अमिताभ : अमित आहे आभा (प्रकाश) ज्याची, अशा एका बुद्धाचे नाव. महायान पंथात अनेक बुद्धांचा आणि बोधिसत्त्वांचा प्रवेश झालेला आहे. सुखावती-व्यूह  नावाचे एक प्राचीन बौद्धसूत्र आहे. त्याचे चिनी भाषांतर दुसऱ्या शतकात झाले आहे. या सूत्रात अमिताभ बुद्धाला ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हटले आहे. मोक्षप्राप्ती किंवा बुद्धत्व-प्राप्ती सुगमतर करण्याच्या महायान पंथाच्या प्रयत्‍नात ह्या बुद्धाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ह्या बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्यास स्वर्गाचे स्थान  मोकळे झाले. पुढे पुढे तर केवळ ह्या बुद्धाला नमन केले किंवा त्यांचे नामस्मरण केले, तरी साधकाला आपल्या पापापासून मुक्तात मिळते व स्वर्गात स्थान मिळते, असा समज दृढ झाला. अमिताभ बुद्धाचे व्हिएटनाम, चीन व जपान देशांत महत्त्व विशेष वाढले असून, तेथे अद्यापही बौद्ध साधक अमिताभाच्या नावाने जपमाळ ओढीत असतात. हल्लीच्या जपानमधील ‘जोदो’ नावाचा बौद्ध संप्रदाय ह्याच तत्त्वावर आधारलेला असून, तो सर्वसाधारण समाजात अत्यंत लोकप्रिय झालेला आहे.

बापट, पु. वि.