सँटिआगो: (सांत्यागो). अमेरिकेतील चिली प्रजासत्ताकाची राजधानी. हे देशातील सर्वांत मोठे शहर व एक महत्त्वाचे राजकीय, आर्थिक, व्यापारी, वित्तीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. लोकसंख्या उपनगरांसह ४८,८५,७७४ (२०१२ अंदाज). देशाच्या साधारण मध्यभागी, पॅसिफिक किनाऱ्यापासून पूर्वेस १४४ किमी. अंतरावर मापोचो नदीकाठी हे शहर वसले आहे. पॅसिफिक किनाऱ्यावरील व्हॅलपारेझो बंदरापासून आग्नेयीस ९५ किमी. वरील हे शहर त्याच नावाच्या प्रांताचेही मुख्य ठिकाण आहे. याच्या पूर्वेस अँडीज पर्वताची उंच हिमाच्छादित निसर्गसुंदर शिखरे आहेत.
पूर्वी या प्रदेशात पिकुंचे या अमेरिकन इंडियन जमातीची वस्ती होती. सोळाव्या शतकात स्पॅनिशांनी या प्रदेशावर मोहीम काढली. त्यांच्या पेद्रो दे व्हालदीव्ह्या या प्रमुखाने हा प्रदेश पादाक्रांत करून तेथे सँटिआगो दे न्वेव्हा एक्स्ट्रीमो या नावाने नगराची स्थापना केली (१५४१). ही स्पॅनिशांची चिलीमधील पहिली वसाहत होय. १५५२ मध्ये त्याला शहराचा दर्जा देण्यात आला. येथील देशभक्तांनी अर्जेंटिनाचा मुत्सद्दी व स्वातंत्र्यसेनानी सान मार्तीन (१७७८ –१८५०) याच्या सहकार्याने हे शहर जिंकून घेतले (१८१७) व चिलीच्या स्वातंत्र्यानंतर ते देशाच्या राजधानीचे ठिकाण केले(१८१८). १८७९ मध्ये चिलीने बोलिव्हिया आणि पेरू यांचा पॅसिफिक युद्घात पराभव करून तांबे आणि नायट्रेट यांनी समृद्घ असलेल्या जमिनी ताब्यात घेतल्या. या खनिज पदार्थांमुळे सँटिआगोचा झपाट्याने विकास झाला. १९०१पर्यंत येथील लोकसंख्या दहा लाखांच्या घरात गेली व लॅटिन अमेरिकेतील ते एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनले. ही देशाची राजधानी असली, तरी काँग्रेस सभा व्हॅलपारेझो येथे भरते. स्फोटके बनविण्यासाठी नायट्रेटच्या मागणीमुळे पहिल्या महायुद्घात सँटिआगोची आर्थिक स्थिती सुधारली. परिसरातील खनिज उत्पादनामुळे दुसऱ्या महायुद्घानंतर तेथे औद्योगिकीकरणास पुन्हा चालना मिळाली. आज येथे वस्त्रे, मद्यार्क, अन्नप्रकिया, पादत्राणे, गृहोपयोगी साहित्य इ.निर्मितीचे प्रमुख उद्योग चालतात. लोह-पोलादाच्या मोठमोठ्या ओतशाळा येथे आहेत. वित्तीय ठिकाण म्हणूनही याला महत्त्व असून अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बँका, विमा कंपन्या व शेअरबाजार येथे आहेत. देशातील हे महत्त्वाचे रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतुकीचे केंद्र आहे.
वसाहतकाळापासून ते आजअखेरच्या बौद्घिक व सांस्कृतिक विकासाच्या निदर्शक ठरणाऱ्या अनेक वास्तू व संस्था येथे आढळतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीसही येथे अनेक वास्तूंची निर्मिती करण्यात आली. शहरातील प्लाझा दे आर्म्स या प्रमुख चौकात कॅथीड्रल (१६१९), नगर सभागृह व प्रमुख व्यापारी पेठ आहे. जवळच गव्हर्नरचा राजवाडा, आधुनिक कार्यालयीन इमारती, काँग्रेसचे सभागृह व राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या भव्य इमारती येथे आहेत. येथील राष्ट्रीय ग्रंथालय हे दक्षिण अमेरिकेतील सर्वांत समृद्घ गंथालय असून त्यात सु. १२,००,००० ग्रंथ आहेत. या शिवाय शहरात सिव्हिक सेंटर नॅचरल हिस्टरी म्यूझीयम, महानगरी नाट्यगृह, आलिशान निवासस्थाने, विस्तीर्ण उद्याने, सार्वजनिक व खाजगी क्री डासंकुले व स्वरमेळाचे वाद्यवृंद आहेत. उच्चशिक्षणासाठी द युनिव्हर्सिटी ऑफ चिली (स्था.१७३८), कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ चिली (१८८८) आणि स्टेट टेक्निकल युनिव्हर्सिटी (१९४७) ह्या शैक्षणिक संस्था येथे आहेत. १९२३ साली येथे पाचवी पॅन अमेरिकन कॉन्फरन्स भरली होती.
शहराला नदीच्या अनेक पुरांचे तसेच भूकंपांचे तडाखे बसले असून १६१७ व १६४७ मधील भूकंपांत तसेच २०१० च्या भूकंपात जवळजवळ संपूर्ण शहर उध्वस्त झाले होते. येथील कँ पेनिया चर्चमध्ये १८८३ साली लागलेल्या आगीत सु. २००० उपासक मृत्युमुखी पडले होते. वर्षातील बहुतांश काळ उबदार दिवस व थंड रात्री असे आरोग्यवर्धक हवामान असणारे दक्षिण अमेरिकेतील हे चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. मापोचो नदीच्या काठावर कोरड्या पात्रातून काढलेला व सार्वजनिक सहलीसाठी दुतर्फा वृक्षांच्या रांगा असलेला आलमेदा बेर्नार्दो ओ हिगिन्झ हा रुंद रस्ता (बूलेव्हार) प्रसिद्घ असून शहरात अनेक बागाही आहेत. शहराच्या परिसरातील सँता लूसीआ व सॅन (सेरो) क्रिस्तोबल या दोन टेकड्या पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. सॅन क्रिस्तोबल टेकडीच्या मध्यभागी व्हर्जिन मेरीचा २१·९ मी. उंचीचा भव्य पुतळा असून उतारावर लॅटिन अमेरिकेतील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे. बर्फावरील खेळांसाठी येथे खास सोय केलेली आहे. याशिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अल्गारोबो आणि सांतो दोमिंगो यांदरम्यानच्या किनारपट्टीत अनेक विश्रांतिस्थाने व आरोग्यधामे बांधली आहेत. त्यामुळे सँटिआगो हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे.
चौधरी, वसंत
“