पायरोक्सिनाइट: जवळजवळ सर्वस्वी पायरोक्सीन नावाच्या खनिजांचा बनलेला भरडकणी, गडद रंगाचा, अंतर्वेशी (घुसलेल्या राशीच्या रूपातील) अग्निज खडक. यात पायरोक्सीन खनिजे [उदा., ऑजाइट, हायपर्स्थीन, डायालेज, ब्राँझाइट, एन्स्टॅटाइट इ.→ पायरोक्सीन गट] ७० ते १००% असून कृष्णाभ्रक, हॉर्नब्लेंड, ऑलिव्हीन, क्रोमांइट, मॅग्नेटाइट, फेल्स्पार व क्वचित क्वॉर्टझ ही यातील गौण खनिजे अल्प प्रमाणात असतात. पैकी यातील फेल्स्पाराचे प्रमाण वाढल्यास गॅब्रो आणि ऑलिव्हिनाचे प्रमाण जास्त झाल्यास पेरिडोटाइट खडक बनतो.

पायरोक्सिनाइट सर्वसामान्य खडकांप्रमाणे राशीच्या रूपात आढळत नाही. तो समाविष्टे, शिलापट्ट (इतर खडकांत घुसलेल्या वडीसारख्या आडव्या राशी), लोपोलिथ (द्रोणीसारखा तळ असलेल्या अग्निज राशी), शाखायुक्त शिरा, अरुंद भित्ती (भेगांमध्ये घुसलेल्या वडीसारख्या अग्निज राशी) इत्यादींच्या रूपांत व इतर घुसलेल्या अग्निज राशींच्या (प्लूटॉनांच्या) कडांशी हा आढळतो. तसेच गॅब्रोच्या मोठ्या राशींतही हा अँनार्थोसाइट आणि पेरिडोटाइट या खडकांच्या जोडीने आढळतो. असा खडक गॅब्रोसारखे संघटन असलेल्या शिलारसाचे भिन्नीभवन (स्थूल मानाने समांग रासायनिक संघटन असणाऱ्या शिलारसापासून भिन्न संघटनांचे खडक तयार होण्याची प्रक्रिया) आणि स्फटिकीभवन होऊन तयार होतो. क्लिनोपायरोक्सिनाइट (ऑजाइट, डायालेज वा डायोप्साइड प्रमुख खनिज असलेले) खडकही शिलारसाच्या भिन्नीभवन व स्फटिकीभवनाने बनलेले असतात. पायरोक्सीन विपुल असणारे इतर काही खडक मात्र रूपांतरण आणि कायांतरण या प्रक्रियांद्वारे तयार झालेले असतात [→रूपांतरित खडक].

मुख्यत्वे ऑजाइट असलेल्या खडकाला सामान्यतः पायरोक्सिनाइटच म्हणतात मात्र इतरांना त्यांच्यातील पायरोक्सिनावरून नावे देतात उदा., डायोप्साइडावरून डायोप्सिडाइट, ब्राँझाइटावरून ब्राँझिटाइट, हायपर्स्थिनावरून हायपर्स्थिनाइट इत्यादी. तसेच मोनोक्लिनिक (एकनताक्ष) स्फटिक व्यूहातील पायरोक्सिनांवरून क्लिनोपायरोक्सिनाइट व ऑर्थोर्‍हाँबिक  (समचतुर्भुजी) स्फटिक व्यूहाच्या [→स्फटिकविज्ञान] पायरोक्सिनावरून ऑर्थोपायरोक्सिनाइट अशीही नावे पडली आहेत. शिवाय पायरोक्सिनांव्यतिरिक्त इतर खनिजांच्या विपुलतेनुसार कृष्णाभ्रकी पायरोक्सिनाइट, हॉर्नब्लेंडी पायरोक्सिनाइट इ. नावेही दिलेली आढळतात.

पिरेनीज पर्वत, बुशफेल्ट (द. आफ्रिका) इ. ठिकाणी पायरोक्सिनाइट आढळतो. भारतात तमिळनाडू आणि प. बंगालात हा चार्नोकाइट खडकांबरोबर आढळतो. उ. काश्मिरातही याचे स्कंद व खोडे आढळतात [→अग्निज खडक]. नेय्यूर (द. त्रावणकोर) आणि पुनालूरजवळ (केरळ) मॅग्नेशिया विपुल असलेले पायरोक्सिनाइट आढळतात.

काही ठिकाणच्या गॅब्रो व पायरोक्सिनाइट यांच्या राशी क्रोमियमाच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. पायरोक्सिनावरून पायरोक्सिनाइट नाव आले आहे.

ठाकुर, अ. ना.