सुतार पक्षि : पिसिडी पक्षिकुलातील एक देखणा पक्षी. या पक्ष्याच्या ४-५ जाती भारतात आढळतात. त्यांपैकी सोनेरी पाठीचा सुतार पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. याचे शास्त्रीय नाव डायनोपियम बेंगॉलेन्सिस असे आहे. जंगलांत, झाडाझुडपांत, आमराईत व फळझाडांच्या किंवा नारळीच्या बागांत याचा वावर जास्त असतो.
सुतार पक्षी साळुंकीपेक्षा मोठा व कावळ्यापेक्षा काहीसा लहान असतो. डोक्याचा माथा किरमिजी रंगाचा आणि त्याच्या दोन्ही बाजू पांढऱ्या व त्यांवर काळ्या रेषा असतात. डोक्यावर किरमिजीरंगाचा तुरा असतो. चोचीखालचा भाग, गळा व मानेचा पुढचा भाग काळा असून त्यावर पांढरे ठिपके असतात. पाठीचा पुढचा भाग सोनेरी व मागचा भाग काळा असतो. शेपटी ताठ व काळी पंख सोनेरी, त्याच्या कडा काळ्या आणि खालची बाजू बदामी-पांढरी व तिच्यावर काळ्या रेषा असतात. मादी नरासारखीच दिसते परंतु तिच्या माथ्याचा पुढचा अर्धा भाग काळा असून त्यावर पांढरे ठिपके असतात व त्याच्या मागे किरमिजी रंगाचा तुरा असतो. चोच लांब, मजबूत व धारदार असते. जीभ बारीक व लांब असते तिचे टोक कठिण व चिकट असून त्यावर आकड्यांसारखे पुष्कळ काटे असतात.
सुतार पक्षी बहुधा झाडांवरच असतो. पायाच्या बोटांवर असलेल्या अणकुचीदार नखांनी खोडाला घट्ट धरुन तो झरझर वर चढून जाऊ शकतो. खोडावर तो सरळ चढत नाही खोडाभोवती मळसूत्राप्रमाणे वळणे घेत तो वर जातो व शेंड्यावर पोहोचल्यावर उडून दुसऱ्या झाडाच्या खोडावर जाऊन बसतो. झाडावर चढत असताना चोचीने सालीवर भराभर घाव घालून तो ती फोडून काढतो आणि तिच्या खालचे किडे खातो. सालींमधील भेगात आपली लांब जीभ खुपसून तिला चिकटलेले किडे तो खातो. याचे प्रमुख अन्न मुंग्या आहे व त्या टिपण्याकरिता तो कधीकधी जमिनीवरही उतरतो. तो पिकलेल्या फळांतील मगज आणि फुलांतील मधही खातो.
झाडाचे खोड किंवा फांदी पोखरुन हा घरटे तयार करतो. घरट्यात जाण्याकरिता एक वाटोळे छिद्र असून ते जमिनीकडे असते. मार्च ते ऑगस्टपर्यंत याचा विणीचा हंगाम असतो. मादी चकचकीत पांढऱ्या रंगाची तीन अंडी घालते. घरटे तयार करणे, अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर व मादी दोघेही करतात.
कर्वे, ज. नी.
“