सॅमॉइड (सामो येद) : भूतपूर्व सोव्हिएट प्रजासत्ताकातील एक प्रसिद्घ मानवजातिसमूह. या समूहात अनेक भटक्या जमाती अंतर्भूत होतात. त्या समूहास ‘युराक’ असेही म्हणत. त्यांची वस्ती मुख्यत्वे सायबीरियात असून काही सॅमॉइड जमाती ईशान्य यूरोपमध्ये, विशेषतः तायमीर व कोला द्वीपकल्प आणि पेचोरा, बो व येनिसे या नद्यांकाठी आढळतात. त्यांची लोकसंख्या ३५,००० होती (१९८१). सॅमॉइडचे दोन प्रमुख समूह असून उत्तरेकडे त्यांची अधिक वस्ती आहे. तिथे त्यांना नेनेट्स म्हणतात. दक्षिणेकडील जमाती नगनासनी एन्टसी (येनिसेई सॅमॉइड), सेल्कप (ओस्तियाक सॅमॉइड) इ. नावांनी प्रसिद्घ असून त्यांपैकी सेल्कपांची लोकसंख्या ३,५०० होती (१९८१). या समूहातील कामासीयन्स, कोईबाल, मोटार आणि तैगी या जमाती लुप्त (निर्वंश) झाल्या आहेत. या जमाती उरल-अल्ताइक भाषासमूहातील चार बोली भाषा समाविष्ट असलेली सॅमॉइड (सामोयेद) भाषा बोलतात. यातील नेनेट्स हा सॅमॉइड भाषा बोलणारा सर्वांत मोठा समूह असून त्यांची लोकसंख्या ३४,००० होती (१९८१).
या सर्व जमाती पशुपालक असून त्या तंबूंतून राहतात. त्यांच्यात सांबरसदृश रेनडियर या प्राण्यास विशेष महत्त्व आहे आणि साधारणतः एका संयुक्त कुटुंबात ७० ते १०० रेनडियरांचा कळप असतो. त्यांचे प्रमुख अन्न रेनडियर व डुक्कर यांचे मांस असते. पशुपालनाशिवाय शिकार, मच्छीमारी हे व्यवसायही ते करतात. रेनडियरपासून मांस, चरबी व रक्ततर मिळवितातच पण त्याच्या कातड्यापासून ते कपडे, पादत्राणे, दोरखंड, फास, चिलखत, लगाम, खोगीर इ. वस्तू बनवितात. हिवाळ्यात तंबूसाठी ते रेनडियरच्या कातड्याचा उपयोग करतात. त्यांच्यात अनेक कुळी असून पितृसत्ताक कुटुंबपद्घती आहे. एकाच कुळात विवाहसंबंध होत नाही. प्रत्येक कुळीचे व्यवसायाचे स्वतंत्र क्षेत्र असले, तरी कबरस्थान एकच असून गणचिन्हांची जागा व बळींची जागा एकच असते. स्त्रियांना घरगुती कामे करावी लागतात. त्यांना गौण स्थान आहे.
या जमाती मुख्यत्वे जडप्राणवादी निसर्गपूजक आहेत. सामर्थ्यानुसार त्यांच्यामध्ये शामानांचे भिन्न वर्ग आढळतात. त्यांचा प्रमुख देव नम (विश्वनिर्माता) असून त्याचा मुलगा न्गाहा दुःख-मृत्यू यांचा कारक आहे. वर्षातून दोन वेळा नम ह्यास कुत्र्याचा वा रेनडियरचा बळी देतात. इलिबेम्बर्ती हे चैतन्य रूप रेनडियरचे संरक्षण-संवर्धन करते. या जमातीमध्ये नामकरणविधी आणि अंत्यविधी हे दोनच महत्त्वाचे संस्कार होत. मृत व्यक्तीला चामड्यात गुंडाळून काही दिवस तंबूत ठेवतात मात्र त्या दिवसांत अन्य व्यवहार चालू असतात. मृतात्मा छायारूपात वावरतो, अशी त्यांची समजूत आहे. कबरस्थानात मृत व्यक्तीस उत्तरेकडे पाय करून दफनपेटीत घालून पुरतात. फक्त अगदी जवळचे नातेवाईक शोक व्यक्त करतात. मृत व्यक्तीची पत्नी लाकडी ताईत वा बाहुली पतीच्या स्मरणार्थ बनविते व तिला कपडे घालून पुढे सहा महिने तिच्या शेजारी झोपते. या काळात तिला पुनर्विवाह करता येत नाही.
यूरोपियनांच्या, विशेषतः मिशनऱ्यांच्या संपर्कानंतर त्यांच्यात काही किरकोळ बदल घडले. त्यांनी गोऱ्यांची काही शस्त्रे, वस्तू , कपडालत्ता घेतला पण त्याबरोबरच मद्यपान, गर्मी-देवी यांसारखे रोग जमातींत प्रविष्ट झाले. रशियन क्रांतीनंतर (१९१७) साम्यवादी शासनाने त्यांची मूलभूत संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला असून या जमातींतील लोकांच्या उच्च शिक्षणासाठी लेनिनग्राड येथे एक स्वतंत्र संस्था काढली आणि सॅमॉइड भाषेला पद्घतशीर लिखित स्वरूप दिले.
संदर्भ : 1. Donner, Kai, Among the Samoyed in Siberia, New Haven, 1954.
2. Hajdu, Peter, The Samoyed Peoples and Languages, Bloomington, 1963.
3. Hoppal, Mihaly, Ed. Shamanism in Eurasia, 2 Vols., Gottingen, 1984.
देशपांडे, सु. र.