अरूण शौरी : (२ नोव्हेंबर १९४१ – ). भारतातील एक तडफदार पत्रकार मागसायसाय पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म सुविद्य कुटुंबात हरिदेव व दयावंती या दांपत्यापोटी जलंदर (पंजाब) येथे झाला. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण मॉर्डन स्कूल व सेंट स्टिफन कॉलेज (दिल्ली) येथे झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी तेथील सिरॅक्यूज विदयापीठातून (न्यूयॉर्क राज्य) अर्थशास्त्र विषयात पीएच्‌.डी. ही उच्च पदवी घेतली (१९६६). प्रारंभी त्यांनी जागतिक बँकेत अर्थशास्त्रज्ञ म्हणून (१९६७-७२ व १९७४-७६) काम केले. मध्यंतरीच्या १९७२-७४ या काळात ते नियोजन आयोगात आर्थिक सल्लागार होते. त्याचवेळी त्यांना होमी भाभा अधिछात्र होण्याची संधी लाभली. पुढे त्यांची आय्.सी.एस्.एस्.आर्.मध्ये जेष्ठ अधिछात्र (सिनियर फेलो) म्हणून निवड झाली (१९७६-७८). त्यानंतर ते पत्रकारितेकडे आकृष्ट झाले. त्यांचा विविध क्षेत्रांतील अनुभव आणि वृत्तपत्रे-मासिके यांतील लेखन (विशेषतः वृत्तपत्रीय मुक्त लेखन) विचारात घेऊन रामनाथ गोएंका यांनी इंडियन एक्स्प्रेस या प्रमुख इंग्रजी दैनिकाच्या कार्यकारी संपादक पदावर त्यांची नियुक्ती केली (१९७९-८२). या काळात त्यांनी इंडियन एक्स्प्रेस मधून शासकीय भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. सिमेंट कोटा प्रकरणातील त्यांच्या टीकास्त्रांमुळे उच्च पदस्थांना राजीनामा दयावा लागला मात्र एक्स्प्रेस विरूद्घ अनेक अब्रुनुकसानीचे दावे न्यायालयात दाखल झाले. तेव्हा बेनेट कोलमन या वृत्तसमूहाने त्यांना आमंत्रित केले आणि टाइम्स ऑफ इंडिया या इंगजी वृत्तपत्राच्या दिल्लीहून प्रसिद्ध होणाऱ्या आवृत्तीचे कार्यकारी संपादकपद दिले (१९८६) तथापि एका वर्षातच रामनाथ गोएंका यांनी त्यांना एक्स्प्रेस वृत्तपत्रात पुन्हा निमंत्रित केले आणि त्यांची दिल्ली येथील इंडियन एक्स्प्रेस च्या कार्यकारी संपादकपदावर नियुक्ती केली (१९८७९०). या पदावर असताना त्यांनी बोफोर्स प्रकरणावर झोड उठविली. या सुमारास काँग्रेस सरकार अल्पमतात येऊन पडले. पुढे मंडल आयोगालाही शौरींनी विरोध दर्शविला. रामनाथ गोएंकांनी त्यांना समज दिली. यापूर्वी शौरींनी १९८२-८६ दरम्यान अनेक वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून लेखन केले होते तसेच ते नागरी स्वातंत्र्याकरिता स्थापन झालेल्या ‘ पीपल्स युनियन’या संघटनेचे सरचिटणीस होते. १९८८ मध्ये वृत्तपत्रस्वातंत्र्याविरूद्ध अब्रुनुकसानीचे बिल पारित करण्याचा केंद्र शासनाने घाट घातला. या विधेयकाचा मूळ उद्देश इंडियन एक्स्प्रेस ची टीका थांबविण्याचा होता. विधेयकावर अन्य वृत्तपत्रांनीही टीका केली आणि इंडियन एक्स्प्रेस ची बाजू उचलून धरली. शौरींनी वृत्तपत्र- स्वातंत्र्यासाठीचा लढा जिंकला, पण संपादकीय मंडळात व विशेषतः गोएंकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला (१९९०). यावेळी इंडियन एक्स्प्रेस विरूद्ध जवळजवळ ३०० दावे न्यायालयात प्रलंबित होते आणि एक्स्प्रेसची आर्थिक कोंडीही करण्यात आली होती.

एक्स्प्रेस सोडल्यानंतर शौरींनी मुक्त पत्रकारिता आणि गंथलेखन याला वाहून घेतले. त्यांचे स्तंभलेखन विविध तीस वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत होते. याचवेळी ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांची राज्यसभेवर निवड झाली (१९९८-२००४). अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील राष्ट्नीय संयुक्त आघाडीच्या शासनात (१९९९-२००४) त्यांनी अनेक खात्यांची मंत्रिपदे भूषविली. त्यांपैकी निर्गुंतवणूक, संदेशवहन आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री असताना त्यांनी मारूती उदयोगसमूह, व्ही.एस्.एन्.एल्., हिंदुस्थान झिंक वगैरे मोठया उदयोगांतील शासकीय समभागांची (शेअर्स) विकी करून केंद्र शासनाची आर्थिक स्थिती भक्कम केली पण या त्यांच्या धोरणावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली. एक वादग्रस्त मंत्री अशी त्यांची प्रतिमा तयार झाली तथापि फेबुवारी २००४ मध्ये विविध कंपन्यांतील शंभर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मतचाचणीत त्यांची विशेष उल्लेखनीय (आउटस्टँडिंग) मंत्री म्हणून निवड करण्यात आली. वाजपेयी सरकारच्या पतनानंतर त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली (२००४०६). या काळात त्यांची विविध संसदीय समित्यांवर निवड करण्यात आली. त्यांनी पक्षीय कार्यास पूर्णतः वाहून घेतले असून भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांत त्यांची गणना होते.

अरूण शौरींनी स्तंभ व स्फुट लेखनाव्यतिरिक्त सु. एकोणीस पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी हार्व्हिस्टिंग अवर सोल्स, इंडियन कॉन्ट्रव्हर्सिज, हिंदू टेम्पल्स : व्हॉट हॅपन टू देम (पहिला खंड), अरूण शौरी अँड हिज ख्रिश्चन क्रिटिक, एमिनन्ट हिस्टोरिअन्स : देअर टेक्नॉलॉजी, देअर लाइन, देअर फ्रॉड हिंदुइझम : इसेन्स अँड कॉन्सिक्वन्स, इन्स्टिट्यूशन इन द जनता फेज, मिशनरीज इन इंडिया, वर्शिपिंग फॉल्स गॉड्स, सेक्युलर अजेंडा, रिलिजन इन पॉलिटिक्स, सिस्टम्स ऑफ फॅसिझम, द वर्ल्ड ऑफ फत्वाज, पार्लमेंटरी सिस्टम वगैरे काही पुस्तके महत्त्वाची होत. त्यांना अनेक राष्ट्नीय व आंतरराष्ट्नीय मानसन्मान-पुरस्कार लाभले. त्यांपैकी मागसायसाय पुरस्कार (१९८२), ‘ इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर अवार्ड ’(१९८२), पद्मभूषण (१९९०), ‘ ॲस्टर अवार्ड ’(१९९०), ‘दादाभाई नवरोजी अवार्ड’ वगैरे प्रमुख व प्रतिष्ठित असून त्यांची वर्ल्ड प्रेस फ्रीडम हिरोजमध्ये ‘ इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट ’ने निवड केली होती तर बिझनेस वीकने त्यांना ‘ स्टार ऑफ एशिया ’हा किताब दिला.

त्यांचा विवाह अनिता या सुशिक्षित युवतीशी झाला (१९६७). त्यांना एक मुलगा असून पत्नी अनिता या विकलांग मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. त्यांची दीपक व नलिनी सिंग ही भावंडे होत. दीपक हे ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडिया ’या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि नलिनी सिंग ह्या प्रख्यात दूरदर्शन-पत्रकार-सूत्रसंचालक आणि ‘ टी. व्ही. लाइव्ह इंडिया ’या वाहिनीच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत.

देशपांडे, सु. र.