सिद्घराम शिवयोगी : (बारावे शतक). एक थोर वीरशैव संत. जन्म सोन्नलगी (सोलापूर) येथे सुग्गलदेवी आणि मुद्दगौड ह्या शिवभक्तपरायण मातापित्यांच्या पोटी. धळीमहाकाळ हे सिद्घरामांचे मूळ नाव होते, असे म्हणतात तथापि पुढे ते सिद्घराम शिवयोगी, सिद्घरामेश्वर ह्या नावांनीच विख्यात झाले. बालपणापासूनच ते शिवभक्तीत निमग्न असत. असे सांगतात, की लहानपणी ते रानात घरची गुरे चरावयास घेऊन गेले असता अकस्मात त्यांच्या समोर एक जंगम प्रकटला आणि त्याने त्यांच्याकडे दहीभात मागितला. तो घरुन घेऊन ते रानात आले, तेव्हा तो जंगम तेथे नव्हता. तो जंगम म्हणजे श्री शैलमल्लिकार्जुन असावा, ह्या श्रद्घेने त्यांनी त्याचा खूप शोध घेतला, तरीही त्या जंगमाचे दर्शन न झाल्यामुळे नैराश्यमय अवस्थेत त्यांनी स्वतःला एका दरीत झोकून दिले. त्यावेळी प्रत्यक्ष मल्लिकार्जुनाने त्यांना तारले आणि दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा उपदेश केला. ह्या उपदेशाप्रमाणे ते आयुष्यभर वागले एका सत्पुरुषाचे जीवन जगले. चेन्नबसवांकडून त्यांनी गुरुदीक्षा घेतली होती. त्यांनी अनेक सार्वजनिक लोकोपयोगी कामे केली. सोलापूर येथील सिद्घेश्वर तलाव त्यांनीच बांधला. जातपात ते मानत नसत. समानत्वाच्या सिंहासनावर बसण्याचा मान त्यांना देण्यात आला होता. सोलापूर येथेच ते समाधिस्त झाले. त्यांनी कन्नडमध्ये मिश्रस्तोत्रविधि, बसवस्तोत्रत्रिविधि आणि अष्टावरणस्तोत्रत्रिविधि ह्या काव्यरचना केल्या. त्यांच्या वचनांच्या अखेरीस ‘कपिलसिद्घ मल्लिकार्जुन’ ही त्यांची मुद्रिका असते. त्यांच्याजीवनावर काही ग्रंथ व पुराणे रचिली गेली आहेत. त्यांत तेराव्या शतकातील ⇨ राघवांक ह्या वीरशैव कवीने रचिलेल्या सिद्घरामपुराण ह्या नऊ सर्गांच्या काव्याचा अंतर्भाव होतो. जयदेवीताई लिगाडे ह्यांचा श्रीसिद्घरामेश्वरपुराण हा ग्रंथही निर्देशनीय आहे. त्यांची स्मृती सोलापूर येथील सिद्घेश्वरमंदिराच्या रुपाने आजही आहे.

पाटील, म. पु.