साबरमती नदी : गुजरात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची नदी. ही ४१६ किमी. लांब असून तिचे जलवाहन क्षेत्र २१,६७४ चौ. किमी. आहे. साबरमती नदीचा उगम राजस्थानमधील अरवली पर्वतात झाला असून सुरुवातीस साबर व हाथमती हे दोन प्रवाह स्वतंत्र वाहतात. त्यांच्या संगमानंतर त्यास साबरमती नदी हे नाव प्राप्त झाले आहे. वाकल, हर्णव, हाथमती, मेश्वो आणि वात्रक, साई या तिच्या मुख्य उपनद्या आहेत. साबरमती नदीच्या एकूण जलवाहन क्षेत्रापैकी सु. एकचतुर्थांश भाग राजस्थानात येत असून बाकीचे जलवाहन क्षेत्र गुजरातमध्ये येत आहे. या दोन राज्यांतून वाहत जाऊन शेवटी साबरमती नदी खंबायतच्या आखातास मिळते. अहमदाबाद व गांधीनगर ही मोठी शहरे साबरमती नदीकाठी आहेत. सुरुवातीला ही नदी सु. १३० किमी. डोंगराळ भागातून वाहताना ती चिंचोळ्या उंच काठ असलेल्या दरीतून जाते. धरोईपासून अहमदाबादपर्यंत नदीचे पात्र रेताड, रुंद व सपाट उताराचे आहे. अहमदाबादपासून ते मुखापर्यंत साबरमतीचे पात्र विशाल (विस्तृत) असून नदी नागमोडी व संथ वाहते. अहमदाबादच्या उत्तरेस २४० किमी. धरोई येथे बांधलेल्या बंधाऱ्यात या नदीचे पाणी साठविले जाते आणि ते पाणी शेती व शहरांना पुरविले जाते. साबरमती प्रकल्पामुळे २८,३२२ हे. शेती पाण्याखाली येत असून अहमदाबाद व गांधीनगर या शहरांनासुद्घा पाणीपुरवठा केला जातो. नदीने वाहून आणलेल्या माती मिश्रित गाळामुळे नदीखोऱ्यातील जमीन सुपीक झाली असून त्यामध्ये नगदी पिके घेतली जातात.
नदीकाठावर प्रसिद्घ साबरमती आश्रम व अनेक पवित्र ठिकाणे आहेत. वांथा येथील संगमावर कार्तिक महिन्यात अनेक यात्रेकरू येतात.
कुंभारगावकर, य. रा.