सिडेराइट : हे लोखंडाचे एक खनिज असून त्याचे स्फटिक सामान्यतः समांतर षट्फलकीय (विषम त्रिभुजफलकी) असून पुष्कळदा स्फटिकांची पृष्ठे वक्र असतात [ ⟶ स्फटिकविज्ञान]. हे गोलसर,संघिते, पाटनक्षम कण, गुच्छाकार, संहत व मातकट रुपांतही आढळते. ⇨ पाटन (1011) परिपूर्ण कठिनता ३·५– ४ वि. गु. ३·९६ (शुद्घ प्रकाराचे) मॅग्नेशियम व मँगॅनीज यांच्यामुळे वि. गु. कमी होते. चमक काचेसारखी रंग बहुधा फिकट ते गडद तपकिरी, तसेच करडा वा फिकट हिरवा पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी [ ⟶ खनिज-विज्ञान]. रा. सं. FeCO3. यात लोहाच्या जागी मँगॅनीज व मॅग्नेशियम आणि क्वचित कॅल्शियम येते. याची रोडोक्रोसाइट (MnCO3) व मॅग्नेसाइट (MgCO3) यांच्यापर्यंतची समरुपता मालिका असते.
सिडेराइट सहजपणे वितळत नाही. तापविल्यावर हे तीव्र चुंबकीय होते. बंद नळीत तापविल्यास याचे अपघटन होऊन काळा चुंबकीय अवशेष मागे राहतो. तप्त हायड्रोक्लोरिक अम्लात हे विरघळून फसफसण्याची क्रिया घडते. याचा रंग आणि कमी वि. गु. यांच्यामुळे हे इतर कार्बोनेटी खनिजांपेक्षा वेगळे ओळखता येते.
पुष्कळदा हे मृत्तिकेत मिसळलेल्या संकेंद्री स्तरयुक्त संघितांच्या म्हणजे क्ले आयर्न स्टोन रुपात आढळते. मृत्तिका द्रव्यांमुळे हे अशुद्घ होते. ब्लॅक बार ओअर या कार्बनयुक्त द्रव्याने संदूषित रुपातील याचे पातळ थर स्तरित शैलसमूहांत व्यापकपणे आढळतात. असे शैलसमूह शेल खडकांत व दगडी कोळशाच्या थरांबरोबर आढळतात. जलतापीय धातवीय शिरांमध्ये सिडेराइट मलखनिज किंवा टाकाऊ खडक या रुपांत आढळते. पूर्वी ब्रिटनमध्ये लोखंडाचे धातुक (कच्ची धातू) म्हणून याचा वापर होत असे व त्यासाठी तेथे त्याचे खाणकामही करीत असत. चुनखडकांवर फेरस विद्रावाची क्रिया होऊनही सिडेराइट तयार होते. याच्यासारखी दिसणारी ⇨ लिमोनाइट खनिजाची छद्मरुपेही सामान्यपणे आढळतात. ऑस्ट्रियातील स्टीरिया येथे सिडेराइटाचा मोठा साठा असून तेथे खाणकाम करुन हे लोखंडाचे धातुक म्हणून वापरतात. सिडेराइट स्फटिकरुपात धातवीय शिरांमध्ये आढळते. तेथे याच्याबरोबर चांदीची खनिजे, पायराइट, कॅल्कोपायराइट, टेट्राहेड्राइट, गॅलेना इ. खनिजे आढळतात. अशा ठिकाणी सिडेराइट विपुल असल्यास त्याचे खाणकाम करतात. उदा., वेस्टफेलिया, जर्मनी.
लोखंड या अर्थाच्या सिडेरॉस या ग्रीक शब्दावरुन सिडेराइट हे नाव पडले आहे. याच्या संघित प्रकाराला स्फेरोसिडेराइट म्हणत. नंतर सिडेराइट हे संक्षिप्त रुप याच्या सर्वच प्रकारांसाठी रुढ झाले. चॅलिबाइट, आयर्न स्पार, स्पॅरी आयर्न, सिडेरोस, स्फॅथिक आयर्न, ऱ्हाँबोहेड्रल आयर्न ओअर व व्हाइट आयर्न ओअर ही याची पर्यायी नावे आहेत. याचे कॅबाझाइट हे नाव आशिया मायनरमधील प्राचीन लोकांच्या नावावरुन पडले आहे. कारण या लोकांनी लोखंडनिर्मितीची कृती शोधून काढली,असे मानतात.
ठाकूर, अ. ना.