कूपेरस, लूई : (१० जून १८६३–१६ जुलै १९२३). डच कादंबरीकार. जन्म हेग येथे एका श्रीमंत खानदानी कुटुंबात. कवी म्हणून अयशस्वी ठरल्यानंतर कादंबरीलेखनाकडे वळला. इटलीत त्याचे दीर्घकाळ वास्तव्य होते. Eline vere (१८८९, इं. भा. १८९२) ही त्याची पहिली कादंबरी निसर्गवादी तंत्राने लिहिलेली आहे. Noodlot (१८९१, इं. भा. द लॉ इन्‌एव्हिटेबल, १९२१), De stille kracht (१९००. इं. भा. द हिड्‍न फोर्स, १९२२), De boeken der kleine zielen (४ खंड, १९०१–१९०४, इं. भा. स्मॉल सोल्स, १९१४ — १९२०), Van oude menschen de dingen die voorbijgaan (१९०६, इं. भा. ओल्ड पीपल अँड द थिंग्ज दॅट पास, १९१९) ह्या त्याच्या इतर काही कादंबऱ्‍या. हेगमधील तत्कालीन समाजजीवनावर त्या आधारलेल्या आहेत. स्मॉल सोल्स  आणि ओल्ड पीपल  ह्या त्याच्या श्रेष्ठ साहित्यकृती. ग्रीक-रोमन पार्श्वभूमीवर त्याने काही ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या (De Komedianten, १९१७, इं. भा. द कॉमेडिअन्स, १९२६Xerxes, १९१९, इं. भा. ॲरगन्स, १९३०  Iskander, १९२०). त्याने काही रोमान्स आणि उत्कृष्ट प्रवासवृत्तेही लिहिली आहेत. जिवंत व्यक्तिचित्रण आणि परिणामकारक निवेदन ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्ये. नियतिवादाची नैराश्यमय छाया त्याच्या लेखनात तीव्रतेने जाणवते. डस्टेख येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.