पत्रकार कक्ष: वृत्तपत्रप्रतिनिधींसाठी राखून ठेवलेली स्वतंत्र जागा. संसदेत व राज्यविधिमंडळात चालणारे कामकाज वृत्तपत्रप्रतिनिधींना पाहता यावे व त्याचा वृ्त्तांत त्यांना देता यावा, म्हणून त्यांच्या बसण्याची जी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते, त्या जागेस पत्रकारकक्ष असे म्हणतात. या पत्रकारकक्षात बसणाऱ्या पत्रप्रतिनिधींना संबंधित वृत्तपत्रसंस्थेकडून प्रतिनिधित्वाचे विशेष अधिकारपत्र मिळवावे लागते. अशा पत्रप्रतिनिधींची अधिकृत वार्ताहर म्हणून शासनाकडून नोंद करण्यात आल्यावरच त्यांना पत्रकारकक्षात बसण्याची प्रवेशपत्रिका देण्यात येते. भारतीय लोकसभेत सु. शंभरांवर पत्रकार बसू शकतील, असे एक दालन (गॅलरी) आहे. संसदभवनात त्यांच्यासाठी तीन स्वतंत्र खोल्या ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या कार्यालयात एक मोठे दालन ⇨ पत्रकार परिषदेसाठी व एक खोली पत्रकारकक्ष म्हणून ठेवण्यात आलेली आहे. तेथे सर्व शासकीय खात्यांचे संपर्काधिकारी पत्रकारांना भेटू शकतात. मुंबईतही मंत्रालयात पत्रकारकक्ष म्हणून एक स्वतंत्र खोली असून तेथे पत्रकार परिषदा होतात. तसेच एखाद्या वेळी शासनाच्या  निर्णयासंबंधीची माहिती देण्यासाठी पत्रकारांच्या त्या खोलीत शासकीय अधिकारी, मंत्री किंवा अन्य संबंधित व्यक्ती उपस्थित राहतात. त्याशिवाय पत्रकारांना परस्परांची ओळख करून घेण्याकरिता व बातम्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही या खोलीचा उपयोग करण्यात येतो. अधिकृत पत्रकारांनाच पत्रकारकक्षात प्रवेश मिळतो. त्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रिकेच्या मागील बाजूस साधारणपणे दहा नियमांची एक आचारसंहिता दिलेली असते. त्या संहितेचा भंग केल्यास प्रवेशपत्रिका रद्द करण्याचा अधिकार प्रवेशपत्रिका देणाराला असतो. राजकीय पक्षांच्या व सामाजिक संस्थांच्या अधिवेशनप्रसंगी पत्रकारांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केलेली असते.

पवार, सुधाकर