सिद्घ : सिद्घ म्हणजे परिपूर्णावस्थेला पोहोचलेले अलौकिक पुरुष होत. सिद्घांच्या तीन परंपरा भारतात प्रसिद्घ होत्या : (१) बौद्घ सिद्घ, (२) नाथ सिद्घ आणि (३) दक्षिणेतले शैव सिद्घ.

बौद्घ सिद्घ : बहुतेक बौद्घ सिद्घ हे वज्र, मंत्र, सहज किंवा कालचक्र या यानांचे अनुयायी होते. वज्रयान हा भारतीय बौद्घ धर्मातील विकासाचा अखेरचा महत्त्वाचा टप्पा होय. येथे ह्याच संप्रदायातील सिद्घांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. भारतीय उपखंडात इ. स. च्या आठव्या ते बाराव्या शतकांदरम्यानच्या काळात वज्रयान संप्रदायाचा प्रभाव विशेष होता. ह्या काळात अनेक सिद्घ होऊन गेले. त्यांतील काहींचे गुरु-शिष्य नातेही होते. बाराव्या शतकातील अभयदत्त याने ८४ सिद्घांची यादी प्रसिद्घ केलेली आहे. तिबेटी परंपरेतही सिद्घांची संख्या तेवढीच-म्हणजे ८४-सांगितलेली आहे परंतु नावे ७८ सिद्घांचीच सांगितलेली आहेत.

बौद्घ सिद्घांची चरित्रात्मक माहिती आपल्याला मुख्यतः तिबेटी संहितांतून मिळते. मूळची सर्वसामान्य माणसे सिद्घावस्थेपर्यंत कशी पोहोचतात, ह्याचे दर्शन ह्या चरित्रांतून घडते. अनेक सिद्घांनी वज्रयान ह्या तांत्रिक यानाचे तिबेट, चीन आणि आग्नेय आशियातील देशांत भारतातून प्रसारण करण्यात ऐतिहासिक भूमिका बजाविलेली आहे. सिद्घांच्या चरित्रांत त्यांच्या जातीची नोंद केलेली असते. अनेक सिद्घ हे खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींतून आलेले दिसतात. बौद्घ धर्मात जातिपातींना महत्त्व नव्हते, ही बाब ह्या सिद्घांच्या चरित्रांतूनही अधोरेखित होते. आरंभी साधे, सामान्य जीवन जगणाऱ्या परंतु अंतरी एक प्रकारचे असमाधान असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या क्षणी एखादा तांत्रिक गुरु भेटतो आणि तो त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतो. पूर्वायुष्याने पोसलेला अहंकार नष्ट करण्यासाठी अनेक खडतर अनुभवांतून त्यांना जावे लागते आणि त्यानंतर ते सिद्घ होतात.

सिद्घांचे मरण हे रुढार्थाने मरण नसते. मृत्यूनंतर ते एका अदृश्य अवस्थेत जातात असे सांगितले जाते, तसेच सिद्घ हे मृत्यू न पावता एका स्वर्गीय जगात जातात आणि तेथून ते केव्हाही परत येऊ शकतात, असेही सांगितले जाते.

सिद्घांनी अनेक तांत्रिक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी रचलेले दोहे ही त्यांची एक महत्त्वाची निर्मिती होय. वज्रयान पंथाच्या तांत्रिक बौद्घ सिद्घाचार्यांनी मागधी अपभ्रंश भाषेत रचलेल्या गीतांचा ⇨ बौद्घ गान ओ दोहा हा संग्रह, तसेच चर्यागीति वा चर्यापदे (गूढाचार गीते) प्रसिद्घ आहेत. एका तिबेटी ग्रंथात भारतीय सिद्घांनी रचलेल्या सहाशे ग्रंथांची यादी आहे. अन्य तिबेटी ग्रंथांतही भारतीय बौद्घ ग्रंथांच्या संहिता आहेत. शुभाकरसिंह, वज्रबोधि आणि अमोघवज्र हे आठव्या शतकात चीनमध्ये गेले होते आणि त्या देशात त्यांनी वज्रयान संप्रदाय नेला पण तो तिथे फारसा टिकला नाही. वज्रयान सिद्घांनी आग्नेय आशियातही हा संप्रदाय नेला आणि तेथे त्यांनी केलेल्या कार्याच्या खुणा जावा, सुमात्रा आणि कंबोडिया येथे आढळतात.

नाथ सिद्घ : नाथ संप्रदाय हा एक महत्त्वाचा भारतीय शैव संप्रदाय आहे. ह्याचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी सांप्रदायिक समजूत असल्यामुळे त्यास ⇨ नाथ संप्रदाय असे म्हणतात. आदिनाथ शिव हे संप्रदायाचे मूळ प्रवर्तक मानले जात असले, तरी ⇨ मच्छिंद्रनाथ हेच नाथ संप्रदायाचे पहिले मानवी गुरु होत. नाथपंथाचा उल्लेख ‘सिद्घपंथ’ असाही केलेला आढळतो. नाथ सिद्घांची संख्या बौद्घ सिद्घांप्रमाणेच ८४ मानली जाते. ८४ सिद्घ ही सिद्घांची संख्या मूळची वज्रयानी परंपरेतील असून नाथ संप्रदायाला नावारुपाला आणणारे गोरखनाथ वा गोरक्षनाथ ह्यांच्या प्रभावामुळे वज्रयान्यांचे अनेक समूह नाथपंथात प्रविष्ट झाले. त्यांनी आपल्या वज्रयानी पूर्वपरंपरेतील सिद्घ पुरुषांची आणि नंतर स्वीकारलेल्या नाथपंथातील सिद्घांची नामावली एकमेकांत मिसळली आणि नवनाथांप्रमाणेच नाथपंथाचीही विवक्षित सिद्घगणना सुरु झाली, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. संतपरंपरेतील नामदेव, एकनाथ अशा संतांनीही आपल्या अभंगांतून ८४ अशी नाथ सिद्घांची संख्या दिलेली आहे. तथापि वर्णरत्नाकरातून संक्रलित केलेल्या नाथपंथीय सिद्घांची संख्या ७६ दिसते. शिवदिन मठाच्या संग्रहातील यादीत ७७ सिद्घांची नावे अंतर्भूत आहेत तत्त्वसारात ९४ सिद्घनामे दिसतात, तर हठयोगप्रदीपिकेतील सिद्घनामावळी २९ सिद्घांपुरतीच मर्यादित आहे. जालंधरनाथ, कृष्णपाद, चौरंगीनाथ, चर्पटीनाथ आणि भर्तृहरी हे काही प्राचीन नाथसिद्घ होत.

जालंधरनाथ हा मत्स्येंद्रनाथांचा गुरुबंधू (तिबेटी परंपरेप्रमाणे मत्स्येंद्रनाथांचा गुरु). पंजाबातील जालंधर- पीठनामक तांत्रिक पीठात ह्याचा जन्म वा साधना झाली असावी. स्कंदपुराणातील नवनाथवर्णनात जालंधराचा निर्देश आढळतो. वर्णरत्नाकरातील सिद्घांच्या सूचीत जालंधरनाथ एकोणिसावा आहे, तर वज्रयानी सिद्घांच्या यादीत तो सेहेचाळीसावा आहे (जालंधरपा). कृष्णनाथ हा जालंधराचा प्रमुख शिष्य होता. कण्हपा, कान्हपा, कानपा, कानफा ही ह्याचीच पर्यायी नावे. एक कवी आणि विद्याव्यासंगी पंडित ह्या दोन्ही दृष्टींनी ८४ नाथसिद्घांत तो सर्वश्रेष्ठ होता. ह्या सिद्घांमध्ये त्याचे ७ शिष्य होते. त्यामध्ये कनखला व मेखला ह्या योगिनींचा समावेश होतो. म. म. हरप्रसाद शास्त्री ह्यांच्या प्रतिपादनानुसार ह्याचे ५७ ग्रंथ आणि १२ संकीर्तनपदे उपलब्ध आहेत. चौरंगीनाथ हा मत्स्येंद्रनाथांचा शिष्य. हातपाय तुटलेला चौरंगीनाथ हा बारा वर्षे ध्यानावस्थेत राहून सिद्घ झाला आणि त्याला त्याचे हातपाय पुन्हा मिळाले, अशी ह्याची कथा सांगितली आहे. श्रीज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी च्या अठराव्या अध्यायात स्वतःची गुरुपरंपरा सांगताना चौरंगीनाथाचा निर्देश ‘भग्नावयवा चौरंगी’ असा केला आहे. वर्णरत्नाकरातील सिद्घांच्या नामावळीत चर्पटीनाथाचे नाव आहे. वज्रयान सिद्घांच्या यादीत एकोणसाठावा सिद्घ चर्पट (चवरिचा) आहे. तसेच हठयोगप्रदीपिकेतील सिद्घांच्या यादीत सोळावे नाव चर्पटीनाथाचे आहे. त्याच्या चतुर्भवाभिवासनाक्रम ह्या ग्रंथाचा तिबेटी अनुवाद उपलब्ध आहे. भर्तृहरी म्हणूनही एक नाथसिद्द आहे, पण हा भर्तृहरी वैराग्यशतक, शृंगारशतक आणि नीतिशतक लिहिणारा भर्तृहरी नव्हे. नाथसिद्घ भर्तृहरी हा गोरखनाथांचा शिष्य. ह्याच्याबद्दल दंतकथा आहेत, पण ऐतिहासिक माहिती मिळत नाही.

शैव सिद्घ : दक्षिण भारतातही एक सिद्घपरंपरा होऊन गेली आहे. ती मुख्यतः तमिळनाडूमध्ये प्रभावी होती. त्यांची उपास्य देवता शिव हीच होती. अनेक प्रकारचे चमत्कार हे सिद्घ करीत. वैद्यक, तसेच मंत्रतंत्र ह्यांत ते प्रवीण होते. तमिळनाडूमधील अठरा सिद्घांची नावे तायुमानवर ह्या ग्रंथकाराच्या सिद्घरगणम् ह्या ग्रंथात दिलेली आहेत. दक्षिणेतल्या शैव सिद्घांनी वैद्यक, नक्षत्रविज्ञान, हठयोग ह्या विषयांवर मुख्यत्वे लिहिले आहे. त्यांची भाषा जनतेच्या व्यवहारातली होती. त्यांचे बरेचसे ग्रंथ नष्ट झाले आहेत मात्र त्यांची नीतिवचने आजही तमिळ लोकांच्या तोंडी असतात.

संदर्भ : 1. Eliade, Mircea, Ed., The Encyclopaedia of Religion, New York, 1987.

२. जोशी, मधुकर रामदास, नाथसंप्रदाय, पुणे, १९८०.

३. ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.

कुलकर्णी, अ. र.