वोल्फ (व्होल्फ), माक्स फ्रांट्स योझेफ कोर्नेलिउस : (२१ जून १८६३–३ ऑक्टोबर १९३२). जर्मन ज्योतिर्विद. स्वत: शोधून काढलेल्या उपकरणांनी व छायाचित्रण पद्धतीने त्यांनी २२८ लघुग्रहांचा शोध लावला. [मंगळ व गुरू या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान कक्षा असलेल्या लहान खस्थ पदार्थांना लघुग्रह म्हणतात → लघुग्रह].

वोल्फ यांचा जन्म जर्मनीतील हायडल्बर्ग (बाडेन) येथे झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. हायडल्बर्ग विद्यापीठात १८८८मध्ये खगोल यामिकीवर प्रबंध लिहून ते पीएच. डी. झाले. त्यांच्या वडिलांनी हौस म्हणून स्वत: लहानशी वेधशाळा स्थापन केली होती. येथेच एकविसाव्या वर्षी माक्स यांनी एका धूमकेतूचा शोध लावला होता. तो त्यांच्याच नावाने (वोल्फ I) ओळखला जातो. १८९० साली ते हायडल्बर्ग विद्यापीठात व्याख्याते व पुढे प्राध्यापक झाले. नंतर तेथे त्यांची खगोल भौतिकीच्या असाधारण प्राध्यापक पदावर व ज्योतिषशास्त्रीय अध्यासनावर नेमणूक झाली होती. अमेरिकेतील वेधशाळा पाहून आल्यानंतर त्यांनी बाडेनचे ड्यूक यांच्या आश्रयाखाली कनिखश्तूल येथे मोठी वेधशाळा काढली व तिचे ते १८९३ मध्ये संचालक झाले. त्यांनी एक मोठी (४० सेंमी.) दुर्बिण देणगीदाखल मिळविली. लघुग्रहांच्या शोधाला उपयुक्त असे छायाचित्रित तंत्र व उपकरण त्यांनी शोधून काढले (१८९१). पृथ्वीच्या अक्षाला समांतर अक्षावर एक दुर्बिण बसवून तिला विद्युत्-ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणार्याक विद्युत्-चलित्राद्वारे पृथ्वीइतकी, पण उलट गती दिली. तिच्यावर बसविलेल्या कॅमेऱ्याने ताऱ्याची छायाचित्रे बिंदुवत व अधिक गतिमान लघुग्रहांची छायाचित्रे आखूड रेषांच्या रूपात मिळाली. या पद्धतीने त्यांनी २२ डिसेंबर १८९१ रोजी (३२३) हा लघुग्रह शोधून काढला. याबद्दल त्यांना लालांद पारितोषिक मिळाले होते. १९०६मध्ये त्यांनी आकिलीझ या लघुग्रहाचा शोध लावला. हा ⇨ ट्रोजन ग्रह या नावाने ओळखण्यात येणार्यार लघुग्रहांच्या गटातील सापडलेला पहिला लघुग्रह असून त्या लघुग्रहाचा आवर्तकाल जवळजवळ गुरूच्या आवर्तकालाएवढा आहे. पुढे त्यांनी एकूण २२८ लघुग्रहांचा शोध लावला. आकाशगंगा, विशेषत: वायुमय अभ्रिका, बिंबाभ्रिका, सर्पिल तेजोमेघ व कृष्णाभ्रिका यांचे वर्णपट व छायाचित्रण यांच्या साहाय्याने त्यांनी खूप निरीक्षण व अभ्यास केला [→ अभ्रिका]. १९०२मध्ये त्यांनी १,५८२ तेजोमेघांची जंत्री तयार केली. त्रिमितीय तुल्यक या एक प्रकारच्या त्रिमितीय दृश्यदर्शीचा प्रथम उपयोग करून त्यांनी जास्त निजगती असणाऱ्या  ताऱ्यांचा शोध घेतला. खगोलीय छायाचित्रांतील हलणार्याश खस्थ पदार्थांचा शोध घेण्यास व ते ओळखून काढण्यास या साधनाची मोठी मदत झाली. अखेरपर्यंत ते वेधशाळेचे संचालक राहिले. उपकरणांच्या योगानेच शास्त्रात प्रगती होते, अशी त्यांची धारणा होती. म्हणून साधननिर्मितीकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते.

हायडल्बर्ग येथे त्यांचे देहावसान झाले.

पहा : ट्रोजन ग्रह लघुग्रह.

गोखले, मो. ना.