प्रसिद्धिका : (हँड-आउट). वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इ. बहुजन माध्यमांद्वारा प्रसिद्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेला मजकूर म्हणजे प्रसिद्धिका. ⇨प्रसिद्धि-पत्रक (प्रेसनोट) व प्रसिद्धिका यांत तत्त्वतः काही भेद नाही परंतु काही लोक व्यवहारात त्या दोहोंमध्ये भेद करतात. प्रसिद्धि-पत्रकातील मजकूर बातमीवजा व कालसापेक्ष असतो तर प्रसिद्धिकेतील मजकूर पार्श्वभूमीवजा माहिती देणारा व तुलनात्मक दृष्टीने कालनिरपेक्ष असतो. शासनाच्या विविध खात्यांना प्रसिद्धि-पत्रके काढता येतात परंतु दुय्यम किंवा संलग्न कार्यालयांना तो अधिकार नसतो. त्यांना प्रसिद्धिका काढाव्या लागतात. 

प्रसिद्धिकांतील मजकुराला स्पष्टीकरणात्मक शीर्षक असते. लहान परिच्छेद, आटोपशीरपणा, स्पष्ट व तर्कशुद्ध मांडणी ह्यांना प्रसिद्धि-पत्रकाप्रमाणे प्रसिद्धिकांतही महत्त्व असते. आलंकारिक भाषा, अनावश्यक विशेषणे, पुनरुक्ती, असत्य, अर्धसत्य किंवा अतिशयोक्तीपूर्ण माहिती यांमुळे प्रसिद्धिकांची विश्वसनीयता कमी होते आणि त्याला प्रसिद्धी मिळणे दुरापास्त ठरते. प्रसिद्धिकांत आवश्यकतेप्रमाणे छायाचित्रे, आकडेवारी, नकाशे इत्यादींचा उपयोग केलेला असतो. 

केंद्र व राज्य शासनांप्रमाणेच औद्योगिक, व्यापारी किंवा सार्वजनिक सेवा-संस्था, परकीय देशांच्या वकिलाती तसेच सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती गरजेप्रमाणे प्रसिद्धिका काढतात. त्यात मुद्रित, चक्रमुद्रित, टंकलिखित किंवा हस्तलिखितही असतात.

 परांजपे, प्र. ना.