दासगणू : (६ जानेवारी १८६८–२५ नोव्हेंबर १९६२). आधुनिक मराठी संतकवी. मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे. नगर जिल्ह्यातील अकोळनेर या गावी जन्म. शालेय शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी काही दिवस नोकरी केली. वामनशास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरू होते. त्यांचे पारमार्थिक गुरू शिर्डीचे साईबाबा हे होते. गुरूपदेशानंतर ते स्वतःला ‘दासगणू’ नावाने संबोधू लागले.

दासगणू हे प्रथमतः लावण्या, पोवाडे करीत पण गुरूच्या आज्ञेने त्यांनी कीर्तन व भक्तीपर वाङ्मय रचण्यास सुरुवात केली. त्यांची कीर्तने नावीन्यपूर्ण आहेत. दासगणूंची संतकवी म्हणून विशेष ख्याती आहे. ईशभक्ती, व्यावहारिक सूक्ष्म निरीक्षण व संतकाव्याचे दृढ संस्कार यांमुळे त्यांच्या काव्यास विविधता व उदात्तता प्राप्त झाली आहे. महीपतीप्रमाणे त्यांनी संतांची ओवीबद्ध चरित्रे लिहिल्यामुळे त्यांना ‘आधुनिक महिपती’ म्हणतात. संतांची चरित्रे लिहिताना ते त्या संतांची ऐतिहासिक माहिती गोळा करीत, कागदपत्रांचा अभ्यास करीत. एकनाथचरित्र, गजाननमहाराजचरित्र ही त्यांनी लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध आहेत. भक्तिरसामृत, भक्तलीलामृतसंतकथामृत हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. अमृतानुभव, भावार्थमंजरी, नारदभक्तिसूत्रबोधिनी, ईशावास्यबोधिनी हे त्यांचे प्रमुख ओवीबद्ध टीकाग्रंथ होत. यांव्यतिरिक्त त्यांनी पौराणिक कथा, स्तोत्रे, अष्टके, सुभाषिते, प्रासंगिक स्फुट कविता, कीर्तनोपयोगी आख्याने इ. वाड्मय लिहून ईशभक्तीचा प्रसार व प्रचार केला. मराठीमध्ये इतकी प्रचंड रचना करणारा कवी अलीकडच्या काळात क्वचित झाला असेल.

मिसार, म. व्यं.

Close Menu
Skip to content