सिल्व्हासा : भारतातील दाद्रा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी. लोकसंख्या २१,८९० (२००१). हे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांच्या मध्ये वसलेले शहर आहे. हे पश्चिम रेल्वेच्या वापी स्थानकापासून पूर्वेस १८ किमी.वर आहे. सिल्व्हासा हे नाव पोर्तुगीजांनी दिले आहे. पोर्तुगीज भाषेत ‘सिल्व्हासा’ म्हणजे घनदाट जंगलाचा भाग. १७७० मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून हा प्रदेश बळकावला, तेव्हा हा घनदाट जंगलाचा भाग होता. १९५४ मध्ये पोर्तुगीजांनी या प्रदेशावरील आपला मालकी हक्क सोडला. १९६१ मध्ये सातवा संघराज्यांतर्गत प्रदेश म्हणून दाद्रा व नगरहवेलीला मान्यता मिळाल्यानंतर सिल्व्हासा हे या राज्याचे प्रशासकीय ठिकाण झाले. येथील लोक गुजराती, मराठी, हिंदी, कोकणी, वारली इ. भाषा बोलतात.
सध्या सिल्व्हासा हे लहान-मोठे कारखाने असलेले औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्घ आहे. सिल्व्हासाजवळ पिपरिया येथील औद्योगिक वसाहतीत ५६ छोटी औद्योगिक केंद्रे असून त्यात मोटारीचे सुटे भाग, जंतुनाशके, प्रकाशीय काचा, अभियांत्रिकी माल, हातकागद, कापडी व नायलॉन फिती, दोर, ‘फोम’ रबराच्या वस्तू, प्रक्षालक, साबण,रासायनिक पदार्थ, कमावलेली कातडी, कौले, चष्म्याच्या फ्रेम्स, प्लॅस्टिकच्या वस्तू , मेणबत्त्या, बेकरी माल इ. महत्त्वाच्या उत्पादनांचे उद्योगधंदे आहेत. येथे उत्तम प्रतीच्या कापडाची निर्मिती होते. येथील कलाकुसरीचे रेशीम कापड विशेष प्रसिद्घ आहे.
जलसिंचन तसेच कारखाने व उद्योगधंद्याना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून दमणगंगा नदीवर सिल्व्हासा येथे ६६ किवॉ. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याची योजना मान्य झालेली आहे. त्याचा लाभ ६,८०० हे. क्षेत्रास होईल.
सिल्व्हासा येथे दिवाणी, जिल्हा व सत्र न्यायालये आहेत. तसेच येथे एक ग्रंथालय आणि २५ खाटांचे एक रुग्णालय आहे. रुग्णालयात क्ष-किरण सुविधा असून क्षय व कुष्ठरोगावरील उपचाराची विशेष सोय आहे. ‘अवर लेडी ऑफ पिटी’ हे पोर्तुगीजांची एकमेव निशाणी असलेले चर्च येथे आहे. दमणगंगा नदीवरील वंधारा उद्यान, खान्वेल येथील वनविहार पर्यटन संकुल तसेच जलक्रीडा संकुल आणि डियर पार्क इ. पर्यटनस्थळे सिल्व्हासाशी रस्त्यांनी जोडलेली आहेत.
कुंभारगावकर, य. रा.