सिलिमनाइट : निओसिलिकेट खनिज. याचे स्फटिक समचतुर्भुजी व सुईसारखे बारीक असून त्यांचे पुष्कळदा समांतर गट आढळतात. यांची अग्रे स्पष्ट नसतात [ ⟶ स्फटिकविज्ञान]. तंतुमय पुंजक्यांच्या रुपातही आढळत असल्याने याला फिबोलाइट असेही म्हणतात. रंग तपकिरी, फिकट हिरवा, पांढरा ⇨ पाटन (010) परिपूर्ण कठिनता ६-७ वि. गु. ३·२३ चमक काचेसारखी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी [ ⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. Al2SiO5. हे वितळत वा विरघळत नाही. कोबाल्ट नायट्रेट विद्रावाबरोबर सिलिमनाइटाचे सूक्ष्मकण निळे होतात. पाटन व पाटनाची एकदिशा यांमुळे हे वेगळे ओळखू येते.
सिलिमनाइट हे ॲल्युमिनियमयुक्त खडकांच्या प्रादेशिक रुपांतरणाने तयार होते. सापेक्षतः विरळा आढळणारे हे खनिज ⇨ सुभाजा व पट्टिताश्म यांसारख्या सर्वांत उच्च प्रतीच्या रुपांतरित खडकांत एक घटक म्हणून विखुरलेले आढळते. या खडकांत मृत्तिका विपुल प्रमाणात असते. मात्र संपर्क रुपांतरणात हे विरळाच आढळते. सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या खडकांत हे पुष्कळदा ⇨ कुरुविंदा बरोबर आढळते. सिलिमनाइट, अँडॅलुसाइट व कायनाइट ही Al2SiO5 या संघटनाची बहुरुपे असून ती ज्या खडकांत आढळतात, त्या खडकांची रुपांतरणाची प्रत या खनिजांवरुन कळते. कॉर्डिएराइट, कृष्णाभ्रक, अलमंडाइन (गार्नेट) ही खनिजे सामान्यपणे सिलिमनाइटाशी निगडित आहेत.
बोहीमिया, ऑस्ट्रियन टायरोल, बव्हेरिया, सॅक्सनी, ब्राझील, फ्रान्स, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इ. प्रदेशांत सिलिमनाइट आढळते. श्रीलंकेतील रेतीमध्ये फिकट निळ्या रंगाचा याचा रत्न प्रकार (नील) आढळतो. भारतात हे खासी टेकड्या (आसाम), सिंगभूम (बिहार), रेवा (मध्य प्रदेश), भंडारा (महाराष्ट्र) व कर्नाटक येथे आढळते. भारतात हे मुख्यतः आर्कीयन सुभाजा व पट्टिताश्म यांमध्ये विखुरलेले आढळते. मृत्तिका व काच उद्योगांमध्ये हे वापरतात. उच्चतापसह द्रव्य असल्याने भट्ट्यांच्या अस्तरासाठी हे वापरतात.
येल विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक बेंजामिन सिलिमन (१७७९— १८६४) यांच्या गौरवार्थ या खनिजाला सिलिमनाइट हे नाव दिले आहे.
पहा : अँडॅलुसाइट कायनाइट.
ठाकूर, अ. ना.