सागरी रसायने : पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग समुद्राने व्यापलेला आहे. समुद्राच्या पाण्यात जवळजवळ सर्व प्रकारची रसायने सामावलेली आहेत तर तळाखाली खनिजांचे मोठमोठे साठे आहेत. यांशिवाय महासागराच्या नैसर्गिक साधनसंपत्तीत समुद्रात मिळणाऱ्या अगणित माशांचा व सागरी अन्नाचा उल्लेख करता येईल. या मत्स्यसंपत्तीचा वाढत्या लोकसंख्येकरिता अन्नाची गरज भागविण्यासाठी उपयोग करण्याचे बऱ्याच देशांत प्रयत्न चालू आहेत. तसेच अब्जावधी वनस्पती समुद्राच्या पाण्यावर वाढतात. त्यांपैकी काही माशांचे खाद्य आहेत तर काहींपासून उपयुक्त रसायने मिळतात. समुद्राचा उपयोग जास्तीत जास्त साधनसंपत्ती मिळविण्यासाठी बऱ्याच देशांत होत आहे आणि त्यासाठी काही विषयांवर संशोधन चालू आहे. उदा., माशांवरील सांगोपांग माहिती, सागरी रसायने, समुद्रतळातील खनिजे, समुद्रावरील परिस्थितीचा हवामानावर होणारा परिणाम, जहाज वाहतुकीस लागणारी सागराबद्दलची माहिती, अणुशक्ती केंद्रातील व समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या शहरांतील आणि कारखान्यांतील सांडपाणी व वाहितमल सोडण्यासाठी समुद्राचा उपयोग आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने त्याकरिता घ्यावी लागणारी काळजी, किनाऱ्यावरील समुद्राचा सार्वजनिक करमणुकीचे साधन म्हणून होणारा वापर इत्यादी. प्रस्तुत नोंदीमध्ये मुख्यतः सागरी रसायने आणि त्यांच्या अनुषंगाने समुद्रातील खनिजे व वनस्पती यांची माहिती दिली आहे. 

समुद्राच्या पाण्यात विरघळलेली खनिजे समुद्रकिनारे, खंड-फळी व खोल समुद्रतळ येथील घट्ट न झालेले खनिज निक्षेप आणि समुद्रतळाखालील आधार शिलेतील घट्ट झालेले निक्षेप हे सागरी पर्यावरणातील खनिज संपत्तीचे तीन मूलभूत प्रकार आहेत. यांची पुढील प्रकारे विभागणी करतात : (अ) द्रायुरूप (द्रव वा वायुरूप) प्रकारात समुद्रतळावरील खनिजांमध्ये गोडे व खारे पाणी येते. खाऱ्या पाण्यात मॅग्नेशियम, सोडियम, युरेनियम व ब्रोमीन आणि इतर २६ मूलद्रव्यांची खनिजे (लवणे) येतात तर समुद्रतळाखालील थरांत जलतापीय द्रायू असतात. (आ) घट्ट व घनरूप न झालेल्या प्रकारात वाळू, रेव, कवचे व ॲरॅगोनाइट तसेच जड खनिजांच्या प्लेसर निक्षेपात मॅग्नेटाइट, रूटाइल, इल्मेनाइट, क्रोमाइट व मोनॅझाइट ही खनिजे येतात. शिवाय यात मँगॅनीज व फॉस्फोराइट यांचे बटाट्यासारखे गोटे आणि धातुयुक्त, कार्बनयुक्त, कॅल्शियमी, सिलिकामय व बराइटाचे चिखल (पंक) आणि अंदुके येतात. शिवाय समुद्रतळाखालील जड मूलद्रव्यांचे प्लेसर निक्षेप, सोने, प्लॅटिनम, कॅसिटेराइट, रत्ने व स्तरित फॉस्फोराइट निक्षेप असतात. (इ) घट्ट झालेल्या निक्षेपांत समुद्रतळावरील भूकवचात फॉस्फोराइट, कोबाल्ट व मँगॅनीज तसेच तेथील टेकड्यांमध्ये व राशींत धातूंची सल्फाइडे आढळतात. शिवाय समुद्रतळाखालील थरांत दगडी कोळसा, फॉस्फेटे, कार्बोनेटे, पोटॅश, आयर्नस्टोन, चुनखडक, धातूंची सल्फाइडे व लवणे आढळतात. 

जमिनीवरील निक्षेपांप्रमाणेच याही निक्षेपांचा शोध घेतात आणि मूल्यनिर्धारणासाठी व उपयोग करून घेण्यासाठी त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतात. त्यांचे खाणकाम करतात. नंतर समृद्घीकरण करून विक्रीयोग्य पदार्थ तयार करतात. समन्वेषण करताना जहाजांद्वारे निक्षेपांची माहिती मिळवितात त्यांचे सर्वेक्षण करून नमुने घेतात. 

समुद्राच्या पाण्यात साधारण ३·५ टक्के विद्राव्य (विरघळण्यास योग्य)पदार्थ आहेत. अब्जावधी वर्षांपासून समुद्राला मिळणाऱ्या नद्या हे पदार्थ पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांतून सागरात आणून सोडत आहेत. यामुळे बहुतेक सर्व मूलद्रव्ये समुद्रात असण्याचा संभव आहे. समुद्रात सु. ७३ मूलद्रव्ये असल्याचे शास्त्रज्ञांनी अगोदरच सिद्घ केले आहे. फक्त ९ मूलद्रव्ये काहीशा मोठ्या प्रमाणात असून बाकीची अतिशय कमी प्रमाणात आहेत. कमी प्रमाणात असलेल्या मूलद्रव्यांत युरेनियम, सोने व रुबिडियम यांचा समावेश आहे. हे मौल्यवान धातू व आयोडीन वगैरे अधातू समुद्राच्या पाण्यापासून काढण्याकरिता सुगम आणि स्वस्त प्रकिया शोधण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. समुद्राच्या एक लक्ष लिटर पाण्यात या मूलद्रव्यांचे अंदाजे प्रमाण बोरॉन ४८० ग्रॅ., लिथियम २० ग्रॅ., रुबिडियम १२ ग्रॅ., आयोडीन ५ ग्रॅ., युरेनियम ३०० मिग्रॅ., सिझियम ५० ग्रॅ., सोने ०·४ मिग्रॅ. असते. यावरून समुद्राच्या पाण्यापासून हे पदार्थ स्वतंत्र रीत्या मिळविणे किती अवघड आहे, याची कल्पना येते. 

समुद्रात असलेली महत्त्वाची लवणे पुढीलप्रमाणे आहेत : सोडियम क्लोराइड (मीठ), मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराइड, कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम ब्रोमाइड. या लवणांचे प्रमाण एकूण विरघळलेल्या पदार्थांच्या सु. ९० टक्के असते. समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या पाण्यातील एकूण लवणांचे प्रमाण निरनिराळ्या कारणाने कमी-जास्त (१ ते ३·५ टक्के) झाले, तरी या लवणांचे एकमेकांशी असलेले प्रमाण स्थिर असते. याचे कारण जगातील सर्व समुद्रांचे पाणी पूर्णपणे मिसळले जाते आणि ही मूलद्रव्ये शोषण्याची तसेच बाहेर टाकण्याची समुद्रातील वनस्पतींची व प्राण्यांची क्रिया सतत चालू असते. त्याचा परिणाम या मूलद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण कायम राखण्यात होतो. 

समुद्राच्या पाण्यात असलेल्या निरनिराळ्या लवणांमुळे या पाण्याचे सखोल शास्त्रीय ज्ञान अजून झालेले नाही. यासाठी निरनिराळी आधुनिक साधने वापरून समुद्राच्या पाण्याविषयी माहिती मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

विद्राव्य रसायने व गोडे पाणी : समुद्रात रसायन उद्योगाला लागणारी कित्येक खनिजे विरघळलेल्या रूपात आहेत परंतु अजून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्याचे प्रयत्न कोणत्याही देशाने केलेले नाहीत. समुद्रातून मिठाशिवाय ब्रोमीन व मॅग्नेशियम ही रसायने मिळविण्याकरिता काही देशांत कारखाने आहेत. मॅग्नेशियम रसायने जास्त प्रमाणात काढावयाची असल्यास मॅग्नेशियम धातूचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. मॅग्नेशियम धातूचा उपयोग कशा रीतीने वाढविता येईल, यांवर पूर्वीपासून संशोधन करण्यात येत आहे. 

शिवाय समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याचे मोठमोठे कारखाने उभारले जात आहेत.यापुढेही मोठ्या प्रमाणात असे कारखाने उभारले जातील. वेगळे केलेल्या अतिशय खाऱ्या पाण्यापासून काही उपयुक्त धातू व अधातू (उदा.,रुबिडियम व ब्रोमीन) मिळण्याची शक्यता आजमाविली जात आहे. 

भारतातील सागरी रसायन उद्योग : समुद्राच्या पाण्यापासून सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन करून भारतात मीठ बनविले जाते. मीठ बनविण्यापूर्वी समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होत असताना कॅल्शियम कार्बोनेट व कॅल्शियम सल्फेट (जिप्सम) ही लवणे स्फटिक रूपाने बाहेर पडतात. मिठाचा संतृप्त विद्राव बनून मिठाचे स्फटिक बाहेर पडल्यावर जे द्रावण राहते, त्याला ‘बिटर्न’ म्हणतात. त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड असतात. साधारणपणे एक टन मिठामागे ०·०५७ टन जिप्सम मिळते आणि एक टन बिटर्नापासून ०·१२२ टन मीठ, ०·०७ टन मॅग्नेशियम सल्फेट, ०·१५ टन मॅग्नेशियम क्लोराइड, ०·०२५ टन पोटॅशियम क्लोराइड व ०·००२३ टन ब्रोमीन मिळू शकते [⟶ मीठ]. 

भारतात बिटर्नापासून १,००० टन पोटॅशियम क्लोराइड व २,००० टन ⇨एप्समाइट  इतकी वार्षिक उत्पादनक्षमता असलेला एक कारखाना कांडला येथे आहे. या कारखान्यात वापरलेल्या प्रक्रियेशिवाय बिटर्नापासून पोटॅशियम क्लोराइड व पोटॅशियम सल्फेट मिळविण्याच्या इतर प्रक्रिया भावनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने संशोधिल्या आहेत. १ लाख टन मीठ बनविणाऱ्या आगरांना बिटर्नापासून पोटॅशियम क्लोराइड बनविण्यास जो भांडवली खर्च येतो, त्यापेक्षा जास्त परकीय चलनाची बचत यामुळे होते. हे कारखाने उभारण्यास बाहेरून कोणत्याही उपकरणाची अगर यंत्राची आयात करावी लागत नाही. 

इझ्राएललगतच्या मृत समुद्रात इतर समुद्राच्या पाण्याशी त्याचे मिश्रण होत नसल्यामुळे सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन पाण्याची घनता वाढली आहे. या समुद्रात सु. २२ टक्के लवणे आहेत आणि ब्रोमीन व पोटॅशियमयुक्त खते मिळविण्याचे ते एक मोठे साधन बनले आहे. भारतातही कच्छच्या रणात समुद्राचे पाणी तेथे पोहोचत असल्यामुळे खाऱ्या पाण्याच्या विहिरींचे साठे बनले आहेत. यांत लवणे १५–२० टक्के आहेत. यांतून काही भागांत मीठ बाहेर काढतात. या पाण्यापासून पोटॅशियम सल्फेट व पोटॅशियम क्लोराइड बनविण्याच्या योजना आहेत. 

पोटॅशियम खते : निरनिराळ्या मिठागरांवर तेथील बिटर्नाचा उपयोग करून पोटॅशियमयुक्त खतांचे कारखाने उभारण्यात आले आहेत. मिठागरातील सर्व बिटर्न पूर्णपणे वापरले गेले, तरीही जवळपास २५,००० टन (K2O च्या परिमाणात) पोटॅशियम खत निर्माण होते व यापासून भारतातील पोटॅशियम खतांची फक्त पाच टक्केच गरज भागविली जाते. तसेच बिटर्नाऐवजी समुद्राच्या पाण्यापासून ⇨आयन-विनिमय  पद्घतीचा उपयोग करून पोटॅशियम खते काढण्याच्या प्रक्रियेवर संशोधन करण्यात आले. समुद्र हे एकच साधन उपलब्ध असल्यामुळे भारताने वर दर्शविल्याप्रमाणे याबाबतीत वेगाने वाटचाल केली आहे. तरीही भारत मुख्यतः आयातीवर अवलंबून आहे. 

मॅग्नेशियम रसायने : समुद्राच्या पाण्यापासून मॅग्नेशियम लवणे (रसायने) मिळविण्याचे प्रयत्न झाले आहेत. भारतात मॅग्नेसाइट खनिजे मोठ्या प्रमाणात मिळत असली, तरी भारताला समुद्राच्या पाण्यापासून मॅग्नेशियम रसायने मिळविण्याची आवश्यकता काही वर्षांत भासू लागेल. बिटर्नापासून कारखान्यांत मॅग्नेशियम क्लोराइड तयार करतात. याचा उपयोग सोरेल सिमेंट व कापडाचे साइजिंग (खळ देणे) यांकरिता होतो. बिटर्नापासून मॅग्नेशियम सिलिकेट बनवितात. ते औषध म्हणून वापरले जाते. बिटर्नापासून औषधाकरिता लागणारे मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, रबर उद्योगांकरिता लागणारे सौम्य क्षारकीय मॅग्नेशियम कार्बोनेट, दारुगोळा कारखान्यांत लागणारे तीव्र क्षारकीय कार्बोनेट व निरनिराळ्या धंद्यांत लागणारे मॅग्नेशियम ऑक्साइड तयार करण्याच्या प्रक्रिया उपलब्ध आहेत. 

सागरी जिप्सम : वर वर्णन केल्याप्रमाणे एक टन मिठाच्या उत्पादनामागे सु. ५७ किग्रॅ. जिप्सम मिळते.फक्त काही मोठमोठी मिठागरेच हे जिप्सम मिळवितात. बहुतेक जिप्सम सिमेंट कारखान्यांना पुरविले जाते. जिप्समापासून कॅल्शियम सिलिकेटही बनविले जाते. कॅल्शियम सिलिकेट रबर उद्योगांत आणि मंद उष्णतावाहक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. 

ब्रोमीन : ब्रोमिनाचा उपयोग एथिलीन ब्रोमाइड व मिथिल ब्रोमाइड आणि पोटॅशियम, सोडियम व अमोनियम ब्रोमाइड तयार करण्याकरिता होतो. मिथिल व एथिलीन ब्रोमाइडाकरिता ब्रोमिनाची आवश्यकता वाढली आहे. बिटर्नावर क्लोरिनाचा परिणाम घडवून ब्रोमीन बनवितात परंतु जसजशी ब्रोमिनाची गरज वाढेल तसतशी बिटर्नाशिवाय समुद्राच्या पाण्यापासूनही ब्रोमीन मिळवावे लागेल. 

खनिजे : समुद्रतळाशी मँगॅनीजयुक्त गोटे (१०१२ टन), फॉस्फरसयुक्त गोटे (१०१० टन), सिलिकायुक्त लगदा (१०१३ टन), कॅल्शियम कार्बोनेटयुक्त लगदा (१०१४ टन), तांबे, कोबाल्ट व निकेलयुक्त तांबडी माती (१०१५ टन) असल्याचा अंदाज आहे. समुद्रतळाशी हे गोटे सतत तयार होत असल्याने त्यांचा अविरत उपयोग करता येणे शक्य आहे. समुद्रातून ही खनिजे काढण्याकरिता स्वस्त व साधी आयुधे तयार करणे व मोठ्या प्रमाणात ही खनिजे काढणे या दोन गोष्टी शक्य झाल्यास ती स्वस्त दरांत पुरविणे शक्य आहे.

  

भारतात फॉस्फोराइटांचे साठे जवळजवळ नसल्यामुळे हिंदी महासागरातील फॉस्फोराइटांचे गोटे मिळविण्याकरिता लागणाऱ्या संशोधनास अग्रक्रम देण्यात आलेला आहे. भूपृष्ठावरील फॉस्फोराइटापेक्षा सागरातील फॉस्फोराइट जास्त अशुद्घ असल्यामुळे त्याला कमी किंमत असते. 

समुद्रतळामधून मिळविल्या जाणाऱ्या खनिजांत मुख्यतः खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि गंधक ही महत्त्वाची आहेत. यांशिवाय समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशांतही खनिजे सापडतात. दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याच्या तळात मौल्यवान हिरे मिळतात. जपानमध्ये अशुद्घ लोखंड टोकिओच्या आखातातून काढले जाते. याशिवाय सोनेयुक्त माती व कथिलयुक्त माती मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया व अमेरिकेलगतच्या समुद्रतळावर आणि मोनॅझाइट वाळू भारत, श्रीलंका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांलगतच्या समुद्रतळाशी मिळते. 

लाखो वर्षांपूर्वी काही भूभागावर समुद्राचे पाणी होते. त्यापासून पोटॅशियम लवणांचे साठे बनले आहेत. काही ठिकाणी याचा परिणाम जिप्सम व मिठाचे खनिज साठे बनण्यात झाला आहे. भारतात असे मिठाचे साठे आणि जिप्समाचे साठे हिमाचल प्रदेशात व राजस्थानमध्ये आहेत परंतु पोटॅशियम लवणांचे साठे नाहीत. भारतातील सौराष्ट्र, केरळ व दक्षिण तमिळनाडूच्या किनाऱ्यावर कॅल्शियम कार्बोनेटाचे साठे आहेत. यांचा संबंध सागरी प्राण्यांशी व वनस्पतींशी आहे. 

औषधी : समुद्रातून बऱ्याचशा औषधी मिळतात. उदा., आगर, कॉड व शार्क माशांचे तेल, आयोडीन, मॅग्नेशियम व ब्रोमिनापासून बनलेल्या औषधी. समुद्रामध्ये प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ असल्याचे आढळले आहे. 

सागरी शैवले : सागरी शैवले हे काही उपयुक्त रसायने मिळविण्याचे एकमेव साधन आहे. सोडियम अल्जिनेट व अल्जिनिक अम्ल यांचा कापड, औषधी व खाद्यपदार्थ उद्योगांत उपयोग होतो. जेलिडियम व ग्रॅसिलॅरियापासून आगर मिळवितात. अल्वा जातीत चांगल्या प्रकारची प्रथिने असल्यामुळे त्याचा अन्नपदार्थांत उपयोग करतात. यांशिवाय इतर जातींच्या शैवलांचा कंपोस्ट खत बनविण्यास उपयोग होतो. काही विशिष्ट शैवले आयोडीन मिळविण्याचे साधन म्हणून वापरतात परंतु ही शैवले भारतात तुरळक मिळतात. सर्वसाधारणपणे भारतात शैवलाची नैसर्गिक निर्मिती कमीच होते. [⟶ शैवले]. 

समुद्राच्या पाण्यातील लवणांत कोणत्याही धातूंची अवजारे व यंत्रे फार काळ टिकाव धरू शकत नाहीत. समुद्राच्या पाण्यात कोणत्या धातूंवर अथवा मिश्रधातूंवर कमी प्रमाणात परिणाम होतात याची माहिती झाल्यास समुद्राच्या पाण्याचा उद्योगांत उपयोग करता येणे शक्य आहे. याप्रमाणे सर्व प्रकारे सागर विज्ञानाचे संशोधन होऊन जसजसे विविध अंगांचे ज्ञान वाढत जाईल, तसतसे समुद्राचा जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकेल. 

कर्वे, रा. वि.

भवितव्य : समुद्रामधील खाणकामाविषयीच्या तांत्रिक समस्या सुटावयाच्या असल्या, तरी त्याचे भवितव्य उज्ज्वल व आकर्षक आहे. १९७०–८० दरम्यान तांबड्या समुद्रात धातुमय चिखल आढळले. पॅसिफिक व हिंदी महासागरांत मँगॅनिजाचे गोटे आढळले, तर पॅसिफिकमध्ये संपुंजित धातुमय सल्फाइडे आणि पॅसिफिक व अटलांटिक महासागरांत उच्च कोबाल्टयुक्त धातुमय ऑक्साइडांची समुद्रतळावरील पुटे (लेप) व्यापकपणे आढळली. या निक्षेपांविषयीची माहिती आणि त्यांचे समन्वेषण व समुपयोग करून घेणे यांसाठीची तंत्रे अगदी प्राथमिक स्वरूपाचीच आहेत. मात्र अशा अनेक निक्षेपांच्या बाबतीत त्यांचा विकास होऊ शकेल व त्यांचे खाणकाम करता येऊ शकेल, यांविषयी थोडी शंकाच आहे. कारण त्यासाठी जमिनीवरील कामांना पर्यावरणाच्या दृष्टीने स्वीकारार्ह अशी प्रणाली उभारावी लागेल. 

समुद्राच्या पाण्यातील खनिजांचे निष्कर्षण आधुनिक पद्घतींनी केल्यास जागतिक उत्पादनातील त्यांचा वाटा चांगलाच मोठा असेल. अनेक ज्ञात मूलद्रव्यांच्या दृष्टीने समुद्राचे पाणी ही अगदी सहजपणे हाताळता येणारी साधनसंपत्ती आहे. सुयोग्य तंत्रविद्या विकसित झाल्यास समुद्राच्या पाण्यातून खनिजांचे थेट (सरळ) निष्कर्षण करण्यात वाढ होईल. समुद्रतळ विस्तारणाची केंद्रे व इतर ज्वालामुखी आविष्कार यांच्याशी निगडित असलेली खनिजे विपुल असलेले जलतापीय द्रायू आहेत. या द्रायूंमुळे खनिजे व भूऔष्णिक ऊर्जा यांच्या निर्मितीची शक्यता वाढली आहे.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या घट्ट न झालेल्या निक्षेपांचे खाण काम हे बांधकाम साहित्य व जड खनिजे यांच्या पुरवठयाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरेल. सुधारित तंत्रविद्येमुळे ते फायदेशीर होईल. कारण यामुळे अधिक खोलवरच्या पाण्यातील, तसेच किनाऱ्यापासून अधिक दूरवरच्या भागात आणि उच्च अक्षांशाच्या भागात खाणकाम करता येईल. धातुयुक्त गोटे व तांबड्या समुद्रातील चिखल यांचे खाणकाम शक्य कोटीतील असल्याचे यांविषयीच्या यशस्वी चाचण्यांवरून कळले आहे.

घट्ट झालेल्या निक्षेपांच्या खाणकामासाठी विविध प्रकारच्या नवीन खाणकाम पद्घती आवश्यक असतील. निक्षेपाचा प्रकार, दर्जा व रसायनशास्त्र तसेच त्याचे जमिनीपासूनचे अंतर व पाण्याची खोली यांवर या पद्घती अवलंबून असतील. समुद्राच्या पाण्याखालील खडकांमधील धातुकांसाठी (कच्च्या रूपातील धातूंसाठी) विद्राव खाणकाम तंत्र वापरावे लागेल. त्यामुळे जागेवर धातुक फोडले जाईल आणि वेधनाद्वारे बनविलेल्या अनेक छिद्रांमधून काढून घेतलेल्या विद्रावांत असलेली मौल्यवान द्रव्ये काढून घेता येतील. खडक फोडण्यासाठी छिद्रांचा आकृतिबंध कसा नियंत्रित करावा हे पहावे लागेल. तसेच जटिल धातुकांमधून इष्ट मूलद्रव्यांचे विवेचकपणे निष्कर्षण करण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. १९६०– ७० या कळात व त्यानंतरही यांविषयीच्या तंत्रविद्येत विशेष प्रगती झाली. त्यामुळे भावी खाणकामाच्या शक्यतेत वाढ होईल. उदा., पाण्याखालील सर्वेक्षण, पाण्याखालील प्रगत वाहनप्रणाली व जलधातुवैज्ञानिक प्रक्रिया यांत चांगली प्रगती झाली आहे. समुद्रतळ प्रतिमादर्शन व पृथ्वीवरील स्थाननिश्चिती या तंत्रांचा एकत्रितपणे उपयोग करणे हा या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा असेल. कारण समुद्रतळावरील साधनसंपत्तीची गुणवैशिष्ट्ये ठरविणे व तिचा विकास करणे यांचा चांगल्या रीतीने पाठपुरावा करण्यासाठी पुरेसे नकाशे लागणार आहेत [⟶ खाणकाम ].

ठाकूर, अ. ना.

पहा : भारत महासागर व महासागरविज्ञान मीठ राष्ट्रीय प्रयोगशाळा.

संदर्भ : 1. Cooper, H. R. Practical Dredging, 1981.  

             2. Cronan, D. S. Under Water Minerals, 1980.  

             3. Krull, A. Ocean Mining and Engineering : New Directions and Opportunities, 1983.  

             4. United Nations, Ed., Seabev Minerals Series, 3 Vols., 1983.  

             5. U. S. Congress, Office of Technology Assessment, Marine Minerals : Exploring Our Ocean Frontier, 1987.