श्रॉक, रिचर्ड आर्. : ( ४ जानेवारी १९४५ –      ). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांना २००५ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक रॉबर्ट एच्. ग्रब्ज व ईव्हेज शौव्हीन यांच्याबरोबर विभागून देण्यात आले. ज्या रासायनिक विकियेत मूलद्रव्यांचा किंवा त्यांच्या गटांचा विनिमय ( अदलाबदल ) होतो, त्या विकियेला विपर्ययकिया म्हणतात ती पुढील सर्वसाधारण समीकरणाने दर्शविता येते : AX + BY ⟶ AY + BX. ही महत्त्वपूर्ण विपर्ययकिया कार्बनी रसायनशास्त्रात वापरली जाते. श्रॉक यांनी या विपर्ययकियेसाठी लागणारा धातवीय संयुगाच्या रूपातील पहिला कार्यक्षम उत्प्रेरक [विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा      पदार्थ ⟶ उत्प्रेरण] तयार केल्यामुळे त्यांना हे पारितोषिक मिळाले.

श्रॉक यांचा जन्म अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील बेर्ने गावी झाला. रिव्हरसाइड येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून त्यांनी बी.ए.पदवी (१९६७) व हार्व्हर्ड विदयापीठातून पीएच्.डी. पदवी (१९७१) संपादन केली. त्यांनी केंबिज विदयापीठातही अध्ययन केले. १९७५ साली ते मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले. तेथे ते १९७८ साली सहयोगी प्राध्यापक, १९८० साली प्राध्यापक आणि १९८९ साली रसायनशास्त्राचे फ्रेडरिक जी. केयस प्राध्यापक झाले. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये  शेरमन टी. फेअरचाइल्ड स्कॉलर (१९८६) आणि केंब्रिजमध्ये सायन्स अँड एंजिनिअरिंग रिसर्च कौन्सिलमध्ये अभ्यागत फेलो (१९९१) म्हणूनही काम केले. त्यांचा विवाह नॅन्सी एफ्. कार्लसन यांच्याबरोबर १९७० साली झाला व त्यांना दोन मुलगे आहेत.

शौव्हीन यांनी १९७०८० दरम्यान एक रासायनिक यंत्रणा प्रथम सुचविली होती. तिच्यावर मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करीत असताना श्रॉक यांनी टँटॅलम, टंगस्टन व इतर धातू असलेल्या उत्प्रेरकांची पद्धतशीर चाचणी घेतली. कोणते धातू वापरता येण्यासारखे आहेत व त्यांचे कार्य कसे चालते हे जाणून घेण्यासाठी श्रॉक यांनी परीक्षणे केली. श्रॉक व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्षम असा विपर्ययकिया उत्प्रेरक   तयार केल्याचे १९९० साली जाहीर केले. या उत्प्रेरकात त्यांनी मॉलिब्डेनम धातूचा  उपयोग केला होता. मात्र विपर्ययकियेसाठीच्या या नवीन उत्प्रेरकावर हवेचे वा पाण्याचे परिणाम होत असल्याचे दिसून आले. हवा व पाणी यांच्याविषयीच्या संवेदनशीलतेमुळे या उत्प्रेरकाची कियाशीलता कमी झाली. तथापि ग्रब्ज यांनी नंतर शोधून काढलेल्या उत्प्रेरकांमुळे हा विशिष्ट प्रश्न सोडविला गेला. श्रॉक यांनी विविध वैज्ञानिक ज्ञानपत्रिकांत व नियतकालिकांत अनेक लेख लिहिले आहेत.

श्रॉक यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत उदा., कार्बनी रसायनशास्त्रातील अमेरिकन केमिकल सोसायटी ( एसीएस ) पुरस्कार (१९८५), हॅरिसन हॉवे पुरस्कार (१९९०), अकार्बनी रसायनशास्त्र पुरस्कार (१९९६), इलिनॉय विदयापीठाचे बेलर पदक (१९९८), जिऑफी विल्किन्सन पदक (२०००), एसीएस कोप स्कॉलर पुरस्कार (२००१), रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे सदस्यत्व वगैरे.

ठाकूर, अ. ना.