सिव्हॅस्तपोलचा

सिव्हॅस्तपोल : (सेव्हॅस्टोपोल). रशियातील काळ्या समुद्रातील एक नैसर्गिक बंदर, शहर व नाविक तळ. ते युक्रेनियन प्रजासत्ताकातील क्रिमियाच्या नैर्ऋत्य टोकास सिव्हॅस्तपोल उपसागरात एका अरुंद खाडीवर (इनलेट) वसले आहे. पूर्वी ते सिबॅस्तपोल या नावाने ज्ञात होते. लोकसंख्या ३,७९,२०० (२००७). सांप्रत शहराची मुख्य वस्ती ही उपसागर आणि त्याची शाखा यांमधील उतारावर आहे. आधुनिक शहराच्या पश्चिमेस इ. स. पू. सहाव्या-पाचव्या शतकांत कर्सनिसची ग्रीक वसाहत होती. स्ट्रॅबो या इतिहासकाराच्या मते या वसाहतीभोवती भक्कम तटबंदी असून तीत प्रजासत्ताक पद्घती प्रचलित होती. त्यानंतर पर्थियाच्या सहाव्या मिथ्रिडेटीझ उपटॉर (कार. १२०— ६३) या राजाने त्यावर आधिपत्य मिळविले. रोमनांबरोबर त्याची तीन युद्घे (मिथ्रिडेटिक वॉर्स) होऊन अखेर रोमन साम्राज्याच्या अधिसत्तेखाली हा प्रदेश गेला. कीव्हच्या पहिल्या व्लादिमिर (कार. ९८०— १०१५) राजाने यावर अंमल बसविला. त्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली (९८९). रशियन भूमीवर राज्य करणारा हा पहिला ख्रिस्ती राजा होय. पंधराव्या शतकात दुसरा मुहम्मद (१४३०— ८१) या ऑटोमन सम्राटाने क्रिमिया जिंकून या ठिकाणी उत्तरेला अखत्यार नावाची छोटी वसाहत स्थापन केली. त्यानंतर रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट (कार. १७६२— ९६) हिच्या कारकीर्दीत रशियन सैन्याने क्रिमिया पादाक्रांत केला (१७८३). तेव्हापासून तो प्रदेश रशियाच्या आधिपत्याखाली आला. रशियन मुत्सद्दी जी. ए. पट्योम् क्यिन याने काळ्या समुद्रावर रशियन सत्तेच्या संरक्षणार्थ ही जागा नाविक तळासाठी निवडली (१७८४). तिथे नवीन नगर वसवून त्यास सिव्हॅस्तपोल (ऑगस्ट सिटी — भव्य व उदात्त) हे नाव दिले. पुढे १८०५ मध्ये ते वाणिज्य बंदर म्हणून कार्यान्वित झाले. बंदराची बांधणी ॲड्‌मिरल एम्. पी. लाझारेव्ह या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली झाली. क्रिमियन युद्घाच्या काळात (१८५३— ५६) इंग्रज व फ्रेंच सैन्याने त्यास वेढा दिला. अकरा महिन्यांच्या घनघोर युद्घानंतर अभेद्य मॅलखफ किल्ला त्यांनी सर केला. या युद्घात नगर, बंदर व किल्ल्याचे अपरिमित नुकसान झाले. रशियाने १८७१ मध्ये त्याची पुनर्बांधणी केली. नगरात १८७५ मध्ये रेल्वे आली आणि व्यापारास चालना मिळाली. १८९० मध्ये बंदराचा नाविक लष्करी तळ म्हणून विकास करण्यात आला. काळ्या समुद्रात शत्रूवर देखरेख करण्यासाठी ते रशियास आवश्यक वाटले. दुसऱ्या महायुद्घात (१९३९—४५) जर्मनीने ते हस्तगत केले (१९४२) परंतु १९४४ मध्ये जर्मनीचा पराभव झाल्यानंतर पुन्हा त्याचे नाविक तळ व बंदर म्हणून महत्त्व वाढले.

सिव्हॅस्तपोल शहरात जहाजबांधणी व दुरुस्ती हा मोठा उद्योग चालतो. तसेच फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती होते. शिवाय अन्नप्रक्रिया उद्योगही चालतो. शहरातील आग्नेयीस असलेला मॅलखफ किल्ला सुस्थितीत अवशिष्ट आहे. तसेच एक संग्रहालय (१९०५) येथे असून, एफ्. ए. रुबी या प्रसिद्घ चित्रकाराने चितारलेला ११३ मी. लांबीचा क्रिमियन युद्घातील वेढ्याच्या प्रसंगाचा पूर्ण देखावा एका स्वतंत्र वास्तूत ठेवला आहे.

पहा : क्रिमिया क्रिमियाचे युद्घ.

निगडे, रेखा