सामाजिक जीवविज्ञान : (सोशिओबायॉलॉजी). मानवासहित सर्व प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाचा जीवशास्त्र व क्र मविकासाच्या ( उत्कांतीच्या ) दृष्टिकोनातून शास्त्रीय अध्ययन करणारी शाखा. प्राण्यांच्या सामाजिक जीवनावर वातावरणातील घटकांचा व सामाजिक घटनांचा काय आणि कसा परिणाम घडत असतो हे समजण्याकरिता सैद्घांतिक निरीक्षण व प्रयोग यांवर आधारित संशोधनाची गरज निर्माण झाली. या संशोधनाचा हेतू मानव तसेच इतर प्राण्यांतील गुंतागुंतीच्या सामाजिक जीवनाचे अनुकूलनाच्या दृष्टीने असणारे महत्त्व तपासून पाहणे हाही होता. सामाजिक जीवविज्ञानाचे स्थान आचारशास्त्र आणि समष्टी जीवविज्ञान यांच्यामध्ये आहे.

आचारशास्त्राप्रमाणेच सामाजिक जीवविज्ञान हे तुलनात्मक विज्ञान आहे. यामध्ये प्राण्यांचे सामाजिक जीवन त्यांच्या जातीनुसार कसे ठरविले जाते, त्यांच्या पद्घती कोणत्या आणि त्यामध्ये पिढीत सातत्य कसे राखले जाते यांचा अभ्यास केला जातो. सामाजिक जीवविज्ञान ही शाखा वर्तनशास्त्र, समष्टी पारिस्थितिकी व क्र मविकासाचे सिद्घांत यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली आहे. या शाखेचा शरीरक्रियाविज्ञान, भ्रृणविज्ञान, मानवशास्त्र, मानसशास्त्र व इतिहास अशा विविध ज्ञानशाखांशी संबंध येतो. प्राण्यांचे वर्तन हे ⇨नैसर्गिक निवडीतून निर्माण होते, असे प्रतिपादन ⇨चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी केले होते. डेव्हिड लॅक यांनी १९६८ मध्ये प्राण्यांच्या वर्तनाच्या विविध पैलूंचा शोध घेताना क्रमविकासाच्या दृष्टिकोनातून ते समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केले. सामाजिक जीवविज्ञान ही संकल्पना लोकप्रिय करण्याचे श्रेय ⇨एडवर्ड ऑस्बर्न विल्सन या अमेरिकन जीववैज्ञानिकांना द्यावे लागेल. त्यांनी १९७५ मध्ये सोशिओबायॉलॉजी : द न्यू सिंथेसिस हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ प्राणी व मानवी वर्तन यांचा आंतरशाखीय संबंध याबाबतीत अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या ग्रंथात त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, सु. दहा टक्के एवढ्या कमी प्रमाणात मानवी वर्तन आनुवंशिकतेने प्रभावित झालेले असते व उर्वरित पर्यावरणाशी निगडित असते.

आचारशास्त्रामध्ये प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासामधील वर्तनाचा अभ्यास केला जातो, तर सामाजिक जीवविज्ञानात प्राण्याच्या समूहातील वर्तनाचा (सामाजिक वर्तनाचा) अभ्यास केला जातो.

सामाजिक जीवविज्ञानाच्या वाढत्या विस्तारामुळे यापुढील काळात आचारशास्त्रज्ञांना प्राण्यांमधील अंतर्जातीय वर्तनात आढळणारे बदल व वैयक्तिक वर्तनाच्या पद्घती यांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासेल. नैसर्गिक निवड सिद्घांताद्वारे यापूर्वी प्राण्यांच्या ज्या वर्तनांचे स्पष्टीकरण मिळत नव्हते, अशा सर्व वर्तनांचे जीवशास्त्रीय स्पष्टीकरण या नवीन शाखेद्वारे मिळावे अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या सामाजिक वर्तनातील घटकांचा विचार केलेला आहे.

प्राण्यांमधील सामाजिक वर्तनातील घटक : परहितदक्षता : यामध्ये एका प्राण्याच्या कृतीचा फायदा त्यास प्रतिसाद देणाऱ्या दुसऱ्या प्राण्यास होतो. उदा., संकटात असताना प्राणी धोक्याचा इशारा देतात. अनेक प्राणी त्याच जातीच्या लहान प्राण्यांना मदत करतात. यावरून प्राण्यांमध्ये निकटचे नातेसंबंध असतात, असे आढळून येते. या वर्तनामागे प्राण्यांमधील आनुवंशिकतेचा संबंधही महत्त्वाचा असतो. कोणताही प्राणी त्याचे जनुक दोन प्रकारे वाढवीत असतो : (१) नवीन प्राण्यांना जन्म देऊन (२) त्यांच्या जातीच्या दुसऱ्या प्राण्यांना प्रजननासाठी मदत करून. परहितदक्षता हा पुढच्या पिढीत जनुके वाढविण्याचा एक मार्ग आहे. यामुळे आपणास सैनिकी मुंग्या त्यांच्या वारुळाच्या रक्षणासाठी प्राण का देतात, तसेच कामकरी मधमाश्या अन्नाचा साठा करून राणी–माशीला प्रजननासाठी का मदत करतात, या प्रश्नाचे उत्तर मिळते. परहितदक्षतेमुळे प्राण्यांची जगण्याची संधी वाढते व नातेसंबंध असलेल्या प्राण्यांची संख्या वाढते. म्हणून यास स्वजन निवड (किन [⟶ लेक्शन)] असेही म्हणतात.

परस्पर सहकार्य करण्याची प्रवृत्ती : प्राण्यांतील दुसऱ्या प्राण्यांना मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे दोन्ही प्राण्यांचा फायदा होतो. हरणे नेहमी कळपात असतात. यामुळे त्यांना चरण्यासाठी अधिक वेळ देता येतो, तसेच त्यांना सुरक्षितता लाभते. धोक्याचा इशारा देण्याचे काम कळपातील वयस्क प्राणी करतात.

प्राण्यांमध्ये परस्पर सहकार्याची अनेक उदाहरणे आढळतात. मुंग्या, वाळवी, मधमाश्या व कुंभारमाश्या समूहाच्या रक्षणासाठी शत्रूवर एकत्रित हल्ला करतात. आर्टिक मस्क ऑक्झेन हे लांडग्यांनी हल्ला केल्यावर त्यांच्या पिलांभोवती वर्तुळाकार उभे राहून लांडग्यांना प्रतिकार करतात. ऑक्झेन नर वर्तुळाच्या बाहेर राहून लांडग्यावर हल्ला  करतात.

⇨रानकुत्र्यांसारखे काही प्राणी समूहाने शिकार करतात. यामुळे ते त्यांच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची (उदा., वाघाची) शिकार करू शकतात. समूहाने शिकार करण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शिकारीमध्ये यश मिळण्याचे प्रमाण वाढते. सिंह ज्या वेळी ३–४ च्या समूहाने शिकार करतात त्या वेळी त्यांना शिकारीमध्ये यश मिळण्याचे प्रमाण जास्त असते.

स्वार्थी वर्तन : ज्या वेळी कृती करणाऱ्या प्राण्याचा फायदा व प्रतिसाद देणाऱ्या प्राण्याचे नुकसान होते, अशा वेळी प्राण्यांमध्ये स्वार्थी वर्तन आढळते. लंगूर माकडे नेहमी १०–२० माद्या व एक नर अशा कळपात राहतात. काही वेळा वृद्घ नराची जागा दुसरा प्रभावी नर घेतो. कळपाचा ताबा घेतलेला नवा नर कळपातील सर्व लहान पिलांना ठार मारून टाकतो. यामुळे जुन्या नराच्या पिलांना वाढविण्यात माद्यांची खर्च होणारी ऊर्जा वाचते व नवीन नराला त्याची वंशवृद्घी करता येते. काही वेळा कळपातील माद्या नवीन नरापासून पिलांना वाचविण्यासाठी स्वतःच कळप सोडून दूर जातात व पिले मोठी होईपर्यंत त्यांना वाढवितात. काही वेळा कळपातील माद्या आक्रमक होतात व नवीन नराला पिलांना मारण्यास विरोध करतात.

आक्रमण : शिकार करणारे बहुतेक प्राणी आक्रमक असतात. शिकारी प्राण्यांना दोन प्रकारचा संघर्ष करावा लागतो. दोन वेगळ्या जातींतील प्राण्यांमधील संघर्षास आंतरजातीय संघर्ष म्हणतात. यामध्ये प्राणी अन्न, पाणी किंवा स्वतःचे संरक्षण यासाठी दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला  करतात. काही वेळा प्राण्यांना स्वतःला जातीतील प्राण्यांबरोबर संघर्ष करावा लागतो, यास अंतर्जातीय संघर्ष म्हणतात. बहुतेक पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष आढळतो. मासे एकमेकांचे जबडे पकडतात, चावे घेतात. पक्षी दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला  करतात. उंदीर भांडताना एकमेकांना चावे घेतात. शेळ्या आणि मेंढ्या डोके व शिंगांच्या साहाय्याने संघर्ष करतात. प्राण्यांतील संघर्ष त्यांच्या आनुवंशिक घटकानुसार विशिष्ट प्रकारचा असतो. अशा प्रकारचा संघर्ष प्राण्यांमध्ये आढळल्याचे प्रमुख कारण या प्राण्यांच्या मूलभूत गरजा समान असतात. त्यामुळे या प्राण्यांना त्याच जातीतील इतर प्राण्यांबरोबर अन्न, सुरक्षित जागा व प्रजननासाठी जोडीदार यांसाठी संघर्ष करावा लागतो. सागरी हत्तींच्या (सी एलिफंट) दोन नरांमध्ये संघर्ष होतो व एकाचा मृत्यू होईपर्यंत हा संघर्ष चालू राहतो. विजयी नर हा मादी कळपाचा ताबा घेतो.


काही प्राणी मर्यादित संघर्ष करतात. संघर्ष मर्यादित करण्याचा एक मार्ग म्हणजे प्राण्यांमध्ये ठराविक प्रदेशातच वावरण्याची प्रवृत्ती आढळते. प्राणी इतर मार्गाचा वापर करून संघर्षात ग्रंभीर दुखापत होणार नाही याची काळजी घेतात. विषारी साप एकमेकांबरोबर संघर्ष करताना विषारी दातांचा वापर करीत नाहीत. पर्वतीय शेळ्या संघर्ष करताना डोके व शिंगांचा वापर करतात, परंतु दुसऱ्या शेळीस जखम होणार नाही याची काळजी घेतात. काही सरडे दुसऱ्या प्राण्यांना भिती दाखविण्यासाठी घश्याजवळील त्वचेचा पडदा पसरट करतात. माकडे झाडांच्या फांद्या जोरजोराने हलवितात, मोठ्याने ओरडतात व भीतीदायक आवाज काढतात. याचा उद्देश संघर्ष टाळणे हा असतो. संघर्षातून विजयी झालेला, जखमी वा थकलेला प्राणी नंतरच्या शत्रूचा सामना करू शकत नाही तो बऱ्याच वेळा दुसऱ्या प्राण्याची शिकार होतो. त्यामुळे काही प्राणी पराभव स्वीकारल्याचा इशारा देतात व संघर्षातून स्वतःची सुटका करून घेतात.

वैयक्तिक मान-अपमान, सामाजिक प्रतिष्ठेस धोका व हत्यारांचा वापर यांमुळे मानवामध्ये आक्र मक प्रवृत्ती वाढते. काही वेळा आक्रमक प्रवृत्तीस प्रोत्साहन दिल्याने ही प्रवृत्ती वाढते. मुलांना आक्रमक प्रवृत्तीऐमुळे इतर मुलांना डावलून खेळणी ताब्यात ठेवता येतात पालकांचे लक्ष वेधता येते. यामुळे अशी मुले जास्त आक्रमक होतात. युवकांचे आक्रमक गट या मुलांचे आदर्श बनतात. जे पालक मुलांना शारीरिक शिक्षा करून शिस्त लावतात अशी मुले दुसऱ्या मुलांशी वागताना आक्रमकपणे वागतात, असे आढळले आहे. दूरदर्शन व प्रसारमाध्यमे यांमधून दाखविल्या जाणाऱ्या हिंसाचार व मारामाऱ्या यांसारख्या हिंसक दृश्यांमुळे समाजातील आक्रमक प्रवृत्तीस प्रोत्साहन मिळते.

प्रादेशिक सार्वभौमत्व : बहुतेक प्राण्यांच्या हालचाली मर्यादित क्षेत्रात होतात. यामुळे प्राण्यांना अन्न व निवारा मिळतो. यास प्रादेशिक सार्वभौमत्व म्हणतात. वाघ व सिंहासारखे प्राणी त्यांच्या प्रादेशिक क्षेत्राच्या सरहद्दीवर मूत्र वा विष्ठा टाकून खुणा करतात. नरांना विशिष्ट प्रदेशावर वर्चस्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या प्रदेशात घुसलेल्या दुसऱ्या नराबरोबर संघर्ष करावा लागणे, ही त्यांच्या शारीरिक ताकदीची परीक्षा असते. संघर्षात विजयी झालेला नर त्या भूभागाचा तसेच माद्यांचा ताबा घेतो, तर पराभूत नराला तो भाग सोडून जावे लागते. सशक्त व बळकट नर भरपूर अन्न, पाणी व निवारा असलेल्या जागा बळकावतात. पराभूत व अशक्त नराच्या प्रजननाच्या संधी कमी होतात. यामुळे कमविकासाचा परिणाम समूहापेक्षा वैयक्तिक प्राण्यावर होतो.

सामाजिक गट : काही प्राणी एकट्याने (स्वतंत्रपणे) जीवन जगत असतात, तर काही प्राणी समूहात राहत असतात. प्राण्यांच्या सामाजिक जीवनाच्या अभ्यासाची सुरू वात डब्ल्यू. सी. ॲलेन व त्यांच्या विद्यार्थ्यांनी १९३८ मध्ये केली. समूहात राहणाऱ्या प्राण्यांचे सर्वसाधारणपणे तात्पुरता समूह, विस्कळित समूह आणि संघटित समूह असे तीन गट पडतात.

तात्पुरता समूह : अनेक प्राणी निरनिराळ्या कारणांसाठी एकत्र येतात परंतु त्यांच्या वर्तनात सुसूत्रता किंवा शिस्त नसते. उदा., रस्त्यावरील विजेच्या दिव्याभोवती जमणारे पतंग (कीटक), पाण्यातील किडे, भुंगेरे इ. कीटक फक्त प्रकाशाच्या आकर्षणामुळे एकत्र आलेले असतात. यातील कोणताही कीटक इतरत्र निघून जातो वा बाहेरील कीटक त्या समूहात येतो. दिवा बंद केला तर समूहातील कीटक इतरत्र निघून जातात. खडकाच्या खाली असणारी ओल व संरक्षण यांमुळे गांडुळे एकत्र येतात.

विस्कळित समूह : एखाद्या कुरणात चरण्यासाठी विविध जातींचे प्राणी एकत्र येतात. गायी, म्हशी, शेळ्या व ससे अशा विविध प्रकारचे प्राणी कुरणात चरत असतात. त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसतो. केवळ अन्न मिळविण्यासाठी ते एकत्र आलेले असतात. माश्यांचा समूह व पक्ष्यांचे थवे यांसारख्या प्राण्यांमध्ये हालचालीत समन्वय असतो. काही विस्कळीत समूहातील प्राण्यांमध्ये एकत्रित संरक्षण व एकमेकांस सहकार्य करण्याची प्रवृत्ती आढळते.

संघटित समूह : सामाजिक जीवनाचा मुख्य आधार म्हणजे कळपातील प्रत्येक सदस्य दुसऱ्या सदस्याची अन्न, पाणी, शरीराची निगा, लैंगिक गरजा व सुरक्षा यांबाबत काळजी घेतो. ⇨नीकोलास टिनबर्जेन यांच्या मतानुसार एकाच प्रजातीच्या सदस्याचे त्याच जातीच्या दुसऱ्या सदस्याशी असलेले संबंध यालाच सामाजिक वर्तन असे म्हणतात.

सामाजिक संघटन हे काही वेळा तात्पुरत्या स्वरुपाचे, तर काही वेळा हंगामी किंवा वार्षिक असू शकते. नर–मादी सरडे हे प्रजनन काळात एकत्र येतात, तर माकडे व कपीमध्ये असणारे सामाजिक जीवन अधिक गुंतागुंतीचे व स्थिर असते. खऱ्या समाजामध्ये प्राण्यांच्या एकापेक्षा अधिक जोड्या असतात. यांमध्ये वृद्घ, तरुण, वाढत्या वयातील प्राणी व लहान पिले असे विविध वयोगटांतील प्राणी असतात. पृष्ठवंशी प्राण्यांतील सामाजिक जीवन अधिक विकासित झालेले असते.

प्राण्यांच्या सामाजिक जीवनाची वैशिष्ट्ये : ⇨एडवर्ड ऑस्बर्न विल्सन आणि डब्ल्यू. एल्. बाऊन (१९७५) यांच्या मतानुसार प्राण्यांच्या सामाजिक जीवनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) एकाच प्रजातीचे अनेक प्राणी एकत्र येतात व त्यांचा समूह तयार होतो. ते एकत्र राहतात. लहान लहान सामाजिक गट किमान एक नर व एक मादी प्रजनन काळात एकत्र येऊन तयार होतात वा मादी व तिची पिले यांपासून बनतात. (२) सामाजिक वर्तन प्राणी त्यांच्या जीवनकाळात किती वर्षे (काळ) एकत्र राहतात यांवर अवलंबून असते. (३) काही प्राणी एकत्र राहतात मात्र एकत्रित राहून त्यांचे कार्य वैयक्तिक पातळीवर चालते. उदा., आफिकेत समूहात राहणारे वाईल्ड बीस्ट हे कळपात चरतात व एकत्र राहतात परंतु त्यांचे कार्य (प्रजनन, पिलांचे संगोपन इ.) वैयक्तिक पातळीवर चालते. (४) कळपातील सर्व सदस्य एकत्रित राहण्यासाठी त्यांच्यात संवाद असणे आवश्यक असते. हा संवाद दृश्य, आवाजाच्या माध्यमाने अथवा ग्रंधामार्फत होतो. (५) सदस्यांमधील कामाची विभागणी हे सामाजिक जीवनाचे एक वैशिष्ट्य  आहे. (६) काही प्राण्यांच्या अनेक जातींतील सामाजिक गटांमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य अथवा कुटुंबातील काही सदस्य एकत्रित राहत असतात. कुटुंबातील लहान पिलांची काळजी नर–मादी घेत असतात. काही वेळा कळपात तीन किंवा त्यापेक्षा जास्त पिढयंतील सदस्य वर्षभर एकत्र राहतात, तर काही सदस्य जीवनभर कळपासोबत राहतात. (७) सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य  म्हणजे कळपातील सदस्य एकमेकांना मदत करतात व इतरांची काळजी घेतात. अपवादात्मक परिस्थितीत स्वतःचा वंश व जीव यांचा विचार न करता कळपासाठी सदस्य त्याग करतात. प्रजनन करू न शकणाऱ्या मुंग्या, मधमाश्या, वाळवी व कुंभारमाश्या हे प्राणी समूहातील इतर प्राण्यांसाठी कष्ट करीत असतात. ही प्रवृत्ती स्वतःच्या जातीचा फायदा व्हावा व प्रगती व्हावी या भावनेतून निर्माण झालेली असते. त्यास स्वजन निवड असे म्हणतात.


संघटित समूहाची वैशिष्ट्ये : ईसेनबर्ग (१९६५) यांच्या मतानुसार संघटित समूहाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) संवाद वा संदेशवहन : बहुतेक संघटित समाजांमध्ये विशिष्ट प्रकारची संवाद यंत्रणा असते. समूहातील सदस्य हातवारे, अंगाची हालचाल, रंगबदल, केस ताठ करून, गंधाद्वारे वा निरनिराळे आवाज यांद्वारे कळपातील इतर सदस्यांशी संवाद साधत असतात. एकमेकांना स्पर्श करणे, विशिष्ट ध्वनिलहरी पसरविणे (वटवाघूळ), शेपटीची हालचाल व नाच करणे (मधमाश्या) हे संवाद साधण्याचे विशेष मार्ग आहेत. पृष्ठवंशी प्राणी चेहऱ्यावरील हावभाव व आवाज यांद्वारे वेगवेगळ्या भावना व संदेश व्यक्त करतात. [⟶ प्राण्यांमधील संदेशवहन]. (२) संलग्नता : संघटित समूहातील सर्व सदस्यांमध्ये एकत्रित राहण्याची प्रबळ इच्छा असते. सर्व प्राणी एकमेकांशी काही बंधनांनी बांधलेले असतात. मधमाश्यांच्या पोळ्यातील सर्व माश्या एकत्र राहतात. हरणाच्या कळपातील सदस्य, वाघीण व तिची पिले आणि लांडग्यांचा कळप यांसारखे समूह जंगलातील ठराविक क्षेत्रात एकत्र राहतात. बॅबून माकडे कळपाने फिरतात. वयस्क व बलवान नर माद्यांच्या जवळ असतो तर कळपातील काही नर कळपाच्या पुढील बाजूस व काही नर मागील बाजूस असतात. (३) कामाची विभागणी : सामाजिक जीवन विकासित झालेल्या प्राण्यांमध्ये लिंग व वयोगट यांनुसार कामाची विभागणी झालेली असते. बॅबून माकडात तरुण नर कळपाच्या पुढे व पाठीमागील बाजूस राहून कळपाचे शत्रूपासून रक्षण करतात. प्रौढ व प्रभावी नर कळपाच्या मध्यभागी राहून खाण्याच्या व विश्रांतीच्या जागा ठरवितात. पिलांना जन्म देणे व त्यांची काळजी घेणे ही कामे मादी करते. ज्या वेळी संघर्षाचा प्रसंग निर्माण होतो, त्या वेळी कळपातील प्रभावी नर ( नेता ) कळपाच्या पुढील बाजूस येतो आणि त्याची जागा दुसरा नर घेतो. याच वेळी माद्या व लहान पिले पाठीमागे सरकत असतात. मधमाश्यांच्या पोळ्यात एक राणीमाशी, काही नर माश्या व कामकरी माश्या असतात. अशा प्रकारे प्राण्यांमध्ये कामाची विभागणी आढळते. (४) कळपाचा टिकाऊपणा व अभेद्यता: कळपातील सदस्य सहसा कळप सोडून जात नाहीत. सस्तन प्राण्यांत थोड्या प्रमाणात सदस्य कळप सोडून जातात. काही वेळा माद्यांचे कळप असतात व कळपातील सर्व सदस्य एकमेकांचे संबंधित असतात. अशा कळपात नर काही काळ राहतात. नंतर कळप सोडून जातात (उदा., वाघ, सांबर). माद्या मात्र कळपाच्या कायमस्वरुपाच्या सदस्या असतात. बंदिस्त समूहात बाहेरील सदस्यास प्रवेश दिला जात नाही.

प्रजननाच्या पद्घती : प्रजननासाठी नर–माद्या एकत्र येतात. मीलनकाळ व जोडीदार यांवरून त्यांचे वर्गीकरण करतात.

(१) एकपती किंवा एकपत्नीत्व : ही सर्वांत साधी प्रजनन पद्घत असून यामध्ये एक नर व एक मादी प्रजननासाठी एकत्र येतात. ही जोडी एका विणीच्या हंगामापुरती वा आयुष्यभर टिकते. काही प्राण्यांऐमध्ये एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास नवीन जोडीदाराचा स्वीकार केला जातो. अशा प्रकाराची प्रजननाची पद्घत पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व सस्तन प्राण्यांत थोड्याफार प्रमाणात आढळते. याचे दोन उपप्रकार आहेत. (अ) हंगामी : यामध्ये नर–मादी एका विणीच्या हंगामापुरते एकत्र येतात. उदा., चिमणी, वॉर्ब्लर. ( आ ) कायमस्वरुपी वा बहुवार्षिक : यामध्ये नर–मादी आयुष्यभर एकत्र राहतात. उदा., गिबन, हंस, गरुड इत्यादी.

(२) बहुपतीत्व किंवा बहुपत्नीत्व : यामध्ये एका प्राण्याचे अनेक जोडीदाराशी लैंगिक संबंध असतात. याचे दोन उपप्रकार आहेत. (अ) बहुपत्नीत्व : यामध्ये एक नर अनेक माद्यांबरोबर राहत असतो. सस्तन प्राण्यांमध्ये बहुपत्नीत्व हे सर्वसाधारणपणे आढळते. नर सहसा पिलांची काळजी घेत नाहीत. उदा., यूरोपियन तांबडे हरिण, सील नर. (आ) बहुपतीत्व : ही अपवादात्मक आढळणारी प्रजनन पद्घत आहे. यामध्ये एक मादी अनेक नरांसोबत राहत असते. ही प्रजनन पद्घती पक्ष्यांमध्ये आढळते.

(३) टिकाऊ संबंध नसणे : यांमध्ये प्रजननासाठी एकत्र येणाऱ्या सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे टिकाऊ संबंध नसतात. नर–मादीची भेट योगायोगाने होत असते. नराचे एकापेक्षा अधिक माद्यांबरोबर मीलन होते, तसेच मादीचे अनेक नरांबरोबर मीलन होते. मिलनानंतर नर–मादी लगेच वेगळे होतात. उदा., अस्वल, चिंपँझी, वाईल्ड बीस्ट इत्यादी.

सामाजिकीकरणाचे फायदे : पर्यावरणीय व सामाजिक दबावातून वा गरजेतून प्राणी एकत्र येतात, यांतून प्राण्यांमध्ये गट तयार होतात व अशा गटांमुळे प्राण्यांमधील सामाजिक वर्तन विकासित होते.

शत्रूपासून संरक्षण : कळपात अनेक सदस्य एकत्र आल्यामुळे शत्रूचा शोध घेण्यात सुधारणा होते. अनेक डोळे व कान यांच्या साहाय्याने शत्रूचा शोध घेण्यात कळपातील एक किंवा अधिक प्राण्यांना यश मिळते. हरणांच्या वा माकडांच्या कळपातील ज्या सदस्यांना शत्रूची चाहूल लागते, ते कळपातील इतर सदस्यांना धोक्याचा इशारा देतात. याचा फायदा कळपातील सर्व सदस्यांना होतो. प्रेअरी ही रानटी कुत्री कळपाने राहतात. त्यांतील एकजण धोक्याचा इशारा देतो, त्यामुळे कळपातील सर्वजण सुरक्षित जागी (बिळात) लपतात.

प्राण्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्याची जबाबदारी कळपातील काही सदस्यांकडे असते. यामुळे कळपातील इतर सदस्यांना निवांतपणे अन्न खाता येते. हनुमान लंगूर माकडाच्या कळपात इशारा देण्याची जबाबदारी प्रौढ नराकडे असते. नर बॅबून कळपाला इशारा देण्याचे काम करतात [⟶ माकड].

सहकार्याने संरक्षण : ज्या वेळी एकापेक्षा जास्त जातींचे प्राणी समूहात वावरतात, त्या वेळी कळपातील एका प्राण्याने धोक्याचा इशारा दिल्यास कळपातील इतर जातींचे सदस्य त्यास त्वरित प्रतिसाद देतात. उदा., बॅबून, झीब्रा, कुरंग इ. प्राणी एकत्रित कुरणात चरत असतात, त्या वेळी यांपैकी एका प्राण्याने धोक्याचा इशारा दिल्यास त्यास इतर जातींचे सदस्य प्रतिसाद देतात व एकमेकांच्या सहकार्याने संरक्षण करतात.

शत्रूवर अचानक हल्ला  करणे, समूह वेगवेगळ्या दिशेला विखुरणे, शोध न घेता येईल अशा मार्गाने जाणे या कृती शत्रूला गोंधळात टाकणाऱ्या असतात. हरिण व काळविटांमध्ये अशा प्रकारची हालचाल शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी केली जाते. वाईल्ड बीस्ट ह्या बैलासारख्या दिसणाऱ्या काळविटांचा सु. ५००–१,००० सदस्यांचा कळप असतो. शत्रूची चाहूल लागताच ते सर्व दिशांना विखुरतात त्यामुळे शत्रूचा गोंधळ होतो. त्यास नेमकी कोणत्या सदस्याची शिकार करावी ते समजत नाही, याचा फायदा घेऊन सदस्य शत्रूपासून सुटका करून घेतात.

शत्रूस घेरणे : कळपातील नर सदस्य शत्रूस सर्व बाजूंनी घेरतात. हा संरक्षणाचा एक प्रकार आहे. बॅबून माकडांच्या कळपावर ज्या वेळी वाघ किंवा बिबट्या  असे प्राणी हल्ल करतात त्या वेळी या शत्रूस कळपातील सदस्य सर्व बाजूंनी घेरून कळपाचे संरक्षण करतात. कॅलिफोर्नियातील जमिनीवर राहणाऱ्या खारी सापापासून संरक्षण करताना सापाभोवती रिंगण करतात ( सर्व बाजूंनी घेरतात ) व त्यास बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडतात. तरस व रानटी कुत्री (कोळसूण) ही कळपात राहतात. ज्या वेळी त्यांची भेट वाघासारख्या प्राण्याबरोबर होते त्या वेळी त्यांचा कळप व वाघ यांच्यामध्ये दुसरा एखादा प्राणी येईल, अशा प्रकारे ते कळपातील सदस्याची हालचाल घडवितात व तो दुसरा प्राणी वाघाची शिकार होतो. यास ‘आपण प्रथम’ (यू फर्स्ट) चे तत्त्व म्हणतात. अशा प्रकारे कळपातील प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता कमी होते व कळपातील सदस्यांना एक प्रकारे संरक्षण मिळते.


अन्न मिळविणे व माहितीचे आदान–प्रदान : एकएकट्या प्राण्यापेक्षा कळपात राहणाऱ्या प्राण्यांना शिकार करणे सोपे जाते. समूहाने शिकार करणे हे नेहमी सर्वांच्या फायद्याचे ठरते. कळपातील माकडे अन्नाच्या शोधासाठी सर्वत्र विखुरतात. एखाद्या सदस्यास अन्नाचा साठा आढळल्याऐवर तो ही माहिती कळपातील इतर सदस्यांना आवाजाद्वारे कळवितो. अशा प्रकारे कळपातील सर्व सदस्यांचा फायदा होतो. रानकुत्री व लांडगे हे प्राणी त्यांच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची (उदा., पर्वतीय शेळ्या, झीब्रा, हरिण) कळपाने शिकार करतात. वाघ, तरस, देवमासे व डॉल्फिन हे देखील काही वेळा समूहाने शिकार करतात. नाईल मगरी पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी दुसऱ्या प्रवाहास मिळतो, त्या संगमाच्या ठिकाणी प्रवाहात अर्धवर्तुळाकार रिंगण करतात व प्रवाहातून जाणाऱ्या माशांची शिकार करतात. सिंहाच्या माद्या नेहमी समूहाने शिकार करतात. काही माद्या शिकारीचा पाठलाग करतात, त्या वेळी काही माद्या दबा धरून दडून बसतात. शिकार दबा धरून बसलेल्या माद्यांकडे जाईल अशा पद्घतीने तिचा पाठलाग केला जातो.

प्रायोगिक अभ्यासात असे आढळले आहे की, चिमण्या व चाफइंच पक्षी कळपातील इतर सदस्य कोणते अन्न खातात याची पाहणी करतात व तशा प्रकारचे अन्न खाण्यास सुरुवात करतात. इंग्लंडमध्ये काही टिटीमाइस पक्षी दुधाच्या बाटलीतील मलई खाण्यास शिकले. त्यांचे अनुकरण इतर अनेक पक्ष्यांनी केले.

सहकार्याने संरक्षण मिळत असल्यामुळे प्रत्येक प्राण्याला अन्न खाण्यासाठी अधिक वेळ मिळतो. रानकुत्री, लांडगे, वाघ व हनुमान माकडे अन्नाचा शोध घेण्यासाठी कळपातील माद्यांची पिले घेऊन जातात. हे एक प्रकारचे प्रशिक्षण असते. त्यास भावंड वर्तन (आण्ट बिहेवियर) असे म्हणतात. समूहात राहिल्याने प्राण्यांना अन्न मिळविण्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळते. मांसाहारी प्राण्यांमध्ये सहकार्य नसेल, तर त्यांनी केलेली शिकार इतर प्राणी पळवून नेतात. सिंहाने केलेली शिकार तरस वा रानकुत्री पळवितात. दोन–तीन सिंह एकत्रित असतील, तर त्यांची शिकार इतरांना पळविता येत नाही. बॅबून माकडांना ज्या वेळी पाण्याचा साठा आढळतो त्या वेळी ती माहिती शेपटी उभी करून व पाणी पिण्याचे हावभाव करून कळपातील इतर सदस्यांना कळवितात. ज्या वेळी मातीतील कंदमुळांचा शोध लागतो, त्या वेळी बॅबून माकडे आनंदाने हातवारे करतात. दुष्काळी परिस्थितीत प्रौढ बॅबून नर सर्व कळपास पाणी असणाऱ्या भागात घेऊन जातात. उंदरांचा नाश करण्यात यश न येण्याचे प्रमुख कारण म्हणजे विषारी आमिष कोणत्या ठिकाणी आहे ही माहिती उंदीर एकमेकांना कळवितात. [⟶ प्राण्यांमधील संदेशवहन].

प्रजननाची संधी : समूहात राहण्यामुळे प्रजननात यश मिळण्याचे प्रमाण वाढते. गेंडा व ओरँगउटान अशा एकाकी राहणाऱ्या प्राण्यांना प्रजननासाठी जोडीदार मिळविण्यात अडचणी येतात. त्यांना यासाठी जंगलात खूप भटकावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ व ऊर्जा खर्च होते. कळपातील सदस्यांना जोडीदारासाठी फार भटकावे लागत नाही, कळपातच जोडीदार उपलब्ध असतो. समूहातील प्राण्यांचा प्रणय पाहून, इतर प्राण्यांना लैंगिक वर्तनाची सवय होते.

सामाजिक वर्तनाचे अनुकूलनाच्या दृष्टीने महत्त्व : क्रमविकासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्तनाकडे पाहिल्यास एखाद्या विशिष्ट जातीचे प्रजनन किती वेगाने होते, यास महत्त्व द्यावे लागते. प्राणी ज्या वेळी समूहाने राहतात, त्या वेळी त्यांना शत्रूपासून संरक्षण मिळते. ज्या वेळी प्राणी एकटे राहतात, त्या वेळी शत्रूच्या हल्ल्याला बळी पडण्याचा त्यांचा धोका वाढतो. अशा प्रकारे सामाजिक वर्तन प्राण्यांच्या बहुतेक जातींना संरक्षण देत असते.

कळपात राहणारे बहुतेक मांसाहारी प्राणी समूहाने शिकार करतात, त्या वेळी त्यांना यश मिळते परंतु ते ज्या वेळी एकट्याने शिकार करतात, त्या वेळी यश मिळण्याची शक्यता कमी असते. पक्ष्यांचा थवा ज्या वेळी अन्नाचा शोध घेत असतो, त्या वेळी अन्न मिळण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे समूहात राहण्यामुळे पशुपक्ष्यांचा फायदा होत असतो.

सामाजिक कीटकांमध्ये ( उदा., मधमाश्या, वाळवी ) कामाची विभागणी आढळते. याचे अनुकूलनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. कामाच्या विभागणीमुळे प्रत्येक काम कार्यक्षमतेने पार पाडले जाते व सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते.

सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रौढांची वर्तणूक पाहून कळपातील पिले शिकत असतात. अशा प्रकारे वर्तणुकीचे शिक्षण एका पिढीकडून पुढील पिढीस दिले जाते. चाफइंच पक्ष्याच्या नराचे स्वतंत्रपणे संगोपन केल्यास तो त्याच जातीच्या नरापेक्षा वेगळ्या प्रकारे गातो. यावरून पक्षी मागील पिढीकडून शिकतात हे लक्षात येते.

प्राण्याचे सामाजिक वर्तन हे एक प्रकारचे अनुकूलन असते. यामुळे समूहातील प्राण्याचे संरक्षण होते, अन्न मिळण्यास मदत होते व शिकारीत यश मिळते. पिले मोठ्या प्राण्यापासून शिकत असतात. अशा प्रकारे समूहात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढण्यासाठी सामाजिक जीवनाची मदत होते.

सामाजिक वर्तन, सामाजिक जीवविज्ञान व मानव : १९८० सालानंतर प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. यातून सामाजिक जीवविज्ञान या शाखेस महत्त्व प्राप्त झाले. सामाजिक वर्तनाचा आनुवंशिकी घटक व सामाजिक जीवविज्ञान यांचा वापर मानवी कल्याणासाठी कसा करता येईल याकडे जीवशास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रित केले.

प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाचा आधार आनुवंशिक घटकांमध्ये आहे, याबाबत काही तज्ज्ञ शंका घेतात. विशिष्ट जनुके ठराविक प्रकारच्या वर्तनाचे नियंत्रण करतात, असा याचा अर्थ नाही. काही वर्तनामुळे शारीरिक क्षमता वाढते परंतु कोणत्या विशिष्ट वर्तनामुळे शारीरिक क्षमता वाढली याचे मापन करणे शक्य नसते. यामध्ये अनेक घटकांचा समावेश असल्याने (उदा., आहार, स्नायूंची स्थिती) प्रत्येक घटकाचा सहभाग किती हे निश्चित करणे अवघड आहे. त्यामुळे याबाबत असे म्हणता येते की, वर्तन व जनुक यांचा संबंध काय आहे यासंबंधी होणाऱ्या भावी संशोधनावर ते अवलंबून आहे.

काही जीववैज्ञानिकांच्या मते ज्या वर्तनामुळे शारीरिक क्षमता वा जगण्याची क्षमता वाढते, ते वर्तन नैतिकतेचा आधार असते. केवळ जगणे यास कोणतेही नैतिक मूल्य नाही. प्राणी व मानवी वर्तनाचा अभ्यास विविध अंगांतून करण्यात येत आहे. वर्तनाच्या कार्यपद्घतीचा अभ्यास (क्रमविकासाचा विचार न करता) करता येतो परंतु क्रमविकासाच्या सिद्घांतातून वर्तनाची निर्मिती व त्याची विविधता समजावून घेता येते. यासाठीच सामाजिक वर्तन व कमविकास याचा एकत्रित विचार केला जातो. भावी काळात सामाजिक वर्तन व वैयक्तिक वर्तन यांच्या अभ्यासातून मानवी मूल्ये समजून घेण्यासाठी पुरेसा आधार निर्माण होईल असे वाटते. मानवता या संकल्पनेत नैतिकतेच्या अभ्यासाचा समावेश होतो. सामाजिक जीवशास्त्रज्ञ वर्तनाबाबत जे भाष्य करतील ते तत्त्वज्ञानी व्यक्तीसारखे असणार नाही. विविध ज्ञानशाखांच्या सहयोगाने यापुढील काळात सामाजिक जीवविज्ञानाच्या ज्ञानात फार मोठी भर पडणार आहे.

पहा : प्राण्यांचे वर्तन प्राण्यांचे संचलन प्राण्यांचे सामाजिक जीवन प्राण्यांमधील संदेशवहन.

संदर्भ : 1. Brian, M. V. Social Insects : Ecology and Behavioural Biology, 1983.

2. Mathur, Reena, Animal Behaviour, Meerut, 1999.

3. Mix, Michael C. Farber, Paul King, Keith I. Biology : TheNetwork of Life, New York, 1992.

4. Tinbergen, N. Social Behaviour in Animals, 1990.

5. Wilson, E. Q. Sociobiology :The New Synthesis, 1975.

पाटील, चंद्रकांत प.