सँ नाझेर : फ्रान्समधील मोठे सागरी बंदर व औद्योगिक शहर. लोकसंख्या ७१,३७३ (२००६ अंदाज). ते देशाच्या पश्चिम भागातील ल्वार (लॉयर)-अटलांटिक डिपार्टमेंटमध्ये, नँट्स शहराच्या वायव्येस सु. ६१ किमी. वर ल्वार नदीमुखखाडीवर वसले आहे. बिस्के उप-सागरावरील या बंदराच्या जागी मूळच्या गॅलो-रोमनांचे कॉर्बिलोनामक बंदर होते. चौदाव्या व पंधराव्या शतकांत ते ब्रिटनीच्या ड्यू कांच्या ताब्यात होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात याला ‘पोर्ट नाझेर’ हे नाव देण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर बंदर म्हणून या शहराच्या विकासास प्रारंभ झाला. तोपर्यंत हे एक छोटे मासेमारी केंद्र म्हणून ओळखले जात होते. पहिल्या महायुद्घाच्या वेळी (१९१४ –१९) अमेरिकनांनी लष्कराच्या सोयीसाठी येथील गोदीची पुनर्बांधणी केली. दुसऱ्या महायुद्घकाळात (१९३९ –४५) जर्मन लष्कराचा, विशेषतः पाणबुड्यांचा, तळ येथे होता. त्यावर ब्रिटिश आरमाराने २८ मार्च १९४२ रोजी हल्ला चढविला. या हल्ल्यात येथील सुकी गोदी व जर्मनांच्या पाणबुड्यांची तसेच रहिवासी, सैन्य यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली व शहर उद्ध्वस्त झाले. मित्रराष्ट्रांनी ते १९४५ मध्ये ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मे १९४८ मध्ये बंदर म्हणून याचा पुन्हा वापर सुरू झाला.
येथील पाच किमी. लांबीच्या गोदीचा पाच लाख टनी बोटींना सहज वापर करता येतो. त्यामुळे देशाचे प्रमुख आयात-निर्यात बंदर म्हणूनयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. बंदर व शहर परिसरात जहाजबांधणी, विमानांचे सुटे भाग, रणगाडे व लहान नौका यांच्या निर्मितीचे कारखाने असून देशातील उत्पादित मालाचे निर्यातकेंद्र म्हणून याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. याशिवाय शहर परिसरात वस्त्रोद्योग, रसायने व रासायनिक खतांची निर्मिती इ.उद्योग विकसित झाले आहेत. नँट्सचे बाह्यबंदर म्हणून याची ख्याती आहे.
देशपांडे, सु. र.