पॉलरॉयटर, पॉल ज्युलिअस : (२१ जुलै १८१६−२५ फेब्रुवारी १८९९). जगातील सर्वांत मोठ्या आणि ख्यातनाम वृत्तसंस्थेच्या जनक, ‘रॉयटर’ या त्याच्या नावानेच ही वृत्तसंस्था जगभर ओळखली जाते. जन्माने ज्यू असणाऱ्या पॉल ज्युलिअसने १८४४ मध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. तेव्हापासून रॉयटर हे नाव त्याने धारण केले. त्याचा जन्म प. जर्मनीतील कासेल येथे झाला. गटिंगेन (जर्मनी) येथे आपल्या चुलत्याच्या पतपेढीवर लेखनिकाचे काम करीत असता त्याचा कार्ल फ्रीड्रख गॉस यांच्याबरोबर परिचय झाला फ्रीड्रिख गॉस यांच्याबरोबर परिचय झाला. त्या काळात कार्ल फ्रीड्रिख विद्युत् तारायंत्रांसंबंधी प्रयोग करीत होता. नंतरच्या काळात बातमीप्रसाराचे ते महत्त्वाचे साधन ठरले. कार्लच्या मैत्रीचा फायदा पॉल ज्युलिअसला पुढच्या आयुष्यात खूपच झाला आणि वृत्तवितरणाच्या क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी तो करू शकला.

त्याने १८४० मध्ये बर्लिनच्या एका प्रकाशसंस्थेत नोकरी धरली. तेथे सत्ताधाऱ्यांविरुद्ध अनेक राजकीय पत्रके प्रसिद्ध केली. परिणामतः जर्मन राज्यकर्त्यांची त्याच्यावर गैरमर्जी होऊन त्यास पॅरिसला जावे लागले. त्या काळात जर्मनीतील वृत्तपत्रांना यूरोपातील क्रांतीचे वर्णन करणारे लेख व व्यापारविषयक बातमीपत्रे तो पाठवीत असे. १८४९ मध्ये आखेन ते ब्रूसेल्स दरम्यान वृत्त टपाल सेवा (कॅरिअर पीजन सर्व्हिस) त्याने सुरू केली. १८५१ साली तो इंग्लंडमध्ये आला. लंडनमध्ये शेअर बाजाराजवळ एक तार कार्यालय उघडून यूरोप खंडातील प्रमुख ठिकाणी बाजारभाव एक तार कार्यालय उघडून यूरोप खंडातील प्रमुख ठिकाणी बाजारभाव वृत्त पाठविण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. या व्यवसायात १८५९ पर्यंत त्यास अफाट यश मिळाले. पुढे बाजारभावांपेक्षाही राजकीय बातम्यांना मागणी वाढली. समुद्रातून तारा टाकण्याची सोय झाल्यानंतर तर त्याच्या वृत्तसंस्थेने इतर खंडांतही आपला विस्तार वाढविला व अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था म्हणून लौकिक संपादन केला. तिसर्या नेपोलियनाचे प्रसिद्ध भाषण लंडन टाइम्स या वृत्तसंस्थेमार्फत १८५८ मध्ये त्वरित जगभर प्रसृत झाले. त्यामुळे या वृत्तसंस्थेचे महत्त्व वाढले. १८६५ मध्ये सार्वजनिक कंपनीत या वृत्तसंस्थेचे रूपांतर झाले. निरनिराळ्या देशांत या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी नेमण्यात आले. वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी व अन्य खाजगी, सरकारी संस्था या वृत्तसंस्थेची सेवा घेऊ लागल्या. संस्थेच्या आर्थिक व्यापारात वाढ वाढल्यावर ब्रिटिश वृत्तपत्रांनी तिची मालकी घेऊन ‘विश्वत मंडळ’ निर्माण केले. आजमितीय ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मुख्य विश्वस्तांनी नेमलेल्या संचालकाकडून (बहुधा तो सेवानिवृत्त न्यायाधीश असतो) वृत्तसंस्थेचा कारभार चालतो. पॉल ज्युलिअसच्या या क्षेत्रातील अपूर्व यशाबद्दल बॅरन ही पदवी देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

भारतात ही वृत्तसेवा जेव्हा सुरू झाली, तेव्हा प्रारंभी मराठीत ‘रूटर’ म्हणून तिचा उल्लेख करण्यात येई. आता मात्र ‘रॉयटर’ हे नाव सर्वमान्य झाले आहे. सध्या सु. २६७ कोटी वाचकांपर्यंत रॉयटरच्या बातम्या पोहोचतात. शंभरांहून अधिक देशांतील वृत्तपत्रे ही वृत्तसेवा घेतात. भारतात स्वातंत्र्यानंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेबरोबर करार होऊन रॉयटरची वृत्तसेवा घेण्याचे ठरले. या वृत्तसंस्थेच्या करार होऊन रॉयटरची वृत्तसेवा घेण्याचे ठरले. या वृत्तसंस्थेच्या जगभर असणाऱ्या बातमीदारांची संख्या हजारांहून अधिक असून ग्राहक असणाऱ्या वृत्तपत्रांची संख्या सु. दहा हजार आहे. अधिकृत व विश्वासार्ह वृत्त हे रॉयटरचे वैशिष्ट्य होय.

पवार, सुधाकर