सिंग, गुरदियाल : (१० जानेवारी १९३३– ). प्रख्यात पंजाबी साहित्यिक. भाइनी फतेह (जि. संग्रूर, पंजाब) येथे जन्म. त्यांनी पंजाब विद्यापीठातून पंजाबी साहित्यात एम्.ए. ही पदवी मिळविली (१९६७). त्यांनी सुरुवातीस प्राथमिक शिक्षक म्हणून (१९५४) व पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत अध्यापन केले (१९६३). फरीदकोट (पंजाब) येथील गव्हर्नमेंट ब्रिजिंद कॉलेजमधून पंजाबीचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

 

त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा प्रारंभ कथाकार म्हणून केला. सग्गी फुल हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्घ झाला (१९६२).चन दा बूटा (१९६४). ओपरा अदमी (१९६५) व कुल्टा ते अदमी (१९७२) हे त्यांचे नंतरचे कथासंग्रह होत. मात्र त्यांना खरी प्रसिद्घी व मान्यता मिळाली, ती त्यांच्या मढी दा दीवा (१९६४) ह्या पहिल्याच कादंबरीच्या लेखनाने. मलवी बोलीभाषेत लिहिलेल्या या कादंबरीचा पंजाबी साहित्यविश्वात सर्वोत्कृष्ट प्रादेशिक कादंबरी असा गौरव झाला आणि पतियाळाच्या (पंजाब) भाषा विभागाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कारही तिला लाभला. त्यांच्या इतर उल्लेखनीय कादंबऱ्या अशा : अनहोये (१९६६), कुवेला (१९६८), रेते दी एक मुठ्ठी (१९६९), अधचानणी रात (१९७२), आथण उग्गण (१९७४), अन्हे घोडे दा दान (१९७६) इत्यादी. यांखेरीज त्यांचे फरिदा रातीं वादियां (१९८४) हे नाटक व विदायगी तोन पिच्छोन (१९८४) हा एकांकिकासंग्रह प्रसिद्घ आहे. त्यांनी किशोरांसाठीही लिहिले आहे. त्यांतील बकलम खुद, तुक खोह लै कवान, लिख्तम बाबा खेमा ही मुलांसाठी लिहिलेली विशेष उल्लेखनीय पुस्तके. त्यांखेरीज त्यांनी अनेक हिंदी, इंग्र जी साहित्यकृतींचे पंजाबीमध्ये अनुवाद केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींची अन्य भारतीय भाषांतून तसेच इंग्रजीतून भाषांतरे झाली आहेत. त्यांनी ग्रेट ब्रिटन, कॅनडा, रशिया इ. ठिकाणी परदेश दौरे केले.

 

पंजाबी या प्रादेशिक भाषेतील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार असा त्यांचा लौकिक आहे. पंजाबच्या मालवा प्रदेशातील ग्रामीण जनजीवनाचे अस्सल वास्तव चित्रण त्यांनी आपल्या कांदबऱ्यांतून केले. आधुनिक पंजाबी कादंबरीला स्वतःचा चेहरामोहरा त्यांनी प्राप्त करुन दिला. ग्रामीण पंजाबच्या नीतिकल्पना त्यांनी काटेकोर वास्तववादी शैलीत साकारल्या. कृतक स्वप्नरंजन व हळवी भावविवशता कटाक्षाने टाळून त्यांनी पंजाबचे ग्रामजीवन आपल्या कथा-कांदबऱ्यांतून अस्सल वास्तवशैलीत उभे केले आणि प्रादेशिक कादंबऱ्या लिहून पंजाबी साहित्यात एक नवा पायंडा पाडला. गरीब, पददलित व शोषित लोकांची दुःखे त्यांनी सहृदयतेने व सखोल सहानुभूतीने चित्रित केली व त्यांना जीवन जगताना करावा लागणारा आर्थिक व सामाजिक संघर्ष त्यांनी संवेदनक्षमतेने व जाणकारीने चित्रित केला. त्यांच्या कादंबऱ्यांनातील पात्रे या जगात जणू अस्तित्वशून्य जिणे जगत असतात. नागरी जीवनाकडून ग्रामीण जीवनचित्रणाकडे पंजाबी साहित्याची होत गेलेली वाटचाल त्यांच्या कथालेखनातूनही प्रत्ययास येते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील हे प्रादेशिक चित्रण त्यांच्या वाङ्‌मयाचे मुख्य शक्तिस्थान आहे.

 

त्यांना अनेक पारितोषिके व मानसन्मान लाभले : पंजाब राज्यशासनाची उत्कृष्ट ललित वाङ्‌मयाच्या निर्मितीसाठीची एकूण चार वेळा पारितोषिके (१९६६, ६७, ६८ व ७२) अधचानणी रात या कादंबरीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार (१९७५) पंजाब आर्ट्‌स काउन्सिल पुरस्कार (१९७९) सोव्हिएट लँड नेहरु पुरस्कार (१९८६) पंजाबी साहित्य अकादेमी पुरस्कार (१९८९) शिरोमणी साहित्यकार पुरस्कार (१९९२) भाई वीरसिंग पुरस्कार (१९९२) ज्ञानपीठ पुरस्कार (१९९९) इत्यादी. तसेच त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषविली : ‘केंद्रीय पंजाबी लेखक सभा’ या संस्थेचे उपाध्यक्ष (१९८७ –८९) साहित्य अकादेमी, नवी दिल्ली येथे पंजाबीच्या सल्लागार समितीचे सदस्य (१९८८–९२) आणि साहित्य अकादेमीच्या सर्वसाधारण परिषदेचे सन्मान्य सदस्य (१९९३–९७). तसेच पंजाब स्कूल बोर्ड व नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थांचेही ते सन्माननीय सदस्य होते.

 

वाड, विजया