साथसंगत : (अकंपनीमेंट).संगीतविषयक संज्ञा. संगीतक्षेत्रात एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराने कलाविष्कारात पूरक व पोषक साहचर्य देणे, अशा अर्थी ‘साथसंगत’ हा शब्दप्रयोग केला जातो. गायन, वादन, नर्तन या तीनही आविष्कारांत साथसंगतीची आवश्यकता असते. हे साहचर्य स्वर व लय या संगीताच्या दोन मूळ संकल्पनांशी निगडित असल्याने ‘तत ’ (नरवी किंवा मिजराबने वाजविण्याची तंतुवाद्ये), ‘वितत ’ (गजाने वाजविण्याची तंतुवाद्ये), ‘अवनद्ध ’, (चामड्याने मढविलेली तालवाद्ये), ‘ घन’ (आघात करून वाजविण्याची वाद्ये) आणि ‘सुषिर ’ (हवेची फुंकर मारुन स्वर निर्माण करणारी वाद्ये) अशा सर्व प्रकारच्या वाद्यांचा साथसंगतीत अंतर्भाव होतो. साथसंगतीची मूळ कल्पना व उपयोजन पुरातन काळापासून रुढ असल्याचे आढळून येते. आदिमानवाच्या काळातही ते प्राथमिक स्वरुपात आढळते. पुराणांत देवादिकांच्या कथांतून भगवान शंकराच्या प्रदोषनृत्याला सरस्वती (वीणा), लक्ष्मी (गायन), इंद्र(वेणू), ब्रह्मदेव(मंजिरा), विष्णू (मृदंग) या देवदेवतांनी साथसंगत केली, अशासारखे उल्लेख अनेकदा आढळतात.

तंबोरा, स्वरपेटी यांसारखी साथीची वाद्येही स्वरप्रमाण किंवा स्वरभरणा यांसाठी योजिली जातात, तर तबला-डग्गा, मृदंग, खोळ, चंडा इ. वाद्येही लय-तालदर्शक वाद्ये म्हणून उपयोजिली जातात. सारंगी, हार्मोनियम, व्हायोलिन, बासरी इ. वाद्येही प्रमुख कलाकाराच्या स्वरकल्पनांच्या पुनरुच्चरणांसाठी किंवा त्यांना पूरक अशा उत्स्फूर्त नवकल्पना मांडण्यासाठी उपयोजिली जातात. जानपदसंगीतात आणि लोकनृत्यात याच नागर वाद्यांची प्रथमावृत्ती वाटावीत अशी स्वरवाद्ये व तालवाद्ये साथसंगतीत अंतर्भूत असतात. उदा., एकतारी, एकतारा, तारपे, ढोल, दिमडी, टाळ, मंजिरा, खंजिरी इत्यादी.

साथसंगत ही अनेक प्रकारे केली जाते. ती गाणाऱ्याला गाणाऱ्याची, वादकाला वादकाची, गायकाला वादकाची किंवा नर्तकाला वादकाची व गायकाची अशा प्रकारे अनेकविध आणि अनेककक्ष असू शकते. साथ ही एकट्याची (तंबोरा धरुन गायक, तबला किंवा मृदंग यांसारखे तालवाद्य) बहुधा दोघांची (एक स्वरवाद्य, एक तालवाद्य) किंवा कारणपरत्वे अनेकांची (भजनाच्या साथीला चिपळ्या, टाळ, रागसंगीताला सारंगी अथवा व्हायोलिन आणि हार्मोनियम नृत्यनाट्ये , संगीतिका आदी प्रकारांत याहूनही अधिक वाद्यांचा वृंद) असू शकते. मूळ स्वराविष्काराला किंवा नृत्याविष्काराला अनुकूल पार्श्वभूमी निर्माण व्हावी एकंदर कलाविष्कारात सातत्य रहावे तो समृद्घ, भरदार, घुमारदार वाटावा, अधिक खुलावा, त्यात पूरक नवकल्पनांची पोषक भर पडावी यांसारखे साथसंगतीचे अनेकविध उद्देश असू शकतात. गायनात भावाभिव्यक्तीसाठी स्वर-लयीबरोबर शब्दाचेही माध्यम असते तथापि साथीच्या वाद्यांना फक्त स्वर व लय यांवरच अवलंबावे लागते.

साथसंगतीच्या मूळ कल्पनेत मुख्य कलाकार व साथसंगतकार यांच्या मानमान्यतेत कमीअधिकपणा अभिप्रेत नाही परंतु प्रत्यक्ष कलाव्यवहारात मात्र साथसंगतीला काहीसे दुय्यम स्थान प्राप्त होताना आढळून येते. पूर्वीच्या काळी साथसंगतकारांचा दर्जा दुय्यम मानण्याची अयोग्य प्रथा रुढ होती. अलीकडे मात्र प्रमुख कलाकार व साथीदार हे समान दर्जाचे मानले जाऊ लागल्याची उदाहरणे दिसू लागली आहेत. (पं.रविशंकर-सतार आणि अल्लरखाँ -तबला). साथसंगतीचे कार्य जसे अप्रतिम अनुकरण हे आहे, तसेच नवकल्पनांचे प्रेरण हेही आहे. साथीदार हा प्रमुख कलाकाराइतकाच तल्लख प्रतिभेचा असू शकतो. नावाजलेल्या साथसंगतींची काही ठळक उदाहरणे पुढीलप्रमाणे होत : बिंदादिनमहाराज (नृत्य) व कालिकाप्रसाद (तबला) बालगंधर्व (नाट्यपदे), थिरकवा (तबला) आणि कादरबक्ष (सारंगी) फैयाजखाँ (शास्त्रीय गायन) आणि अताहुसेन (गायन) इत्यादी.

पाश्चात्त्य संगीतात साथसंगतीला वेगळेच महत्त्व आहे. प्रमुख गायक-वादकाच्या संगीताची पुनरुक्ती किंवा तो काही काळ थांबला असता उत्स्फूर्त साथ करणे, ही त्याची प्रमुख कार्ये असतात. याखेरीज पाश्चात्त्यांचे बरेचसे संगीत हे मुळातच लिहिलेले व योजनाबद्घ असल्याने प्रमुख कलाकाराप्रमाणेच साथीदाराचे संगीतही अगोदरपासूनच पूर्वनियोजित असते, तसेच पाश्चात्त्य संगीतातील हार्मनी वृंदवादन इ. आविष्कारांच्या योगे साथसंगतीच्या कक्षा विस्तारलेल्या दिसून येतात.

पाश्चात्त्य संगीताचे रसग्ररहण करताना दोनतीन भिन्न स्वर किंवा भिन्न कल्पना एकाच वेळी कानावर पडू शकतात. ते स्वर किंवा त्या कल्पना वेगवेगळ्या अजमाविण्याचे शतावधान जसे ऐकणाऱ्याला लागते, तसेच त्यांचा सम्यक परिणामही त्याला स्वतंत्रपणे अनुभवता यावा लागतो. पौर्वात्य साथसंगत ‘मेलडी ’ च्या तत्त्वाचा पुरस्कार करत असल्याने श्रोता एकावधानी असतो, स्वरातील कल्पकता किंवा भावना यांचा एकमार्गी उत्कर्ष तो अनुभवत असतो.

जठार, प्रभाकर