सादिक : (१० एप्रिल १९४३ – ). प्रसिद्घ उर्दू कादंबरीकार व कवी. त्यांचे पूर्ण नाव सय्यद सादिक अली. त्यांचा जन्म उज्जैन (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून (औरंगाबाद) उर्दू भाषासाहित्यात एम्.ए. आणि पीएच्.डी. या पदव्या घेतल्या आणि अध्यापन हा व्यवसाय स्वीकारला.दिल्ली विद्यापीठात त्यांनी उर्दू विभागात अधिव्याख्याता, प्रपाठक आणि प्राध्यापक या पदांवर कामकेले.निवृत्तीनंतरचे उर्वरित जीवन ते पूर्णतः वाचन-लेखन यांत व्यतीत करीत आहेत.
सादिक यांनी विपुल ग्रंथ लेखन केले असून, त्यांचे बहुतेक सर्व लेखन उर्दू भाषेत आहे व त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी व अन्य भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या एकूण बारा प्रकाशित ग्रंथांपैकी दस्तखत (१९७३), सिलसिला (१९७६), कुशाद (१९९२), गिरते आसमानका बोज (१९९७) हे काव्यसंग्रह मालवे की लोककथायें (१९८१) येह दाग-दाग उजाला (१९९०), उर्दू कीं कालजयी कहानियां (१९९६–लघुकथासंगह), तरक्वी पसंद तहरीक और उर्दू अफसाना (१९८१), अदब के सरोकार (१९९६) वगैरे काही समीक्षात्मक ग्रंथ मान्यवर व महत्त्वाचे होत.
त्यांना अनेक मानसन्मान लाभले आणि अनेक प्रतिष्ठित संस्थांवर सदस्य-सचिव पदांवर त्यांनी काम केले आहे. भारतीय ज्ञानपीठ समितीच्या उर्दू भाषाविषयक विभागाचे सदस्य-सल्लगार (१९९०), भाषासमिती आणि सरस्वती सन्मानासाठीच्या चयन समितीचे सदस्य व समन्वयक (१९९१-९२) आणि अखिल भारतीय लेखक संघटनेचे ते सचिव होते (१९९४–९६). त्यांना गालिब पुरस्कार (१९७३), ‘निशान-ए-सज्जाद झहीर’ पदवीसन्मान (१९८६), कलाश्री सन्मान (१९९२) आदींनी गौरविण्यात आले आहे.
देशपांडे, सु. र.