सॅम पित्रोदा : (१६ नोव्हेंबर १९४२– ). दूरसंचार अभियंते, संशोधक, विकासकांचे मार्गदर्शक आणि प्रवर्तक. पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा तथापि सामान्यतः ‘सॅम’ या नावाने सर्वत्र परिचित. जन्म ओरिसा (ओडिशा) राज्यातील तितलागढ या खेडेगावात. सॅम यांचे शालेय शिक्षण गुजरातमधील आनंद वल्लभ विद्यालयातून झाले पुढे त्यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून भौतिकी आणि इलेक्ट्रॉनिकी या दोन विषयांमध्ये एम्.एस्सी. ही पदवी संपादिली. त्या नंतर ते उच्च शिक्षणासाठीअमेरिकेस गेले. तेथे शिकागोच्या इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी विद्युत् अभियांत्रिकीमधील एम्.एस्सी. पदवी प्राप्त केली.
सॅम पित्रोदा हे १९६० चे दशक व १९७० च्या दशकाची पहिली काही वर्षे दूरसंचारक्षेत्र आणि छोटे संगणक (हँडहेल्ड कॉम्प्यूटर) यांविषयीच्या संशोधनात व्यग्र होते. या काळात त्यांनी प्रामुख्याने दूरध्वनी स्विचमधील मायकोप्रोसेसर यांची जगाला ओळख करून दिली. अमेरिकेतील शिकागो येथील जीटीई कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिजिटल स्विच तंत्रज्ञानक्षेत्रात दहा वर्षे काम केल्यानंतर लवकरच त्यांनी वेसकॉम स्विचिंग या कंपनीची स्थापना केली (१९७४). काही काळाने ‘रॉकवेल इंटरनॅशनल’ या मोठ्या कंपनीत ती सामील झाल्यानंतर सॅम पित्रोदा या कंपनीचे उपाध्यक्ष बनले. १९७५ मध्ये त्यांनी लावलेल्या इलेक्ट्रॉनिक डायरीचा शोध म्हणजे छोट्या संगणकाचेच उदाहरण मानले जाते. १९८३ मध्ये पित्रोदांनी ‘काँप्युकॉर्ड’ नावाचा संगणक-शीर्षकाचा द्विअंगी (१, २, ४, ८, …..) पत्त्यांचा खेळ, ज्यामध्ये दशांश पद्घतीचा वापर केलेला नाही असा, शोधून काढला.
भारतात त्यांनी भारत सरकारच्या आधिपत्याखाली ‘द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ (सी-डॉट) या केंद्राची स्थापना केली (१९८४). सॅम यांची १९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लगार म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८९ मध्ये भारतीय दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. दूरसंचारविषयक कायदेकानू आणि त्यांचा सर्वांगीण विकास या सर्व गोष्टींची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. भारताचे राष्ट्रीय दूरसंचार धोरण ठरविण्यात पित्रोदा यांचे मोठे योगदान आहे. भारताच्या दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार म्हणूनच ते ओळखले जातात विशेषतः त्यांच्यामुळेच सर्वव्यापक पीतवर्णी सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्राच्या रूपात सबंध भारतात स्वस्त आणि सुलभ अंतर्गत विदेश दूरध्वनिसेवा उपलब्ध झाली. सी-डॉट प्रत्यक्षात अवतरल्यावर पित्रोदांनी भारतात लहान, ग्रामीण दूरध्वनी कार्यालये उभारली त्याचप्रमाणे जगातील अनेक दुर्गम प्रदेशांमध्ये दूरध्वनींचे जाळे पसरविले. सी-डॉट यंत्रणा व्हिएटनाम, बांगला देश, नेपाळ, इथिओपिया, घाना व युगांडा यांसारख्या जगातील सु. २२ देशांना दूरध्वनिसाहित्य निर्यात करते. शासकीय सेवा सोडल्यानंतर सॅम पित्रोदा शिकागोला गेले आणि त्यांनी संगणक व इतर संगणकीय साधने यांच्या उत्पादनावर विशेष भर दिला.
सॅम पित्रोदा यांनी १९९५ मध्ये अमेरिकेत ‘वर्ल्डट्रेल’ नावाची आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची मान्यता असलेली एक वैश्विक संघटना स्थापन केली. अविकसित व अर्धविकसित देशांधील दूरसंचार व्यवस्थेचा विकास करणे, हे त्या संघटनेचे उद्दिष्ट आहे. या संघटनेचे ते प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व नंतर अध्यक्ष बनले. सॅम पित्रोदांचे ज्ञान व अनुभव तसेच त्यांच्या गटाचे तंत्रज्ञान यांचा सहयोग भारताला मिळावा म्हणून त्यांची नियुक्ती ‘राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी केली गेली (२००८).
सॅम पित्रोदांच्या मते पुरेसा आहार, स्वच्छ पाणी व पुरेसा निवारा यांच्या बरोबरीने दूरसंचार हा आधुनिकीकरण प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा वा घटक समजला पाहिजे. पिवळ्या रंगाच्या एस्टीडी व पीसीओ कक्षिका (बूथ्स) म्हणजे सॅम पित्रोदांच्या प्रयत्नांचे निदर्शकच होय.
या दूरध्वनी जाळ्याच्या उभारणीमागील मूलभूत तंत्रज्ञान हे अतिशय साधे व स्वस्त होते. सी-डॉट यंत्रणेतील पित्रोदांच्या गटाने शोधून काढलेल्या एका उपकरणाच्या योगे दूरध्वनी करणाऱ्याला येणाऱ्या खर्चाचे आकलन होई, तसेच दूरध्वनी वापरणाऱ्याला दूरध्वनी केल्याचे पैसे दूरध्वनिकेंद्राऐवजी तात्काळ कळत असत यामुळे भारतीय दूरध्वनियंत्रणेत मोठा बदल घडून आला. भारतातील दूरसंचारयंत्रणेत क्रां ती आणण्याबरोबरच पित्रोदांनी इतर विकसनशील अर्थव्यवस्थांसमोर भारताच्या रुपाने एक आदर्श निर्माण केला. याचबरोबर पित्रोदांनी पन्नासांवर एकस्वे मिळविली. [उदा., डिजिटल स्विचिंग, सिंकोनायझेशन, सुयोग्य ध्वनिनिर्मिती (टोन जनरेशन), सुयोग्य ध्वनिगहण, मोठमोठ्या सभांचे आयोजन तसेच वाणिज्यविषयक दहा एकस्वे]. सध्या सॅम पित्रोदा इलेक्ट्रॉनिकीय वॉलेटविषयक (इलेक्ट्रॉनिकीय पैशाचे पाकीट) एकस्व मिळविण्यासंबंधी कार्यरत आहेत. या वॉलेटमध्ये पतपत्र (केडिटकार्ड), नावेपत्र (डेबिटकार्ड), आरोग्यपत्र (हेल्थकार्ड), विमापत्र (इन्शुरन्सकार्ड), वाहनपरवानापत्र इ. प्रकारची कार्डे उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिकीय पद्घतीने सरकारी नोकरांचे पगार थेट बँकांध्ये त्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले. तसेच वीज बिले, दूरध्वनी बिले इ. जमा होऊ लागली. याचे श्रेय पित्रोदांकडे जाते. पित्रोदा यांच्या ‘सी-डॉट’चे महत्त्वाचे योगदान म्हणजे रॅक्स (रुरल ऑटोमॅटिक एक्स्चेंज) आकाराने लहान, स्वस्त परंतु मजबूत स्विच ज्यांच्या योगे दूरध्वनियंत्रणा ग्रामीण भागात रुजली गेली व तिने दूरसंचारण व्यवस्थेचा पाया घातला.
सॅम पित्रोदा हे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार सल्लगार परिषदेचे संस्थापक-सदस्य आहेत. दूरसंचार क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल पित्रोदांना भारताच्या पंतप्रधानांकडून भारतीय राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९९३ व १९९५ या दोन वर्षी पित्रोदांना आय्आय्टी विद्यार्थी पदक आणि आंतरराष्ट्रीय बहुप्रतिष्ठित नेतृत्व पुरस्कार लाभले. दूरध्वनि-कक्षिकांचा भारतभर प्रसार आणि कोटीच्यावर लोकांना दूरध्वनियंत्रांचा वापर करता येईल, अशी उपलब्धता त्याचप्रमाणे भारताच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला पायाभूत बैठक पुरविणे, या दोन मोठ्या कार्यांबद्दल डाटाक्वेस्ट संस्थेने त्यांना आय्टी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले (२००२). यांशिवाय कॅनडा-इंडिया फाउंडेशन (सीआय्एफ्) या संस्थेद्वारा देण्यात येणारा ‘चंचलानी ग्लोबल इंडियन’ अवॉर्ड (२००८), आंध्र विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही सन्माननीय पदवी (२००८), पद्मभूषण पुरस्कार (२००९), राजीव गांधी ‘ग्लोबल इंडियन’ अवॉर्ड (२००९) इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले.
गद्रे, वि. रा.
“