सीमाँ, क्लोद : (१० ऑक्टोबर १९१३— ). फ्रेंच कादंबरीकार. जन्म तानानारीव (अँतनॅनरीव्हो), मादागास्कर येथे. पॅरिस, ऑक्सफर्ड आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने विपुल प्रवास केला आणि पुढे दुसऱ्या महायुद्घात तो जर्मनांविरुद्घ लढला. १९४० मध्ये तो जर्मनांकडून पकडला गेला तथापि पलायन करून त्यांच्या तावडीतून सुटण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर जर्मनांचा प्रतिकार करणाऱ्या फ्रेंचांच्या चळवळीत तो सामील झाला. दुसरे महायुद्घ चालू असतानाच त्याने १९४० मध्ये झालेल्या फ्रान्सच्या पाडावावरील ‘द ट्रिक्स्टर’ (१९४५, इं. शी.) ही कादंबरी लिहून पूर्ण केली. स्पॅनिश यादवी युद्घातही त्याने भाग घेतला होता. पुढे तो दक्षिण फ्रान्समध्ये स्थायिक झाला आणि तेथे त्याने द्राक्षांचे मळे तयार करणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या उद्योगात लक्ष घातले.

 

त्याच्या कादंबऱ्यांत— सर्व इं. शी.— ‘द विंड’ (१९५७) स्पॅनिश यादवी युद्घावर आधारलेल्या ‘द टाउट रोप’ (१९४७) आणि ‘द क्राउनिंग ऑफ स्प्रिंग’ (१९५४) ह्यांचा समावेश होतो. ह्यांशिवाय ‘द ग्रास’ (१९५८), ‘द फ्लँडर्स रोड’ (१९६०), ‘द पॅलेस’ (१९६२) आणि ‘हिस्टरी’ (१९६७) ही कादंबरीमालिकाही त्याने लिहिली. ‘द बॅटल ऑफ फार्सेलस’ (१९६९) आणि ‘ट्रिपटिक’ (१९७३) ह्या त्याच्या उत्तरकालीन कादंबऱ्या.

 

क्लोद सीमाँ हा फ्रेंच साहित्यातील नव-कादंबरीचा एक ठळक प्रतिनिधी. दुसऱ्या महायुद्घानंतर साहित्याची अभिव्यक्ती, तंत्र आणि साहित्यिक मूल्ये ह्यांचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता फ्रेंच साहित्यिकांना जाणवू लागली. त्यातून फ्रेंच कादंबरीने नवे रुप घेतले. सीमाँच्या कादंबऱ्यांची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीत संज्ञाप्रवाहाचे तंत्र वापरलेले आहे. तसेच कुठल्याही विरामचिन्हांवाचून येणारी दीर्घ— हजार शब्दांचीही — वाक्ये आहेत. पुढे जाणाऱ्या जीवनाची गती आपल्या शैलीत पकडण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो.

 

१९८५ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करण्यात आले.

 

कुलकर्णी, अ. र.