सॅलॅमँडर : हा सरड्यासारखा दिसणारा आणि उभयचर वर्गातील युरोडेला (कॉर्डेटा) गणामधील प्राणी आहे. सॅलॅमँडर सॅलॉमँड्रा हे नेहमी आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव आहे.
काही सॅलॅमँडर स्थलचर आहेत. काही जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी आढळतात परंतु फक्त पाण्यात राहाणारे सॅलॅमँडर क्वचितच आढळतात. त्वचा गुळगुळीत (काहींत खडबडीत) असते. त्वचेवर शल्क (खवले) नसतात. त्वचेवरील गंथींच्या स्रावामुळे ती ओलसर राहते. त्वचा नेहमी ओलसर म्हणून सॅलॅमँडर अदाह्य आहेत अशी एक समजूत आहे, परंतु ती चुकीची आहे. त्वचेत विषगंथी असतात व त्यामधून विष स्रवते. या विषामुळे सॅलॅमँडर शत्रूंपासून आपले रक्षण करु शकतो. शेपटी गोलसर (काहींत चपटी) असते. जवळजवळ सर्व सॅलॅमँडरांत फुप्फुसां मार्फत श्वसन होते, परंतु ज्या सॅलॅमँडरात फुप्फुसे नसतात त्यांचे श्वसन त्वचा व गसनीमार्फत होते. प्रौढात क्लोम (गिल) नसतात. हे प्राणी अंडजरायुज आहेत.
सॅलॅमँडर दिवसा लपून राहतात व रात्री अन्नासाठी बाहेर पडतात. कीटक, अळ्या, गोगलगायी व लहान प्राणी हे त्यांचे अन्न आहे. तापमान कमी झाल्यास ते शीतनिष्क्रि यतेमध्ये जातात. त्यांचे मीलन पाण्यामध्ये होते. निषेचन बाह्य किंवा आंतर असते. निषेचन बाह्य असल्यास डिंभ जलीय असतो व कायांतरण होऊन त्याचे प्रौढात रुपांतर होते. निषेचन आंतर असल्यास डिंभ गर्भाशयात वाढतो व त्याचे कायांतरणही गर्भा-शयातच होते. सॅलॅमँडर सॅलॉमँड्रा मध्ये गर्भाशयात एका वेळी अनेक अंडांचे निषेचन होते. अनेक अंडांपैकी एकाच अंडाचा विकास होतो व इतर अंडी फुटून त्यांच्या पीतकाचा एक पुंजका तयार होतो. विकासाच्या सुरुवातीला अंड अंडकलेत असते व भ्रूणाचे पोषण अंडातील पीतकाने होते.भ्रूण अंडकलेतून बाहेर पडल्यानंतर त्याचे पोषण इतर अंडांच्या पीतकाने होते. भ्रू णावर बाह्य क्लोम दिसू लागतात. हे क्लोम सस्तन प्राण्यांच्या अपरेच्या [⟶ वार–२] जरायु-अंकुरिकाप्रमाणे काम करतात. यावेळी भ्रूणाचे पोषण क्लोमद्वारा मातेच्या रक्ताने होते. ज्यावेळी भ्रूणाचे पोषण इतर अंडांच्या पीतकावर होत असते त्यावेळी जर त्यास कृत्रिम रीत्या गर्भाशयाबाहेर काढले तर तो पाण्यात जिवंत राहू शकतो.
सॅलॅमँडर सॅलॉमँड्रा च्या पृष्ठीय भागावर काळे आणि पिवळे चट्टे असतात. हा व्याघ्र सॅलॅमँडर ईशान्य आफ्रिका, नैर्ऋत्य आशिया व मध्य यूरोप येथे आढळतो. पूर्व चीन आणि जपानमधील थंड पाण्याच्या झऱ्यांत अजस्र सॅलॅमँ डर आढळतात. त्यांची लांबी जवळजवळ १७५ सेंमी.असते. यास मेगॅलोबॅट्रॅक्स जॅपोनिकस (जपानी सॅलॅमँडर) असे म्हणतात. अँबीस्टोमा टिग्रीनम च्या डिंभाला ॲक्झोलोटल डिंभ म्हणतात. या डिंभाचे कायांतरण होत नाही व तो कायम डिंभावस्थेत राहतो. यास ⇨ चिरडिंभता असे म्हणतात. जरी तो कायम डिंभावस्थेत राहत असला तरी प्रौढ सॅ सॅलॅमँ डर प्रमाणे जननक्षम असतो.
सॅलॅमँडरचे सर्वांत जुने जीवाश्म क्रिटेशस कालातील आहेत. याचा विस्तार पॅलिआर्क्टिक विभागात (यूरोप, उत्तर आशिया, अरेबिया आणि
सहाराच्या उत्तरेकडील आफ्रिका या प्रदेशांचा समावेश असलेल्या जीवभौगोलिक विभागात) झालेला आढळून येतो. फुप्फुसे नसलेले सॅलॅमँडर दक्षिण अमेरिकेत आढळतात.
पहा : गुहावासी प्राणि पुनर्जनन भ्रूणविज्ञान.
जोशी, मीनाक्षी र.
“