वारिस शाह : (सु. १७३० – सु. १७९०). सुप्रसिद्ध पंजाबी कवी. हीर-रांझा या पारंपरिक प्रणयरम्य आख्यानावर आधारित हीरनामक काव्याचा जनक. वारिस शाहचा जन्म जंडियाला शेर खाँ, जि. शेखूपुरा (पाकिस्तान) येथे झाला. सय्यद गुलशेर शाह ह्याचा तो मुलगा. त्याचे प्रारंभीचे सर्व शिक्षण जंडियाला खेड्यातीलच एका मुल्लाकडे झाले. वारिस शाह जेव्हा प्रौढ झाला, तेव्हा त्याचे कुटुंबियांशी न पटल्याने त्याने आपले गाव सोडून कसूरला प्रयाण केले आणि तेथे मखदूम कसूरिया याचे शिष्यत्व स्वीकारले. त्याकाळी कसूर हे विद्यार्जनाचे व सूफी पंथाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. तत्कालीन पंजाबी संस्कृतीवर मुस्लिम सूफीवादाचा मोठा पगडा होता. वारिस शाहच्या मानसिक जडणघडणीवर या संप्रदायाचाही काही प्रभाव पडल्याचे आढळते. त्याचे प्रतिबिंब त्याच्या काव्यलेखनातही उमटलेले आहे.

वारिस शाहचा पिंड ज्ञानोपासकाचा होता. त्यामुळे त्याच्या काळातील उपलब्ध सर्व ज्ञानशांखामध्ये त्याने मुक्त संचार केला व अल्पावधीतच राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, कायदा, संगीत, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, वैद्यक यांसारख्या विविध ज्ञानशाखांमध्ये उत्तम प्रतीचे नैपुण्य संपादन केले. फार्सी आणि अरबी भाषांवरही त्याचे प्रभुत्व होते. वारिस शाह हा मुरशाद शाहाचाही शिष्य होता, असे परंपरेने मानले जाते.

आपले विद्यार्जन पूर्ण करून वारिस शाह जेव्हा स्वग्रामी परत आला, तेव्हा त्याला कुटुंबातील पूर्वींचे प्रतिकूल वातावरण बदलल्याचा प्रत्यय आला. तथापि तो फार काळ स्वग्रामी राहू शकला नाही. कारण तो थाते येथील भागभराई नावाच्या हिंदू स्त्रीच्या प्रेमात पडला. या घटनेमुळे तत्कालीन जनसंमर्दाचा रोष ओढवल्याने, वारिस शाहला जीव बचावण्यासाठी परागंदा व्हावे लागले. ह्या परागंदा अवस्थेत असताना  प्रेमभंगाच्या मनःस्थितीत त्याला हीर-रांझाच्या पारंपरिक शोकात्म प्रणयगाथेवर आधारलेले दीर्घकाव्य लिहिण्याची स्फूर्ती झाली व मल्का, हॅन्स येथे असताना त्याने १७६७-६८ च्या सुमारास हीर हे काव्य रचिले. त्याच्या या काव्यात ६१२ ‘बंद’ (कडवी) व ४,१२७ ‘बैन’ छंद (वारिस शाहने कथाकाव्यासाठी अनुकूल असा हा नवा छंद रूढ केला) आहेत. वारिस शाहच्या प्रेमभग्न व्यथित मनःस्थितीचे उत्कट प्रकटीकरण या काव्यात झाल्याने ते विलक्षण शोकात्म, हृदयस्पर्शी आणि अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यातील नीतितत्त्वांमुळे त्यास आध्यात्मिक उच्च पातळीही लाभली. परिणामी शीख गुरूंनी तसेच अनेक सूफी पंथी साधकांनीही स्वतःही ईश्वरभेटीविषयीची आर्त ओढ व्यक्त करण्यासाठी वारिस शाहच्या हीर काव्यातील अनेक अवतरणांचा आश्रय घेतला. अशा अनेक कारणांमुळे वारिस शाहचे हे कथाकाव्य पंजाबी भाषेचे शिरोभूषणच ठरले. दुय्यम दर्जाच्या काही कवींनी या लोकप्रिय काव्याचे भ्रष्ट अनुकरण केल्याचाही दाखला मिळतो.

शेक्सपिअरप्रमाणेच वारिस शाहनेही आपल्या साहित्यनिर्मितीसाठी परंपरागत प्रचलित विषयाची निवड करून त्यात नवचैतन्य ओतले. वारिस शाहा हा विलक्षण कल्पक प्रकृतीचा व संवेदनशील मनाचा कवी होता, त्यामुळे त्याने आपल्या निर्मितीवर वास्तवाचा, रंजकतेचा आणि लोकानुभूतीचा साज चढविला. दंतकथासदृश असलेला मूळ लेखनविषय स्वाभाविक पातळीवर येण्यासाठी त्याने परंपरागत घटितांचा संक्षेप करून या घटितांना स्वाभाविक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेचे रंगरूप प्राप्त करून दिले. यासाठी तत्कालीन फार्सी आणि ब्रज भाषांतील रूढ वाक्‌‌प्रचारांचे त्याने आपल्या या काव्यात विस्तृत प्रमाणात उपयोजन केले. दैनंदिन जीवनव्यवहारातील विविध दृष्टांतांची त्याने त्यात मुबलक प्रमाणात पेरणी केल्याचेही आढळते. आपल्या या कथाकाव्याला त्याने नाट्या त्मकतेचा साज चढविलेला दिसतो. जीवनाचे सर्वांगीण आकलन करण्याच्या बाबतीत वारिस शाहचा हात धरील, असा अन्य पंजाबी कवी शोधूनही सापडणे कठीण. वारिस शाहच्या सर्वस्पर्शित्वामुळे हा एकप्रकारे स्वकाळातील चालताबोलता ज्ञानकोशच होता, असे म्हटले जाते. यामुळे त्याच्या या कथाकाव्यातून तत्कालीन पंजाब प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक स्थितिगतीचाही बोध होतो. अहमद शाह अबदाली आणि नादिर शाह यांनी पंजाबवर केलेल्या स्वाऱ्यांचे व या स्वाऱ्यांचा निकराने प्रतिकार करणाऱ्या विजिगीषू शीख समाजाचेही दर्शन त्याच्या या काव्यातून घडते. त्याच्या काव्यातील काही पंक्तीना तर पंजाबी भाषेतील वाक्‌‌प्रचारांचे स्थान प्राप्त झाले. ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळेच वारिस शाहच्या हीर या काव्याला पंजाबी साहित्यात एकमेवाद्वितीय असे स्थान प्राप्त झाले आहे.

के. जगजित सिंह (इं.), कुलकर्णी, गो. म. (म.)