माहितीशास्त्र व माहिती केंद्रे:विविध प्रकारच्या माहितीचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन आणि वितरण करणारी एक अत्याधुनिक ज्ञानशाखा. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही कालसंदर्भात माहितीची गरज असते. माहितीशास्त्राच्या व्याप्तीचे नेमके मोजमाप करणे अशक्य आहे कारण देशकालमानाच्या पार्श्वभूमीवर माहितीचे स्वरूप व माहितीसंपादनाचे हेतू यांत विविधता आढळून येते. आधुनिक काळातील मानवी जीवन अत्यंत गतिमान बनले आहे. सामाजिक व नैसर्गिक विज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत वेगाने नवे संशोधन पुढे येत आहे. एखाद्या विषयासंबंधी किंवा प्रश्नासंबंधी या बाबीसंबधी त्वरित निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्थात असा निर्णय घेणे हे सर्वांगीण, सूक्ष्म व काटेकोर माहितीच्या आधारेच शक्य आहे. विद्यमान काळातील वैज्ञानिक-तांत्रिक ज्ञानाचा परिस्फोट लक्षात घेतल्यास माहितीशास्त्राचा उदय एका अपरिहार्य गरजेतून झाला आहे. असे म्हणता येईल.

माहितीशास्त्र (इन्फर्मेशन सायन्स) आणि माहितीतंत्र (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) यांचा परिचय करून घेण्यापूर्वी माहिती या शब्दाच्या अर्थाची निश्चितता ध्यानात घेतली पाहिजे. भूत, वर्तमान तसेच भविष्यकाळातील सर्व घटनाचे वाचिक, शाब्दिक, लिखित चित्ररूप, संख्यारूप अथवा इतर कोणत्याही स्वरूपातील प्रकटीकरण म्हणजेच माहिती, अनिश्चितता दूर करते ती माहिती, अशी नवी संकल्पना शास्त्रीय जगात स्थिरावत आहे. 

माहितीशास्त्र या संज्ञेचा वापर प्रथम अमेरिकेत होऊ लागला आणि १९५९ ते १९६३ च्या दरम्यान तो इतर देशांमधूनही मान्यता पावला. ⇨ संदेशवहन प्रक्रियेशी संबंधित असलेला ⇨ अवगम सिद्धांत (इन्फर्मेशन थिअरी), नव भाषाविज्ञान उपपत्ती (न्यू लिंग्विस्टीक थिअरी), सामान्य प्रणाली सिद्धांत (जनरल सिस्टिम थिअरी) खेळ व निर्णय सिद्धांत (गेम अँण्ड डिसिजन थिअरी), संगणकशास्त्र (कॉम्प्यूटर सायन्स) इ. शास्त्रांबरोबरच माहितीशास्त्राचा उदय दुसऱ्या महायुद्धानंतर झाला. १९७० मध्ये अमेरिकन डॉक्युमेंटेशन या नियतकालिकाचे नाव जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी फॉर इन्फर्मेशन सायन्स असे बदलण्यात आले, त्यावेळी माहितीशास्त्रास खरी मान्यता मिळाली असे मानले जाते. रशिया व पूर्व यूरोपमधील काही राष्ट्रांमधून ‘इन्फर्मेटिक्स’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. आधुनिक माहितीशास्त्राच्या कक्षा केवळ मानवी व्यवहारापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. माहितीच्या आधारे विश्वातील सर्व घटनांचा मागोवा घेणे, त्यांची संगती लावणे आणि भवितव्याची चाहूल घेणे हे माहितीशास्त्राचे प्रगत स्वरूप आहे असे काही तज्ञ मानतात. तर काही तंज्ञांच्या मते माहितीशास्त्र हे अगदी स्वतंत्र शास्त्र आहे. त्यांच्या मते ग्रंथालयशास्त्र हे ग्रंथबद्ध माहितीचाच शोध घेण्यापुरते मर्यादित असते, तर माहितीशास्त्र कोणत्याही स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीचा शोध घेते.

माहितीशास्त्र या नव्या ज्ञानशाखेच्या उद्दिष्टांचे वर्णन स्थूलमानाने पुढीलप्रमाणे केले जाते : (१) निरनिराळ्या संदर्भात माहितीचे उत्पादन व वाढ करणे. (२) माहितीचा संग्रह, जतन, संघटन आणि संस्करण करणे, (३) वेगवेगळ्या संदर्भात माहितीचे प्रसारण आणि देवघेव करणे, (४) व्यक्तीवर आणि समूहांवर माहितीच्या होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांचा शोध घेणे. (५) माहिती पद्धतीचा आराखडा तयार करून त्या संदर्भातील प्रगतीचा अभ्यास करणे, (६) माहितीशास्त्राच्या आणि तंत्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कायदेशीर परिणामांचा अभ्यास करणे (७) माहितीशास्त्राचे अध्यापन व संशोधन प्रगत करणे.

मानवी संस्कृतीच्या अतिप्राथमिक अवस्थेत जी काही मर्यादित स्वरूपाची माहिती उपलब्ध होत असे, तिची साठवणूक फक्त मेंदूच्या द्वारे व प्रसरण शब्दांच्या द्वारेच होऊ. मात्र उत्तरोत्तर मानव प्रगत होऊ लागला, त्याच्या गरजा वाढू लागल्या, कार्याची क्षितिजे विस्तारू लागली आणि परिणामतः नव्या ज्ञानाची, माहितीची आवश्यकता त्याला भासू लागली. माहिती निर्मितीचा ओघ जोपर्यंत मर्यादित होता, तो पर्यंत हवी असलेली माहिती परंपरागत तंत्राच्या द्वारे, म्हणजेच ग्रंथालयशास्त्राच्या आधारे, संग्रहित व प्रसारित केली जात असे. दुसऱ्या महायुद्धानंतर साहित्यनिर्मिती व ज्ञानप्रसार इतक्या झपाट्याने वाढत आहे की त्याचे नियंत्रण करण्यासाठी ग्रंथालयशास्त्रासारखे पारंपारिक स्वरूपाचे तंत्र थिटे वाटू लागले. सध्या जगात फक्त शास्त्रीय व तांत्रिक विषयासंबंधी प्रतिवर्षी ३० लक्ष प्रकाशन-पुस्तके लेख, निबंध, अहवाल, इ. प्रसिद्ध होत असतात. एका अंदाजानुसार या शतकाच्या अखेर प्रतिवर्षी दीड ते दोन कोटी प्रकाशने प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


सर्व प्रकारच्या माहितीचे नियंत्रण व संघटन करणे हे जरी माहितीशास्त्राचे उद्दीष्ट असले, तरी माहितीचा शोध आणि वितरण (इन्फर्मेशन रिट्रिव्हल) ही संज्ञा  मात्र विशिष्ट संदर्भातच अस्तित्वात आली. पूर्वी याच प्रक्रियेला प्रलेखपोषण किंवा प्रलेखन (डॉक्युमेंटेशन) असे संबोधले जात असे. विशिष्ट विषयासंबंधीचा सूक्ष्मतम विचार तत्काळ व अचूकपणे उपलब्ध करून देणाऱ्या रीतीला माहिती पुनसंपादनतंत्र असे म्हणतात. मानवाच्या बौद्धीक सामर्थ्याबरोबरच या तंत्रात अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर केला जातो.

माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वांना समजू शकेल अशा एखादी भाषा निर्माण करणे आवश्यक झाले आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. त्यात यश आले, तर माहितीशास्त्राच्या कार्यक्षेत्रात ते एक क्रांतिकारक पाऊल ठरेल.

माहिती-निर्मितीचा प्रचंड वेग, तीमधील विविधता व वैचित्र्य आणि आर्थिक मर्यादा जमेस धरून माहितीची देवाणघेवाण करण्याच्या संदर्भात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर सहकारी योजना कार्यान्वित होऊ लागल्या. या संदर्भातील उल्लेखनीय घटना इ.स. १९७३ साली घडली. त्या वर्षी ‘युनिसिस्ट’ (युनिव्हर्सल सिस्टिम फॉर इन्फर्मेशन स्टोअरज अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच, वर्ल्ड सायन्स इन्फर्मेशन सिस्टिम) अस्तित्वात आली. युनिसिस्टच्या कक्षेखाली सु. शंभर आंतरराष्ट्रीय कीर्तीची माहितीकेंद्रे आहेत. उदा., ‘इनिस’ (इंटरनॅशनल न्यूक्लिअर इन्फर्मेशन सिस्टिम), ‘ॲग्रिस’ (ॲग्रिकल्चरल इन्फर्मेंशन सिस्टिम), ‘इंडिस’ (इंडस्ट्रियल इन्फर्मेशन सिस्टिम), ‘इनपॅडॉक’ (इंटरनॅशनल पेटन्ट डॉक्युमेंटेशन सेंटर) इ. माहितीकेंद्रे प्रसिद्ध आहेत. भारत व इतर राष्ट्रांमधून ‘निसॅट’ (नॅशनल इन्फर्मेशन सिस्टिम फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी), ‘एनव्हिस’ (एन्व्हायरन्मेंटल इन्फर्मेशन सिस्टिम) व नॅशनल इन्फर्मेशन सेंटर इ. माहितीकेंद्रे अस्तित्वात आली. वर नमूद केलेल्या संस्था व माहितीकेंद्रे यांच्या व्यक्तिरिक्त अमेरिकेतील केमिकल ॲबस्ट्रॅक्टस सर्व्हिस व ‘मेडलार्स’ (मेडिकल लिटरेचर ॲनॅलिसिस अँड रीट्रीव्हल सिस्टिम), नेदर्लंड्‌समधील ‘एक्सपर्टा मेडिका’, ग्रेट ब्रिटन मधील ‘इन्स्पेक’, इ. संस्था व माहितीकेंद्रे या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत आहेत. वरील उपक्रमांव्यतिरिक्त निरनिराळ्या देशांतील विद्यापीठे, संशोधनसंस्था, औद्योगिक प्रकल्प यांच्यामधून माहितीच्या देवघेवीचे कार्य चालू आहे.

माहितीशास्त्र केवळ प्रगत राष्ट्रांमधूनच नव्हे तर, प्रगतिपथावर असलेल्या राष्ट्रांमधूनही स्थिर होत आहे. हे शास्त्र अधिक परिणाम कारक व उपयुक्त करण्याच्या हेतुने निरनिराळी राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. या विषयांसंबधी दरवर्षी विपुल प्रकाशने प्रसिद्ध होत असतात. परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने यांच्या द्वारे या विषयासंबंधीचे संशोधन व मूल्यमापन होत आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ॲनॲबॅरि येथून प्रकाशित होणारी उल्‌रिच इंटरनॅशनल पीरिऑडिकल्स डिरेक्टरी चाळली, तर माहितीशास्त्र या विषयासंबंधी कितीतरी नियतकालिके प्रसिद्ध होतात याची कल्पना येते.

निरनिराळ्या प्रकारची माहिती संग्रहित आणि प्रसारित करण्याचे कागद हे माध्यम आजतागायत अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते शब्दबद्ध कागद ग्रंथरूपाने ग्रंथालयांमधून हजारो वर्षे जतन केले जात. पंरतु पुढील काही वर्षात कागदाची जागा इतर साधने काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच कागदरहित ग्रंथालये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे व त्यांमधून मॅग्नेटिक टेप, डिस्क, ड्रम, व्हीडिओ डिस्क, मायक्रोफिल्म, मायक्रोफीश, संगणकयंत्र, इ. साधनांचा माहिती साठविण्यासाठी व प्रसारणासाठी उपयोग केला जाणार आहे. या नवीन साधनांच्या वापरामुळे माहितीशास्त्र आणि माहितीकेंद्रे यांना या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

इतर अनेक देशांप्रमाणे भारतातही आता माहितीशास्त्राचे शिक्षण देण्याच्या सोयी अनेक विद्यापीठांमधून उपलब्ध झाल्या आहेत. ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे रूपातंर आता ग्रंथालयशास्त्र आणि माहितीशास्त्र अभ्यासक्रम असे झाले आहे. माहिती केंद्रामधून सूक्ष्मचित्रीकरण, संगणकयंत्र, रेप्रोग्रॅफी, दूरसंदेशवहन इ. अत्याधुनिक साधनांचा वाढता वापर जमेस धरता माहितीशास्त्र अभ्यासक्रमातही बदल घडवून आणणे अपरिहार्य ठरले आहे. माहितीशास्त्र अतिसूक्ष्म अशा विशिष्ट विषयाशी संबंधित असल्याने संबंधित विषयात प्राविण्य मिळविलेल्या व अत्याधुनिक उपकरणे वापरण्याचे ज्ञान असलेल्या उमेदवारांनाच यापुढे माहितीशास्त्राचे शिक्षण घेण्यास प्राधन्य देणे उचित ठरणार आहे.

संदर्भ : 1. Chandler, George, International and National Library and Information Services, New York, 1982. 

              2. Guha, B. Documentation and Information, Calcutta, 1983. 

              3. Shera, Jesse H. Documentation and Organization of Knowledge, London, 1966. 

              4. Wilson, Ira, G. Wilson, Marthann, Information Computers and Retrieval, New York, 1968.

हिंगवे, कृ. शं.