सुरमा नदी : भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५ २८’ उत्तर अक्षांश व ९४ १८’ पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो.

सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते.

सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत.

गाडे, ना. स.