार थायमेट हेक्टरी २० किग्रॅ. जमिनीत टाकतात. तसेच २० टक्के द्रव एंड्रिनाची नियमित फवारणी करतात.

तलगेरी, ग. मं.