सिमॅरुबेसी : (इं. क्वासिया फॅमिली सं. महानिंब कुल). फुलझाडांपैकी [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] काही वनस्पतींच्या एका कुलाचे शास्त्रीय नाव. ह्या कुलाचा अंतर्भाव ⇨ जॉन हचिन्सन यांनी ⇨ रुटेलीझ (सताप) या गणात केला असून त्यामध्ये सु. ३० प्रजाती व २०० जाती समाविष्ट आहेत त्याचा प्रसार मुख्यत्वेकरुन पृथ्वीवरील उष्ण प्रदेशांत झालेला आढळतो. बहुतेक वनस्पती झुडपे व वृक्ष असून त्यांच्या सालीत व लाकडात कडू द्रव्ये असतात. पाने बहुधा संयुक्त, क्वचित साधी, एकाआड एक, कधी उपपर्णे लवकर गळणारी आणि अनुपपर्णे (तळाशी उपांगे नसणारी) अशी असतात. होलॅकँथा ह्या प्रजातीत पाने नसतात पानांत तैल-प्रपिंडे (ग्रंथी) नसतात. फुले लहान, नियमित, द्विलिंगी क्वचित उपविकसनामुळे एकलिंगी संवर्त व पुष्प-मुकुट ३— ७ भागी केसरदले (पुं-केसर) तितकीच किंवा दुप्पट (बाहेरील मंडल पाकळ्यांसमोर व आतील त्यांच्याशी एकाआड एक) त्यांच्या तळाशी बहुधा खवल्यासारखे उपांग असते. किंजदले (स्त्री-केसर) बहुधा ४-५ व पूर्णपणे किंवा अंशतः जुळलेली असून ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा अंशतः वर जुळलेल्या किंजमंडलातील किंजपुटात अनेक कप्पे प्रत्येक कप्प्यात बहुधा एक बीजक (अपक्व बीज) असते. केसरमंडल व किंजमंडल यांच्यामध्ये विविध बिंब असते. फळ विविध प्रकारचे (आठळीयुक्त, शुष्क किंवा पंखधारी) असून बियांत पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) भरपूर, फार कमी किंवा त्याचा पूर्ण अभाव असतो. ह्या कुलातील काही जाती शोभेच्या वनस्पती म्हणून व काही उपयुक्ततेमुळे लागवडीत आहेत. उदा., ⇨ महारुख किंवा महानिंब, ⇨ हिंगण, ⇨ लोखंडी इत्यादी. ह्या कुलाचे इंग्रजी नाव ‘क्वासिया फॅमिली’ हे क्वासिया ह्या प्रजाती नामावरुन पडले आहे. भारतात क्वा. ॲमारा शोभेकरिता बागेत लावतात. क्वा. इंडिका (लोखंडी) ही जंगली वनस्पती आहे (सॅमॅडेरा इंडिका हे तिचे जुने नाव आहे).
पहा : रुटेलीझ.
संदर्भ : Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II,Cambridge, 1963.
परांडेकर, शं. आ.