पत्रकार परिषद: प्रेस कॉन्फरन्स किंवा न्यूज कॉन्फरन्स या इंग्रजी संज्ञेचा हा मराठी पर्याय आहे. यासाठी मराठीत वार्ताहर परिषद, वार्ताहर बैठक, पत्रप्रतिनिधी परिषद इ. इतर संज्ञाही रूढ आहेत. मराठीत पत्रकारांची जी एक संघटना आहे तिचेही ‘पत्रकार परिषद’ असे नाव आहे, परंतु त्या संघटनेचा या विषयाशी संबंध नाही. [⟶

वृत्तपत्रकारिता ] एखादी विशेष महत्त्वाची माहिती वृत्तपत्रकारांना पुरवावयाची असेल, तेव्हा साधारणतः पत्रकार परिषद बोलाविण्यात येते. खाजगी संख्या अथवा उद्योग केंद्रे स्वत:च्या उपक्रमांची प्रसिद्धी व्हावी म्हणून पत्रकार परिषद बोलावतात. शासनातर्फे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री एखादा महत्त्वाचा निर्णय वा योजना जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतात. काही वेळा मंत्री किंवा उच्च शासकीय अधिकारीही पत्रकार परिषदा घेतात. अमेरिकेत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पत्रकार परिषद घेत. ही पद्धत आता सर्वत्र रूढ झालेली आहे. आपल्याकडेही स्वातंत्र्योत्तर काळात माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी २८ ऑगस्ट १९४७ रोजी पहिली वार्ताहर परिषद घेतली होती. त्यात त्यांनी दिल्ली व पंजाबमधील राजकीय परिस्थितीचे निवेदन केले होते. त्यानंतरही ते दर महिन्याला नियमितपणे पत्रकार परिषद घेऊन शासकीय निर्णयांची व अन्य राष्ट्रीय प्रश्नांसंबंधीची माहिती देत असत. पत्रकार परिषदेत वार्ताहरास विचारावयाचे प्रश्न आधी लेखी स्वरूपात द्यावे लागतात. काही वेळा आयत्या वेळचे प्रश्नही विचारता येतात. विशेषतः परदेशी पाहुण्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न अगोदर द्यावे लागतात. सर्वच प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत, असे बंधन नसते. तथापि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असा संकेत आहे. पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तररूपाने मोकळी चर्चा होऊन अनेक तऱ्हेची माहिती प्राप्त होते. तथापि प्रश्नोत्तरे याचा अर्थ वादविवाद नव्हे, हे पथ्य पत्रकारांना पाळावे लागते आणि पत्रकार परिषद घेणारासही नुसते भाषण देता येत नाही. जास्तीत जास्त एक तासाचा काळ पत्रकार परिषदेसाठी दिला जातो. बहुधा पत्रकार परिषदेचे आयोजन शासकीय प्रसिद्धी अधिकारी किंवा लोकसंपर्क अधिकारी करतात. त्यांना ज्या विषयासंबंधी पत्रकार परिषद घ्यावयाची असते, त्यासंबंधी एक टिपणी तयार करून ती पत्रकारांना द्यावी लागते. त्याला ⇨प्रसिद्धिका (प्रेस हँडआउट) म्हणतात. वृत्तपत्रांच्या अधिकृत प्रतिनिधींना किंवा संपादकांना वा सहसंपादकांना पत्रकार परिषदेस आमंत्रित करण्यात येते. महत्त्वपूर्ण बातम्या प्रसृत करण्याचे पत्रकार परिषद हे एक मोठे साधन आहे.

पवार, सुधाकर