वृत्तपत्रे : (न्यूज पेपर). मुख्यतः वार्ता तसेच मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे ‘वृत्तपत्र’ (न्यूज पेपर). रोजच्या ताज्या घडामोडींच्या वार्ता देणे, जाहिराती प्रसृत करुन उद्योग व व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवणे व प्रभावित करणे तसेच लोकमताचे नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे अशा विविध उद्दिष्टांनी आधुनिक नागर संस्कृतीत विकसित झालेल्या संस्था, असे वृत्तपत्र-माध्यमाचे वर्णन केले जाते. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरुपाच्या विविध बातम्या ताबडतोब पुरवणे, हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू इतर नियतकालिकांपेक्षा त्यांचे वेगळेपण स्पष्ट करणारा आहे कारण अन्य नियतकालिकांमध्ये ताज्या बातम्यांना असे स्थान नसते. [→नियतकालिके]. वार्ता आणि विचार-प्रसार ह्या दोन अंगांनी मिळून वृत्तपत्र बनते चालू घडामोडींच्या नोंदींचा तो ऐतिहासिक दस्तऐवज असतो, तसेच घडलेल्या घटनेचा योग्य अन्वयार्थ लावून त्यावर भाष्य करणे, संपादकीय दृष्टीकोनातून मतप्रदर्शन करणे, हेही आधुनिक वृत्तपत्राचे महत्त्वाचे अवतारकार्य मानले जाते. वृत्तपत्रास सामान्य माणसाचे विद्यापीठ मानले जाते. माहिती, मनोरंजन, मार्गदर्शन व सेवा ही वृत्तपत्राची चार प्रकट कार्ये होत.

विपुल, विस्तृत व विविधांगी स्वरुपाच्या बातम्या देणे, हे वृत्तपत्राचे आद्य कतव्य होय. मात्र ⇨ वार्ता  म्हणजे काय ह्याची काटेकोर, सर्वमान्य व सर्वसमावेशक व्याख्या करणे कठिण आहे. वाचकाला आधी ठाऊक नसलेली हकीकत नव्याने कळवणे, ताज्या घटना घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती शीघ्रतेने व तत्परतेने पुरवणे, हे वार्तेचे स्थूल स्वरुप म्हणता येईल. वार्तेचा ताजेपणा, नावीन्य व घडलेल्या घटनेचे महत्त्व ही प्रमुख वार्तामूल्ये होत. नजीकच्या भविष्यात काय घडू शकेल ह्याचा अंदाज वर्तवणे, हेही वृतपत्रीय वार्ताकथनाच्या कक्षेत येते. वार्तेचा ताजेपणा व नावीन्य यांबरोबरच, स्थलसान्निध्य वा स्थानिकत्व, व्यक्तिमाहात्म्य वा पदमाहात्म्य, एखाद्या घटनेचे संभाव्य दूरगामी परिणाम ही काही अन्य महत्त्वाची वार्तामूल्ये होत. आधुनिक वृत्तपत्रव्यवसायाच्या केंद्रस्थानी ⇨ वार्ताहर असतो. दैनिक वृत्तपत्र वेळच्यावेळी नियमितपणे प्रकाशित करण्यासाठी गतिमान कार्यक्षमतेची गरज असते. वार्ताहर, संपादकवर्ग, छायाचित्रकार, चित्रकार आदींना ठरलेली अंतिम मुदत पाळण्याच्या दडपणाखाली सदैव तत्परतेने व शीघ्रगतीने आपापली कामे पार पाडावी लागतात. [→वृत्तपत्रकारिता]. जाहिरात विभाग हेही वृत्तपत्र व्यवसायाचे एक अपरिहार्य अंग आहे. उत्पादकांचा माल आकर्षक जाहिराती छापून व वाचकांना उपयुक्त वस्तूंची माहिती देऊन सेवा पुरवणे, ही उद्दिष्टे वृत्तपत्राद्वारे साधली जातात व त्यातून वृत्तपत्रांना आर्थिक लाभही होतो. समाजातील सर्वच घटकांना या ना त्या स्वरुपाची उपयुक्त व मार्गदर्शक माहिती वृत्तपत्रे पुरवत असतात. त्यामुळेच वृत्तपत्र हा जरी व्यवसाय असला, तरी ते जनसेवेचे उपयुक्त साधनही आहे. त्याप्रमाणे ते प्रभावी व सर्वदूर पोहोचणारे संपर्कमाध्यम आहे.

जगातील बहुतेक वृत्तपत्रे साधारणपणे दोन प्रमाणित आकारांत छापली जातात : (१) वृत्तपत्रिकेच्या (टॅब्लॉइड) आकारात-म्हणजे सु. २८ X ३८ सेमी. किंवा (२) बृहतपत्रकाच्या (ब्रॉडशीट) आकारात-म्हणजे ३८ X ५८ सेमी. वृत्तपत्राच्या छपाईसाठी साधारणपणे स्वस्तातला, वृत्तपत्री कागद (न्यूजप्रिंट) वापरला जातो. वृत्तपत्राचे अन्य नियतकालिकांच्या तुलनेत लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे, त्याची पाने सुटी व घड्या घातलेली असतात जाड अक्षरांतील मोठे ठळक मथळे, चित्र, व्यंगचित्रे, अनेकविध आकर्षक आणि रंगीबेरंगी जाहिराती यांमुळे वृत्तपत्राचे दर्शनी रुप वेधक व आकर्षक बनते.  जाहिरातींचे प्रमाण वृत्तपत्राच्या आकारमानाच्या सु. ३५ ते ६० टक्क्यांपर्यंतही असू शकते. वृत्तपत्राचे पाने भारतासारख्या देशात कमीत कमी दोनपासून सोळा पृष्ठांपर्यंत आढळतात. परदेशांत मात्र ते ७५ ते ८० किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतात.

वृत्तपत्रांचे प्रमुख प्रकार म्हणजे – (१) दैनिक, (२) साप्ताहिक, (३) खास आस्थाविषयक (स्पेशल इंटरेस्ट) वार्तापत्रे, (४) वृत्तनियतकालिके.

दैनिक वृत्तपत्रे : दैनिकांतून जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या तसेच स्थानिक ताज्या वार्ता विपुल प्रमाणात व त्यांच्या महत्त्वसापेक्षतेनुसार कमीअधिक विस्तृत, तपशीलवार दिल्या जातात. संपादकीय वा अग्रलेख, स्फुटे, स्तंभ, विशेष लेख किंवा वृत्त लेख (फीचर आर्टिकल) ह्यांतून मतप्रदर्शन केले जाते. वाचकांच्या पत्रव्यवहारासारखी सदरे असतात. मोठ्या दैनिक वृत्तपत्रांमध्ये माहितीचे वैविध्य व व्याप्ती खूपच मोठी असते. अनेकविध विषयांतील ताज्या घडामोडींच्या वृत्तकथा (न्यूजस्टोरी) व विशेष लेख दिले जातात. अन्य वृत्तकथांमध्ये गुन्हे, अपघात, आपत्ती तसेच नानाविध आस्थाविषयांचा (उदा., भविष्य, आरोग्य, बालसंगोपन, वेशभूषाप्रकार, इ.) समावेश होतो. भिन्नभिन्न वाचकगटांसाठीही खास सदरे वा पुरवणी-विभाग असतात. उदा., स्त्रीजगत, मुलांसाठी ज्ञान-रंजन पुरवण्या इत्यादी. नवेनवे चित्रपट, नाटके, साहित्यकृती, कलाकृती आदींची परिक्षणे, कलाप्रदर्शनांचे वृतांत, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती इ. पूरक वाचनीय मजकूर दिला जातो. वृत्तपत्रांच्या जास्त पानांच्या  रविवार आवृत्त्या वा विशेष पुरवण्याही त्यासाठी काढल्या जातात. रोजच्या घडामोडींवर भाष्य करणारी छोट्या-मोठ्या आकारांची व्यंगचित्रे छापली जातात. अनेक दैनिक वृत्तपत्रे सकाळी लवकर वितरित होणारी (मॉर्निंग न्यूज पेपर्स), काही दुपारची (मिड् डे), तर काही सायंदैनिके असतात.

साप्ताहिक वृत्तपत्रे : दैनिक वृत्तपत्रांपेक्षा ह्यांचे विषयक्षेत्र मर्यादित असते. बातम्यांचे स्वरुपही दैनिकापेक्षा भिन्न व काही वेळा व्यक्तिसापेक्ष असते. एखाद्या छोट्या समूहातील लोक परस्परांना ओळखत असल्याने त्यांच्यात एकमेकांच्या व्यक्तिगत बाबींमध्ये स्वारस्य उत्पन्न होते. त्या दृष्टीने व्यक्तिगत पातळीवरच्या जन्म, मृत्यू, वाढदिवस, विवाहसमारंभ अशा घटनांच्या बातम्यांना महत्त्व येते. अशा वृत्तपत्रांचा खपही त्या त्या समूहापुरताच मर्यादित असतो. रस्त्यावरचे वाहनांचे अपघात, आगीसारख्या घटना अशा बातम्यांनाही पहिल्या पानावर स्थान दिले जाते. स्थानिक राजकारण, व्यापार अशा गोष्टींनाही त्यात प्राधान्य असते. त्या तुलनेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बातम्यांना दुय्यम स्थान असते, किंवा कित्येकदा त्या बातम्या दिल्या जात नाहीत.

जिल्हा वृत्तपत्रे साधारणतः ह्याच स्वरुपाची असतात व ती दैनिक वा साप्ताहिक स्वरुपात प्रसिद्ध होतात.

खास आस्थाविषयक वार्तापत्रे : विशिष्ट गटांसाठी ही खास वृत्तपत्रे चालवेली जातात. उदा., मोठमोठ्या कंपन्या, उद्योगसमूह, व्यापारी संघटना आपल्या सदस्यांसाठी अशी वृत्तपत्रे प्रकाशित करतात. गृहपत्रे (हाउस जर्नल्स) यांचा ह्या प्रकारात सामान्यतः समावेश होतो. महानगरातून विदेशी व्यक्तींसाठी त्यांच्या भाषेतील वार्तापत्रे निघतात.

वृत्तनियतकालिके : (न्यूज मॅगझीन्स). ह्या एका नव्या प्रकाराचा उदय विसाव्या शतकात झाला. विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण जागतिक घटना घडामोडींच्या बातम्या सविस्तर रुपात व पूरक छायाचित्रांसह पुरविणारे टाइम मॅगझीन हे अमेरिकेतील साप्ताहिक १९२३ साली प्रसिद्ध होऊ लागले व त्यातून या प्रकाराला चालना मिळाली. या साप्ताहिकाला मिळालेल्या भरघोस यशामुळे त्याच्या धर्तीवर अल्पावधीतच न्यूजवीक, यू. एस्. अँड वर्ल्ड रिपोर्ट ही साप्ताहिकेही निघू लागली. आपले कुशल बातमीदार व छायाचित्रकार जगभर नेमून त्यांच्या करवी मिळालेल्या सामग्रीवर आपल्या खास भाषाशैलीचा संपादकीय संस्कार करुन बातम्या आकर्षक रीत्या कथनरुपात सादर करणे, हे या वृत्तनियतकालिकांचे ठळक वैशिष्ट्य होय. याबरोबर वार्तेचे विस्तृत विवरण, विश्लेषण, भाष्य, मुल्यांकन करण्याकडेही कल असतो. फ्रान्समधील L’Express, जर्मनीतील Der Spiegel, इटलीतील पॅनोरामा व मेक्सिकोतील Tiempo ही या प्रकारातील उल्लेखनीय वृत्तनियतकालिके होत. मात्र वृत्तनियतकालिकांत टाइमचा दर्जा व लोकप्रियता प्रदीर्घ काळ टिकून आहे. अमेरिकेत लेखी मजकुरांपेक्षा छायाचित्रांना अधिक प्राधान्य देणाऱ्या  छायाचित्रनियतकालिकांचा प्रारंभ लाइफ या साप्ताहिकाने १९३६ मध्ये केला. जगातील लक्षवेधक घटना-प्रसंगांची उत्तमोत्तम कलात्मक व परिणामकारक छायाचित्रे प्रसिद्ध करुन या साप्ताहिकाने छायाचित्र-पत्रकारितेत एक नवी परंपरा निर्माण केली. १९७३ मध्ये लाइफ आर्थिक अडचणींमुळे बंद पडले. पण त्याने निर्माण केलेली परंपरा पुढे चालविणाऱ्या विद्यमान छायाचित्र-नियतकालिकांत फ्रान्समधील पॅरिसमॅच, जर्मनीतील स्टर्न व इटलीतील ओग्गी ही नियतकालिके श्रेष्ठ दर्जाची मानली जातात. वृत्तनियतकालिकांचा भर साधारणतः मागील आठवड्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे साद्यंत वृतांत देण्याकडे, तसेच त्यांचे तपशीलवार विवरण, विश्लेषण, मूल्यमापन व भाष्य करण्याकडे मुख्यत्वे असतो.

दूरदर्शन, रेडिओ यांसारख्या वृत्तप्रसारणाच्या माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्र हे मुद्रित-माध्यम काही बाबतींत जास्त किफायतशीर ठरते. उदा., – (१) वृत्तपत्रात बातम्या जास्त संख्येने, विस्तृत व तपशीलवार देता येतात. त्यांचे विवरण-विश्लेषण, अन्वयार्थ, भाष्य यांनाही जास्त वाव असतो. (२) इतर माध्यमांच्या तुलनेत स्वस्त, कमी खर्चाचे. (३) कात्रणे काढून संग्रह करण्याची तसेच टपालाद्वारे अन्य ठिकाणी पाठवण्याची सोय. (४) ग्राहक-वाचकांच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी वाचता येते. (५) आकडेवारीची कोष्टके, आलेख, तक्ते इ. सचित्र साहित्य जास्त सुस्पष्ट व सुबकपणे देता येते. (६) स्थानिक जाहिराती अधिक प्रमाणात व परिणामकारक रीत्या देता येतात. त्यामुळे उत्पादक व्यापाऱ्यांची व ग्राहकांची मोठी सोय साधली जाते. (७) संदर्भासाठी पुन्हा काढून वाचता येते.

इनामदार. श्री. दे.

वृत्तपत्राचे स्वरुप आणि मांडणी : वृत्तपत्राचा आकार, पानांची संख्या, स्तंभांचा आकार, जाहिरातींचे प्रमाण, छपाईचे तंत्रज्ञान या मूलभूत बाबींवर वृत्तपत्रांचे स्वरुप ठरविण्यात येते. वृत्तपत्राची चौकट ठराविक असते. मात्र मजकुरातील नावीन्याप्रमाणे वृत्तपत्राच्या दिसण्यातही ताजेपणा असावा, अशी वाचकाची अपेक्षा असते. शिवाय व्यावसायिक स्पर्धेचा भाग म्हणूनही स्वरुपात आकर्षकता असने अनिवार्य ठरते.

तांत्रिकदृष्ट्या उभी, आडवी आणि मिश्र असे मांडणीचे तीन प्रकार करता येतात. वृत्तपत्राच्या तंत्रज्ञानविषयक बदलांनुसार मांडणीमध्ये बदल होत गेले. संगणकामुळे असममित आणि सुट्या घटक पद्धतीची किंवा चौकोनी (मॉड्युलर) मांडणी अधिक रुढ झाली. स्थिर आणि गतिशील असे मांडणीचे गुणात्मक वर्गीकरण करता येते.

तोल आणि विरोधाभास ही मांडणीमधील मुख्य तत्वे होत. त्यांच्या आधारे मजकूर आणि चित्रे यांची रचना वृत्तपत्राच्या पानात केली जाते. या आखणीचे नियोजन जेवढे चांगले, तेवढा संज्ञापनाचा हेतु अधिक सुलभपणे साधता येतो.

गोडबोले, आल्हाद वा.

प्राचीन काळातील वृत्तवितरण : वार्ता व टीका ही वृत्तपत्रांची प्रमुख अंगे मानली, तर त्यांच्याशी साधर्म्य असलेल्या काही गोष्टी पूर्वीच्या काळात आढळतात. प्राचीन ग्रीसमध्ये रंगभूमीवर होणाऱ्या नाट्यप्रयोगांतून अनेकदा ताज्या बातम्या सांगत व त्यांवर टीकाही केली जात असे. कित्येक नाटकांचे विषय चालू घटनांशी निगडीत असत व त्यामुळे प्रचलित घडामोडींवर टीका करणे नटांना अवघड जाई. देशोदेशातील शाहीर आपल्या कवनांतून चालू प्रश्नांचा ऊहापोह करीत व त्यामुळे त्यांची कवने लोकप्रिय होत. लेखी वृत्तपत्रांच्या ऐवजी तोंडी वृत्तपत्रांचा हा प्रकार म्हणता येईल.

ईजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी हुकूम कोरलेले शिलालेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवीत. असे काही शिलालेख संशोधकांना सापडले आहेत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढीत व ते कागद प्रांताप्रांतातून वाटले जात. अशा पत्रकांतून देशांत व विशेषतः राजधानीत घडणाऱ्या गोष्टींची ताजी बातमीही असे. जुलिअस सीझरच्या आधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना (इं. शी. ‘डेली ॲक्ट’) या नावाची वार्तापत्रके, सरकारी निवेदने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दररोज रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जात. सातव्या शतकात चीनमध्येही सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावीत व त्यांच्या प्रती वाटल्या जात. फ्रान्समध्येही टपालखात्याची पत्रके अशाच रीतीने प्रसृत होत. त्यानंतर बातम्या देणारी पत्रके ब्रिटनमध्ये अधूनमधून प्रकट होऊ लागली. त्यांत लढाया, खून, अत्याचार इ. घटनांचा समावेश असे. फेरीवाले रस्त्यांतून चटकदार बातम्यांचे विषय ओरडून सांगत. धर्मशाळेत उतरणारे प्रवासीही निरनिराळ्या ठिकाणच्या बातम्या लोकांना रंगवून सांगत. छापीइ वृत्तपत्रांची प्राचीन रुपे म्हणजे दवंडी पिटणारे लोक, टपालाद्वारे पाठवले जाणारे जाहीरनामे, वादविवादांसंबंधीची पुस्तपत्रे, बॅलड, ब्रॉडसाइड्स (एका बाजूने लिहिलेले रुंद कागद) इ. होत. त्या काळी अमीर-उमराव, मुत्सद्दी व राजेमहाराजे आपले खास प्रतिनिधी परदेशी पाठवत व त्यांच्याकरवी ताज्या बातम्या आणवीत. भारतातदेखील ही पद्धत अखबारनविसांच्या मार्फत चालू होती.

मुद्रित रुपातील वृत्तवितरण :मुद्रणाच्या शोधानंतर (पंधराव्या शतकाचा पूर्वार्ध) पूर्वीच्या काळातील वेळोवेळी प्रसृत होणारी हस्तलिखित वार्तापत्रे छापील स्वरुपात निघू लागली. सोळाव्या शतकात अशी अनेक वार्ता-पुस्तपत्रे (न्यूज-पॅम्फ्लिट) जर्मनी तसेच अनेक युरोपीय देशांत प्रसिद्ध होऊ लागली ती जत्रांमधून, दुकानांमधून विकली जात. त्यांमध्ये युद्ध, आपत्ती, राज्याभिषेकसोहळा तसेच अद्भुत नवलकथा आदींचा समावेश असे. हळूहळू त्यांच्या प्रकाशनात नियमितपणा येऊ लागला. सतराव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत जर्मनी, ऑस्ट्रिया, नेदर्लंड्स, इटली येथे काही छापील वृत्तपत्रे नियमित निघू लागली. अविसा रिलेशन ओडर झायटुंग (१६०९) हे नियमितपणे प्रसिद्ध होणारे जर्मन वृत्तपत्र सर्वांत जुने वृत्तपत्र मानले जाते. त्यानंतर अँटवर्प येथे १६१६ साली Nieuwe Tidingen हे वृत्तपत्र सुरु झाले. पहिले इंग्रजी वृत्तपत्र द विकली न्यूज फ्रॉम इटली, जर्मनी इटीसी हे लंडन येथे १६२२ च्या मे महिन्यात चालू झाले. त्याच्या पूर्वी नथॅन्यल बटर या प्रकाशकाने १६०५ च्या जूनमध्ये यॉर्कशरमधील दोन खूनखटल्यांचे वृत्तांत प्रसिद्ध केले होते.

प्रमुख देशांतील वृत्तपत्रे : जगातील प्रमुख देशांत वृत्तपत्रसंस्थेची सुरुवात व प्रगती कशी झाली, याचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे :

ग्रेटब्रिटन :वृत्तपत्र या अर्थाचे मूळ इंग्रजी शब्द ‘कोरंट’ व ‘गॅझेट’ हे होतं. ‘कोरंट’ म्हणजे संकलित वृत्त. ‘गॅझेट’ हा शब्द याहीपेक्षा जुना असून तो ‘गॅझेट्टा-गॅझा’ या इटालियन शब्दापासून बनला आहे. सोळाव्या शतकात इटलीत व्हेनिस प्रांतात गेझा या नावाची वृत्तपत्रे चालू होती. ब्रिटनमधले पहिले इंग्रजी दैनिक एलिझाबेथ मॅलेटने द डेली कोरंट या नावाने ११ मार्च १७०२ रोजी प्रकाशित केले. ते लहान आकारात असून, केवळ एका बाजूने छापीत. त्यात फक्त बातम्या प्रसिद्ध होत. संपादकीय मजकूर नसे. ऑक्सफर्ड गॅझेट हे द्विसाप्ताहिक डेली कोरंटपेक्षाही जुने असून ते १६६५ साली १६ नोव्हेंबरला सुरू झाले. सहा महिन्यांनी त्याचे लंडनला स्थलांतर झाले व लंडन गॅझेट या नावाने ते ५ फेब्रुवारी १६६६ पासून प्रसिद्ध होऊ लागले.

द विक्‌ली न्यूज या पहिल्या इंग्रजी नियतकालिकाचे संचालक निकोलस बोर्न व टॉमस ऑर्थर हे ब्रिटनमधले पहिले वृत्तपत्रप्रकाशक. नथॅन्यल बटर हा त्यांचा या धंद्यातला प्रतिस्पर्धी. पुढे ते एकत्र आले व त्यांनी न्यूज ऑफ द प्रेझेंट वीक हे साप्ताहिक सामायिक रीत्या सुरु केले. या काळी वृत्तपत्र प्रकाशनाला सरकारी परवाना काढावा लागे. १६३८ साली पहिल्या चार्ल्‌स राजाने न्यूजला असा परवाना दिला होता. त्यासाठी त्याच्या संचालकांनी सेंट पॉल कॅथीड्रलच्या दुरुस्तीसाठी वर्षाला दहा पौंड द्यावयाचे होते. सरकारी परवान्याशिवाय जी वृत्तपत्रे निघत, त्यांना ‘स्टार चेंबर’ कडक शासन करीत असे. परवान्याविषयीचा हा कायदा १६९२ साली रद्द झाला. त्या काळी पार्लमेंटमधील वादविवाद प्रसिद्ध करण्यावरही बंदी असे. त्यामुळे डॉ. जॉन्सनसारखे विद्वान लेखक ऐकीव माहितीवर, घरी बसून असे अहवाल तयार करीत. १७७२ पासून पार्लमेंटच्या कामकाजाचे खरेखुरे वृतांत प्रसिद्ध होऊ लागले.

याच सुमारास वृत्तपत्रांना मुद्रांक शुल्क भरावे लागे. १७१२ साली वृत्तपत्राच्या प्रत्येक पानामागे एक पेनी कर बसविण्यात आला. हा कर १८५५ पर्यंत चालू होता. त्याशिवाय वृत्तपत्रांतील जाहिरातींवरही कर असे. वृत्तपत्राच्या कागदावरदेखील कर आकारीत. पण हे सारे कर हळूहळू कमी होत गेले व एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस वृत्तपत्रांना टपालाच्या सवलती मिळू लागल्या.

कॅफेमध्ये बसून वृत्तपत्रे वाचण्याची व त्यांतील बातम्यांवर चर्चा करीत बसण्याची प्रथा अठराव्या शतकात लोकप्रिय झाली. गिऱ्हाईक मिळविण्यासाठी ‘कॉफी हाउस’चे मालकही आपल्या खर्चाने गिऱ्हाईकांना मिळतील ती सारी वृत्तपत्रे पुरवीत. त्यांतूनच त्यांना स्वतःची वृत्तपत्रे काढण्याची कल्पना सुचली व १७२८ साली त्यांनी सहकारी  भांडवलाची कंपनी काढून एक दैनिक सुरु करण्याचे ठरविले व इतर वृत्तपत्रांवर बहिष्कार टाकला. याला उत्तर म्हणून लंडनच्या वृत्तपत्रचालकांनी स्वतःची कॉफीची दुकाने काढण्याचा धाक घातला व त्याचा उपयोग होऊन ‘कॉफी हाउस’ वाल्यांच्या मालकीची वृत्तपत्रे निघण्याचे रहित झाले. अठराव्या शतकातच राजकीय स्वरुपाची वृत्तपत्रेही ब्रिटनमध्ये सुरु झाली. त्यांच्या जोडीला अर्थातच देशी-विदेशी बातम्या देणारी वृत्तपत्रेही असत. स्टील, ॲडिसन, स्विफ्ट यांच्यासारखे नामवंत लेखक वृत्तपत्रांतून लेखन करु लागले. ते विद्यमान समाजस्थितीची चर्चा करीत.⇨ डॉ. सॅम्यूएल जॉन्सन (१७०९८४) यांची कामगिरी तर विशेष महत्त्वाची आहे. द रँब्लर हे नियतकालिक त्यांनी १७५० मध्ये काढले. संपादक या नात्याने त्यात तत्कालीन सामाजिक, राजकीय, वाङ्‌मयीन विषयांवर अनेक बोधपर निबंध लिहिले.⇨रिचर्ड स्टीलचे द टॅटलर (१७०९११) व⇨जोसेफ ॲडिसनचे द स्पेक्टेटर (१७१११२ १७१४) ही तेव्हाची नावाजलेली नियतकालिके होत. त्यांतील लेख तत्कालीन इंग्रजीचा उत्तम नमुना म्हणून मानले जात. बातमीविक्या वृत्तपत्रापेक्षा काहीतरी वैशिष्ट्य दाखवावे, अशा ईर्षेने ती चालविली जात. ‘नियतकालिक निबंध’ हा नवा साहित्यप्रकार त्यातून विकसित झाला. ‘एडिटर’ (संपादक) हा शब्द याच काळात रुढ झाला. १७०९ साली ॲडिसनने द टॅटलर पत्राच्या संबंधात, आपला मित्र स्टील याचा ‘एडिटर’ म्हणून प्रथम उल्लेख केला.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात ब्रिटनमध्ये महत्त्वाची दैनिके सुरु झाली. या शतकाच्या थोडे आधी टाइम्स सुरु झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुद्रांक-कराचा कायदा, जाहिरातीवरचा कर इ. बाबतींत वृत्तपत्रांवर जाचक शासकीय निर्बंध होते. परंतु पुढे हे निर्बंध सैल होत गेले व शतकाच्या उत्तरार्धात वृत्तपत्रे स्वतंत्र, अनिर्बंध वातावरणात निघू लागली. या स्वातंत्र्यामुळे त्यांचा दर्जा थोडा खालवला हे खरे आहे. शतकाच्या अखेरीअखेरीस वृत्तपत्र व्यवसायाचा व्याप पुष्कळच वाढला. वृत्तपत्रनिर्मितीच्या क्षेत्रातील तांत्रिक प्रगती व शिक्षणप्रसारामुळे वाढलेला वाचकवर्ग ह्यांच्या योगे हे शक्य झाले.

विसाव्या शतकात ब्रिटनमध्ये वृत्तपत्रांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. लंडन टाइम्स, डेली मेल, डेली एक्स्प्रेस, डेली टेलिग्राफ, गार्डियन यांसारखी दैनिके लंडन येथे भरभराटीस आली. त्यांशिवाय स्कॉटलंडमध्ये स्कॉट्समन (१८१७ मध्ये द्विसाप्ताहिक व १८५५ पासून दैनिक), वेल्समध्ये वेस्टर्न मेल अशी दैनिकेही मान्यता पावली आहेत. ब्रिटनमध्ये दैनिके रविवारी प्रसिद्ध होत नाहीत फक्त त्या दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकांत ऑब्झर्वर, संडे टाइम्स इ. महत्त्वाची आहेत. त्यांशिवाय इकॉनॉमिस्ट, न्यू स्टेट्समन, स्पेक्टेटर, सॅटर्‌डे रिव्ह्यू ही ब्रिटनची वैचारिकतेवर भर देणारी साप्ताहिके होत.

ब्रिटनच्या दैनिकांत मोठ्या खपाची रंजक वृत्तपत्रे बरीच आहेत. आकर्षक बातम्या प्रामुख्याने देणे हे त्यांचे वैशिष्ट्य. त्या मानाने राजकीय वा सामाजिक घटनांना त्यांत गौण स्थान दिले जाते. अशा रंजक वृत्तपत्रांची स्पर्धा गंभीर प्रकृतीच्या दैनिकांना बाधक ठरते. आर्थिक अडचणींमुळे मूळ वृत्तपत्र-मालकाला टाइम्स हे वृत्तपत्र रॉय टॉम्सन या बड्या उद्योगपतीला १९६७ मध्ये विकावे लागले. ब्रिटिश वृत्तपत्रसृष्टीत लॉर्ड बीव्हरब्रुक (१८७९-१९६४), लॉर्ड नॉर्थक्लिफ (१८६५-१९२२), रॉदर मीअर केम्सले व रॉय टॉम्सन (१८९४-१९७६) ह्या व्यक्ती अनेक साखळी वृत्तपत्रांचे मालक या नात्याने फार प्रभावशाली ठरल्या. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वृत्तपत्रांचा खप वाढविण्यासाठी त्यांच्या चालकांनी अनेक क्लृप्त्या अंमलात आणल्या. वाचकांना व त्यांच्या कुटुंबांना विम्याची पॉलिसी मोफत द्यावयाची, पुस्तकांपासून ते कपडेधुलाई यंत्रापर्यंत अनेक तऱ्हेच्या वस्तू त्यांना भेटीदाखल द्यावयाच्या, अशा प्रथा सुरु झाल्या. शब्दकोड्यांसारख्या स्पर्धाही सुरु करण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वृत्तपत्रांच्या खपावर नियंत्रणे आली व त्यामुळे खप वाढविण्याचे हे खटाटोपही बंद झाले. १९५० नंतर ते पुन्हा सुरु झाले व वाचकांना शर्यतीचे घोडे प्रलोभन म्हणून देण्यापर्यंत काही वृत्तपत्रांची मजल गेली. १८४९ साली ब्रिटनमध्ये पहिली वृत्तवितरण संस्था सुरु झाली.⇨पॉल ज्युलिअस रॉयटर (१८१६९९) याने सुरु केलेली ‘रॉयटर’ ही सध्या ब्रिटनमधील प्रमुख वृत्तसंस्था मानली जाते.

अमेरिका : अमेरिकेत पहिला छापखाना १६३८ मध्ये केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे सुरु झाला. बेंजामिन हॅरिस या लंडनमधील प्रकाशक व पुस्तकविक्रेत्याने पब्लिक ऑकरन्सेस बोथ फॉरिन अँड डोमेस्टिक हे पहिले अमेरिकन वृत्तपत्र २५ डिसेंबर १६९० रोजी चालू केले परंतु सरकारी अवकृपेमुळे ते लगोलग बंद पडले. यावेळी अमेरिका ही ब्रिटनची वसाहत होती व मुद्रणस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य यांना कायदेशीर रीत्या आधार नव्हता. छापखाने काढण्यासाठी इंग्लंडच्या राजाकडून परवाना काढावा लागत असे.

बॉस्टन येथे तेथील पोस्टमास्तर जॉन कँबेल (१६५३-१७२८) याने बॉस्टन न्यूज लेटर या नावाचे वृत्तपत्र १७०४ च्या एप्रिलमध्ये सुरु केले १७२२ पर्यंत ते चालू होते. १७१९ साली त्याच शहरात बॉस्टन गॅझेट हे दुसरे वृत्तपत्र निघाले. ह्या वृत्तपत्रांतून लंडनच्या वृत्तपत्रांचे जवळजवळ पुनर्मुद्रण होत असे. त्यांची एकूण चार पाने असून ती बातम्यांनी भरलेली असत. चालू घडामोडींची नोंद, एवढेच त्या बातम्यांचे स्वरुप असे. संपादकीय टीका अधूनमधून प्रसिद्ध होई. या वृत्तपत्रांनी नवनव्या लोकांना वृत्तपत्रप्रकाशनाची प्रेरणा दिली, एवढेच त्यांचे महत्त्व. त्यांना वर्गणी म्हणून वेळप्रसंगी गहू, लोणी, लाकडे इ. वस्तूही स्वीकाराव्या लागत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अमेरिकेतील वृत्तपत्रांचे स्वरुप पालटले. तेथे वेगवेगळे राजकीय पक्ष स्थापन झाले व त्यांचे पुढारी वृत्तपत्रांच्या संपादनात लक्ष घालू लागले. द गॅझेट ऑफ द युनायटेड स्टेट्स (१७८९) हे फेडरल पक्षाचे वृत्तपत्र होते व त्यावर त्याचे पुढारी ⇨अलेक्झांडर हॅमिल्टन (१७५५१८०४) यांचे प्रभुत्व असे. याउलट द नॅशनल गॅझेट (१७९१) हे वृत्तपत्र तेव्हाच्या रिपब्लिकन (आताच्या डेमॉक्रॅटिक) पक्षाचे अध्वर्यू ⇨टॉमस जेफर्सन (१७४३१८२६) यांच्या नियंत्रणाखाली असे. ह्या पक्षनिष्ठेपायी वृत्तपत्रे पक्षपाती बनली आणि विरोधकांवर कडक व प्रसंगी निंदाप्रचुर टीका करु लागली. त्यांत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुनिष्ठ राहिल्या नाहीत व अनेकदा त्या विकृत स्वरुपात प्रसिद्ध होऊ लागल्या. वृत्तपत्रांतील ही भाऊबंदकी कमी करण्याचे आवाहन एकदा जॉर्ज वॉशिंग्टनलाही करावे लागले होते. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी वृत्तपत्रांची ही पक्षनिष्ठा पराकोटीला पोहोचली परंतु नंतर ती कमी होत जाऊन शतकाच्या मध्याला ही अपप्रवृत्ती जवळजवळ नष्ट झाली.

अमेरिकेतील नियतकालिके प्रारंभी मासिकांच्या वा साप्ताहिकांच्या स्वरुपात निघत. पुढे द्विसाप्ताहिके, त्रिसाप्ताहिके अशा क्रमाने त्यांचे दैनिकांत रुपांतर होत गेले. पेनसिल्व्हेनिया पॅकेट (द जनरल ॲड्व्हर्टायझर) हे अमेरिकेतील सुरुवातीचे दैनिक १७८४ च्या सप्टेंबरमध्ये जॉन डनलॅप व डेव्हिड सी. क्लेपूल यांनी सुरु केले. न्यूयॉर्क डेली ॲड्व्हर्टायझर हे न्यूयॉर्कमधले दैनिकरूपात सुरु झालेले (१ मार्च १७८५) पहिले वृत्तपत्र होय. तत्पूर्वी त्या शहरात १७२५ साली न्यूयॉर्क गॅझेट हे सरकारी वृत्तपत्र सुरु झाले होते. विल्यम कोलमन याने द न्यूयॉर्क इव्हिनिंग पोस्ट हे दैनिक वृत्तपत्र १८०१ च्या नोव्हेंबरमध्ये सुरु केले, ते अद्यापही त्याच नावाने चालू आहे. पूर्वीच्या काळी या दैनिकांतून बातम्यांपेक्षा जाहिरातीच जास्त असत. १७६४ च्या ऑक्टोबरमध्ये सुरु झालेल्या द कनेक्टिकट कोरंट या साप्ताहिकाचे पुढे हार्टफर्ड कोरंट या दैनिकांत रुपांतर झाले, ते अजूनही प्रसिद्ध होते. सध्या अस्तित्वात असलेले ते जुन्यात जुने वृत्तपत्र होय.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीनंतर लवकरच अमेरिकेत ‘पेनी प्रेस’चा प्रारंभ झाला. ‘पेनी प्रेस’ची वृत्तपत्रे लहान आकाराची असत व ती एका सेंटला विकली जात, त्यांत स्थानिक तसेच आकर्षक व रंजक स्वरुपाच्या मजकुराला प्राधान्य दिले जाई. न्यूयॉर्क सन (१८३३) हे पहिले ‘पेनी’ दैनिक एच्. डी. बेंजामिन याने सुरु केले. त्यानंतरचे न्यूयॉर्क हेरल्ड (१८३५) जेम्स गॉर्डन बेनेट याने सुरु केले. १८७८ साली ⇨जोसेफ पुलिट्झरने (१८४७१९११) सेंट लूइस पोस्ट, सेंट लूइस डिस्पॅच आणि न्यूयॉर्क वर्ल्ड ही दैनिक वृत्तपत्रे सुरू केली. पुढे सेंट लूइस पोस्ट व सेंट लूइस डिस्पॅच ह्यांचे एकत्रीकरण करुन पोस्ट-डिस्पॅच हे नवेच वृत्तपत्र सुरु केले. पोस्ट-डिस्पॅच व न्यूयॉर्क वर्ल्ड ह्या वृत्तपत्रांना अफाट लोकप्रियता लाभली. त्यातून अमेरिकेच्या वृत्तपत्रसृष्टीत आधुनिक युगाची नांदी झाली. जॉन डिलन याच्या न्यूयॉर्क पोस्टनेही या उपक्रमाला साहाय्य केले. पुढे विल्यम रँडॉल्फ हर्स्ट (१८६३-१९५१) या क्षेत्रात उतरला आणि त्याचे न्यूयॉर्क जर्नल (१८९५) व पुलिट्झरचे न्यूयॉर्क वर्ल्ड यांच्यात चढाओढ सुरु झाली. या स्पर्धेतून वृत्तपत्रसृष्टीत खळबळजनक, सनसनाटी, आग्रही प्रचार आणि रविवार अंकातील विनोदी व्यंगचित्रे इ. बरेवाईट उपक्रम सुरु झाले. या अंकातील चित्रपट्टी-मालिकांत मुलाच्या अंगात पिवळा गाऊन असे त्याच्यावरुन वृत्तपत्रजगतात ‘यलो जर्‌नॅलिझम’ (पीत पत्रकारिता) हा शब्दप्रयोग रुढ झाला. मोठमोठ्या टंकांतली धक्कादायक भयावह शीर्षके, चित्रांचे वैपुल्य, सनसनाटी मजकूर, जनतेला आवडणाऱ्या गोष्टींचा भडक प्रचार, विनोदी व्यंगचित्रमालिका ही तत्कालीन पीत पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये होत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस हा प्रकार संपुष्टात आला व अमेरिकेत न्यूयॉर्क टाइम्ससारखी गंभीर प्रकृतीची वृत्तपत्रे लोकप्रिय होऊ लागली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये लॉर्ड नॉर्थक्लिफ याने लंडन डेली मिररसारख्या अर्ध्या पानाच्या आकाराच्या छोट्या वृत्तपत्रांचा (टॅब्‌लॉइड जर्‌नॅलिझम) उपक्रम सुरु करुन पाहिला व तो काहीसा यशस्वीही झाला. त्याचे यशस्वी अनुकरण न्यूयॉर्कमध्ये डेली न्यूजसारख्या वृत्तपत्रांद्वारा करण्यात आले. अलीकडे मोठ्या शहरांच्या उपनगरांसाठी व लहान शहरांतील ठराविक लोकवस्त्यांसाठी ही नियतकालिके चालविली जात आहेत.

निग्रो लोकांसाठी फ्रिडम्स जर्नल हे पहिले वृत्तपत्र न्यूयॉर्क येथे १८२७ साली सॅम्युअल कॉर्निश व जॉन बी. रस्‌वर्म यांनी सुरु केले. १९४० मध्ये सु. २०० प्रकाशने दीड लाख निग्रोंपर्यंत पोहोचत होती. निग्रो वृत्तपत्रांची संख्या व खप वाढतच राहिलेला दिसतो. ह्यांशिवाय जर्मन, चिनी इ. भाषांतून प्रसिद्ध होणारी सु. ७६ दैनिके अमेरिकेत आहेत. अमेरिकेत वृत्तपत्रांच्या मोठमोठ्या साखळ्या आहेत. १८७८ साली ‘स्क्रिप्स’ गटाच्या वृत्तपत्रांची पहिली साखळी निर्माण झाली. १९२० साली वृत्तपत्र-साखळ्यांची संख्या पन्नास होती. १९५० सालीही तोच आकडा कायम होता. अशा साखळ्यांकडे एकूण तीनशे वृत्तपत्रांची मालकी होती. ‘हर्स्ट’ व ‘स्क्रिप्स’ या सर्वांत मोठ्या वृत्तपत्र-साखळ्या होत. चालू जमान्यात वृत्तपत्रे चालविण्यासाठी मोठे भांडवल लागते. वृत्तपत्रांचे गट किंवा साखळ्या यांमुळे ते उपलब्ध होते. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांची मारक स्पर्धा संपविण्यासाठीही त्यांना एका साखळीत अडकविण्याचे तंत्र उपयुक्त ठरते.

फ्रान्स : फ्रेंच भाषिक वृत्तपत्रे ही सुरुवातीपासूनच त्यांच्या वाङ्‌मयीन दर्जासाठी विशेषत्वाने प्रसिद्ध होती. कला, साहित्य, राजकारण यांना त्यांत प्राधान्य होते व ती या क्षेत्रांतील कोणत्या ना कोणत्या गटाशी निगडीत असत. कित्येकदा वृत्तपत्रांना या गटांचा आर्थिक आश्रयही लाभत असे. १६३१ च्या मे महिन्यात गाझेत दी फ्रान्स हे साप्ताहिक कार्डिनल रीशल्य यांच्या आश्रयाखाली सुरु झाले. त्याचा पहिला संपादक व मुद्रक तेऑफ्रास्त रनोदो (सु. १५८६-१६५३) हा होता. फ्रान्समधील वृत्तपत्रसंस्थेचा प्रारंभही तेव्हापासूनच झाला. या साप्ताहिकाकडे तेरावा लूई आस्थेने लक्ष पुरवीत असे. नेपोलीयनच्या कारकीर्दीत Gazette nationale, Ou le moniteur universal हे वृत्तपत्र (१७८९) सुरु झाले. मॉनित्यूर हे फ्रान्सच्या विधिमंडळातील बहुमतवादी पक्षाचे पुरस्कर्ते वृत्तपत्र होते, तर याउलट मर्क्यूर दी फ्रान्स (१७२८) हे अल्पमतवाद्यांचे पाठीराखे होते. मौज ही, की दोन्ही वृत्तपत्रांची मालकी एकाच व्यक्तीकडे होती.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर (१७८९) फ्रेंच वृत्तपत्रांचा दर्जा काहीसा खालावला. कारण खप व जाहिराती यांकडे ही वृत्तपत्रे अधिक लक्ष देऊ लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास (१६ जुलै १८५०) फ्रेंच असेंब्लीने वृत्तपत्रांच्या जामीनक्यांचा कायदा (Loi Tinguy) जारी केला. त्यातूनच पुढे वृत्तपत्रांतून लेखकाने स्वतःच्या सहीने लेख लिहिण्याचा प्रघात सुरु झाला व फ्रेंच वृत्तपत्रांचे ते वैशिष्ट्य बनले. पॅरिसमधील वृत्तपत्रांच्या मानाने प्रांतिक वृत्तपत्रे अधिक स्वतंत्र व वजनदार असत. पहिल्या महायुद्धकाळात वृत्तपत्रांवरील नियंत्रण कडक होते. दुसऱ्या   महायुद्धात जर्मन सेनेने जून १९४० मध्ये पॅरिसचा ताबा घेतल्यानंतर तेथील वृत्तपत्रांची संख्या घटली. जर्मन सेनेविरुद्ध जी भूमिगत आंदोलने चालू होती, त्यांच्या पुरस्काराने अनेक वृत्तपत्रे निघत व ती वेळोवेळी जर्मन सत्ताधाऱ्यांच्या रोषाला बळीही पडत. दुसरे महायुद्ध संपल्यावर, फ्रान्समधल्या वृत्तपत्रांना पुन्हा चांगले दिवस आले. १९६० च्या दशकात त्या देशात १२३ दैनिके होती व त्यांचा एकूण खप सु. १,१५,००,००० होता. १९७५ मध्ये पॅरिस येथे प्रकाशित होणाऱ्या दैनिकांची संख्या सु. १५ होती. त्यांत सर्वाधिक खप फ्रान्स-सॉईर या दैनिकाचा (७,२७,०००) होता. महायुद्धोत्तर काळात प्रांतिक वृत्तपत्रांनीही खूप प्रगती केली आहे. शंभराहून अधिक प्रांतिक दैनिके प्रकाशित होत असून त्यांचा एकत्रित खप सु. १३६ लक्षांहून जास्त होता (१९९५).

फ्रान्समधील वृत्तपत्रे तेथील राजकारणावर चांगला प्रभाव पाडतात. प्रत्येक लहान-मोठ्या राजकीय गटाचे स्वतःचे वृत्तपत्र असते. साहित्याच्या दृष्टीनेही फ्रेंच वृत्तपत्रांचा दर्जा उच्च प्रतीचा आहे. वृत्तपत्रांतून लेखन करुन अनेक लेखक फ्रान्समध्ये नावारुपाला आले आहेत.

दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर १९४० साली फ्रेंच स्वातंत्र्यवाद्यांनी लंडनमध्ये स्वतंत्र फ्रेंच वृत्तवितरण संस्था स्थापन केली, आता तीच ‘Agence France-Presse’ या नावाने चालू आहे. जगात तिच्या पन्नासहून अधिक कचेऱ्या आहेत.

जर्मनी : जगातले पहिले नियमित स्वरुपातील वृत्तपत्र प्रसिद्ध करण्याचा मान जर्मनीकडे जातो.अविसा रिलेशन ओडर झायटुंग हे आऊग्जबुर्ग येथे १६०९ मध्ये प्रकाशित झाल्याचे उल्लेख सापडतात. तत्पूर्वी समाजातील वरिष्ठ वर्गात हस्तलिखित बातमीपत्रे लोकप्रिय असत. फ्रान्समधील राज्यक्रांतीनंतर जर्मन वृत्तपत्रांचे महत्त्व व संख्याही वाढली. सतराव्या शतकात जर्मनीतील सर्व प्रमुख शहरांत वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली होती.

बिस्मार्कच्या (१८१५-९८) काळात गृहमंत्रालयामार्फत वृत्तपत्रांवर प्रभाव पाडला जाई. त्यासाठी सरकारी धोरणांचा पुरस्कार करणारे लेख त्यांना पुरविले जात. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत वृत्तपत्रसृष्टीत सरकारी हस्तक्षेप चालू होता परंतु त्याचे मार्ग अधिक सूक्ष्म झाले होते.

पहिल्या महायुद्धांनंतर (१९१९) वायमार प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार वृत्तपत्रांना खूप स्वातंत्र्य दिले गेले. युद्धोत्तर काळात सुरुवातीला निरनिराळ्या राजकीय, सामाजिक व धार्मिक मतप्रणालींचे प्रतिनिधित्व करणारी वृत्तपत्रे निघाली, नंतर मोठ्या खपाची दैनिके सुरु झाली. हिटलरने सत्ता काबीज केल्यावर (१९३३) प्रथम निरनिराळ्या वृत्तपत्रांवर ताबा मिळविला. त्याने वृत्तपत्रांचे नाझीकरण केले व ज्यांचे नाझीकरण करता येत नव्हते, ती बंद केली. Volkischer Beobachter हे हिटलरचे व्यक्तिगत पत्र व नाझीपक्षाचे मुखपत्र बनले. त्याच्या अमदानीत वृत्तपत्रांना निमसरकारी माहितीपत्रांचे स्वरुप प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका, सोव्हिएत युनियन, ब्रिटन व फ्रान्स या चार देशांनी जर्मनीचा ताबा घेतला व आपापल्या विभागांत वृत्तपत्रे सुरु करण्याला परवाने दिले. जर्मन फेडरल रिपब्लिकची (पश्चिम जर्मनी) १९४९ च्या सप्टेंबर महिन्यात स्थापना झाल्यानंतर ही परवाना पद्धत रद्द झाली. त्यामुळे नवी वृत्तपत्रे निघाली व काही जुनी पुनरुज्जीवित झाली. १९५० साली पश्चिम जर्मनीत व पश्चिम बर्लिनमध्ये एकूण १,२७६ दैनिके होती व त्यांचा खप सोळा कोटी होता. पश्चिम जर्मनीत १९७३ मध्ये ४३२ दैनिके व ६३ साप्ताहिके (रविवार आवृ.) असून, त्यांचा एकूण खप सरासरी २१० लक्षांच्यावर होता. देशातील ‘ॲक्सेल स्प्रिंगर समूह’ हा सर्वांत मोठा वृत्तपत्रसमूह गणला जातो. प्रमुख राजकीय पक्षांची स्वतःची वृत्तपत्रे आहेत. बिल्ड-झायटुंग हे सर्वाधिक राष्ट्रीय खप (१९७५ मध्ये ४८ लक्ष) असलेले दैनिक वृत्तपत्र होते. मध्यवर्ती वृत्तसंस्था वेळोवेळी खास लेख पुरवितात व ते जर्मन वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. साहित्य, कला, संगीत, नाटके इ. विषयांचा परामर्श जर्मन वृत्तपत्रे आस्थेने घेतात. ‘नॅशनल न्यूज एजन्सी ड्यूशे’ ही पश्चिम जर्मनीची वृत्तवितरण संस्था १९४९ साली सुरु झाली.

जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) १९४९ च्या ऑक्टोबर महिन्यात निर्माण झाले व सोशॅलिस्ट यूनिटी पक्षाची कम्युनिस्ट राजवट सुरु झाली. पूर्व जर्मनीत १९७५ मध्ये सु. ४० दैनिक वृत्तपत्रे होती. त्यांत न्यूज ड्यूशलँड (बर्लिन) हे सत्ताधीश पक्षाचे अधिकृत व सर्वाधिक खपाचे प्रमुख वृत्तपत्र होते, तसेच ॲलगेमेईनर ड्यूशर नाक्रिशेंडिन्स्ट ही एकमेव अधिकृत वृत्तसंस्था आहे.

रशिया : रशियातील पहिले वृत्तपत्र Viedomosti मॉस्को येथे १७०२ मध्ये सुरु झाले. पीटर द ग्रेट याच्या हुकुमावरुन, स्वीडनबरोबरच्या युद्धातील ताज्या घडामोडी लोकांना कळाव्यात, म्हणून ते सुरु करण्यात आले. एकोणिसाव्या शतकात रशियातील वृत्तपत्रांची वाढ होत जाऊन ती जहाल मताची व व्यक्तिवादी बनली. झारच्या राजवटीला हे सहन झाले नाही व तिने त्यावर जाचक निर्बंध लादले.

कोलोकोल (म. शी. ‘घंटा’) हे पहिले क्रांतिवादी रशियन मासिक १८५७ मध्ये लंडन येथे सुरु झाले सध्याच्या सोव्हिएट वृत्तपत्रांचे ते पूर्वसूरी म्हणता येईल. १९०५ साली लेनिनच्या नेतृत्वाखाली Novaya Zhizn (म. शी. ‘नवजीवन’) हे पहिले बोल्शेव्हिक वृत्तपत्र सुरु झाले. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर प्रावदा (म. शी. ‘सत्य’) हे कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र सुरु झाले. प्रावदा देशातील ४४ शहरांत छापण्यात येते. इझव्हेस्तिया (म. शी. ‘वार्ता’) हे शासनसंस्थेचे मुखपत्र असून ‘कॉम्‌सोमोल’ या युवक संघटनचे कॉम्‌सो‌मोल स्काय प्रावदा हे मुखपत्र आहे तर ट्रेड हे कामगार संघटनांचे मुखपत्र आहे. देशाच्या राजधानीत कम्युनिस्ट पक्ष व शासनसंस्था यांची दोन दैनिके आहेत. प्रांतोप्रांतीही अशाच प्रकारची व्यवस्था आढळते.

रशियातील मुख्य वृत्तसंस्था ‘टेलिग्राफ एजन्सी ऑफ द सोव्हिएट युनियन’ (टास) ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत येते. राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांखेरीज प्रांतिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रे देशात प्रकाशित होतात. देशात ५५ देशी व १० परदेशी अशा एकूण ६५ भाषांतून सु. ८,१०० वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असून, त्यांपैकी दैनिकांची संख्या ६४० होती (१९८५). व्यावसायिक पत्रकारांची देशांत संघटना असून ती कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याची सोय वृत्तपत्रविद्येच्या स्वतंत्र संस्थांतून तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या खास प्रशिक्षण केंद्रांतून उपलब्ध आहे. संपादकीय पदांवरच्या नेमणुका सामान्यतः कम्युनिस्ट पक्षसंघटनेमार्फतच केल्या जातात. थोडक्यात, रशियन वृत्तपत्रे ही शासनाच्या नियंत्रणाखालीच चालविली जातात. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा एक प्रमुख अवयव, असेच रशियातील वृत्तपत्रांचे वर्णन करता येईल.

चीन : मुद्रित स्वरुपातले पहिले वृत्तपत्र ती चौ (द पीकिंग गॅझेट) हे चीनमध्ये थांग राजवटीत (सु. ६१८) सुरु झाले. ते केंद्रीय सत्तेच्या राजपत्राच्या स्वरुपात होते. पुढे प्रांतोप्रांती हा उपक्रम राबवला गेला. १८९५ च्या चीन-जपान युद्धानंतर जहाल मतप्रणालीची वृत्तपत्रे निघाली व ती १९११ च्या क्रांतीला उपकारक ठरली. १९११ नंतर वृत्तपत्रांची संख्या बरीच वाढली परंतु लवकरच त्यांच्यावर कडक नियंत्रणे घालण्यात आली. चीनचे जे भाग परदेशाच्या ताब्यात होते, तेथे परकीय भाषांतून वृत्तपत्रे चालत. १९४९ च्या कम्युनिस्ट क्रांतीपूर्वी चीनमध्ये अठराशे नियतकालिके प्रसिध्द होत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक दैनिके होती. कम्युनिस्ट क्रांतीनंतर तेथील वृत्तसंस्था सोव्हिएट युनियनमधील नमुन्याबरहुकूम पुनर्घटित करण्यात आली. रेनमिन रिबाओ (पीपल्स डेली) हे तेथील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाचे दैनिक मुखपत्र आहे. चीनमध्ये महत्त्वाची व मोठ्या खपाची सहा वृत्तपत्रे असून, त्यांत पीकिंग येथील क्वांगमिंग रिबाओ (क्वांगमिंग डेली), लिबरेशन आर्मी डेली, पीकिंग डेली तसेच शांघाय येथील लिबरेशन डेली इ. वृत्तपत्रांचा अंतर्भाव होतो (१९७१). ‘न्यू चायना न्यूज एजन्सी’ (नवचीन वृत्तसंस्था) व ‘चायना न्यूज सर्व्हिस’ या प्रमुख वृत्तसंस्था आहेत.

जपान : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जपानमध्ये काष्ठठशाच्या साहाय्याने योमिउरी नावाची लहान लहान वार्तापत्रे प्रसिद्ध करीत. ही वार्तापत्रे फिरते विक्रेते बातम्या ओरडून सांगून विकत असत. हाच तेथील वृत्तपत्रसृष्टीचा आरंभ होय. नागासाकी येथून प्रसिद्ध होत असलेले शिपिंग लिस्ट अँड ॲड्व्हर्टायझर (१८६१) हे इंग्रजी भाषिक वृत्तपत्र हे जपानचे पहिले वृत्तपत्र म्हणता येईल. अल्पावधीतच त्याचे स्थलांतर योकोहामा येथे झाले व ते जपान हेरल्ड या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. मात्र जपानच्या वृत्तपत्र व्यवसायाला खरी सुरुवात मेजी राजवटीच्या प्रारंभी १८६८ साली झाली. त्यावर्षी टोकियो, ओसाका, क्योटो, योकोहामा व इतर शहरांत मिळून सोळा वृत्तपत्रे निघाली. पुढे टोकियो निची-निची व ओसाका मैनिची या दोन दैनिकांनी त्या व्यवसायाला उर्जितावस्था आणली. टोकियो निची-निची हे १८७२ पासून निघू लागले. जेनिचिरो फुकुची हा प्रख्यात नाटककार व शिक्षणतज्ञ त्याचा संपादक होता. हिकोइची मोतोयामा हा ओसाका मैनिची या वृत्तपत्राचा मालक होता. सुरुवातीला हे वृत्तपत्र ओसाका निप्पो या नावाने १८७६ मध्ये सुरु झाले पण १८८८ मध्ये मोतोयामाने त्याचे नामकरण ओसाका मैनिची असे केले. ह्या दोन वृत्तपत्रांनी जपानी वृत्तसृष्टीत नवा इतिहास घडवला.

जपानमध्ये १९३७ साली बाराशे दैनिके व सहाशे साप्ताहिके निघत होती. १९४२ साली सरकारी सूचनेवरुन त्यांचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाले व दैनिकांची संख्या त्रेपन्नावर आली. देश अमेरिकेच्या ताब्यात असताना १९४८ पर्यंत तेथे वृत्तनियंत्रण होते. १९७० नंतर जपानमध्ये वृत्तपत्रांवरील शासकीय नियंत्रणे पूर्णपणे उठवण्यात आली व जगातील सर्वांत मुक्त, अनिर्बंध स्वातंत्र्य असलेली, सर्वांत स्पष्टवक्ती वृत्तपत्रे असा त्यांचा लौकिक पसरला. सर्वाधिक मोठ्या खपाची राष्ट्रीय पातळीवरची जपानमधील प्रमुख वृत्तपत्रे म्हणजे आशाई शिम्बुन (६५ लक्ष), मैनिची शिम्बुन (४९ लक्ष), योमिउरी शिम्बुन (६४ लक्ष) व निहोन कैझेई शिम्बुन (१५ लक्ष) ही होत (१९७५). जपानमधील सु. १५० दैनिकांचा खप सु. ५० दशलक्ष प्रती इतका आहे. प्रत्येक जपानी कुटुंबात साधारणपणे दोन वृत्तपत्रे विकत घेतली जातात. जपानी वृत्तपत्रांवर अमेरिकन वृत्तपत्रांची बरीच छाप आहे. वृत्तसंपादन, छायाचित्रे इ. अनेक बाबतींत ती अमेरिकन वृत्तपत्रांचे अनुकरण करतात. अद्ययावत यंत्रसामग्रीही त्यांना उपलब्ध असते.

‘क्योडो तत्सुशिन शा’ ही १९६० च्या दशकाच्या प्रारंभी जपानी प्रमुख वृत्तवितरणसंस्था होती. त्यापूर्वी ‘डोमै’ (स्थापना १९३६) ही शासकीय अनुदानप्राप्त जुनी वृत्तसंस्था कार्यरत होती.

भारतातील इंग्रजी वृत्तपत्रे :भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत. त्यांचे चालकत्वही बव्हंशी कंपनीच्या असंतुष्ट कर्मचारीवर्गाकडेच असे.

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनी सरकारशी संघर्ष सुरु झाल्यावर त्याने वृत्तपत्रस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व अशा तऱ्हेचे स्वातंत्र्य समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असेही म्हटले. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली. तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.

नोव्हेंबर १७८० मध्ये बी. मेसिन्क व पीटर रीड यांनी इंडिया गॅझेट, (कलकत्ता ॲड्‌व्हर्टायझर) हे साप्ताहिक सुरु केले. हे पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार-व्यवहारांशी मुख्यत्वे निगडित होते व ते पुढे जवळपास पन्नास वर्षे चालले. त्याच्या प्रकाशनानंतर चार वर्षांनी कलकत्ता गॅझेट प्रत्यक्षपणे   सरकारी आश्रयाखाली फेब्रुवारी १७८४ मध्ये सुरु झाले. हेच पत्र पुढे सरकारी राजपत्र (गॅझेट) म्हणून चालू राहिले. बेंगॉल जर्नल हे साप्ताहिक फेब्रुवारी १७८५ मध्ये सुरु झाले. त्यानंतर एप्रिल १७८५ मध्ये ओरिएंटल मॅगझिन किंवा कलकत्ता अम्यूझमेंट हे मासिक चालू झाले. १७८६ मध्ये कलकत्ता क्रॉनिकल अवतरले. या सुमारास कलकत्ता येथून चार साप्ताहिके व एक मासिक प्रकाशित होत होते.

मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी जाहिरातींना कायदेशीरपणाचा दर्जा खास हुकुमाने देण्यात आला होता. १७९१ मध्ये मद्रास कुरिअरचा संपादक बॉईड याने हुर्कारु हे वृत्तपत्र काढले पण ते अल्पजीवी ठरले. १७९५ मध्ये आर्. विल्यमने मद्रास गॅझेट सुरु केले व नंतर अवघ्या एका महिन्याने हंफ्री नावाच्या गृहस्थाने इंडिया हेरल्डच्या प्रकाशनाला अधिकृतपणे सुरुवात केली. या अपराधाबद्दल सरकारने त्याची इंग्लंडकडे रवानगी केली परंतु बोटीवरुन तो निसटून गेला.

मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते. १७९२ साली बाँबे कुरिअरचा जन्म झाला. त्यात देशी भाषांतून जाहिराती प्रसिद्ध होत. मोडी लिपीतही काही जाहिराती प्रकाशित झाल्या.

मद्रास व मुंबई येथील ही वृत्तपत्रे सरकारी आश्रयाखाली असल्याने त्यांचा अधिकाऱ्यांशी संघर्ष झाला नाही. मात्र बंगालमध्ये परिस्थिती निराळी होती. १७९१ मध्ये विल्यम ड्‌वेन याने डिमकीन्कासन याच्या भागीदारीत बेंगॉल जर्नलची मालकी मिळविली. मराठ्यांबरोबरच्या लढाईच्या काही वार्ता प्रसिद्ध केल्याबद्दल त्याच्यावर सरकारचा रोष झाला व त्याला हद्दपार करण्याचेही ठरले. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही व ड्‌वेन याने स्वतःचे इंडियन वर्ल्ड हे वृत्तपत्र सुरु केले. त्या पत्रातील मजकुराबद्दल ड्‌वेनवर राज्यकर्त्यांची इतराजी झाली व त्याला इंग्लंडला धाडण्यात आले. भारतातील त्याच्या तीस हजार रुपयांच्या मिळकतीबद्दल त्याला भरपाईदेखील मिळाली नाही. १७९८ मध्ये डॉ. चार्ल्‌स मॅक्लीन याने बेंगॉल हुर्कारु सुरु केले परंतु प्रारंभापासूनच मॅक्लीनच्या सरकारशी कटकटी सुरु झाल्या व त्याचे पर्यवसान त्याच्या हद्दपारीत झाले.

हिंदुस्थानातील प्रारंभीची वृत्तपत्रे ईस्ट इंडिया कंपनीच्या असंतुष्ट नोकरांनी सुरु केली. त्यांत वैयक्तिक हेवेदावे व भानगडी यांच्यावरच भर दिला जाई. देशातील यूरोपीय समाज डोळ्यासमोर ठेवून ती चालविली जात. त्यांचा खप अगदी मर्यादित असे. वृत्तपत्रांसाठी खास कायदे नसले, तरी त्यांच्यावर अनेकदा राज्यकर्त्यांची अवकृपा होई व प्रकाशनपूर्व नियंत्रणेही लादली जात.

भारतातील वृत्तपत्रांच्या भरभराटीला पोषक ठरलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे,⇨सर चार्ल्स मेटकाफ  या हंगामी गव्हर्नर जनरलने (कार. १८३४-३५) भारतात वृत्तपत्रांना बहाल केलेले स्वातंत्र्य होय. त्या आधीच्या हंगामी गव्हर्नर जनरल ⇨जॉन ॲडम (कार. जानेवारी ते ऑगस्ट १८२३) याने कडक नियम करुन वर्तमानपत्रांच्या प्रकाशनावर नियंत्रणे लादली होती. ह्याचे कारण, कलकत्ता जर्नलचा संपादक जेम्स सिल्क बकिंगहॅम हा सरकारी कारभारावर टीका करीत असे. पुढे मेटकाफने आपल्या कारकीर्दीत १८३५ मध्ये वर्तमानपत्रांवरील हे निर्बंध रद्द करुन त्यांना स्वातंत्र्य देऊ केले. भारतातील वृत्तपत्रांच्या वाढीस व प्रसारास ह्यातूनच चालना मिळाली. जेम्स सिल्क बकिंगहॅम याने कलकत्ता जर्नल हे आपले वृत्तपत्र निर्भयपणे व व्यापक दृष्टीने चालवले. वृत्तपत्रावरील सरकारी बंधनांना त्याचा सक्त विरोध होता. हिंदी लोकांविषयी त्याला आपुलकी वाटे. राजा राममोहन रॉय व बकिंगहॅम यांचा गाढ स्नेह हे त्याचेच द्योतक आहे. त्याचा स्वतंत्र बाणा कंपनी सरकारला मानवला नाही व १८२३ साली त्याची सक्तीने इंग्लंडला रवानगी करण्यात आली.

ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने स्वतःकडे घेतला व भारतातील राजकीय परिस्थितीही बदलू लागली. देशाच्या निरनिराळ्या भागांत भारतीय भाषांतील वृत्तपत्रे निघू लागली व राज्यकारभारावरची त्यांची टीका राज्यकर्त्यांना झोंबू लागली. त्यातूनच त्या वृत्तपत्रांवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्यासाठी १८७८ साली ‘व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट’ जारी झाला. हा कायदा मंजूर करताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी, इंग्रजी  वृत्तपत्रांची प्रशंसा केली. ही प्रशंसा ब्रिटिश मालकीच्या इंग्रजी वृत्तपत्रांना उद्देशून होती, हे उघड आहे. भारतामधील अशा वृत्तपत्रांना ‘अँग्लो इंडियन प्रेस’ अशी संज्ञा प्राप्त झाली.

अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे प्रांतांच्या राजधान्यांतून प्रसिद्ध होत. स्टेट्स्‌मन (कलकत्ता), मद्रास मेल (मद्रास), टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई), पायोनिअर (अलाहाबाद), सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट (लाहोर) इ. त्या काळातील प्रमुख अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे होती. स्टेट्स्‌मन हे वृत्तपत्र रॉबर्ट नाइट याने कलकत्ता (नवी दिल्लीच्या आवृत्तीसह) १८७५ पासून सुरु केले. अलाहाबाद येथे पायोनिअर १८६५ पासून चालू झाले. ह्या वृत्तपत्रांतील काही थोडीच उदारमतवादी व बाकीची बहुतेक कट्टर भारताविरोधी होती. भारतात प्रखर होत चाललेल्या राजकीय आंदोलनांना विरोध करावयाचा व राज्यकर्त्यांची बाजू उचलून धरावयाची, हे त्यांचे अंगीकृत कार्य ती नीटपणे पार पाडीत असत. १९३७ साली प्रांतिक स्वायत्तता अंमलात आल्यावर या वृत्तपत्रांनी आपले धोरण बदलण्यास सुरुवात केली व ती विद्यमान सरकारला पाठिंबा देऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटिश मालकांनी ती देशातील धनिकांना विकून टाकली आणि भारतामधील अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांचा अवतार समाप्त झाला.

भारतात ब्रिटनचा अंमल स्थिरपद झाल्यानंतर भारतीयांच्या मालकीची इंग्रजी वृत्तपत्रे हळुहळू निघू लागली. बंगालमधील बंगाली व अमृतबझार-पत्रिका ही त्यांपैकी अग्रेसर होती. त्यांच्या मागोमाग फॉर्वर्ड, लिबर्टी, ॲड्व्हान्स ही दैनिके त्या प्रांतात निघाली. कलकत्त्याला हिंदुस्थान स्टँडर्ड हे दैनिक सुरु झाले. या प्रकारच्या दैनिकांत मद्रासच्या हिंदूचे स्थान महत्त्वाचे आहे. २० सप्टेंबर १८७८ रोजी हिंदू साप्ताहिक रुपात सुरु झाले. जी. सुब्रह्मण्यम् अय्यर हे त्याचे संस्थापक होत. कालांतराने हिंदूचे कार्यालय मद्रासच्या राजकीय कार्याचे केंद्र बनले. १८८९ पासून हिंदू हे दैनिक रुपात प्रसिद्ध होऊ लागले. त्यावेळी कस्तुरी रंगा  आयंगार हिंदूचे कायदेशीर सल्लागार होते. त्यांनी ते दैनिक १९१२ च्या मार्चमध्ये विकत घेतले व सध्याही त्याची मालकी त्यांच्या कुटुंबाकडे आहे.

मुंबई प्रांतातील इंग्रजी वृत्तपत्रांत बाँबे क्रॉनिकल, ॲडव्होकेट ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल इ. दैनिकांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. बाँबे क्रॉनिकल हे राष्ट्रीय बाण्याचे पहिले इंग्रजी वृत्तपत्र ⇨फिरोजशहा मेहतांनी १९१३ च्या मार्चमध्ये सुरु केले. त्यांचे संपादक म्हणून बी. जी. हॉर्निमन व सय्यद अब्दुल्ला ब्रेलवी यांनी लौकिक संपादला. लक्ष्मण गणेश खरे हे त्याचे सहसंपादक होते. एस्. सदानंद यांनी फ्री प्रेस जर्नल १९२७ साली सुरु केले. पत्रकारितेचे आणि देशभक्तीचे संस्कार लाभलेले एस्. सदानंद यांनी ‘फ्री प्रेस ऑफ इंडिया न्यूज एजन्सी’ ही वृत्तसंस्था १९२७ साली स्थापन केली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीसंबंधीच्या बातम्या विस्तृतपणे व यथार्थ रुपात भारतीयांच्या दृष्टिकोणातून लोकांपुढे आणणे, ही त्या काळाची गरज होती व ती भागविण्यासाठीच या देशी वृत्तसंस्थेचा जन्म झाला. या संस्थेच्या बातम्या प्रसृत करण्यासाठीच सदानंद यांनी पुढे स्वतःचे फ्री प्रेस जर्नल हे दैनिक वृत्तपत्र जर्नल सुरु केले. या इंग्रजी दैनिकाने आम जनतेसाठी वृत्तपत्र चालवण्याचा नवा पायंडा निर्माण केला. दिल्लीतील वृत्तपत्रांत हिंदुस्थान टाइम्स अग्रेसर आहे. स्टेट्स्‌मनही तेथून प्रकाशित होते. हिंदुस्थान टाइम्सचा प्रारंभ शिखांचे (अकाली) मुखपत्र म्हणून १९२३ साली झाला. पुढे त्याची मालकी पंडित ⇨मदनमोहन मालवीय यांच्याकडे आली. त्यांचे संपादक म्हणून सरदार पण्णीकर, जयराम दास दौलतराम, पोथॅन जोसेफ, देवदास गांधी प्रभृतींनी काम केले. आता ते बिर्ला-गटा’ च्या मालकीचे आहे. लीडर हे उत्तर प्रदेशातील एक जुने इंग्रजी वृत्तपत्र मदनमोहन मालवीय यांनी १९०९ च्या ऑक्टोबर महिन्यात सुरु केले. ते देशातील उदार पक्षाच्या धोरणाला पाठिंबा देई. सी. वाय्. चिंतामणी हे त्याचे प्रथितयश संपादक होते. पंडित नेहरुंच्या पुरस्काराने लखनौला नॅशनल हेरल्ड हे पत्र १९३८ च्या ऑगस्टमध्ये चालू झाले. के रामराव हे त्याचे पहिले संपादक होत. त्यांच्यानंतर नॅशनल हेरल्डची संपादकीय सुत्रे १९४६ मध्ये ⇨चलपती राव यांच्याकडे आली. १९४२ च्या आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेरल्डला सरकारी छळ सोसावा लागला व ते काही काळ बंदही राहिले. विवेचक व अभ्यासपूर्ण संपादकीय लेखन हे या पत्राचे वैशिष्ट्य होय. लाहोरचे  ट्रिब्यून १८८१ साली सुरु झाले. सरदार दयालसिंग मजिथिया हे त्याचे संस्थापक होते. त्यांनी त्यासाठी सार्वजनिक न्यास स्थापन केला. कालिनाथ रे यांच्या संपादकत्वाखाली (१९१७-४३) ट्रिब्यूनला स्वतंत्र बाण्याचे दैनिक म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली. नागपूरचा हितवाद १९१३ साली ‘भारत सेवक समाज’ च्या मालकीचा झाला व १९३९ साली त्याचे दैनिकात रुपांतर करण्यात आले. १९१४ नंतर डॉ. ॲनी बेझंट यांनी होमरुल लीगच्या प्रचारासाठी मद्रासला न्यू इंडिया हे दैनिक चालू केले. त्याच्या संपादनात डॉ. सी. पी. रामस्वामी अय्यर, डॉ. ॲरंडेल यांच्यासारखी मातब्बर मंडळी सहभागी होती. त्याच सुमारास मद्रासच्या ‘जस्टीस पक्षा’ ने जस्टिस या नावाचे दैनिक १९१७ साली चालू केले. पुढे त्याचा वारसा लिबरेटरने १९४२ ते १९५३ पर्यंत चालविला. सध्या एकाहून अधिक केंद्रांतून स्टेट्स्‌मन व टाइम्स ऑफ इंडिया ही दैनिके प्रसिद्ध होतात. इंडियन एक्स्प्रेस हे दैनिक सहा ठिकाणांहून प्रकाशित होते.

इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत साप्ताहिकांनी मोठी कामगिरी बजावली आहे. देशातील राजकीय व सामाजिक चळवळींचे पुढारीपण करणारे नामवंत कार्यकर्ते त्यांचे संपादन करीत असत. अशा इंग्रजी साप्ताहिकांत लो. टिळकांचे मराठा, म. गांधींचे यंग इंडिया व हरिजन, लाला लजपतराय यांचे पीपल, राजगोपालाचारींचे नियमितपणे लेखन चालू असलेले स्वराज्य, के. नटराजन्‌ यांचे सोशल रिफॉर्मर, भारत सेवक समाजाचे सर्व्हंट ऑफ इंडिया इत्यादींचा समावेश होतो.

भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे : भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. ‘धार्मिक, नैतिक व राजकीय विषय, देशातील अन्य घटना, देशी व परदेशी वार्ता इ. मजकूर कौमुदीत प्रसिद्ध होईल’, असे तिच्या उद्देशपत्रकांत म्हटले होते व जनतेला हार्दिक पाठिंब्याचे आवाहन केले होते. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक ⇨ राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

संवाद कौमुदीच्या प्रकाशनाने देशी भाषांतील व विशेषतः बंगाली  भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. कलकत्ता जर्नल या नामांकित इंग्रजी पत्राने कौमुदीविषयी प्रशंसापर लेख लिहिला. मात्र एशियाटिक जर्नलसारख्या प्रतिगामी वृत्तपत्राने देशी भाषेतील अशा वृत्तपत्रांच्या उदयाबद्दल नापसंती व्यक्त केली व या घटनेचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील, असेही बजावले.

राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले. त्यातील मजकुराची धाटणी संवाद कौमुदीपेक्षा थोड्या वरच्या दर्जाची असे. परंतु लवकरच १८२२ च्या ‘प्रेस ॲक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले. राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या चालीविरुद्ध वृत्तपत्रांतून जोराची मोहिम चालविली. संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

मुनशी वजीद अली खान यांनी जुब्दत-उल्-अखबार हे फार्सी वृत्तपत्र १८३३ साली दिल्ली येथे सुरु केले. त्याशिवाय आग्रा, मीरत इ. ठिकाणी फार्सी व उर्दू भाषांत वृत्तपत्रे सुरु झाली होती. फर्दुनजी मर्झबान यांनी मुंबईना समाचार हे गुजराती भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र १ जुलै १८२२ रोजी सुरु केले व १८३२ मध्ये त्याचे दैनिकात रुपांतर झाले. अद्यापही ते चालू आहे. १८३२ च्या सुमारास जाम-ए-जमशेद प्रकाशित होऊ लागले. १८३३ साली मद्रास येथे तमिळ व तेलुगू भाषांत दोन वृत्तपत्रे सुरु झाली, त्यांना सरकारी मदत मिळत असे. १८३२ साली मुंबई येथे ⇨बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषांत चालू केले.

भारतीय भाषांतील प्रमुख वृत्तपत्रे : भारतातील असमिया, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, मलयाळम्‌, ओडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ, तेलुगू व उर्दू या भाषांतील प्रमुख वृत्तपत्रांचा आढावा या भागात थोडक्यात घेतला आहे. अखेरीस मराठी वृत्तपत्रांचा आढावा काहीशा विस्ताराने व तपशीलवार घेतलेला आहे.

असमिया : असमिया भाषेत वृत्तपत्रे उशिरा सुरु झाली व त्यांची प्रगतीही मंद गतीनेच झाली. पूर्वी आसाममध्ये प्राथमिक शाळेत असमिया भाषा शिकविली जाई परंतु त्यानंतर होतकरु मुले बंगालीत उच्च शिक्षण घेत. ही गोष्ट तेथील वृत्तपत्रांच्या वाढीस प्रतिकूल ठरली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आसाममध्ये काही साप्ताहिके सुरु झाली. त्यांच्यानंतर थोडी दैनिकेही निघाली. सिबसागर येथून ख्रिस्ती मिशनऱ्यांमार्फत प्रकाशित होणाऱ्या अरुणोदय या मासिकातून वर्तमानकालीन बातम्या प्रसिद्ध होत व त्यांबरोबरच शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक विषयांवरचे लेख प्रकाशित केले जात. त्यात ख्रिस्ती  धर्मप्रसारावर भर असे. आसाम न्यूज हे असमिया भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. प्रसिद्ध असमिया लेखक ⇨हेमचंद्र बरुआ त्याचे संपादक (१८८२-८५) होते. असमिया गद्याचे उत्कृष्ट नमुने ठरावेत असे लेख त्यांनी त्यातून लिहिले. असमिया कवी ⇨चंद्रकुमार आगरवाला यांनी सादिनिया असमिया हे परिपूर्ण साप्ताहिक १९१८ मध्ये प्रकाशित केले. नंतर त्याचे दैनिकात रुपांतर झाले व १९५७ पर्यंत ते चालू राहिले. आसामच्या इतिहासातील खडतर कालखंडात, मुख्यतः स्वातंत्र्य-आंदोलन काळात, आसामी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य या वृत्तपत्राने केले. १९४८ मध्ये नतून असमिया हे दैनिक वृत्तपत्र सुरु झाले व अनेक आपत्तींना व ताणतणावांना तोंड देत १९७० च्या दशकापर्यंत टिकून राहिले. आसाममधील नतून असमियाच्या रविवार आवृत्तीत प्रसिद्ध होणारी पुस्तक-परिक्षणे, विशेष लिख व ललित निबंध यांनी असमिया साहित्यात मोलाची भर जशी घातली, तसेच गद्याच्या विकासालाही हातभार लावला आहे. अत्यंत यशस्वी व प्रचंड खप असलेले वृत्तपत्र म्हणजे दैनिक असम, हे ‘ट्रिब्यून पब्लीकेशन्स’, गौहाती यांच्यातर्फे प्रकाशित होते. असम बाणी हे अत्यंत लोकप्रिय साप्ताहिकही ह्याच प्रकाशनसमूहामार्फत प्रकाशित होते. दोन नियतकालिकांनी वार्ता आणि मते प्रसिद्ध करण्याबरोबरच, अनेक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन असमिया साहित्यातही मोलाची भर घातली आहे. यांखेरीज देक असम (गौहाती), आसोम सेवक (तेझपूर), श्रमिक (दिब्रुगड) व जन्मभूमी (जोरहाट) ही साप्ताहिके विशेष उल्लेखनीय आहेत. तसेच बंगालला लागून असलेल्या सुरमा खोरेभागात जुगवेरी, जनशक्ति, जुगशक्ति व सुरमा ही प्रमुख वृत्तपत्रे प्रसिध्द होतात.

बंगाली : श्रीरामपूर मिशनच्या ⇨विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने प्रथमतः बंगाली भाषेत नियतकालिके काढण्यास प्रारंभ केला. दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले. त्यानंतर २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो. या पत्राचे देशी (नेटिव्ह) संपादक तारकालंकार जयगोपाल हे होते. त्यानंतर पारंपारिक हिंदू धर्माची बाजू मांडणारे समाचार चंद्रिका हे पत्र १८२१ मध्ये सुरु झाले. राजा राममोहन रॉय यांचे पत्र म्हणून ओळखले जाणारे संवाद कौमुदी हे पत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु झाले. भवानीचरण बंदोपाध्याय यांनी ते सुरु केले. योगींद्रमोहन ठाकूर यांनी २८ जानेवारी १८३१ रोज़ी ⇨ईश्वरचंद्र गुप्तयांना संवाद-प्रभाकर नावाचे वृत्तपत्र सुरु करुन दिले व त्यासाठी छापखाना उभारुन दिला. हे पत्र प्रथम साप्ताहिक व नंतर दैनिक झाले. हे बंगालीतील पहिले दैनिक वृत्तपत्र होय. या पत्राने समाजात वैचारिक जागृती घडवून आणून बंगालमध्ये राष्ट्रीय जागृतीचे व सांस्कृतिक प्रबोधनाचे नवे पर्व सुरु केले. राष्ट्रीय जागृती व वैचारिक प्रबोधन घडवून आणण्यात बंगाली वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा आहे. देशापुढील राजकीय व सामाजिक समस्यांची निर्भीडपणे व धडाडीने चर्चा करण्यात बंगालमधील वृत्तपत्रे नेहमीच आघाडीवर राहिली आहेत. इंग्रजी व बंगाली वृत्तपत्रांप्रमाणेच पहिली उर्दू व हिंदी वृत्तपत्रेही बंगालमध्येच सुरु झाली. त्याशिवाय उत्तर प्रदेश, दिल्ली व पंजाब या ठिकाणी वृत्तपत्रे चालू करण्यात बंगाली लोकांचा प्रामुख्याने पुढाकार होता.

इ.स. १८५७ च्या उठावानंतर बंगाली वृत्तपत्राची वाढ जोमाने होत गेली. १८६१ मध्ये नीलदर्पण या नाटकाने बंगालमध्ये बरीच खळबळ माजवली होती. त्यात निळीच्या वसाहतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दुरवस्थेचे चित्र रंगविले आहे. नीलदर्पणच्या प्रकाशकावर खटला होऊन त्याला शिक्षा झाली. या खटल्याचे पडसाद बरेच दिवस बंगाली वृत्तपत्रांत उमटत होते. नीलदर्पणच्या मिहिमेत हिंदू पेट्रिअट आघाडीवर होते. ते १८५३ साली सुरु झाले. १८६१ साली त्याचे चालकत्व पंडित ⇨ईश्वरचंद्र विद्यासागर  यांच्याकडे आले. त्याचे संपादक म्हणून क्रिस्तदास पॉल यांनी लौकिक मिळविला.

पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते. त्यात राजकीय प्रश्नांची सडेतोड चर्चा करण्यात येई. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांतील जनतेच्या अडीअडचणींना त्यात कटाक्षाने वाचा फोडण्यात येई. त्याच वर्षी ग्रामवार्ता प्रकाशिका हे ग्रामीण प्रश्नांवर भर देणारे दुसरे वृत्तपत्रही सुरु झाले.

याचवेळी ⇨ देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिकही चालू होटल (१८४३-१९०२). त्याकामी ⇨केशवचंद्र सेन  हे देवेंद्रनाथांचे सहकारी होते. पुढे त्या दोघांत मतभेद झाले व केशवचंद्रांनी स्वतःचे सुलभ समाचार या नावाने साप्ताहिक सुरु केले (१८७८). याच सुमारास किसारी मोहन गांगुली यांची हलिशहार पत्रिका प्रसिध्द होत असे. महाभारताचे इंग्रजी भाषांतर हे त्याचे वैशिष्टय. अमृत बझार पत्रिका हे प्रसिध्द वृत्तपत्र मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले. १८६९ पासून अमृत बझार पत्रिकेत इंग्रजी मजकूर येऊ लागला. १८७१ च्या ऑक्टोबर महिन्यात पत्रिकेचे कलकत्त्याला स्थलांतर करण्यात आले परंतु छापखान्याच्या अडचणींमुळे काही काळ साप्ताहिक निघू शकले नाही. अडचणींचे निवारण झाल्यावर अमृत बझार पत्रिका १९७२ च्या फेब्रुवारीत द्वैभाषिक साप्ताहिक म्हणूम पुन्हा चालू झाले. या सुमारास अमृत बझार पत्रिकेच्या संपादकीय लेखनाचा चांगला बोलबाला झाला होता. कलकत्ता उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश द्वारकानाथ मित्र यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली व त्यामुळे जनतेत असंतोष माजेल, असा इशारा दिला. मित्र यांना उत्तर देताना शिशिरकुमार घोष यांनी असे उद्‌गार काढले, की ‘लोकांना स्वतःच्या दैन्यावस्थेची जाणीव करुन देऊन त्यांच्यात जागृती व देशाभिमान निर्माण करण्यासाठी पत्रिकेचा जन्म आहे, म्हणून आमची  भाषा खणखणीत व अंतःकरणाचा ठाव घेणारीच असली पाहिजे’. ह्याच सुमारास निघालेले सुलभ समाचार (१८७०) हे वृत्तपत्रही स्वस्त किंमत व सुलभ वृत्तप्रसारणाचे कार्य यांमुळे उल्लेखनीय ठरले.

देशी भाषांतील वृत्तपत्रांचे अधिक चांगल्या रीतीने नियंत्रण करण्यासाठी १८७८ साली ‘व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट’ जारी झाला. सर ॲशली ईडन हे त्यावेळी बंगालचे नायब राज्यपाल होते. त्यांनी शिशिरकुमार घोष यांना बोलावणे पाठविले व त्यांना अनुकूल करुन घेण्याचा प्रयत्न केला. शिशिरकुमार ॲशलीसाहेबांच्या प्रलोभनाला किंवा धमकावणीला बधले नाहीत. त्यांची खंबीर भूमिका पाहून नायब राज्यपाल संतप्त झाले व पत्रिकेला नामोहरम करण्यासाठी त्यांनी तडकाफडकी ‘व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट’ मंजूर करुन घेतला परंतु शिशिरकुमार व त्यांच्या बंधूंनी ॲशलीसाहेबांवरच कुरघोडी केली. नवा कायदा देशी भाषांतील वृत्तपत्रांसाठी होता. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी घोष बंधूंनी अमृत बझार पत्रिका संपूर्णपणे इंग्रजीत प्रकाशित करण्यास प्रारंभ केला व या संकटातून आपली सुटका करुन घेतली.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी कलकत्ता येथून नायक हे एकमेव बंगाली दैनिक प्रकाशित होत असे. ते बेंगॉलचे भावंड शोभले असते. त्याशिवाय त्यावेळी संजीवनी व हितवादी ही दोन बंगाली साप्ताहिके चालू होती. त्यांपैकी हितवादी या साप्ताहिकातून रवींद्रनाथ टागोरांच्या कथा दर आठवडयाला प्रकाशित होत. १९१४ साली हेमेंद्रप्रसाद घोष यांच्या संपादकत्वाखाली वसुमती हे दैनिक सुरु झाले. घोष यांनी वार्तासंकलनाची चांगली व्यवस्था केली व वृत्तपत्रनिर्मिती आधुनिक व आकर्षक बनविली. अद्यापही वसुमति चालू आहे. आनंद बझार पत्रिका हे प्रमुख बंगाली दैनिक प्रफुल्लकुमार सरकार, सुरेशचंद्र मजुमदार व मृणाल क्रांतिघोष यांनी १९२२ मध्ये चालू केले. देश हे आनंद बझारचे साप्ताहिक भावंड होय. या वृत्तपत्रगटाच्या वतीने १९३७ साली हिंदुस्थान स्टँडर्ड हे इंग्रजी दैनिक सुरु झाले. त्याची अमृत बझार पत्रिकेशी स्पर्धा होऊ लागल्याने तिला उत्तर म्हणून पत्रिकेच्या चालकांनी जुगांतर हे बंगाली दैनिक चालू करुन (१९३७) आनंद बझारशी चढाओढ सुरु केली. हल्ली ही सारीच दैनिके चांगल्या रीतीने चालू आहेत. १९३९ साली  भारत व कृषक ही दोन बंगाली दैनिके निघाली होती परंतु ती अल्पजीवी ठरली.

देशबंधू ⇨चित्तरंजन दास यांनी १९२३ साली स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉर्वर्ड हे इंग्रजी दैनिक चालू केले होते. त्याची भावंडे म्हणून आत्मशक्ति (१९२६) हे साप्ताहिक व बांगलार कथा हे सायंदैनिक (१९२२) सुरु झाले पण ती फक्त दोन वर्षे टिकली. पुढे अनुक्रमे लिबर्टी, वंगवाणी व नवशक्ति या नव्या नावांनी ही तीनही नियतकालिके पुन्हा अवतीर्ण झाली पण त्यांचाही जम बसू शकला नाही.

फझलुल हक्क यांनी १९४१ साली नवयुग हे बंगाली दैनिक सुरु केले. त्यापूर्वी मौलाना अक्रमखान यांनी आझाद (१९२६) हे दैनिक चालवले होते. हसन सुऱ्हावर्दी यांनी इतेहाद हे दैनिक सुरु केले (१९४७). ही तीनही दैनिके बंगालमधील मुस्लिमांचा राजकीय दृष्टिकोन प्रभावीपणे मांडीत असत.

कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र म्हणून १९४६ साली स्वाधीनता हे बंगाली दैनिक चालू झाले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने १९४९ साली सत्ययुग हे बंगाली दैनिक चालू झाले परंतु चार वर्षांनी ते बंद पडले. लोकसेवक व जनसेवक ही दोन दैनिके स्वातंत्र्योत्तर काळात निघाली आहेत.

बंगाली साप्ताहिकांत नजरुल इस्लाम यांचे बंगाल, प्रफुल्ल चंद्र रे यांचे सचित्र भारत (१९३५), कृष्णेंदू भौमिक यांचे स्वदेश व सुशील बसूंचे वंगदूत ही साप्ताहिके विशेष उल्लेखनीय आहेत.

गुजराती : गुजराती भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभ मुंबईमध्ये पारशी जमातीमधील मंडळींनी केला व १ जुलै १८२२ रोजी मुंबई येथे मुंबईना समाचार या नावाचे साप्ताहिक फर्दुनजी मर्झबान (१७५७-१८४०) या पारशी गृहस्थाने सुरु केले. त्यासाठी त्यांनी ‘समाचार प्रेस’ ची स्थापना केली. त्या पत्राला मुंबई सरकारचा आश्रय होता व सरकारने पत्राच्या ५० प्रती घेण्यास संमती दिली होती. मुंबईना समाचार पत्रात व्यापारी बातम्या भरपूर येत असल्याने हे पत्र व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात विशेष लोकप्रिय ठरले. १८३२ सालापासून ते दैनिक स्वरुपात प्रसिध्द होऊ लागले. जनार्दन वासुदेवजी व विनायक वासुदेवजी हे दोघे मराठी बंधू या गुजराती पत्राचे काही काळ संपादक होते. यानंतरही गुजराती भाषेत जी वृत्तपत्रे निघाली, तीही मुंबईतच व पारशी लोकांचाच त्यांत पुढाकार राहिला. मोबेद नवरोजी दोराबजी चंदारु यांनी मुंबई वर्तमान हे साप्ताहिक १ सप्टेंबर १८३० रोजी चालू केले. तेरा महिन्यांत ते द्विसाप्ताहिक झाले व मुंबईना हुर्कारु अने वर्तमान या नावाने प्रसिध्द होऊ लागले. पुढे हेच पत्र मुंबईना चाबूक (१८३३) या नावाने चालवले गेले. १८३१ मध्ये पेस्तनजी माणेकजी मोतीवाला यांनी सनातनी समाजाचे मुखपत्र म्हणून जाम ई जमशेद हे गुजराती साप्ताहिक काढले. १८५३ साली त्याचे दैनिकात रुपांतर झाले. अद्यापही मुंबई समाचार व जाम ई जमशेद ही दैनिके चालू आहेत.

मुंबईत १८३२ ते १८५० या कालखंडात सहा गुजराती नियतकालिके सुरु झाल्याची नोंद आढळते. मुंबई दुर्बिण (१८३८), समाचार दर्पण (१८४९), चित्रज्ञान दर्पण (१८५०) अशी काही पत्रे अल्पकाळ चालली. मुंबईना चाबूक हे साप्ताहिक त्याच्यावरील अब्रुनुकसानीच्या खटल्यांनी बरेच गाजले व नंतर बंद पडले.

अहमदाबाद येथे ‘गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी’ मार्फत वर्तमान हे साप्ताहिक १८४९ मध्ये चालू झाले. त्यात अहमदाबादचे तत्कालीन अतिरिक्त न्यायाधीश सर अलेक्झांडर किन्लॉक फोर्बस यांनी तुरुंगव्यवस्थेवर टीका करणारा लेख लिहिला, त्यामुळे मुंबई सरकारने त्यांची बदली केली. पुढे या पत्राला उतरती कळा लागून १८५४ साली ते बंद पडले. १८५४ साली ‘व्हर्नाक्युलर सोसायटी ’ ने सुरतच्या विद्यावर्धक मंडळीचे बुध्दिप्रकाश हे चार वर्षांपूर्वी निघालेले मासिक चालवावयास घेतले. खेडा जिल्ह्यात १८६१ मध्ये खेडा वर्तमान हे पत्र सुरु झाले. तद्वतच सुरत मित्र १८६३ साली अवतरले.

मुंबईत १८४६ च्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या पारशी- मुस्लीम दंग्यानंतर ⇨ दादाभाई नवरोजी  यांनी रास्त गोफ्तार (म. शी. ‘सत्यवादी’) हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५१ रोजी सुरु केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द असून मुख्यतः पारशी समाजात सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी दादाभाईंनी हे वृत्तपत्र काढले. ते दोन वर्षे त्याचे संपादक होते, पुढे त्याचे धोरण जास्त व्यापक होत गेले. प्रमुख हिंदू समाजसुधारक ⇨करसनदास मूळजी  काही वर्षे रास्त गोफ्तारचे संपादक होते. पुढे त्यांनी सत्यप्रकाश हे स्वतःचे साप्ताहिक काढले, ते १८५२ पासून नऊ वर्षे चालले. वल्लभ संप्रदायातील गैरप्रकारांविरुध्द सत्यप्रकाशने मोहिम चालविली व तीत यश मिळविले. १८६२ साली सत्यप्रकाश व रास्त गोफ्तार ही एकत्र आली व संयुक्त नावाने प्रकाशित होऊ लागली. हे नवे साप्ताहिक १९२० पर्यंत प्रकाशित होत होते. गुजरातमध्ये वृत्तपत्रांचा प्रसार १८५० नंतर झपाटयाने झाला व पारशी समाजाव्यतिरिक्त इतरही गुजरातीभाषी लोक वृत्तपत्रांकडे वळले. १८५७ च्या आगेमागे सुरु झालेली काही गुजराती वृत्तपत्रे अद्यापिही चालू आहेत.

गुजराती वृत्तपत्रांपैकी काही पत्रे धार्मिक व सामाजिक प्रश्नांबाबत परंपरागत दृष्टिकोनाचा पाठपुरावा करीत. अशा वृत्तपत्रांत गुजराती हे साप्ताहिक प्रमुख होते. याउलट रणछोडदास लोटवाला यांचे अखबार-ई-सौदागर (ते पुढे हिंदुस्थान या नावाने प्रसिध्द होऊ लागले) समाजसुधारणेचा जोरदार पुरस्कार करीत असे. लोटवालांनी हिंदुस्थान व प्रजामित्र अँड पारशी या आपल्या वृत्तपत्रांचे एकीकरण केले व ते हिंदुस्थान प्रजामित्र या नव्या नावाने १९४० पर्यंत चालू होते.

गुजराती वृत्तपत्रसृष्टीवर⇨ महात्मा गांधींचा जबरदस्त प्रभाव पडावा, हे तसे स्वाभाविकच होय. गांधीजींनी पत्रकारितेला नवी दृष्टी व नवचैतन्य प्राप्त करुन दिले. आपल्या राजकीय विचारसणीचा व तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी गांधीजींनी ‘सत्याग्रही’ ह्या संपादकीय नावाखाली सत्याग्रह हे साप्ताहिक दि. ७ एप्रिल १९१९ पासून सरकारी परवान्याशिवाय प्रसिध्द करण्यास   सुरुवात केली. यंग इंडिया (इंग्रजी) व नवजीवन (गुजराती) ही नियतकालिके १९१९ पासून त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिध्द होऊ लागली. तत्पूर्वी इंदुलाल याज्ञिक यांनी नवजीवन अने सत्य हे मासिक (१९१५-१९) चार वर्षे चालवले होते. गांधीजींनी हे मासिक इंदुलाल याज्ञिक यांच्याकडून चालवावयास घेतले व त्याचे साप्ताहिकात रुपांतर केले. नवा विचार, नवी भाषा, नवी वृत्तपत्र पध्दती आणि जाहिरातींचा अभाव ही या नियतकालिकांची वैशिष्ट्ये होती. गांधीजी नवजीवनमधून राजकीय व सामाजिक समस्यांविषयीची आपली मते सोप्या व परिणामकारक भाषेत मांडत. १९२० च्या सुमारास नवजीवनचा खप सु. वीस हजार होता, यावरुन त्याची लोकप्रियता स्पष्ट होते. ११ फेब्रुवारी १९३३ रोजी हरिजन (इंग्रजी) साप्ताहिक गांधीजींनी सुरु केले. हरिजनची हिंदी आवृत्तीही निघू लागली. त्यात स्वतः गांधीजींच्या व्यतिरिक्त महादेव देसाई, किशोरलाल मशरुवाला, काका कालेलकर व नरहरी पारेख यांच्यासारखे नामवंत लेखक लेखन करीर असत. १९४० पासून सहा वर्षे गांधीजींनी आपली वृत्तपत्रे प्रकाशनपूर्व नियंत्रणाच्या निषेधार्थ बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरु झाली. गांधीजींच्या निधनानंतरही ती सात-आठ वर्षे चालू होती. ⇨ किशोरलाल मशरुवाला  यांनी गांधीजींच्या हत्येनंतर सु. साडेचार वर्षे हरिजनचे संपादकपद मोठया कौशल्याने व समर्थपणे सांभाळले. गुजराती वृत्तपत्रसृष्टीत ‘सौराष्ट्र ट्रस्ट’ च्या वृत्तपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. १९२१ साली सौराष्ट्रात राणपुर येथे अमृतलाल शेठ यांनी सौराष्ट्र साप्ताहिक सुरु केले व नंतर फूलछाब या नावाने ते चालविले. श्रेष्ठ गुजराती कवी व लेखक ⇨मेघाणी  हे या साप्ताहिकाचे संपादक होते. अमृतलाला यांनी मुंबईत जन्मभूमी हे गुजराती दैनिक चालू केले. मेघाणी यांनी जन्मभूमी या दैनिकात प्रारंभापासून (१९३३) ‘कलम अने किताब’ हे वाड्‌मयीन सदर चालवले. या सदरातील त्यांचे लेखन उत्कृष्ट वृत्तपत्रीय लिखाणाचे उदाहरण आहे. पुढे जन्मभूमीचे संपादक सामलदास गांधी यांनी स्वतःचे वंदेमातरम्‌ दैनिक १९४१ साली सुरु केले. काही वर्षे दोन्ही दैनिके चालू होती परंतु वंदेमारतम्‌ बंद पडले. जन्मभूमी अद्यापिही चांगल्या तऱ्हेने चालू आहे.

अहमदाबाद येथे सुरु झालेले पहिले दैनिक म्हणजे नंदलाल बोडीवाला यांचे स्वराज्य (१९२१). काही वर्षांनी त्याच्याऐवजी बोडीवालांनी संदेश हे दैनिक सुरु केले. १९४३ साली स्थापन झालेल्या त्यांच्या ‘संदेश लिमिटेड’ या कंपनीमार्फत संदेशशिवाय सेवक हे सायंदैनिक, आराम हे वाडमयातील साप्ताहिक व गुजराती पंच हे साप्ताहिक प्रकाशित होत होते. अहमदाबादच्या ‘लोकप्रकाशन लि.’ या दुसऱ्या कंपनीच्या वतीने गुजरात समाचार हे दैनिक, लोकवाद हे सायंदैनिक व प्रजाबंधु हे साप्ताहिक ही नियतकालिके चालविली जातात. काकाभाई कोठारी यांच्या मालकीची दैनिक प्रभात, साप्ताहिक नव सौराष्ट्र व मासिक कुमार ही नियतकालिकेही त्या शहरात प्रकाशित होतात.

सुरत येथे समाचार व गुजराती ही दैनिके प्रसिध्द होतात. १९३० साली बडोदे येथे पहिले दैनिक चालू झाले. हल्ली तेथे सयाजी, विजय, जय गुजरात, राजहंस व प्रकाश ही दैनिके चालू आहेत. सौराष्ट्राच्या संघराज्याची स्थापना झाल्यावर जय हिंद, नूतन सौराष्ट्र व फूलछाब ही तीन दैनिके राजकोटला सुरु झाली. कच्छमध्ये भूज येथून आझाद कच्छ, कच्छ मित्र व जय कच्छ या तीन दैनिकांचे प्रकाशन होते. गुजराती समाज हा मुख्यत्वे व्यापारी पेशाचा असल्याने तो देशात अनेक ठिकाणी वा परदेशांतही वास्तव्य करुन आहे, त्याच्याकरिता त्या त्या ठिकाणी काही गुजराती भाषिक नियतकालिके प्रसिध्द हो असतात.

हिंदी : उदन्त मार्तण्ड हि पहिले हिंदी साप्ताहिक, पं. युगलकिशोर शुक्ल यांनी सुरु केले (३० मे १८२६) पण वर्षभरातच ते बंद करावे लागले (४ सप्टेंबर १८२७). १८२९ साली राजा राममोहन रॉय यांनी इतर तीन भाषांप्रमाणे वंगदूत हिंदी भाषेतही सुरु केले होते. १८५० साली युगलकिशोर शुक्ल यांनीच सामदण्ड मार्तण्ड हे हिंदी नियतकालिक प्रकाशित करण्यास प्रारंभ केला परंत्य अल्पावधीतच तेही बंद पडले. समाचार सुधावर्षण हे पहिले हिंदी दैनिक कलकत्ता येथेच १८५४ साली चालू झाले. ⇨ राजा शिवप्रसाद (सितारे हिंद)यांच्या प्रेरणेने उत्तर प्रदेशात बनारस अखबार हे पहिले हिंदी साप्ताहिक १८४५ च्या जानेवारीत प्रकाशित झाले. त्याचे संपादक गोविंद रघुनाथ थत्ते होते. या हिंदी पत्रात उर्दू शब्दांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे १८५० मध्ये बनारस येथून निघालेले सुधाकर हे खऱ्या अर्थाने पहिले हिंदी साप्ताहिक म्हणता येईल. त्याचे संपादक तारामोहन मित्र हे बंगाली गृहस्थ होते. १८६७ च्या सुमारास जम्मू, सिकंदराबाद व बनारस येथे तीन नवी हिंदी वृत्तपत्रे सुरु झाली. त्यांपैकी कवि वचनसुधा या ⇨भारतेंदु हरिश्चंद्र यांच्या वृत्तपत्राचा विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. ते १५ ऑगस्ट १८७४ रोजी सुरु झाले. ते प्रारंभी मासिक होते पुढे त्याची पाक्षिक, साप्ताहिक अशी स्थित्यंतरे झाली. १८८५ मध्ये ते बंद पडले. भारतेंदूंना हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे राममोहन रॉय मानतात. त्यांच्यामुळे तिला स्थिरता व लौकिक प्राप्त झाला.

भारतमित्र हे साप्ताहिक १८७७ साली सुरु झाले. अंबिकाप्रसाद बाजपेयी, लक्ष्मण नारायण गर्दे, बालमुकुंद गुप्त यांच्यासारखे नामवंत संपादक त्याला लाभले होते. परंतु पुढे कलकत्ता शहरातच त्याच्याशी अन्य हिंदी दैनिकांची स्पर्धा सुरु झाली. परिणामी ते १९३७ साली बंद पडले. कलकत्ता येथील हिंदी बंगवासी (१८९०), मुंबई येथील श्री वेंकटेश्वर समाचार, हिंदी प्रदीप, भारतजीवन ही या काळातील अन्य काही प्रमुख वृत्तपत्रे होत. जनमानसात सामाजिक, राजकीय जाणिवा जसजशा विस्तारत गेल्या, तसतशी हिंदी नियतकालिकांची वाढ झपाटयाने होत गेली. १८७७ ते १८८३ च्या दरम्यान सु. पन्नास नवी हिंदी नियतकालिके सुरु झाली. प्रारंभीच्या काळात साप्ताहिकांचे प्रमाण जास्त होते. त्यानंतरच्या दहा वर्षांत त्यांत आणखी सु. दीडशे नियतकालिकांची भर पडली. भारतीय राष्ट्रीय आंदोलनातून दैनिक वृत्तपत्रांचा जन्म झाला. हिंदूस्थान हे पहिले हिंदी दैनिक लंडनमध्ये सुरु झाले. पुढे त्याचे उत्तर प्रदेशात कालाकांकर येथे स्थलांतर झाले. राजा रामपाल सिंग यांनी ते संपादित व प्रकाशित केले. पंडित मदनमोहन मालवीय हे काही काळ त्याचे संपादक होते. या काळात त्याची लोकप्रियता खूपच वाढली व त्याचे दैनिकात रुपांतर झाले. १९१० पर्यंत हे दैनिक चालू होते.

विसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षांत हिंदी वृत्तपत्रे साहित्य आणि सामाजिक व धार्मिक प्रश्न यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष पुरवीत. शिक्षण, शेती व व्यापार यांना वाहिलेलीही काही वृत्तपत्रे होती. हिंदी प्रदीप, मराठी केसरीचे रुपांतर असलेले हिंदी केसरी (१९०७), कर्मयोगी (१९१०), आग्रा येथील सैनिक, पं. मदमोहन मालवीय यांचे अलाहाबाद येथील अभ्युदय (१९०७), देशदूत, कानपूरचे प्रताप (१९१३) अशी काही मोजकीच वृत्तपत्रे राजकारणावर चर्चा करण्यात आघाडीवर होती, तसेच स्वातंत्र्य आंदोलनाला चालना देण्यातही अग्रेसर होती. अभ्युदयचे १९१५ मध्ये दैनिकात रुपांतर झाले. पहिले महायुध्द चालू झाल्यावर काही वृत्तपत्रांचे दैनिकांत रुपांतर करण्यात आले परंतु लवकरच हा प्रयोग बंद पडला. या कालखंडात गंगाप्रसाद सिंह (विश्वदूत, भारतजीवन या पत्रांचे संपादक, भारतमित्रचे व्यवस्थापक), बालमुकुंद गुप्त, नंदकुमारदेव शर्मा, ⇨ महावीरप्रसाद द्विवेदी, हरिकृष्ण जौहर (भारतजीवन), इंद्र विद्यावाचस्पती (सध्दर्मप्रचारक, विजय), मातादिन शुक्ला, शिवराम पांडे, लक्ष्मण नारायण गर्दे, नर्मदाप्रसाद मिश्रा, बनारसीदास चतुर्वेदी (विशाल भारत, मधुकर), शिवपूजन सहाय (मारवाडी सुधार, आदर्श, समन्वय इ.) प्रभृती हिंदी पत्रकार-संपादक उदयाला आले. त्यांच्यापैकी महावीरप्रसाद द्विवेदी व बालमुकुंद गुप्त यांनी हिंदी भाषा समृध्द करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. द्विवेदींनी सरस्वतीचे सलग सतरा वर्षे (१९०३ ते १९२०) संपादन केले व त्या नियतकालिकाला लौकिक प्राप्त करुन दिला. पं. मदनमोहन मालवीय यांच्यानंतर गुप्त हे दैनिक हिंदुस्तानचे संपादक (१८८९-९१) होते. त्यानंतर हिंदी बंगवासी (१८९३-९८) व भारतमित्र (१८९९-१९०७) या पत्रांच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. महात्मा गांधीनी सत्याग्रह आंदोलन सुरु केले, त्या काळात हिंदी दैनिक वृत्तपत्रांना   उधाण आले. विश्वमित्र (कलकत्ता), आज, भारत (अलाहाबाद), वीर अर्जुन (दिल्ली) व नवभारत (नागपूर) ही भारतीय स्वातंत्र्यलढयाच्या दुसऱ्या  पर्वातील महत्त्वाची प्रमुख हिंदी दैनिके होत. ह्याच काळात अंबिकाप्रसाद बाजपेयी यांनी स्वतंत्र हे दैनिक कलकत्ता येथे १९२० मध्ये सुरु केले व त्याने लोकप्रियताही मिळविली. परंतु १९३० मध्ये सरकारी रोषामुळे बंद पडले. दिल्लीत स्वामी श्रध्दानंदांनी काढलेल्या दैनिक विजयचीही तीच गत झाली. ⇨सखाराम गणेश देउसकर हे महाराष्ट्रीय पत्रकार हितवार्ता ह्या राष्ट्रीय बाण्याच्या साप्ताहिकाचे १९०७ ते १९१० या काळात संपादक होते. त्यांच्या प्रेरणेने ⇨बाबूराव विष्णु पराडकर (१८८३-१९५५) हे प्रख्यात पत्रकार या क्षेत्रात शिरले. त्यांच्याकडून त्यांनी हिंदी बंगवासी या पत्रात संपादनाचे प्राथमिक धडे घेतले. हितवार्ता (१९०७-१०), भारतमित्र (१९११ साप्ताहिकाचे दैनिक झाल्यानंतर) या पत्रातून संपादनाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी वाराणसीहून १९२० पासून सुरु झालेल्या आज ह्या दैनिकाचे संयुक्त संपादक म्हणून श्रीप्रकाश यांच्यासमवेत काम केले. चार वर्षांनंतर ते त्याचे संपादक व १९३४ पासून अखेरपर्यंत प्रमुख संपादक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आजला सध्याची प्रतिष्ठा व लोकप्रियता प्राप्त झाली. सध्याचे ते हिंदीतील सर्वांत अग्रगण्य पत्र मानले जाते. पराडकरांनी संसार ह्या दैनिकाचेही १९४३ ते १९७४ या काळात संपादन केले. काही वर्षे आजचे ते संपादक होते. पराडकरांनंतर रामकृष्ण रघुनाथ खाडिलकर हे १९५६ ते जून १९५९ पर्यंत आजचे प्रधान संपादक होते. १९२३ साली घनःश्यामदास बिर्ला यांनी दिल्लीत अर्जुन या नावाचे वृत्तपत्र चालू केले. परंतु सरकारी जाचामुळे ते १९३८ साली बंद पडले. नंतर त्याचे वीर अर्जुन मध्ये रुपांतर झाले. १९३० ते १९४० च्या दरम्यान सु. तीस   नवी हिंदी वृत्तपत्रे हिंदीभाषी प्रदेशांत सुरु झाली. त्यांच्यापैकी काही मुंबई, नागपूर व कलकत्ता अशा ठिकाणांहूनही प्रसिध्द होत. या वृत्तपत्रांत   दैनिक (आग्रा) लोकमान्य व विश्वमित्र (कलकत्ता) आर्यावर्त व राष्ट्रवाणी (पाटणा) संसार व सन्मार्ग (वाराणसी) हिंदुस्तान (दिल्ली) हिंदी मिलाप (लाहोर) व गणेश शंकर विद्यार्थी यांचे प्रताप (कानपूर) ही प्रमुख होत.

अलीकडच्या काळात हिंदी वृत्तपत्रसृष्टीची झपाटयाने प्रगती झाली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आज, हिंदुस्तान, नवभारत टाइम्स, विश्वमित्र इ. दैनिके आघाडीवर आहेत. विश्वमित्रसारखी प्रमुख दैनिके तीनचार ठिकाणांहून एकाचवेळी प्रकाशित होतात. हिंदुस्तान व नवभारत टाइम्सइसारख्या आघाडीच्या दैनिकांच्या मासिक आवृत्त्याही निघतात व त्यांत मुख्यत्वे वाडमयीन व अन्य महत्त्वाच्या विषयांवर गंभीर स्वरुपाचे, माहितीपूर्ण लिखाण प्रसिध्द होते.

कन्नड : कर्नाटकमध्ये कन्नड भाषेतील वृत्तपत्रे साधारण १८६० नंतर निघू लागली. म्हैसूर (सध्याचे कर्नाटक राज्य) या कन्नडभाषी घटक राज्याची निर्मिती होईपर्यंत (१९५६) कन्नडभाषी मुलुख निरनिराळ्या चार राजवटींत विभागला गेला होता. या चार विभागांतील कन्नड भाषेतही विभिन्नता होती. या अडचणींमुळे वृत्तांत पत्रिके हे पहिले कन्नड नियतकालिक निघेपर्यंत १८६५ साल उजाडले. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ते म्हैसूरला सुरु केले. पहिला कन्नड छापखानाही त्यांनीच चालू केला. त्यानंतर कर्नाटक प्रकाशिका हे वृत्तपत्र १८६५ मध्ये बंगलोर येथे प्रकाशित झाले. कन्नड भाषेतील तेच पहिले प्रतिष्ठित वृत्तपत्र होय. त्यात व्यासंगी लेखक लेखन करीत असल्याने त्याचा वाडमयीन दर्जा उच्च प्रतीचा होता. १८८० ते १९०८ च्या दरम्यान सुरु झालेल्या कन्नड दैनिकांत देशाभिमानी (१८८०) हे प्रमुख होते. परंतु लवकरच ते सरकारी अवकृपेला बळी पडले. म्हैसूरचे वेंकट कृष्णय्या, एम्‌. गोपाल आणि एम्‌. श्रीनिवास अयंगार हे कन्नड भाषेतील प्रारंभीचे प्रमुख पत्रकार होत. कृष्णय्या वृत्तांत चिंतामणीचे संपादन करीत. श्रीनिवास अयंगार नाडगन्नडि या साप्ताहिकाचे संपादक होते. १९०८ साली म्हैसूर संस्थानात वृत्तपत्रांचे नियंत्रण करणारा खास कायदा मंजूर झाला व त्याला बरीच वृत्तपत्रे बळी पडली. त्यांतच ⇨डी. व्ही. गुंडप्पा यांचे भारती हे पहिले कन्नड दैनिक होते.

पहिल्या महायुध्दाच्या सुमारास म्हैसूर संस्थानाला सर एम्‌. विश्वेश्वरय्या यांच्यासारखा   उदार मनोवृत्तीचा दिवाणा लाभला (१९१२-१८). त्यामुळे तेथे वृत्तपत्रसृष्टीला चांगले दिवस आले व ती स्थिरपद झाली. पुढे मुहम्मद इस्माईल मिर्झा या दिवाणाच्या कारकीर्दीतही (१९२६-४१) कन्नड वृत्तपत्रांचा विकास झाला.

पूर्वीच्या मुंबई प्रांतातील चार कन्नड जिल्ह्यांत वृत्तपत्रांची वाढ वंगभंगाच्या आंदोलनापासून झाली. हुबळीत डॉ. ना. यु. हर्डीकर यांनी कन्नड केसरी १९०७ साली सुरु केले. ते मराठी केसरीचे कन्नड भाषांतर होते. दक्षिण कारवारात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरु केलेली कन्नड वृत्तपत्रे फार वर्षे टिकली नाहीत. स्वदेशाभिमानीसारखी काही जुनी साप्ताहिके तेथे अद्यापही चालू आहेत. त्याशिवाय नवभारत हे दैनिक आणि प्रभात व राष्ट्रमाता ही साप्ताहिके तेथे प्रसिध्द होतात.कर्नाटक वैभव हे जूने कन्नड साप्ताहिक विजापूर येथे १८९२ मध्ये सुरु झाले. जयराव देशपांडे हे विजापूरचे प्रमुख वकील त्याचे पहिले संपादक होते. त्याच्यानंतर हणमंतराव मोहरे यांनी ते १९२१ साली चालवावयास घेतले. कृष्णराव मुदवेडकर यांचे कर्नाटक वृत्त पस्तीस वर्षांच्या वाटचालीनंतर १९३६ साली बंद पडले.

इ. स. १९२१ पासून गांधी युग सुरु झाल्यावर रंगराव दिवाकर, रामभाऊ हुक्केरीकर प्रभृतींनी ‘लोकशिक्षण ट्रस्ट’ च्या वतीने हुबळीला कर्मवीर साप्ताहिक चालू केले. १९२४ मध्ये बेळगावला महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अधिवेशन भरले. त्यामुळे झालेल्या लोकजागृतीमुळे कन्नड नियतकालिकांना चालना मिळाली. १९२४ साली कर्नाटक एकीकरणाच्या मागणीचा पाठपुरवा करण्यासाठी बेळगाव येथे संयुक्त कर्नाटक हे साप्ताहिक सुरु झाले. १९३३ साली त्याचे दैनिकात रुपांतर होऊन हणमंतराव मोहरे यांनी त्याचे संपादकत्व स्वीकारले. १९३७ साली संयुक्त कर्नाटक बेळगावहून हुबळीला हलविण्यात आले. त्याचे चालकत्व ‘नॅशनल लिटरेचर पब्लिकेशन ट्रस्ट’ कडे असून रंगराव दिवाकर हे ह्या संस्थेचे एकमेव विश्वस्त आहेत. सध्या संयुक्त कर्नाटक हुबळी व बंगलोर येथून प्रसिध्द होते. १९४७ साली हुबळीत नवयुग व विशाल कर्नाटक ही दोन दैनिके चालू झाली. त्याच साली डॉ.हर्डीकर यांनी आपल्या हुबळी गॅझेट साप्ताहिकाचे जय हिंदमध्ये रुपांतर केले.

कन्नड गद्याला लोकप्रियता लाभली, ती मुख्यत्वे वृत्तपत्रे व नियतकालिके यांचा उदय व प्रसार झाल्यानंतरच.पुस्तकांपेक्षा वृत्तपत्रे व नियतकालिके यांचा वाचकवर्ग संख्येने मोठा होता. गद्यशैलीचे विविध नमुनेही वृत्तपत्रांतील अनेकविध विषयांवरच्या लेखांतून, सदरांतून विकसित होत गेले. अनेक श्रेष्ठ कन्नड लेखकांनी वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून उत्तम प्रतीचे गद्य लेखन केले. डी. व्ही. गुंडप्पा, ⇨ मास्ती वेंकटेश अयंगार, तिरुमले ताताचार्य शर्मा, सिध्दवनहळ्ळी कृष्ण शर्मा ⇨शिवराम कारंत, बसवराज कट्टीमणी, निरंजन इ. लेखक या ना त्या प्रकारे पत्रकारितेशी संबंधित होते. काही वृत्तपत्रांतून साहित्यिक, सांस्कृतिक आदि महत्त्वाच्या विषयांवर नियमितपणे स्तंभही चालवले जातात. अशा स्तंभलेखकांमध्ये निरंजन, एच. एम्‌. नायक, के. एस. हरिदास भट ह्यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. नायक यांनी दैनिकांतून लिहिलेल्या १२३ लेखांचा संग्रह सल्लाप हा प्रसिध्द आहे.

भाषावार प्रांतरचनेनंतर (१९५६) बंगलोर हे कन्नड वृत्तपत्रांचे प्रमुख केंद्र बनले. तेथे संयुक्त कर्नाटक या वृत्तपत्राबरोबरच प्रजावाणी व ताई ताडू ही आणखी दोन दैनिके प्रसिध्द होतात. एकोणिसाव्या शतकापासून बेळगावातही कन्नड वृत्तपत्रांची परंपरा आढळते.

काश्मीरी :काश्मीरी   भाषेतील वृत्तपत्रीय लिखाणाची सुरुवात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी खबरनामाज या छोटया साप्ताहिकातून केली. १९२० च्या दशकात श्रीनगर येथे त्यांनी उभारलेल्या दोन इस्पितळांतून हे साप्ताहिक चालवले जात असे. ह्या वार्तापत्रात ख्रिस्ती मिशनच्या रुग्णालयांतील घडामोडींच्या वार्ता, तसेच ख्रिस्ती धर्माचे शिकवण गद्य- पद्यात असे. त्यात मिस गोम्‌री ह्या मिशनरी डॉक्टरच्या पद्यरचना प्रामुख्याने असत. ⇨महजूरने १९४० मध्ये द गाश हे पहिले काश्मीरी वृत्तपत्र सुरु केले. त्यात तत्कालीन घटना- घडामोडींच्या वार्ता व त्यांवरची भाष्ये प्रसिध्द होत असत. याशिवाय ‘असून त गिंदुन हे सदर चालवले जात असे, त्यात बातम्यांवर हलकीफुलकी, विनोदी मल्लिनाथी असे. काश्मीरमधील सर्वांत जास्त लोकप्रिय व यशस्वी साप्ताहिक वतन हे गुलाम नबी खयाल यांनी १९६४ मध्ये सुरु केले. चमन हे साप्ताहिक १९६५ मध्ये राज्य शासनाने चालू केले. भारत सरकारच्या ‘प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो’ ने (पी. आय. बी) प्रगाश हे नियतकालिक चालवले आहे, तर काश्मीरी सांस्कृतिक संघटनेमार्फत कूशुर अखबार हे साप्ताहिक चालवले जाते.

मलयाळम्‌ : या भाषेतील वृत्तपत्रांची सुरुवात ख्रिस्ती मिशनऱ्यांनीच केली. बाझेल मिशनतर्फे (तेल्लिचेरी) राज्य समाचारम्‌ हे पहिले मलयाळम्‌ मासिक जून १८४७ मध्ये प्रकाशित झाले. ख्रिस्ति मिशनऱ्यांच्या वृत्तपत्रांपैकी १८७६ साली चालू झालेले सत्यानंदम्‌ हे साप्ताहिक अद्यापही एर्नाकुलम्‌ येथून प्रसिध्द होते. कोट्टयमचे ज्ञाननिक्षेपम्‌ (१८४८) व कोचीनचे पश्चिम तारका (१८६२) ही मलयाळम्‌ भाषेतील जुनी नियतकालिके होत.

कालिकत येथे १८८४ साली केरळ- पत्रिका हे साप्ताहिक सुरु झाले. पत्रिकेचे संपादक सी. कुन्हीराम मेनन यांचा, सरकारचे निर्भीड टीकाकार व मलयाळम्‌ भाषेतील नामवंत शैलीदार म्हणून लौकिक होता. याच सुमारास कालिकत येथे केरळ संचारी व मनोरमा ही दुसरी दोन साप्ताहिकेही सुरु झाली. के. रामकृष्ण पिळ्ळा (१८७८-१९१६) हे केरळमधील प्रमुख पत्रकार होत. त्यांनी मलयाळी (१८८६) व स्वदेशाभिमानी (१९०५) ही साप्ताहिके चालविली. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून घेतला व परिणामी त्रावणकोर संस्थानातून त्यांना १९१० साली हद्दपार करण्यात आले.

कोट्टयम्‌ येथील मलयाळ मनोरमा हे केरळमधील एक प्रमुख वृत्तपत्र मानले जाते. १८९० मध्ये कंटत्तिल वर्गीस माप्पिळ यांनी हे साप्ताहिकरुपात सुरु केले. केरळच्या समाजजीवनातील प्रमुख व्यक्ती त्यात लेखन करीत असत. त्यामुळे त्याला आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त झाली. या वृत्तपत्रगटाचे भाषा पोषिणी (१८९२-१९४०) हे द्वैमासिक प्रकाशन असून, ते वाडमयीन नियतकालिकांमध्ये महत्त्वाचे व अग्रगण्य आहे. १९२२ पासून मनोरमा दैनिकरुपात प्रकाशित होत आहे. १९३८-१९४७ पर्यंत ते त्रावणकोर सरकारच्या हुकुमामुळे बंद होते. मातृभूमी हे केरळचे दुसरे प्रमुख दैनिक. १९३२ साली कालिकत (विद्यमान कोझिकोडे) येथे के. माधवन्‌ नायर व पी. अच्यूतन्‌ यांनी त्रिसाप्ताहिक म्हणून त्याची सुरुवात केली. या दोघांनी असहकारितेच्या चळवळीत वकिली सोडली होती. मातृभूमीने केरळच्या वृत्तपत्रसृष्टीत उच्च परंपरा निर्माण केली व तिचे पुढेही कसोशीने पालन केले.

केरळ पत्रिका, मलयाळी, मलयाळ मनोरमा यांसारख्या वृत्तपत्रांनी मलयाळम्‌ गद्याचा विकास घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. सी. पी. अच्युत मेनन, कंटत्तिल वर्गीस माप्पिळ, अप्पन तंपुरान यांसारखे अग्रगण्य साहित्यिक ह्या दैनिकांच्या संपादकांत होते. संपादकांच्या नंतरच्या पिढीतील सी. व्ही. कुंजुरामन, के. रामकृष्ण पिळ्ळा, मूरकोट कुमारन, ⇨कुमारन आशान (१८७३-१९२४), के. अय्यपन हे चिकित्सक वृत्तीचे व पुरोगामी दृष्टी असलेले होते. हा सामाजिक व राष्ट्रीय जागृतीचा काळ होता. ह्या संपादकांनी एक जोमयुक्त, सामर्थ्यसंपन्न लेखनशैली निर्माण केली. वृत्तपत्रीय गद्यशैलीचा एक नवाच मानदंड त्यांनी निर्माण केला. विसाव्या शतकातील पत्रकारांनी पाल्हाळ, पसरटपणा, शब्दबंबाळपणा टाळून नेमक्या व मोजक्या शब्दांत आशय व्यक्त करणारी नवी वृत्तपत्रीय शैली रुढ केली. मूरकोट कुमारन हे या पिढीतील आघाडीचे शैलीकार संपादक होते.

केरळमधील वृत्तपत्रांत मलयाळी व मलयाळ राज्यम्‌ (क्विलॉन), केरळ कौमुदी व दीनबंधु (एर्नाकुलम), कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र देशाभिमानी, मुस्लिल लीगचे चंद्रिका इ. दैनिकांचा उल्लेख विशेषत्वाने करावा लागेल.

ओडिया : ओरिसातील ओडिया भाषेत सुरुवातीची नियतकालिके ख्रिस्ती मिशनऱ्यांनीच चालवली. ‘कटक मिशन प्रेस’ ची स्थापना १८३७ मध्ये झाली. १८४९ मध्ये ज्ञानारुण हे मासिक या प्रेसतर्फे ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ चालू करण्यात आले. प्रबोध चंद्रिका (१८५६) व अरुणोदय (१८६१) ही नियतकालिके ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रयत्नातूनच चालू झाली. आधुनिक ओडिया गद्याची जडणघडण व प्रसार मुख्यत्वे या नियतकालिकांतून झाला. पहिले एकद्देशीय नियतकालिक उत्कल दीपिका हे ऑगस्ट १८६६ मध्ये अवतीर्ण झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. ६० नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. ओडिया भाषेचा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याच्या मागणीतूनच तेथील वृत्तपत्रसृष्टीला मुख्यत्वे चालना मिळाली. या मागणीच्या पुरस्कारासाठी सहा वृत्तपत्रे निघाली.

बिहार-ओरिसा प्रांत १९१२ साली अस्तित्वात आला. त्यानंतर संयुक्त ओरिसाच्या मागणीला पुन्हा जोर चढला व तिला पाठिंबा देण्यासाठी वृत्तपत्रे निघाली. शशीभूषण दत्त यांच्या आशा साप्ताहिकाचे १९२८ साली दैनिकार रुपांतर झाले. त्यानंतर ⇨गोपबंधू दास (१८७७-१९२८) यांनी समाज हे साप्ताहिक १९१९ मध्ये सुरु केले. ते प्रथम सखीगोपाल येथून, नंतर १९२५ मध्ये पुरी येथून व १९२७ मध्ये कटक येथून निघत असे. १९३० पासून त्याची दैनिक आवृत्ती निघू लागली. या वृत्तपत्रात संपादकीय लेख लिहून गोपबंधू दास यांनी देशभक्तीचा पुरस्कार केला व लोकजागृती घडवून आणली. वाडमयीन भाषा व दैनंदिन लोकव्यवहारातील भाषा यांच्या मिश्रणातून घडवलेली वृत्तपत्रीय लेखनशैली हे वैशिष्टय या काळात निर्माण झाले व पुढेही जोपासले गेले. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरांवरच्या बातम्या आणि त्यांवरची भाष्ये यांच्या वृत्तपत्रीय शैलीवर शिष्टमान्य इंग्रजीचा प्रभाव होता तर स्थानिक, प्रादेशिक घटनांच्या संदर्भात नित्याच्या लोकव्यवहारातील भाषेचा वापर बव्हंशी होत असल्याचे दिसून येते. हे वैशिष्टय आजतागायत टिकून आहे.

ओरिसात १९३१ ते १९४७ या कालखंडात अनेक वृत्तपत्रे निघाली. गांधीजींच्या चळवळीचा पुरस्कार हे त्यांचे उद्दिष्ट असे. परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यापैकी बहुतेक बंद पडली. डॉ. हरेकृष्ण मेहताब यांचे प्रजातंत्र साप्ताहिक बलसोरला दैनिक म्हणून निघू लागले. स्वराज्य साप्ताहिकही १९३२ साली दैनिक झाले. प्रसिध्द कवी ⇨नीलकंठ दास हे नवभारत या दैनिकाचे संपादक होते. ओडिया पत्रकारितेवर इंग्रजीचा प्रभाव होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली मातृभूमी हे नवे साप्ताहिक ओरिसात सुरु झाले. कटक व कलकत्ता (कोलकाता) येथून प्रामुख्याने ओडिया भाषेतून नियतकालिके प्रसिध्द होतात.

पंजाबी : १८५४ साली ख्रिस्ती मिशनऱ्यांनी लुधियाना येथे पंजाबी  भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. १८६७ मध्ये अमृतसरला अखबार की दरबार साहिब हे नियतकालिक सुरु केले. १८५७ मध्ये सुकाव्य संबोधिनी व १८७६ साली कवि चंद्रोदय ही दोन गुरुमुखी लिपीतली वृत्तपत्रे सुरु झाली. त्यांची भाषा पंजाबीपेक्षा हिंदीला जवळ असे.

वृत्तपत्रासाठी १८८० पासून शुध्द पंजाबी भाषा उपयोगात आणण्याचा उपक्रम सुरु झाला. १८७३ साली ‘सिंग सभा’ स्थापन झाली. ख्रिस्ती  धर्मप्रसाराच्या विरोधात उभी राहिलेली ही सुधारणा-चळवळ होती. या सभेने पंजाबी वृत्तपत्रकारितेचा खऱ्या अर्थाने पाया घातला. आधुनिक पंजाबी गद्याचा विकास घडवण्यातही या सभेचा मोलाचा वाटा होता. शीखवादाचे पुनरुज्जीवन हे तिचे उद्दिष्ट होते आणि ते साधण्यासाठी व सुधारणावादाचा पुरस्कार करण्यासाठी ‘सिंग सभे’ने वृत्तपत्रे काढली. आधुनिक काळातील पंजाब मधील बहुतेक सर्व गद्य लेखक आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीत कधी ना कधी या ना त्या रुपाने पत्रकारितेशी निगडित होते. भाई गुरुमुख सिंग (१८४९-९८) हे लाहोर येथील ‘ओरिएंटल कॉलेज’मध्ये पंजाबीचे प्राध्यापक तसेच ‘सिंग सभे’चे संस्थापक होते. त्यांनी गुरुमुखी अखबार (१८८०), सुधारक खालसा अखबार व खालसा गॅझेट (१८८५) ही वृत्तपत्रे सुरु केली. पंजाबी पत्रकारितेचा पाया त्यांनी घातला, असे मानले जाते. ग्यानी दित सिंग (१८५३-१९०१) हेही सिंग सभेचे एक संस्थापक होते. ते खालसा अखबार साप्ताहिकाचे १८८६ ते १९०१ या काळात संपादक होते. ⇨भाई वीरसिंग (१८७२-१९५७) यांनी सिंग सभेच्या प्रभावाखाली ‘वजीर-इ-हिंद’ हा शिळाछाप-छापखाना सुरु केला. ‘खालसा ट्रॅक्ट सोसायटी’ स्थापन करुन (१८९४) या संस्थेचे मुखपत्र म्हणून खालसा समाचार हे गुरुमुखी लिपीतील पंजाबी साप्ताहिक १८९४ मध्ये सुरु केले. ‘खालसा ट्रॅक्ट सोसायटी’ व खालसा समाचार यांनी पंजाबी गद्यशैलीचा विकास घदवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. सिंग सभेच्या कार्यकर्त्यांनी लाहोर व अमृतसर येथून इतर अनेक वृत्तपत्रे चालू केली. ती  धार्मिक तसेच सामाजिक विषयांना वाहिलेली होती.

पंजाबात १९०६ नंतर राजकीय जागृती होऊ लागली व तिचे पडसाद वृत्तपत्रसृष्टीत उमटले. परंतु त्यांचे स्वरुप मर्यादितच होते. १९२० मध्ये अकाली आंदोलन सुरु झाले. शिखांच्या गुरुद्वारांची सुधारणा हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतर शिखांना अस्वस्थ करणाऱ्या अनेक राजकीय घटना घडल्या. अकाली चळवळीच्या अनुषंगाने त्या काळी पंजाबात २३ दैनिके, ६७ साप्ताहिके, ४ पाक्षिके व २५ मासिके सुरु झाली. ब्रिटिश सत्तेविरुध्द लढा देण्यासाठी व सर्वसामान्य जनतेत राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी शहीद व पंथ सेवक ही राजकीय विचारसरणीची पत्रे निघाली. चरणसिंग शहिद (१८९१-१९३५) ह्या प्रसिध्द पंजाबी विनोदी लेखकाने राजकीय उद्दिष्टे असलेले शहीद हे दैनिक अमृतसर येथे १९२४ मध्ये सुरु केले. त्यांनी मौजी हे साप्ताहिक (१९२६) सुरु करुन विनोदची समृध्द परंपरा पत्रकारितेत निर्माण केली. १९३७ साली प्रांतिक स्वायत्तता आली. पुढे दोन वर्षांनी दुसरे महायुध्द सुरु झाले. १९४२ साली ‘छोडो भारत’चे आंदोलन पेटले. या महत्त्वाच्या कालखंडात निरनिराळे पक्ष पुढे आले व त्यांच्या प्रचार-मोहिमा सुरु झाल्या. त्यामुळे या कालावधीत पंजाबमध्ये ३ दैनिके, ३१ साप्ताहिके, ४ पाक्षिके व ५२ मासिके नव्याने सुरु झाली.

पंजाबी वृत्तपत्रांना १९४७ च्या फाळणीचा जबर तडाखा बसला आणि लाहोरमधील वृत्तपत्रांचे संसार विसकटले. तरीदेखील त्यांनी हिंमत सोडली नाही व स्वतःचे पुनर्वसन करुन घेतले. १९४७ पासुनच्या पाच वर्षांत पंजाबी वृत्तपत्रांच्या संख्येत घट न होता, त्यांमध्ये उलट थोडी वाढच झाली. पंजाबी दैनिकांत अजित हे सर्वाधिक खपाचे, अग्रगण्य दैनिक आहे. मात्र ट्रिब्यून या इंग्रजी वृत्तपत्राच्या, अथवा पंजाब केसरी (हिंदी) व हिंद समाचार (उर्दू) या दैनिकांच्या तुलनेत त्याचा खप कमीच आहे. अलीकडे दलित वर्गाच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी काही वृत्तपत्रे पंजाबीत सुरु झाली आहेत.

सिंधी : सिंधी वृत्तपत्रांची १८५७ ते १९०७ या काळात प्रगती संथ होती पण तरीही सिंधी गद्याच्या जडणघडणीवर त्यांचा प्रभाव पडला. १८८५ मध्ये स्थापन केलेल्या सिंध मद्रसाच्या पत्रिकेत कवी अबोझो यांचे काही लेख प्रसिध्द झाले. कवी शम्सुद्दीन ‘बुलबुल’ यांनी या पत्रिकेत लेखन केले. तसेच सक्कर येथील साप्ताहिक आफताबचे ते अनेक वर्ष संपादक होते. सक्करच्या अलहक व आफताब यांमधील सिंधी गद्य फारसी व अरबी मिश्रीत असल्याने हिंदूंना कळण्यास कठीण होते. हिंदू पत्रकारिता हिरानंद शौकिराम यांच्या सिंध सुधार (१८८४) व सरस्वती (१८९०) या नियतकालिकांपासुन सुरु झाली. सिंधी लोकांचे लक्ष वेधून घेणारे पहिले वर्तमानपत्र सरस्वती हे असावे. प्रभात हे साप्ताहिक १८९१ पासून प्रसिध्द होऊ लागले. त्याचे संपादक लेखराज तिलोकचंद होते. या पत्राने सिंधमधील लोकमत घडवण्यात प्रभावी भूमिका बजावली. सक्करचे साप्ताहिक सिंधी ह्याच सुमारास चालू झाले होते. वीरुमल बेगराज हे त्याचे संपादक होते. कॅथलिक ख्रिस्ती पंथाचे जोत हे दोन पानी सिंधी पाक्षिक १८९६ पासून निघू लागले. ब्रह्मबांधव उपाध्याय, खेमचंद अमृतराय (त्यांनी पुढे सिंधी जर्नल या इंग्रजी साप्ताहिकाचेही संपादन केले) हे सुरुवातीच्या काळातले तर परमानंद मेवाराम हे नंतरच्या काळातले संपादक होते. मुख्यतः परमानंद मेवाराम यांनी सु. १८९९ पासून सतत चाळीस वर्षे जोतचे संपादन करुन त्यास दर्जेदार वाङ्‌मयीन रुप दिले. वरील वृत्तपत्राखेरीज अखबार तलिम (१९०२), रुह रिहान (१९२०), सिंधु (१९३२), मिहराण (१९४६), रिसाल मद्रसा (१९०४), बहार-इ-अखलाक, अल-अमिन, तौहिद (१९२३), अल्‌-जामी (१९२५), सितारा-इ-सिंधी इ. नियतकालिकांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. सिंधी गद्याचा विकास घडवून आणण्यात या नियतकालिकांनी मोलाची कामगिरी बजावली. जेठमल परसराम यांनी कित्येक वृत्तपत्रांचा व पत्रिकांचा प्रारंभ केला. रुह रिहाण या पत्रिकेची स्थापना त्यांनीच केली. अनेक सिंधी वृत्तपत्रे व पत्रिका यांतुन ते सातत्याने लेखन करीत असत. वृत्तपत्रीय लिखाणाला वाडमयीन दर्जा प्राप्त करुन देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्याप्रमाणे ⇨ भेरुमल मेहरचंद अडवानी (१८७६-१९५३), ⇨मंघाराम उधाराम मलकाणी (१८९६-१९८०) इ. साहित्यिकांनी नियतकालिकांचे संपादन करुन व त्यात लेख लिहून सिंधी अद्यशैली समृध्द व संपन्न केली.

तमिळ : एकोणिसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात तमिळ भाषेत पत्रकारितेचा पाया घातला गेला. तमिळ गद्याची एक शाखा वार्ता व त्यांवरची भाष्ये लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयोजनातून विकसित झाली. सर्वसामान्य लोकांच्या आस्थेच्या व कुतूहलाच्या अनेकविध विषयांवरचे ज्ञान व माहिती प्रसृत करणे, हे सुरुवातीच्या नियतकालिकांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. उदा., विवेक चिंतामणी हे मासिक.

भारतातील इतर अनेक भाषांप्रमाणे तमिळमध्येही नियतकालिकांची सुरुवात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रयत्नांतूनच झाली. तमिळमधील सर्वांत पहिले नियतकालिक तमिळ मॅगझीन हे ‘ख्रिश्चन रिलिजस ट्रॅक्ट सोसायटी’ने १८३१ साली सुरु केले. ते दोन वर्षे चालले. १८५५ साली राजवृत्तिबोधी हे दुसरे तमिळ वृत्तपत्र सुरु झाले. त्यात प्रामुख्याने इंग्रजी वृत्तपत्रांतील मजकुरांची  भाषांतरे असत. दिन वार्तामणि हे साप्ताहिक १८५६ मध्ये सुरु झाले. रेव्हरंड पी. पर्सीव्हल हे त्याचे संपादन करीत व त्याला सरकारी मदत मिळे. ही वृत्तपत्रे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालवलेली असल्याने त्यांत सरकारमान्य माहिती प्रसिध्द होत असे. भारतीय राजकारणातील तत्कालीन ख्यातनाम पुढारी ⇨ जी. सुब्रमण्यम् अय्यर यांनी लोकजागृतीच्या उद्देशाने स्वदेशमित्रन् हे तमिळ साप्ताहिक वृत्तपत्र १८८२ मध्ये सुरु केले. या पत्रानी मद्रासमधील राजकीय चळवळीस चालना दिली. स्वदेशमित्रन्मध्ये देशातील व परदेशांतील घटना व्यवस्थित नेटक्या रुपात तमिळ भाषेतून देण्यात येत. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांच्या चौकस बुध्दीला चालना मिळे. ऑगस्ट १८९९ मध्ये स्वदेशमित्रन्‌चे दैनिकात रुपांतर झाले. जी. सुब्रमण्यम् अय्यर हे स्वदेशमित्रन्‌चे संस्थापक तसेच प्रमुख संपादकही होते. या पत्राद्वारे त्यांनी राजकीय पत्रकारितेचा पाया घातला. सामाजिक-राजकीय प्रश्नांवर प्रभावी, जोमदार संपादकीये लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता व तमिळ पत्रकारितेत ती परंपरा त्यांनी रुजवली. या पत्रावर राजद्रोहाचा खटलाही झाला. प्रख्यात कवी ⇨सुब्रह्मण्य भारती (१८८२-१९२१)ह्यांनी स्वदेशमित्रन्‌चे सहसंपादक म्हणून १९०४-०५ मध्ये काम केले. १९१५ साली ए. रंगास्वामी अयंगार यांना स्वदेशमित्रन्‌चे संपादक नेमून ते निवृत्त झाले.

स्वदेशमित्रन् हे १८९९ पासून सतरा वर्षे एकमेव तमिळ दैनिक होते. १९१७ साली देशभक्तन् हे दुसरे दैनिक सुरु झाले. बॅ. सावरकरांचे सहकारी व्ही. व्ही. एस्. अय्यर हे त्याचे १९२० मध्ये संपादक होते. पण १९२१ मध्ये त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन एका वर्षासाठी तुंरुगवास भोगावा लागला. १९२६ साली डॉ. पी. वरदराजलू नायडू यांनी आपल्या तमिळ्नाडू साप्ताहिकाची दैनिक आवृत्ती सुरु केली.

डॉ. वरदराजलू नायडू यांनी आपल्या तमिळनाडू या आपल्या दैनिकातून वृत्ते व भाष्ये साध्या, सोप्या व वाचनीय शैलीत देण्यास प्रारंभ केला. ही वृत्तपत्रीय लेखनशैली तमिळ भाषेत रुजवणारे ते आद्य पत्रकार होत. गांधीयुगात तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय बाण्याच्या लेखकांनी मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रे सुरु केली. प्रभावीपणे प्रत्यक्ष जनसंपर्क साधण्यात ह्या वृत्तपत्रांनी मोलाचा वाटा उचलला. सर्वसामान्य व गरीब लोकांना परवडेल अशा स्वस्त किंमतीत ही वृत्तपत्रे विकली जात. सुतनतीर संगु व गांधी ही त्यांपैकी दोन प्रमुख साप्ताहिके होती. तसेच १९३३ साली जयभारती हे एक-पैसा दैनिक सुरु झाले. संगु सुब्रमण्यम् हे सुतनतीर संगुचे संपादक होते. त्यांची राजकीय घडामोडींवरची भाष्ये लोकांना खुपच प्रभावित करीत असत. त्यामुळे या वृत्तपत्राने तमिळमध्ये इतिहास घडवला. गांधीचे संपादक टी. एस्. चोक्कलिंगम् (१८९९-१९६६) हे स्वातंत्र्यसेनानी पत्रकार होते. हे पत्र ज्ञानप्रसार व टीकाभाष्य या दृष्टीनी खूपच प्रभावशाली ठरले. १९३४ पर्यंत ते त्या पत्राचे संपादक होते. नंतर त्याच वर्षी दिनमणी या तमिळ दैनिकाचे ते पहिले संपादक झाले. स्वातंत्रलढ्याच्या राष्ट्रीय आंदोलनात ह्या वृत्तपत्राने खुपच प्रभावी भुमिका बजावली. आजही ते तमिळमधील आघाडीचे दर्जेदार वृत्तपत्र गणले जाते. चोक्कलिंगम् यांच्या नंतर ए. एन्. शिवरामन हे दिनमणीचे संपादक झाले. त्यांनी विज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण व राजकीय प्रणाली इ. विषयांवर आकर्षक व संभाषणवजा शैलीत स्तंभलेखन करुन ह्या वृत्तपत्राच्या लौकिकात भर घातली. ‘फ्री प्रेस’ वृत्तपत्रगटाने दिनमणी हे दैनिक १९३४ मध्ये सुरु केले. पुढे तमिळनाडू हे दिनमणीत विलीन झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला जयभारती बंद पडले आणि स्वदेशमित्रन् व दिनमणी ही दोनच दैनिके टिकून राहिली. टी. एस्. चोक्कलिंगम् यांनी १९४४ मध्ये दिनसारी ह्या नव्या दैनिकाचे संपादन सुरु केले. १९५२ मध्ये ते बंद पडल्यावर त्यांनी जनयुगम् हे द्विसाप्ताहिक सुरु केले आणि नंतर १९५४ मध्ये नवशक्ती या दैनिकाचे ते संपादक झाले. १९४० साली ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र म्हणून भारतीदेवी हे पत्र सुरु झाले.

वृत्तपत्रीय लेखनशैलीत साधेपणा व सुलभता आणण्याचे कार्य आधुनिक काळात दिनतान्तीने व त्या गटाच्या साखळी-वृत्तपत्रांनी पूर्णत्वास नेले व अगदी सर्वसामान्य वाचकांत वृत्तपत्रे लोकप्रिय केली.

आधुनिक काळातील तमिळ पत्रकारितेच्या विकास-विस्तारात काही राजकीय, सामाजिक नेते, साहित्यिक आदींचा महत्वाचा वाटा आहे. थोर राजकीय नेते व समाजसुधारक ⇨ई. व्ही. रामस्वामी नायकर  यांनी आपल्या प्रसारासाठी अनेक वृत्तपत्रे चालवली. विडूतलई व कुडियरसू ही त्यांतील दोन प्रमुख नियतकालिके होत. त्यांची शैली आवाहक व अधिकारवाणीने युक्त अशी होती. ⇨कल्कि-आर्. कृष्णमूर्तीहे प्रसिध्द तमिळ कादंबरीकार व पत्रकार होते. ते सुरुवातीला आनंद विकटन् या साप्ताहिकाचे संपादक (१९२९-४०) व नंतर कल्कि या साप्ताहिकाचे संपादक (१९४१-५४) होते.

मद्रास हेच १९४२ पर्यंत तमिळ दैनिकांचे एकमेव केंद्र होते. १९४२ साली तान्ती हे दैनिक मद्रास, मदुरा, सालेम व तिरुचिरापल्ली या ठिकाणांहून प्रसिध्द होऊ लागले. कालौघात त्याच्या मद्रास व मदुरा येथील आवृत्त्या टिकून राहिल्या. १९५२ मध्ये मदुरा येथे तमिळनाडू व कोईमतूर येथे नव इंडिया ही दैनिके सुरु झाली.

मद्रास राज्यात मोठ्या खपाची काही साप्ताहिके आहेत. त्यांत एस्. एस्. वासन यांचे आनंद विकट्न् व कल्कि ही प्रमुख आहेत. स्वतंत्र संघु हे त्रिसाप्ताहिक मान्यता पावले आहे.

तेलुगू :तेलुगूमधील सत्यदूत हे आद्य नियतकालिक १८३५ च्या सुमारास ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ‘बेल्लारी ख्रिश्चन ट्रॅक्ट सोसायटी’ च्या वतीने धर्मप्रसारार्थ चालु केले. त्यानंतरचे वृत्तांतिनी (१८३८) मंडिगल वेंकटराम शास्त्री यांनी संपादित केले. राजकीय, सामाजिक, वाङ्‌मयीन विषयांवरच्या बातम्या देणे हे त्याचे उद्दिष्ट होते व त्यात शिष्टमान्य ‘ग्रांथिक’ शैली अवलंबण्यात येत असे. ते १८४१ मध्ये बंद पडले. वर्तमान तरंगिणी हे सय्यद रहमतुल्ला यांनी १८४२ मध्ये सुरु केले. पुव्वाड वेंकटराव हे त्याचे अनेक वर्षे संपादक होते. हिंदू-मुस्लिमांमधील मैत्रीसंबंध दृढ करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. हे पुरोगामी दृष्टिकोण  असलेले वृत्तपत्र होते व त्यात नागरी, सामाजिक, शैक्षणिक, वाडमयीन आदी विषयांवर वैविध्यपूर्ण वृत्तलेख छापले जात. मच्छलीपटनम् येथील हितवादी (सु. १८६०) व बेल्लारीचे श्री यक्षिणी ही मद्रासबाहेरील नियतकालिके. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मद्रास हेच तेलुगू पत्रकारितेचे प्रमुख केंद्र राहिले. दिनवार्तामणी हे साप्ताहिक वृत्तपत्र ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविले. ⇨ कंदुकूरि वीरेशलिंगम्‌  यांनी तेलुगू भाषेतील नियतकालिकांचा व पत्रकारितेचा पाया घातला, असे मानले जाते. ते आधुनिक तेलुगू गद्याचे जनक मानले जातात. त्यांनी विवेकवर्धिनी हे साप्ताहिक १८७४ मध्ये सुरु केले. समाजसुधारणा, भाषासुधारणा व विद्येचा प्रसार हे या साप्ताहिकाचे ध्येय होते. राजशेखर चरित्र ही त्यांची कादंबरी (१८८०) या साप्ताहिकातून क्रमशः प्रसिध्द झाली. १८८५ मध्ये ते बंद पडले. आंध्र भाषासंजीवनी हे मासिक महामहोपाध्याय कोकोंडा व्यंकटरत्नम्‌ पंतुलू ह्यांनी चालवले. त्याचा काळ १८७१ ते १८८३ व १८८४ ते १९०३ असा होता. त्यात विविध विषयांचा परामर्श घेतला जाई. त्याचे व विवेकवर्धिनीचे वाद चालत. ए. सी. पार्थसारथी नायडू यांनी आंध्र प्रकाशिका हे साप्ताहिक १८८५ मध्ये सुरु केले. तेलुगू भाषेतील हे पहिले वृत्तसाप्ताहिक होय. आंध्र प्रकाशिका काँग्रेसला पाठिंबा देत असे. गोदावरी व आंध्रकेसरी ही मद्रासबाहेर प्रसिध्द होणारी उल्लेखनीय साप्ताहिके. ती राजमहेंद्रीहून निघत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पीपल्स फ्रंट (नेल्लोर), धर्मसाधनी (गुंतूर), वृत्तांतमंजिरी (मद्रास), व देशोपकारी (एलूरु) ही तेलुगू साप्ताहिके सुरु झाली होती. देवगुप्त शेषाचलराव यांचे देशाभिमानी हे पहिले तेलुगू दैनिक होय. ह्याच सुमारास साहित्य, समाजसुधारणा इ. विषयांना वाहिलेली सात-आठ साप्ताहिकेही चालू होती. ब्राह्मणेतर चळवळीचा पुरस्कार करणारे समदर्शनी हे साप्ताहिक विसाव्या शतकाच्या प्रारंभी चालु होते. या सुमारास तेलुगू साप्ताहिकांतून तेलुगू भाषेच्या शैलीविषयी वाद चालू होता. ⇨ विश्वनाथ सत्यनारायण व रामकोटेश्वर राव यांच्या जनता साप्ताहिकाने आधुनिक तेलुगूचा पाया घातला.

आंध्रपत्रिका हे तेलुगू भाषेतील पहिले यशस्वी दैनिक मानले जाते. तेलुगूमधील दैनिक वृत्तपत्रांचा इतिहास यथार्थपणे ह्याच नियतकालिकापासून सुरु होतो. हे वृत्तपत्र प्रथम साप्ताहिकरुपात १९०८ मध्ये मुंबई येथे काशीनाथुनी नागेश्वरराव पंतुलू यांनी सुरु केले. १९१४ साली त्याचे मद्रासला स्थलांतर झाले व तेथूनच ते दैनिकरुपात निघू लागले. शेषगिरी राव हे त्याचे पहिले संपादक होते. आता आंध्रपत्रिकेला एका प्रतिष्ठित संस्थेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वृत्तपत्रांच्या ‘एक्सप्रेस ग्रूप’ या गटाने १९३९ साली आंध्रप्रभा हे दैनिक चालु केले व त्याला लोकप्रियताही लाभली. खासा सुब्बाराव व न्यापती नारायणमूर्ती हे सुरुवातीच्या काळात त्याचे संपादक होते.

पुढे प्रसिध्द पत्रकार व साहित्यिक ⇨वेंकटेश्वरराव नार्ल हे आंध्रप्रभा या दैनिकाचे सु. सतरा वर्षे (१९४२-५८) संपादक होते. त्यांच्या कारकीर्दीत वृत्तपत्रीय भाषाक्षेत्रात या पत्राने क्रांती घडवून आणली. रोजच्या व्यवहारातील नित्यपरिचित बोलीभाषेचा (व्यवहारिका) वापर या पत्रात १९४० व १९५० या दशकांत प्रकर्षाने करण्यात आला. त्यातून तेलुगू गद्यालाही आधुनिक वळण लाभले. आंध्र ज्योती हे पत्र नार्ल यांनी विजयवाडा येथून १९६० मध्ये सुरु केले. ते १९७७ पर्यंत या दैनिकाचे संपादक होते. सर्वसामान्यांबरोबरच अभिजनवर्गालाही आकृष्ट करुन घेण्याकडे या पत्राचा कल राहिला आहे. हैदराबाद येथून आंध्रभूमी हे दैनिक पी. नागेश्वर राव यांच्या संपादकत्वाखाली सुरु झाले. हे तेलंगण प्रदेशाचे मुखपत्र असून, यात तेंलगण बोली काही प्रमाणात वापरलेली दिसते. आंध्र भारती, आंध्र वार्ता, आंध्र प्रजा, शशीरेखा, जनवाणी अशी काही पत्रे या दरम्यान सुरु झाली. पण ती अल्पायुषीच ठरली. राष्ट्रवादाचा वाढता प्रसार, राजकीय स्वातंत्र्याची चाहूल व देशाचे स्वातंत्र्य ह्या घडामोडींनी तेलुगू पत्रकारितेला नवी चालना दिली.

नवशक्ती हे साप्ताहिक १९३६ मध्ये सुरु झाले. पण ब्रिटिश राजवटीने १९३९ मध्ये ते बंद पाडले. प्रजाशक्ती हे साप्ताहिक १९४१ मध्ये कम्युनिस्टांचे मुखपत्र म्हणून सुरु झाले. मद्दुकुरी चंद्रशेखर राव यांच्या संपादकत्वाखाली त्याचे दैनिकात रुपांतर झाले. शोषित व पददलित वर्गातील जनतेची गाऱ्हाणी समाजापुढे आणण्याचे कार्य या पत्राने पार पाडले. पण या पत्राच्या आयुष्यात चढउतारही खूप झाले. १९४८ मध्ये सरकारने त्याच्यावर बंदी आणली पण १९५१ मध्ये त्याचे पुनरुज्जीवन साप्ताहिक-रुपात झाले. त्यानंतर ते द्विसाप्ताहिक झाले व पुढे १९५२ मध्ये त्याचे परत दैनिकात रुपांतर झाले. मात्र यावेळी त्याचे विशालांध्र असे नामांतर झाले. ते आता अखंडपणे वाढती लोकप्रियता संपादन करीत चालू आहे. आजही भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र म्हणून ते मान्यता पावले असून, सर्वसामान्यांना सहज समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत मार्क्सवादी विचारसरणीचा प्रसार करण्यात ते अग्रेसर आहे.

तेलुगूमधील आजचे सर्वाधिक खपाचे, सर्वांत लोकप्रिय दैनिक म्हणजे ईनाडू (म. शी. ‘आज’) हे होय. रामोजी राव यांनी १९७४ मध्ये विशाखापटनम् येथे ते चालू केले. तेच त्याचे सुरुवातीपासून आजतागायत मालक-संपादक आहेत. अल्पावधीतच ते हैदराबाद व अन्य ठिकाणांहून प्रसिद्ध होऊ लागले. सध्या आंध्रमधील एकूण बारा केंद्रांवरुन ते एकाच वेळी प्रकाशित होते. सध्या त्याच्या दैनिक आवृत्तीचा एकूण खप नऊ लाखांवर असून, रविवार आवृत्तीचा खप त्याहून एक लाखाने जास्तच आहे. मुख्य १४ पानी पत्राबरोबर जिल्हानिहाय स्वतंत्र रंगीत पुरवण्या (प्रत्येकी १६ पृष्ठांच्या एकूण २७ पुरवण्या) दिल्या जातात. जिल्हा-पुरवण्या दररोज वितरित करण्याची प्रथा भारतात ईनाडूनेच प्रथम निर्माण केली. शिवाय रविवारची ३२ पानी मासिकाच्या आकाराची पुरवणी दिली जाते. नानाविध विषयांवरील माहितीपर, नाविन्यपुर्ण वृत्तलेख, वेगवेगळ्या वयोगटांतील भिन्नभिन्न रूचींच्या वाचकांसाठी रंजक व माहितीपूर्ण सदरे, तसेच लिखाणात दैनंदिन व्यवहारातील साध्या, सोप्या भाषेचा वापर ही या वृतपत्राची लक्षणीय वैशिष्टे होत.

तेलुगू पत्रसृष्टीत साप्ताहिकांनाही विशेष महत्त्व आहे. कोंडा वेंकटप्पया यांनी १९०२ मध्ये कृष्णा पत्रिका हे सचित्र साप्ताहिक काढले. ते तेलुगूमधील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण साप्ताहिक होते. ते १९६९ पर्यंत चालले. वेंकटरामा नायडू यांनी सुरु केलेले जमीन रयतु व पप्पुरी रामचरलू यांनी संपादित केलेले साधना ही लोकप्रिय साप्ताहिके होत. तेलंगणमध्येही पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिकांच्या प्रकाशानानेच झाली. पहिले साप्ताहिक हितबोधिनी हे महबुबनगर येथून श्रीनिवास शर्मा यांच्या संपादकत्वाखाली १९१३ मध्ये सुरु झाले. पण १९१४ मध्ये ते बंद पडले. १९२० मध्ये दोन साप्ताहिके निघाली. त्यांपैकी तेलुगू पत्रिका हे वरंगळ जिल्ह्यातून, तर दुसरे निलगिरी हे नळगोंडा येथून प्रकाशित होऊ लागले. ही साधारण पाच वर्षे चालली. १९२५ मध्ये सुरवरम्‌ प्रताप रेड्डी यांनी गोलकोंडा हे साप्ताहिक सुरु केले. ते १९६६ पर्यंत चालले. अन्य साप्ताहिंकात जनवाणी, प्रजाबंधु, तेलुगू स्वतंत्र इ. उल्लेखनीय आहेत.

उर्दू : पहिले उर्दू वृत्तपत्र म्हणून जाम-ए-जहान्नुमा या साप्ताहिकाचा उल्लेख केला जातो. त्याचा पहिला अंक दि. २७ मार्च १८२२ रोजी प्रसिध्द झाला, असे एक मत आहे. तथापि अतिक सिद्दिकीच्या मते एप्रिल १८२२ हा प्रकाशनकाल असावा. दिल्लीमधील पहिले उर्दू वृत्तपत्र दिल्ली उर्दू अखबार (१८३६) हे होते व मौलवी मुहमद्द बाकर हे त्याचे मालक- संपादक होते. त्यानंतर लगोलग सैय्यिद-उल-अखबार हे वृत्तपत्र निघाले, त्याचे संपादक सैय्यिद मुहमद्द होते. १८५२ च्या सुमारास दिल्लीमध्ये आठ उर्दू वृत्तपत्रे होती. मद्रास येथे जामे-उल-अखबार हे साप्ताहिक वृत्तपत्र १८४० मध्ये रहमतुल्ला यांच्या संपादकत्वाखाली चालू झाले. लाहोर येथून मुनशी हरसुखराय यांनी कोहिनूर हे उर्दू साप्ताहिक १४ जानेवारी १८५० रोजी सुरु केले. लखनौहून नियमितपणे प्रसिध्द होणारे अवध अखबार हे पहिले उर्दू वृत्तपत्र नवल किशोर यांनी १८५८ मध्ये प्रसिध्द केले. प्रारंभी ते साप्ताहिक होते. त्याकाळी भरघोस पृष्ठे (४८ पृ.) व उच्च दर्जाची निर्मिती मूल्ये असलेले हे सर्वोकृष्ट वृत्तपत्र  अतिशय लोकप्रिय होते. राजकारण, सामाजिक सुधारणा व वाडमय हे विषय त्यात खासकरुन समाविष्ट होते.⇨ पंडित रतननाथ सरशार  हे १८७८ मध्ये या पत्राचे संपादक झाले. त्यांची फिसान-ए आजाद ही उर्दूतील सर्वोकृष्ट कादंबरी ह्याच पत्रातून क्रमशः प्रसिद्ध होत होती. सुरुवातीच्या काळातील बऱ्याच उर्दू वृत्तपत्रांना जहागीरदार- संस्थांनिकांचे वा ब्रिटिश शासनाचे आर्थिक साहाय्य मिळत असल्याने ती टिकून राहिली व त्यांच्या संख्येतही भर पडत गेली. १८५७ च्या उठावापूर्वी त्यांत राजकीय विषयांची थोडीफार चर्चा असे पण १८५७ नंतर ती बंद पडून शैक्षणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक विषयांना प्राधान्य मिळाले. १८५७ नंतरच्या पंचवीस वर्षांत उर्दू वृत्तपत्रांच्या संख्येत बरीच भर पडली. ह्या काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिक म्हणजे लखनौ येथून १८७७ पासून प्रसिध्द होत असलेले अवध पंच होय. विनोद व व्यंगचित्रे यांवर भर देणाऱ्या ह्या पत्राचे संपादक सय्यद सज्जाद हुसेन हे स्वतः उत्कृष्ट विनोदी लेखक, तसेच प्रखर राष्ट्रीय बाण्याचे, प्रसंगी सरकारला धारेवर धरणारे निर्भीड टीकाकार होते. हे पत्र सु. ३५ वर्षे सलगपणे चालले. ⇨सर सय्यद अहमद यांच्या संपादकत्वाखाली अलीगढ येथून निघणारे तहझीब-उल-अखलाख हे उर्दूतील दर्जेदार व प्रतिष्ठित साप्ताहिक होते. ते १८७० ते १८७६, १८७९ ते १८८१ व १८९४ ते १८९७ अशा खंडित कालावधीत प्रकाशित होत असे. सर सय्यद हेच त्याचे प्रमुख लेखक होते. आपल्या लिखाणातून त्यांनी पाश्चात्य शिक्षण व संस्कृती, तसेच विवेकनिष्ठ धार्मिक विचारसरणी यांचा प्रसार केला. मुस्लिम समाजातील जुना कर्मठपणा व अंधश्रद्धा यांवरही या पत्रातून टीका केली जाई. अब्दुल हलीम ‘शरर’ (१८६०-१९२६) यांनी दिलगुदाज हे वृत्तपत्र १८८७ मध्ये काढले. ते लखनौ व हैदराबाद येथून १९०१ पर्यंत, अधूनमधून खंडित होत चालू राहिले.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी उर्दू वृत्तपत्रांची संख्या सु. ७० होती. त्यांपैकी अवध अखबार, पैसा अखबार व सुल ए कुल ही दैनिके विशेष उल्लेखनीय होती. पंजाबचे मुनशी महबूब आलम यांनी पैसा अखबार (१८८८) या आपल्या दैनिकाने उर्दू पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध मार्गांनी क्रांती घडवून आणली. ह्या दैनिकाच्या अंकाची किंमत फक्त एक पैसा होती. पैसा अखबारचा संपादक मौलवी महबूब आलम हा स्वतंत्र व कल्पक दृष्टी असलेला धडाडीचा पत्रकार होता. त्या काळी वृत्तपत्रविद्येचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाणारा तो पहिलाच उर्दू पत्रकार असावा. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या स्थापनेनंतर उर्दू वृत्तपत्रसृष्टी नवे वळण लागले. १९०७ साली अलाहाबाद येथून उर्दू स्वराज्य हे पत्र सुरु झाले. थोर देशभक्त, प्रभावी वक्ते व पत्रकार ⇨मौलाना अबुलकलाम आझाद  यांनी लोकजागृतीच्या उद्देशाने आपले अल्‌ हिलाल हे साप्ताहिक वृत्तपत्र कलकत्ता येथून एक जून १९१२ रोजी सुरु केले. अल्‌ हिलाल राजकीय प्रश्नांत काँग्रेसचा पाठपुरावा करी. सामाजिक व धार्मिक समस्यांविषयीही त्याचे धोरण पुरोगामी असे ‘मुसलमानांचा गोवधाचा हट्ट जातीय शांततेला विघातक आहे’ असे अल्‌ हिलालने १९१३ साली बजावले होते. बातम्यांसोबत छायाचित्रे छापणारे ते पहिलेच उर्दू वृत्तपत्र होते. दोन वर्षांतच त्याचा खप दर आठवडयाला २६,००० प्रती इतका झाला. उर्दू वृत्तपत्रांबाबत हा खपाचा एक उच्चांकच होता. अल्‌ हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश शासनकर्त्यांचा रोष झाल्याने हे वृत्तपत्र बंद करावे लागले. त्यानंतर आझाद यांनी काही काळ अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र चालवले. राष्ट्रीय बाण्याचा प्रसार करणाऱ्या  वृत्तपत्रांत अल्‌ हिलालबरोबरच, कानपूर येथील हसरत मोहानीचे उर्दू-ए-मोअल्ला (१९०३), दिल्ली येथील मौलाना मुहम्मद अलीचे हमदर्द व लाहोर येथील मौलाना जफर अली खानचे जमीनदार (१९१०) ही उल्लेखनीय होत. यांव्यतिरिक्त हमीदुल अन्सारी (मदिना), मौलाना अब्दूल बारी (हमदम) प्रभृती मुस्लिम नेत्यांनीही स्वतःची उर्दू वृत्तपत्रे चालविली होती.

पहिल्या महायुद्धकाळातील निर्बंधांमुळे उर्दू वृत्तपत्रांच्या संख्येत काही वर्षे फारशी वाढ झाली नाही. १९१९ साली कृष्ण यांचे प्रताप हे उर्दू दैनिक सुरु झाले. त्याला वेळोवेळी सरकारी अवकृपेचे तडाखेही सहन करावे लागले. १९२३ साली खुशालचंद यांनी मिलाप हे उर्दू दैनिक सुरु केले. प्रताप व मिलाप ही दोन पत्रे आर्यसमाजाच्या भूमिकेचा पाठपुरावा करीत. फाळणीनंतर ती जलंदर व दिल्ली येथून प्रकाशित होऊ लागली. मिलाप हे हैदराबादहूनही निघते. १९२० साली लाला लजपतराय यांनी वंदेमातरम्‌ हे दैनिक सुरु केले. स्वामी श्रध्दानंदांनी दिल्लीत १९२३ साली तेज हे दैनिक सुरु केले. सनातनी हिंदूंचा दृष्टिकोन पुढे मांडण्यासाठी गोस्वामी गणेश दत्त यांचे वीर भारत १९२८ पासून प्रसिध्द होऊ लागले. १९३० नंतर अनेक उर्दू वृत्तपत्रे नव्याने चालू झाली. ती देशाच्या निरनिराळ्या भागांत प्रकाशित होत असत. त्यांच्यापैकी बहुतेक मुस्लिम लीगच्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा करीत, काही थोडी राष्ट्रीय मुसलमानांची भूमिका मांडीत. १९४० नंतर उर्दू वृत्तपत्रांच्या संख्येत आणखी भर पडली. त्या वर्षी शीख समाजाचे मुखपत्र म्हणून अजित सुरु झाले. त्याच्यावर ग्यानी कर्तार सिंग यांच्या मतांची छाप असे. पुढे ⇨मास्टर तारासिंग  यांच्या नेतृत्वाखालील अकाली दलाने शेर- इ- भारत हे वृत्तपत्र चालू केले. नंतर तारासिंगांनी प्रभात हे वृत्तपत्र विकत घेतले. ते पंजाबमधील श्रमिक पत्रकारांनी सहकारी तत्त्वावर सुरु केले होते. अकाली ते प्रदेशी या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. १९४२ साली कम्युनिस्ट पक्षाने नया जमाना हे साप्ताहिक मुंबईत चालू केले. १८५२ साली त्याचे जलंदरला स्थलांतर झाले. पंडित जवाहरलाल नेहरुंच्या मार्गदर्शनाखाली १९४५ पासून लखनौ येथून कौमी आवाझ प्रसिध्द होऊ लागले. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुखपत्र असून, देशाच्या अनेक भागांतून प्रसिध्द होते. त्याच वर्षी (१८४५) चौधरी खलिक उझ झमान यांनी तनवीर सुरु केले. पाकिस्ताननिर्मितीच्या चळवळीतील बॅ. महंमद अली जिनांचे एक निकटचे सहकारी व पत्रकार हमीद निझामी यांच्या संपादकत्वाखाली नवा-ई-वक्त हे राजकीय दैनिक सुरु झाले. ते अद्यापही चालू आहे. १९४७ च्या फाळणीनंतर अनेक उर्दू वृत्तपत्रांचे संसार विसकटले व त्यांना लाहोरहून दिल्लीला स्थलांतर करावे लागले.

अलीकडच्या काळात दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या उर्दू दैनिकांत तेज, मिलाप, कौमी आवाझ, सवेरा, प्रताप, अल जमियात व दावत (हे आता साप्ताहिकरुपात प्रकाशित होते) यांचा निर्देश करणे आवश्यक आहे. दिल्लीशिवाय मुंबई, हैदराबाद, कलकत्ता, लखनौ, श्रीनगर व जलंदर येथूनही दर्जेदार उर्दू वृत्तपत्रे प्रकाशित होत असतात. इन्किलाब व उर्दू टाईम्स (मुंबई), सियासत व रहनुमा- इ- डेक्कन (हैदराबाद), रोझाना हिंद (कलकत्ता), कौमी आवाझ (लखनौ), अफताब (श्रीनगर) ही काही प्रमुख उल्लेखनीय वृत्तपत्रे होते. सध्याच्या उर्दू दैनिकांमध्ये लाला जगत्‌ नारायण हे संचालक- संपादक असलेल्या, जलंदरच्या हिंद समाचारचा खप सर्वाधिक आहे.

साने, मा. वि.; इनामदार, श्री. दे.

मराठी वृत्तपत्रांचा आढावा : मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण शुक्रवार, दि. ६ जानेवारी १८३२ रोजी ⇨बाळशास्त्री जांभेकर  यांनी मुंबईतून सुरु केले. त्यापूर्वी मुंबापूर वर्तमान नावाचे वृत्तपत्र (२० जुलै १८२८) निघाल्याची नोंद आढळते. दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले. काळबादेवी रस्त्यावरील ‘मेसेंजर प्रेस’ मध्ये ते छापले जाई. दर शुक्रवारी प्रसिध्द होणाऱ्या दर्पणचा आकार १९ x ११.५ इंच होता. प्रत्येक पानावर दोन स्तंभ मजकूर असलेली आठ पाने प्रत्येक अंकात असत. या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात असे. डावीकडचा स्तंभ इंग्रजी, तर उजवीकडचा मराठी मजकुराचा असे. रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे दोन श्रीमंत गृहस्थ या पत्राचे चालक होते.

जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात ⇨भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे. स्वतः जांभेकर इंग्रजी मजकुराचे मराठीत भाषांतर करीत. १२ नोव्हेंबर १८३१ रोजी प्रसृत केलेल्या एका निवेदनामध्ये जांभेकरांनी आपल्या वृत्तपत्राची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. विलायतेतील कला, विद्या व कौशल्ये यांचा वाचकांना परिचय व्हावा, शिवाय त्यांचे मनोरंजन करावे व ‘चालते काळाची वर्तमाने’ त्यांना कळवावीत ही त्यांची उद्दिष्टे होती. जांभेकर विद्वान होते. दर्पणमध्ये त्यांनी कोणताही विषय वर्ज्य मानला नाही. हिंदू विधवांचा पुनर्विवाह, धंदेशिक्षणाची आवश्यकता, बंगाली रंगभूमी, रहदारी- जकात असे नानाविध विषय दर्पणमध्ये आले आहेत. ‘वाचकांची पत्रे’ दर्पणकार आवर्जून छापत, मात्र स्तुतीची पत्रे टाळीत. दर्पणचा खप वर्षभरात तीनेशे प्रतींवर गेला होता. एका बदनामीच्या खटल्यात जांभेकर यांना आठशे रुपये दंड झाला. बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण बंद पडले (१८४०). ते बंद पडल्यावर त्याच्या चालकांनी युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक सुरु केले.खुद्द जांभेकरांनी  १८४० च्या मे महिन्यात दिग्दर्शन हे मराठी नियतकालिक सुरु केले. ते साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांना वाहिलेले भारदस्त मासिक होते. पूर्णपणे मराठी भाषेतील मजकुराचे वृत्तपत्र म्हणून मुंबई अखबारचा निर्देश करावा लागेल. ४ जुलै १८४० रोजी त्याचा पहिला अंक प्रसिध्द झाला. तीन स्तंभांत मजकूर प्रसिध्द होई. प्रांतोप्रांताच्या बातम्या, भाषांतरे, पत्रकर्त्याच्या सूचना असे त्याच्यातील मजकुराचे स्वरुप होते. ते दर शनिवारी प्रसिध्द होई. दर्पण बंद करुन त्याच्याच चालकांनी हे वृत्तपत्र सुरु केले. असे उपलब्ध अंकांवरुन दिसते. याच सुमारास जून १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ति मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते. मराठी विभागाचे संपादन शाहूराव कुकडे करीत असत. ज्ञानोदयच्या संपादकांमध्ये कवी रेव्हरंड ना. वा. टिळक, देवदत्त नारायण टिळक, रेव्हरंड दि. शं. सावरकर यांच्या नावांचा उल्लेख करावा लागतो.

दर्पणच्या परंपरेतील प्रभाकर हे वृत्तपत्र २४ ऑक्टोबर १८४१ रोजी सुरु झाले. प्रभाकरची प्रेरणा सामाजिक परिवर्तनाची होती. भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. त्यांनी निष्ठेने पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. प्रभाकर शिळाप्रेसवर दोन स्तंभांमध्ये छापला जाई. त्याची वार्षिक वर्गणी त्या काळी बारा रुपये होती. प्रभाकरमध्ये इंग्रजी बातम्यांचे भाषांतर व संकलन असे. त्याचबरोबर संपादकीय टीपा, स्फुटे, वाचकांची पत्रे यांचाही समावेश असे. प्रभाकरचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रसिध्द झालेली शतपत्रे. ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ⇨लोकहितवादी  लिहीत असत. मिशनऱ्यांच्या धार्मिक आक्रमणावर आणि एतद्देशीय समाजाच्या अनिष्ट रुढींवर भाऊ महाजन हल्ला चढवीत. महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत प्रभाकरची कामगिरी महत्त्वाची आहे. हे साप्ताहिक १८६५ साली बंद पडले. प्रभाकरशी स्पर्धा करणाऱ्या वर्तमानदीपिका या वृत्तपत्राला तोंड देण्यासाठी भाऊ महाजन यांनी धूमकेतू (१८५३) नावाचे वृत्तपत्र काढल्याची नोंद आढळते.

मुंबईनंतर पुण्यातून वृत्तपत्रे निघू लागली. पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते १८४४ मध्ये निघाले पण लवकरच बंद पडले. ज्ञानप्रकाशपासून पुण्यातील वृत्तपत्र व्यवसायाला व पत्रकारितेला खर्यान अर्थाने प्रारंभ झाला. १२ फेब्रुवारी १८४९ रोजी ज्ञानप्रकाश सुरु झाले. १८५३ मध्ये ते द्विसाप्ताहिक झाले. या पत्राची मालकी सु. ६० वर्षे कृष्णाजी त्रिंबक रानडे यांच्याकडे होती. १५ ऑगस्ट १९०४ रोजी त्याचे रुपांतर दैनिकात झाले. ⇨ वासुदेव गोविंद आपटे संपादक असताना हे रुपांतर घडले. १९०९ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले. त्यानंतर नेमस्तांचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली. ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार ⇨हरी नारायण  आपटे यांना मिळाला. त्यानंतर नरेश अप्पाजी द्रविड, गोपाळराव देवधर, वामनराव पटवर्धन, श्री. ग. वझे, कृ. ग. तथा काकासाहेब लिमये आणि शं. गो. गोखले यांनी ज्ञानप्रकाशचे संपादकपद भूषविले. ‘सत्य, सौख्य आणि ज्ञान’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते. साप्ताहिकरुपातील ज्ञानप्रकाश दर सोमवारी प्रसिध्द होई. १८६३ ते १८९७ या दरम्यान मराठीबरोबरच इंग्रजीतूनही मजकूर प्रसिध्द होई. महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ज्ञानप्रकाशमधून लेखन करीत. या वृत्तपत्राच्या सु. शंभर वर्षांच्या वाटचालीत सर्वाधिक ठसा कृ. ग. ऊर्फ काकासाहेब लिमये (१८९२ -१९४८) ह्यांनी उमटविला. अप्रिय अशा मवाळ राजकीय धोरणाचे वृत्तपत्र त्यांनी आपल्या संपादकीय कर्तृत्वाने लोकप्रिय केले. वृत्तपत्र हे केवळ मतपत्र नसून ते बातम्या देणारे पत्र आहे, ही जाणीव त्यांनीच निर्माण केली. बातमीचे क्षेत्र त्यांनी व्यापक केले. दैनिकाची वृत्तपत्रकारिता सुरु करण्याचे श्रेय काही प्रमाणात लिमयांना द्यावे लागते. त्यांनी ज्ञानप्रकाशला लोकाभिमुख बनविले. १ जून १९२९ रोजी त्यांनी या वृत्तपत्राची मुंबई आवृत्ती सुरु केली. शंभर वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या दैनिकाचा शेवटचा अंक ३१ डिसेंबर १९५० रोजी प्रकाशित झाला.

जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले. ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता. इंदुप्रकाश इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध होई. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत. १९०२ साली त्याचे दैनिकात रुपांतर झाले. राजकारण, समाजकारण व अर्थकारण यांवर या पत्रात भर देण्यात येई. न्यायमूर्ती रानडे यांच्या विद्वत्तेची छाप ह्यावर होती. सर दिनशा वाच्छा, न्यायमूर्ती तेलंग, परशुरामशास्त्री रानडे, प्रा. दा. ग. पाध्ये, विष्णुपंत भाटवडेकर यांसारख्या त्या काळातील प्रसिध्द विद्वानांचे लेख इंदुप्रकाशमध्ये प्रसिध्द होत. ⇨विष्णु परशुरामशास्त्री पंडित  हे १८६४ मध्ये इंदुप्रकाशचे संपादक झाले. आपल्या संपादकीय कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सुधारणांवर भर दिला, १९०४ मध्ये इंदुप्रकाशचे प्रकाशन स्थगित झाले.

रावसाहेब ⇨ वि. ना. मंडलिक  यांनी १८६४ मध्ये नेटिव्ह ओपिनियन हे इंग्रजी साप्ताहिक सुरु केले. १८६६ मध्ये या वृत्तपत्रात मराठी विभाग सुरु झाला. नारायण महादेव ऊर्फ ⇨ मामा परमानंद हे काही काळ या वृत्तपत्राचे संपादक होते.

याच सुमारास विरेश्वर ऊर्फ तात्या छत्रे यांचे ज्ञानसिंधु (१८४२), ⇨ कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे  विचारलहरी (१८५२), हिंदु पंच (१८७२) ही वृत्तपत्रे निघाली. मराठी वृत्तपत्रांतून व्यंगचित्रे छापण्याची प्रथा हिंदु पंचने सुरु केली. ‘न्यू इंग्लिश स्कूल’ शी संबंधित असलेल्या सहा तरुणांनी (त्यात प्रामुख्याने चिपळूणकरांसह लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी) ⇨ विष्णुशास्त्री चिपळूणकर  यांच्या निबंधमालेतून स्फूर्ती घेऊन मराठा व केसरी ही इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे अनुक्रमे २ जानेवारी व ४ जानेवारी १८८१ रोजी पुण्यातून प्रकाशित करण्यास सुरुवात केली.⇨ लोकमान्य टिळक हे मराठाचे पहिले संपादक, तर ⇨गोपाळ गणेश आगरकर  हे केसरीचे पहिले संपादक होते.

केसरीच्या प्रकाशनापूर्वी त्याविषयीचे जाहिरातवजा निवेदन निबंधमालेत व नेटिव्ह ओपिनियनमध्ये प्रसिध्द झाले आहे. त्याखाली विष्णुशास्त्री चिपळूणकर, बा. ग टिळक, गो. ग. आगरकर, वामनराव आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गणेश कृष्ण गर्दे अशा सहाजणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ते निवेदन असे: “ वरील केसरी नावाचे वर्तमानपत्र निव्वळ महाराष्ट्र भाषेत येत्या १८८१ सालच्या आरंभापासून दर मंगळवारी काढण्याचा विचार खालील मंडळीने केला आहे. या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरणे, व्यापारासंबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच पण याखेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथांवर टीका वगैरे विषयांचाही त्यात समावेश केला जाईल. तसेच विलायतेत ज्या राज्यप्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकांस समजणे अवश्य असल्यामुळे त्याचाही सारांशरुपाने यात संग्रह करण्याचा बेत केला आहे. आजपर्यंत वरील तीन विषयांवर- म्हणजे देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण- या विषयांच्या संबंधाने जसे यथास्थित उद्‌घाटन व्हावयास पाहिजे होते तसे कोणत्याही वर्तमान- पत्रात झाले नाही, असे म्हणण्यास हरकत नाही. तर ही मोठी उणीव नाहीशी करुन टाकण्याचे आम्ही मनात आणले आहे.” केसरीच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावरील निवेदनही बोलके आहे. त्यातील काही भाग असा: “तर सरकारी अधिकारी आपापली कामे कोणकोणत्या तऱ्हेने बजावतात याविषयी केवळ निःपक्षपात बुध्दीने व कोणाची भीड न बाळगता मजकूर लिहिण्याचा आमचा इरादा आहे. अमुक अमुक गोष्ट केली तर तिजवर चर्चा केली असता सरकारची मर्जी जात राहील वगैरे क्षुद्र विचारास आम्ही कधी थारा देणार नाही. वर्तमानपत्रकर्ते हे रयतेचे कोतवाल व वकील होत. तर हे दोन्ही अधिकार होईल तितक्या दक्षतेने बजावण्याचा आम्ही संकल्प केला आहे.”

पहिली सात वर्षे आगरकर हे केसरीचे संपादक होते. कोल्हापूर गादीच्या प्रकरणात टिळक व आगरकर या दोघांना चार महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. १८८४ पासून उभयतांतील मतभेद वाढत गेले. हे मतभेद राजकीय-सामाजिक प्रश्नांप्रमाणेच काही अंशी व्यक्तिगत पातळीवरीलही होते. केसरी- मराठा संस्था आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा दोन्ही ठिकाणी मतभेद वाढत गेल्यामुळे टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली, तर आगरकरांनी केसरीच्या संपादकपदाचा त्याग केला.

जहाल राष्ट्रवादी चळवळीचे मुखपत्र म्हणून लोकमान्य टिळक यांनी केसरीला आकार दिला. टिळकांनी पत्रकारिता त्यांचा राजकीय नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचाच एक अविभाज्य भाग होती. हिंदु-मुस्लिम दंगली, दुष्क़ाळ, प्लेगची साथ, वंगभंगाची चळवळ अशा महत्वाच्या घटनाप्रसंगी टिळकांनी केलेले लेखन मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अजरामर ठरले आहे. आक्रमक व धारदार शैलीतील त्यांचे अग्रलेख राजकीय जागृतीचे साधनच बनले होते.

‘शिवाजीचे उद्‌गार’ या १५ जून १८९७ रोजी प्रसिध्द झालेल्या कवितेमुळे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दीड वर्ष कारावासाची शिक्षा झाली. १९०४ मध्ये राष्ट्रीय चळवळीचा जोर वाढत गेल्यावर टिळकांचे लेखनही अधिक आक्रमक व जहाल बनले. २४ जून १९०८ रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा शिक्षा झाली. ही शिक्षा सहा वर्षांची होती. ती मंडाले येथे भोगावी लागली. केसरीत प्रसिध्द झालेले हे लेखन ⇨कृष्णाजी प्रभाकर  खाडिलकर यांचे होते. परंतु टिळकांनी त्याची जबाबदारी संपादक या नात्याने स्वतःकडे घेतली. १९०८ ते १९१० पर्यंत खाडिलकर व १९१० ते १९१८ पर्यंत केळकर यांनी संपादकाची जबाबदारी सांभाळली. १९१८ ते १९२० या काळात टिळक व केळकर विलायतेस गेल्यामुळे खाडिलकरांनीच संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. १९२० मध्ये खाडीलकरांनी केसरी सोडला. १९२१ मध्ये ते लोकमान्य या मुंबईतील वृत्तपत्राचे संपादक झाले. १९२३ साली त्यांनी स्वतःचे नवाकाळ हे वृत्तपत्र काढले. १९२० नंतरची केसरीची संपादकीय परंपरा अशी न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर (१९१० ते १९३२), वा. कृ. भावे (१९३२-३३), जनार्दन सखाराम करंदीकर (१९३३-४६), दा. वि. ऊर्फ बाबूराव गोखले (१९४६-४७), ग. वि. केतकर (१९४७-५०), जयंतराव टिळक (१९५०-८०), त्यानंतर चंद्रकांत घोरपडे व डॉ. शरच्चंद्र गोखले हे केसरीचे संपादक झाले. अरविंद व्यं. गोखले हे केसरीचे विद्यमान संपादक होत (२००१).

केसरी १९२९ साली द्विसाप्ताहिक झाला. २ जून १९५० रोजी लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक केसरीचे संपादक झाले. त्यांनी केसरीची रविवार आवृत्ती सुरु केली, त्यामुळे त्याचे रुपांतर त्रिसाप्ताहिक झाले. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी केसरीचे दैनिकात रुपांतर झाले. जयंतराव टिळक १९८० पर्यंत संपादकीय होते. केसरीने सोलापूर, सांगली व अहमदनगर येथून स्वतंत्र आवृत्त्या प्रकाशित करण्यास आरंभ केला आहे. सोलापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या आवृत्तीचे नाव केसरी गर्जने (केसरीची गर्जना) असे आहे, तर सांगलीहून प्रसिध्द होणाऱ्या  आवृत्तीचे दक्षिण महाराष्ट्र केसरी असे नामकरण करण्यात आले आहे. केसरीने १९९८ पासून चिपळूणहून आवृत्ती प्रकाशित करण्यास प्रारंभ केला आहे. केसरीने शंभराहून अधिक वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रवादाची आपली भूमिका कायम ठेवली आहे. काळानुसार व संपादकांनुसार धोरणात काही बदल झाले, तरी मूळ बैठक फारशी बदललेली नाही.

केसरीच्या पाठोपाठ महाराष्ट्रात जी काही वृत्तपत्रे निघाली, त्यांत सुधारक, काळ आणि संदेश या वृत्तपत्रांची कामगिरी मोलाची आहे. १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुधारकचा साप्ताहिकरुपात पहिला अंक निघाला. सुरुवातीच्या काळात सुधारक वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमधून मजकूर प्रसिध्द होई. नामदार⇨गोपाळ कृष्ण गोखले आगरकरांना सहकार्य करीत व इंग्रजीतून लेखन करीत. आगरकारांनी मृत्युपर्यंत (१८९५) सुधारक स्वतः चालविले. आगरकरांच्या पश्चात सीतारामपंत देवधर यांनी सुधारक चालविले. त्यांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सहाय्य केले. देवधर स्वतः शिक्षक होते. त्यांना ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या नियमामुळे सुधारकचे काम सोडावे लागले. त्यानंतर विनायक रामचंद्र जोशी व हरी नारायण आपटे यांनी संपादकीय जबाबदारी सांभाळली. दोघांनाही ज्ञानप्रकाशमधील पत्रकारितेचा अनुभव होता. मात्र दोघांनाही ही जबाबदारी पेलली नाही. ३ जुलै १९१६ रोजी सुधारक बंद पडले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सुधारक वृत्तपत्राच्या माध्यमातून आगरकरांनी केलेले लेखन आधुनिक जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारे आहे.⇨शिवराम महादेव परांजपे  यांनी २५ मार्च १८९८ रोजी काळ हे साप्ताहिक सुरु केले. पारतंत्र्याची चीड आणि स्वातंत्र्याचा ध्यास यांतून हे वृत्तपत्र सुरु झाले. पारतंत्र्य, गुलामगिरी आणि ब्रिटिशांची दडपशाही हे परांजपे यांच्या लेखनाचे विषय असले, तरी काव्यमय आणि कल्पनारम्य लेखन करण्यात परांजपे यांची लेखणी रमत असे. उपहास आणि वक्रोक्ती ही त्यांच्या शैलीची दोन मोठी बलस्थाने होती. १९०४ मध्ये ब्रिटिश सरकारने टाइम्स वृत्तपत्राच्या मदतीने परांजप्यांना राजद्रोहाच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न केला. टाईम्सने काळमधील काही लेखन इंग्रजीत अनुवाद करुन छापले परंतु हे लेखन कायद्याच्या कचाटयातून सुटले. मात्र १५ मे १९०८ च्या काळच्या अंकातील लेखन राजद्रोही ठरवून परांजपे यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यात त्यांना एकोणीस महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा झाल्यावर परांजपे यांच्या निबंधांचे संग्रह जप्त करण्यात आले. तुरुंगातून सुटून आल्यावर सरकारने काळकडे जामीन मागितला. त्यामुळे १९१० साली परांजपे यांना काळ बंद करावे लागले. त्यानंतर दहा वर्षे परांजपे पत्रकारितेपासून दूर राहिले. १२ ऑगस्ट १९२० रोजी   त्यांनी स्वराज्य हे साप्ताहिक सुरु केले. १९२७ पर्यंत चाललेल्या या साप्ताहिकातील लेखन मात्र काळसारखे नव्हते.

भास्कर बळवंत भोपटकर यांनी ५ एप्रिल १९०५ रोजी  भालाचा पहिला अंक प्रकाशित केला. भोपटकर टिळकांचे भक्त असले, तरी त्यांचा भर राजकारणापेक्षा धर्मकारणावर जास्त होता. ‘नरकाचा दरबार’ या लेखाकरिता भोपटकर यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा महिन्यांची शिक्षा झाली. त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांचे बंधू लक्ष्मण बळवंत ऊर्फ अण्णासाहेब भोपटकर यांनी  भाला चालविले. सरकारी दडपशाहीमुळे नोव्हेंबर १९१० मध्ये भाला बंद पडले. १९२५ साली पुन्हा भाला सुरु करण्यात आले. विरोधकांची खिल्ली उडविणे हाच भालाकारांचा छंद होता. १९३५ पर्यंत हे वृत्तपत्र चालले.

लोकमान्य टिळक यांच्या राजकारणाचे आणि विचारांचे पुरस्कर्ते असणाऱ्या ⇨अच्युत बळवंत कोल्हटकर  यांनी १४ जानेवारी १९१५ रोजी मुंबईतून संदेश हे वृत्तपत्र दैनिकरुपात सुरु केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत संदेशमुळे नावीन्य आले. कोल्हटकर हाडाचे पत्रकार होते. संदेशखेरीज दहा- बारा वृत्तपत्रांशी कोल्हटकर निगडित होते. त्यांत मेसेज (इंग्रजी, १९१७), इंदुप्रकाश, स्वातंत्र्य, सुदर्शन, युगांतर, चाबूक, चाबूकस्वार, संजय, वंदेमातरम्‌, डेली न्यूज (इंग्रजी), विदूषक अशा लहानमोठया वृत्तपत्रांचा समावेश होता. मात्र कोल्हटकर यांचे कर्तृत्व संदेशमुळे गाजले. कोल्हटकर यांनी मराठी पत्रकारितेत आधुनिकता आणली. चौफेर बातम्या, चुरचुरीत सदरे, सोपी आकर्षक भाषा, नेटकी मांडणी ही संदेशची वैशिष्ट्ये होती. त्यातील ‘वत्सला वहिनींची पत्र’ हे सदर लोकप्रिय होते. जहाल आणि मवाळ राजकारणावर खुसखुशीत भाष्य करणारे लेखन या सदरात प्रसिध्द होई. सदरातील मजकुराची भाषा, मथळे, लेखनातील दाखले हे सर्व बायकी ढंगाचे होते. स्वतः कोल्हटकर व दाजीसाहेब तुळजापूरकर असे दोघे मिळून हे सदर लिहीत. नाट्यपरीक्षणे, क्रिकेटच्या सामन्यांची वर्णने, काँग्रेस अधिवेशनाचे वृत्तांत हेही संदेशचे वैशिष्टय होते. सर्वसामान्य वाचक नजरेपुढे ठेवून कोल्हटकर यांनी हे वृत्तपत्र चालविले. १९२१ मध्ये संदेश बंद पडले. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर १५ ऑगस्ट १९२० रोजी संदेशने खास ‘लोकमान्य अंक’ प्रसिध्द केला. हा ५६ छापील पानांचा अंक कोल्हटकरांनी एकटाकी लिहिला.

टिळक यांच्या निधनानंतर १९२१ मध्ये मुंबईहून लोकमान्य दैनिक सुरु झाले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्याचे पहिले संपादक होते. मात्र १९२३ साली मतभेदामुळे खाडिलकरांनी संपादकपद सोडले. त्यानंतर रा. ना. मंडलिक, बा. गं. खेर, ल. ब. भोपटकर यांनी संपादकपद सांभाळले पण १९२५ मध्ये ते बंद पडले. १९३५ मध्ये पुन्हा लोकमान्य सुरु झाले. पां. वा. गाडगीळ त्याचे काही काळ संपादक होते.

खाडिलकर यांनी लोकमान्य सोडल्यावर स्वतःचे नवाकाळ हे दैनिक मुंबईतून ७ मार्च १९२३ रोजी सुरु केले. या वृत्तपत्रातील लेखनाबद्दल १९२९ साली संपादक या नात्याने खाडिलकर यांच्याविरुध्द राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव य. कृ. खाडिलकर संपादक झाले. त्यानंतर नीलकंठ खाडिलकर आणि त्यांच्या कन्या जयश्री खाडिलकर- पांडे या नवाकाळची जबाबदारी सांभाळत आहेत. नीलकंठ खाडिलकर यांनी १९८० नंतरच्या दशकात नवाकाळ हे दैनिक मुंबईत अफाट लोकप्रिय केले. १९९० च्या दशकात त्याचा खप तीन लाखांवर गेला होता. कष्टकरी व गिरणगावातील कामगार हा त्याचा प्रामुख्याने मोठा वाचकवर्ग आहे.

संदेश, नवाकाळ या वृत्तपत्रांच्या पाठोपाठ मुंबईतून प्रभात हे वृत्तपत्र पांडुरंग महादेव भागवत यांनी २१ नोव्हेंबर १९२९ रोजी सुरु केले. आपले वृत्तपत्र बहुजन समाजाचे असावे, अशी भागवत यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार हे वृत्तपत्र चालविण्याचा आणि लोकप्रिय करण्याचा प्रयत्न श्रीपाद शंकर नवरे यांनी केला. आकर्षक मथळा, चटपटीत मजकूर, खुलवून लिहिलेली बातमी हे प्रभातचे वैशिष्टय होते. १९३४ मध्ये नवरे या वृत्तपत्राचे संपादक झाले परंतु प्रत्यक्षात १९३८ पासून त्यांचे नाव छापले जाऊ लागले. प्रभातने कामगार भागात जम बसविला. त्याचे क्षेत्र मुंबईपुरते मर्यादित होते. परंतु भागवत व नवरे यांनी काटकसरीने वृत्तपत्र चालवून अत्यल्प किंमतीत वाचकांना अंक देण्याचा प्रयत्न केला. १९४१-४२ साली हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडले. त्या काळात राजा बहादूर नारायण बन्सीलाल पित्ती यांच्याकडे त्याची मालकी गेली. पित्ती यांनी  धोरण न बदलता वृत्तपत्र चालविले. १ ऑक्टोबर १९४७ मध्ये पुन्हा ते मूळ मालकांकडे परत आले. २६ नोव्हेंबर १९५० रोजी अखेरचा अंक प्रसिध्द होऊन प्रभात बंद पडले. १९३७ मध्ये प्रभातची पुणे आवृत्ती प्रसिद्ध होऊ लागली होती. या आवृत्तीची मालकी वा. रा. कोठारी यांनी १९३८ साली घेतली. ते त्याचे संपादक होते. कोठारी हे कार्यकर्ता- संपादक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला कोठारी यांच्या प्रभातने मनःपूर्वक पाठिंबा दिला. चळवळीचे विस्तृत वार्तांकन आणि चळवळीच्या समर्थनार्थ अग्रलेख लिहिण्यात कोठारी आघाडीवर होते.

तरुण भारत हे दैनिक मुळात साप्ताहिकरुपात २० जानेवारी १९२६ रोजी नागपूर येथून  सुरु झाले. नागपूरचे ज्येष्ठ राजकीय नेते मोरोपंत अभ्यंकर यांच्या प्रेरणेने हे सुरु झाले. डॉ. ना. भा. खरे हे त्याचे पहिले संपादक होत. १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत डॉ. खरे यांना अटक झाल्यावर काही काळ त्याचे प्रकाशन स्थगित झाले. १९३२ मध्ये अभ्यंकर यांनी हे वृत्तपत्र पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रत्यक्षात आला नाही. १९३२ मध्ये मध्यवर्ती असेंब्लीच्या निवडणुकीनंतर अभ्यंकर यांनी पुन्हा वृत्तपत्राचा प्रस्ताव मांडला पण त्यांच्या निधनाने तो मागे पडला. त्यानंतर अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ ‘नरकेसरी स्मारक मंडळा’ ची (ट्रस्ट) स्थापना झाली. या मंडळाने साप्ताहिक तरुण भारत हे दैनिकरुपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे २ जानेवारी १९४४ रोजी या दैनिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. प्रख्यात कादंबरीकार व समीक्षक⇨ग. त्र्यं. माडखोलकर  हे या दैनिक वृत्तपत्राचे पहिले संपादक होत. माडखोलकर १९६७ पर्यंत या दैनिकाचे प्रमुख संपादक होते. त्यांच्या नंतर पां. चि. ऊर्फ तात्यासाहेब करकरे, मा. गो. वैद्य आणि दिगंबर धुमरे यांनी संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. माडखोलकर यांची संपादकीय कारकीर्द त्यांच्या शैलीदार अग्रलेखांमुळे लक्षणीय ठरली. त्यांच्यामुळे या वृत्तपत्राला विदर्भात प्रतिष्ठा आणि स्थैर्य लाभले. २० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली. १९६७ मध्ये आर्थिक अडचणींमुळे पुण्याच्या तरुण भारतमध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. कर्मचारी- कपात करण्यात येऊन तरुण भारतचे चालकत्व नरकेसरी प्रकाशनाने पुण्याच्या ‘राष्ट्रीय विचारप्रसारक मंडळा’ कडे सोपविले. १९६८ च्या ऑगस्ट महिन्यात पुणे आणि नागपूरच्या तरुण भारतची फारकत झाली. केतकर १९६४ पर्यंत संपादक होते. पुढे चं. प. भिशीकर, वि. ना. देवधर आणि चि. द. पंडित यांनी संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. १९८९-९० मध्ये आर्थिक अडचण व कामगारतंटयामुळे पुण्याच्या तरुण भारतचे प्रकाशन स्थगित झाले. नागपूरप्रमाणे मुंबई, सोलापूर, औरंगाबाद आणि नासिक येथून तरुण भारतच्या स्वतंत्र आवृत्त्या वेगवेगळ्या विश्वस्त संस्थांच्या वतीने प्रसिध्द होतात. प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनसंघ, त्यानंतर रा. स्व. संघ- भारतीय जनता पक्ष यांच्या राजकीय विचारांचा आणि धोरणांचा पुरस्कार या वृत्तपत्राने सातत्याने केला आहे.

समकालीन वृत्तपत्रांचा सखोल अभ्यास करुन डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांनी १ जानेवारी १९३२ पासून पुण्यात दैनिक सकाळ हे वृत्तपत्र सुरु केले. ज्ञानप्रकाशच्या संचयिकांचा बारकाईने अभ्यास करुन दैनिक वृत्तपत्रांत आपले वेगळेपण कसे निर्माण करता येईल, याचा विचार परुळेकरांनी केला. ते सकाळचे संस्थापक- संपादक होते. मात्र १९३६ ते १९५२ या काळात रा. ब. ऊर्फ बाबासाहेब घोरपडे हे या दैनिकाचे संपादक होते. सकाळपासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत एक नवे पर्व सुरु झाले. दैनिकाची पत्रकारिता परुळेकरांनी रुजविली व वाढविली. बातमीची कक्षा आणि क्षेत्र विस्तारले. १९३२ पासून ते १९७३ पर्यंत- म्हणजे परुळेकरांच्या निधनापर्यंत- ते अखंडपणे बेचाळीस वर्षे पत्रकार म्हणूनच वावरले. लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकसेवा ही सकाळच्या पत्रकारितेची त्रिसूत्री होती व तीच कायम राहिली आहे. बातम्यांचे क्षेत्र जसे विस्तारले, तसेच बातम्यांची भाषाही बदलली. वृत्तपत्रीय भाषेत सकाळने मोठे परिवर्तन घडविले. वृत्तपत्र हे केवळ मूठभर उच्च शिक्षितांसाठी नसून ते व्यापक असे जनसंज्ञापनाचे माध्यम आहे, याची जाण आणि दूरदृष्टी परुळेकरांना होती. त्यांनी परदेशातील वास्तव्यात तेथील वृत्तपत्रांची पाहणी केली. लोकमान्य टिळक यांचा आदर्श व न. चिं. केळकर यांचे मार्गदर्शन यांतून परुळेकर पत्रकारितेकडे वळले. ‘रोजची बातमी गोळा करुन स्वदेश व परदेश यांत एकाच वेळी काय चालले आहे याची कल्पना मराठी वाचकास जितक्या पूर्णतेने देता येईल तितकी देऊन विचार करण्यास लागणारी सामग्री जनतेला पुरवावी अशी आमची योजना आहे’, असे निवेदन सकाळ प्रकाशित करताना परुळेकरांनी केले होते. त्यातील प्रयोजनाशी सकाळची बांधिलकी कायम राहिली आहे. विविध क्षेत्रांतील बातम्या देण्यावर परुळेकरांनी भर दिला. त्यांच्या निधनानंतर (१९७३) श्री. ग. मुणगेकर, एस. के. कुवळेकर यांनी सकाळचे संपादकपद भूषविले. कुवळेकर यांच्यानंतर अनंत दीक्षित संपादक झाले. सकाळने १ ऑगस्ट १९८० पासून कोल्हापूर येथून स्वतंत्र आवृत्ती प्रकाशित करण्यास प्रारंभ केला, तसेच नासिकहूनही स्वतंत्र आवृत्ती प्रसिध्द होते. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या  मुंबई सकाळचे प्रकाशन १९९७ पासून बेलापूर येथून सकाळ या नावाने होत आहे.

सकाळच्या पाठोपाठ पुण्यात त्रिकाळ हे दैनिक १९३५ साली निघाले. सकाळमधून बाहेर पडलेले शि. ल. करंदीकर यांनी हे वृत्तपत्र सुरु केले परंतु ते अल्पावधीतच बंद पडले. त्रिकाळच्या जागी काळ हे वृत्तपत्र कट्टर हिंदुत्ववादी नेते शं. रा. उर्फ मामाराव दाते यांनी १९४० साली काढले. १९३५ साली लोकशक्ती हे द्विसाप्ताहिक पुण्यातून प्रकाशित होऊ लागले. आचार्य ⇨शं. द. जावडेकर  त्याचे संपादक होते. काँग्रेसला पाठिंबा देणारे हे वृत्तपत्र १९३७ पासून दैनिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. जावडेकर (१९५५) यांच्यानंतर ह. मो. जोशी, नरुभाऊ लिमये यांनी या दैनिकाचे संपादकपद सांभाळले. लोकशक्तीला आर्थिक बळ न लाभल्यामुळे एप्रिल १९५७ मध्ये ते बंद पडले. १९३५ ते १९५० या काळात पुण्यातून लोकमत, लोकहित, नवभारत, अग्रणी यांसारखी दैनिके प्रसिद्ध होत होती.

ब्राह्मणेतरांची पत्रकारिता : मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या पत्रांनी बजावलेली कामगिरी महत्त्वाची आहे. ब्राह्मणेतरांची स्वतंत्र पत्रे निघणे गरजेचे आहे, असे ⇨महात्मा जोतीराव फुले  यांचे मत होते. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत, या भुमिकेतून निघालेले पहिले पत्र म्हणजे कृष्णराव भालेकर (१८५०-१९१०) यांचे दीनबंधू. पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी भालेकरांनी ते सुरु केले. पुढे आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते चालविता आले नाही, त्यामुळे १८८० साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगारनेते ⇨नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संताजी आवटे यांच्या स्वाधीन केले. लोखंडे यांनी हे पत्र मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांनी ते बरीच वर्षे चालविले. परंतु लोखंडे यांच्या मृत्यूनंतर (१८९७) त्याची परवड झाली व ते बंद पडले. १९०५ मध्ये दामोदर सावळाराम यंदे आणि वासुदेवराव लिंगोजीराव बिर्जे यांनी या पत्राला आधार दिला. या पत्राने ब्राह्मणेतरांचा केवळ कैवार घेतला असे नाही, तर ब्राह्मणेतरांमधील स्वत्वही जागविले. सामाजिक विषमतेला वाचा फोडण्यासाठी व बहुजन समाजातील बंडखोर प्रवृत्तीला प्रोत्साहन व दिशा देण्यासाठी या पत्राचा वापर करण्यात आला. चिपळूणकरांनी फुले यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार भालेकरांनी या पत्रांतून घेतल्याचे दिसते. भालेकरांचे लेखन चुरचुरीत होते. ब्राह्मणी पत्रांतून सत्यशोधकांचा उल्लेख सतत बाटगे, नास्तिक, धर्मद्रोही, सरकारचे बगलबच्चे असा होत असे. भालेकर त्यास समर्थपणे तोंड देत. फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूडचे दोन भाग प्रथम दीनबंधूत प्रकाशित झाले. १९०५ नंतर बिर्जे यांच्याकडे या पत्राची सुत्रे होती. ‘मराठा समाजाचे शिक्षण व सुधारणा’ ही लेखमाला बिर्जे यांनी लिहिली. त्यातून ‘मराठा शिक्षण परिषद’ अस्तित्वात आली. १९०८ मध्ये बिर्जे यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती तानुबाई यांनी काही काळ दीनबंधू चालविण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही. पुढे १९२७ मध्ये वि. मा. नवले यांनी या पत्राचे पुनरुज्जीवन केले.

दीनबंधूप्रमाणेच दीनमित्र हेही ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने हे पत्र गाजले. मुकुंदराव पाटील यांनी ते तीस वर्षे चालविले. मुळात १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले. १८९२ मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे पत्र बंद पडले. त्यांचे दत्तकपुत्र मुकुंदराव पाटील यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी २३ नोव्हेंबर १९१० रोजी ते साप्ताहिकरुपात पुन्हा सुरु केले. ग्रामीण भागातून-सोमठाणे येथून-हे पत्र प्रसिद्ध होऊ लागले. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या गावाहून प्रकाशित होई. मुकुंदराव हे तत्वनिष्ठ संपादक व कट्टर सत्यशोधक होते. केवळ ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्धच नव्हे, तर काही वेळा मराठे व संस्थानिकांविरुद्धही त्यांची लेखणी चाले.

ब्राह्मणेतर चळवळीचे एक अध्वर्यू दिनकरराव जवळकर (१८९८-१९३२) यांची पत्रकारितेतील कामगिरीही महत्त्वाची आहे. शाहू महाराजांच्या इच्छेनुसार त्यांनी १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले. फेब्रुवारी १९२८ मध्ये त्यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले. जवळकर लेखणीचा वापर तलवारीसारखा करीत. तिखट वाणी आणि लेखणी यांकरिता ते प्रसिद्ध होते. त्यांच्या परदेशदौऱ्याच्या काळात गणपतराव जाधव यांनी कैवारीची संपादकीय जबाबदारी सांभाळली. परदेशात जाऊन आल्यावर जवळकर बदलले आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापासून दूर होऊन ते डाव्या विचारांकडे झुकले. शेतकरी व कामगार यांची बाजू मांडण्यासाठी ९ मे १९३१ रोजी त्यांनी तेज साप्ताहिक काढले. पण ते अल्पायुषी ठरले. अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात जवळकर यांनी केलेली कामगिरी लक्षणीय आहे.

ब्राह्मणेतरांच्या पत्रांमध्ये वा. रा. कोठारी (पुढे ते प्रभातकार म्हणून प्रसिद्ध झाले) यांचे जागरुक, भगवंत बळवंत पाळेकर यांचे जागृती आणि श्रीपतराव शिंदे यांचे विजयी मराठा यांचा समावेश होतो. कोठारींनी सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी १९ जुलै १९१७ रोजी जागरुक हे साप्ताहिक सुरु केले. या कामासाठी त्यांना भास्करराव जाधव, रावबहादूर डोंगरे आणि अण्णासाहेब लठ्ठे यांचे साहाय्य लाभले. शिक्षणात मागासलेल्या जातींना स्वतंत्र मतदारसंघातून आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असावा या मताचा पुरस्कार कोठारी यांनी जागरुकमधून केला. १९२२ मध्ये हे पत्र बंद पडले. पुन्हा १९२५ मध्ये नव्या रुपात ते सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. भगवंतराव पाळेकर यांनी २५ ऑक्टोबर १९१७ रोजी जागृती हे पत्र काढले. दर शनिवारी ते बडोद्याहून प्रसिद्ध होत असे, तरीही त्यात महाराष्ट्रातील घडामोडींची नोंद असे. पाळेकरांनी हे पत्र सु. ३२ वर्षे चालविले. १९२९ मध्ये या पत्रास आर्थिक झळ बसली पण त्यातून ते सावरले. त्यानंतर १ जानेवारी १९४९ रोजी ते बंद पडले. पाळेकरांवर फुले यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ‘मराठा शिक्षण परिषदे’च्या कार्याशी ते संबंधित होते. जातवार प्रतिनिधीत्वाचा पुरस्कार करणाऱ्या जेधे यांच्या विचारसरणीला पाळेकरांनी विरोध केला. ब्राह्मणेतर चळवळ आणि या चळवळीतील नेत्यांच्या विचारांची समीक्षाही त्यांनी वेळोवेळी केली. ब्राह्मणेतर चळवळीचे आणखी एक मुखपत्र म्हणजे श्रीपतराव शिंदे (१८८३-१९४४) यांचे विजयी मराठा. १ डिसेंबर १९१९ पासून ते सुरु झाले. ‘भारत सेवक समाज’ सारखी संस्था व ज्ञानप्रकाशसारखे पत्र आपण काढावे, असे शिंदे यांना वाटत होते. राजकीय सत्ता हस्तगत करुन ब्राह्मणेतर समाजाचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत विकास साधता येईल, असा विश्वास त्यांना होता. ठाम मते आणि निश्चित धोरण हे शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. केसरीविरुद्ध भूमिका घेणारे पत्र म्हणून विजयी मराठा बहुचर्चित झाले. १९३१ मध्ये शिंदे यांनी ‘शाहू सेवा सोसायटी’ ही संस्था ‘भारत सेवक समाज’ या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली. त्यानंतर विजयी मराठा त्या संस्थेच्या वतीने प्रकाशित होऊ लागले. १ जानेवारी १९३५ रोजी ते बंद पडले. १९२० मध्ये कायद्यातील नव्या सुधारणेनुसार निवडणुका झाल्या. ब्राह्मणेतर पक्षाने निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीत प्रचाराचे साधन म्हणून विजयी मराठाने कामगिरी बजावली.

याशिवाय खंडेराव बागल यांचे हंटर (१९२५), रामचंद्र रावनारायण लाड यांचे मजूर (१९२५) या पत्रांचाही निर्देश आवश्यक आहे. हंटर हे साप्ताहिक प्रथम हरिभाऊ चव्हाण व रामभाऊ जाधव यांनी सुरु केले. पुढे एक-दोन अंकांनंतर ते खंडेराव बागल यांना चालवावयास दिले व ते त्यांनी नावारुपास आणले. मजूर या पत्राला दिनकरराव जवळकर यांचा पाठिंबा होता. ब्राह्मण आणि टिळकपंथीय हे मजूर पत्राचे टीकेचे विषय होते.

अपरिहार्य अशा गरजेतून ब्राह्मणेत्तरांची पत्रे जन्माला आली. ब्राह्मणेत्तर पक्षांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करेपर्यंत त्यांनी धार्मिक व सामाजिक प्रश्नांना अग्रक्रम दिला. सनातनी, कर्मठ विचारांशी व ब्राह्मण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरस्कार करणाऱ्या  पत्रांशी या पत्रांचा सतत संघर्ष घडत असे. उदा., केसरी व भाला यांसारख्या पत्रांनी ब्राह्मणेत्तर पत्रांशी सामना केला.शेतकरी, कष्टकरी वर्गाचे शिक्षणाचे प्रश्न या पत्रांनी मांडले परंतु कालांतराने या पत्रांतून ब्राह्मणनिंदाच प्रामुख्याने येऊ लागली. ब्राह्मण- ब्राह्मणेत्तर वादाची चळवळ सुरु राहिली, पण पत्रे मात्र बंद पडली. या पत्रांनी अस्पृश्यांच्या प्रश्नावर जेवढा भर द्यावयास हवा होता, तेवढा दिला नाही. अस्पृश्यांच्या लढ्याला प्राधान्य वा पाठिंबा देण्याची या पत्रांची तयारी नव्हती. त्यातूनच दलित पत्रकारिता जन्माला आली.

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारिता : आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ वर टीका झाली, तरी त्यास ते उत्तर देत. दीनबंधू पत्रात ही टीका प्रसिद्ध होत असे. याच पत्रात गोपाळबाबाही स्वतंत्र लेखन करीत. गोपाळबाबांची पद्यरचना-जिचा उल्लेख ते ‘अखंडरचना’ असा करीत-दीनबंधूने प्रकाशित केली. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे संपादक-संस्थापक म्हणून बनसोडे यांना श्रेय देणे श्रेयस्कर ठरणार नाही, असे दलित पत्रकारितेच्या अभ्यासकांना वाटते. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. सोमवंशीय मित्रमध्ये लेख, अग्रलेख, स्फुटे, बातम्या, वाचकांची पत्रे असा मजकूर प्रसिद्ध होई. समाजसुधारणा, शिक्षण, विवाहसंस्था यांविषयी कांबळे यांनी गांभीर्याने लेखन केले.राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली.

किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली, ते ‘कर्ते सुधारक’ होते. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता : डॉ. आंबेडकर  यांनी मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात दलित पत्रकारितेच्या रुपाने केलेली कामगिरी मोलाची आहे. त्यांनी मूकनायक (३१ जानेवारी १९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) अशी चार पत्रे चालविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज समता संघाचे अध्यक्ष होते व समता हे या संघाचे मुखपत्र होते.

डॉ. आंबेडकरांची काही समाजसुधारकांसह शाहूमहाराजांशी १९१९ साली मुंबईत भेट झाली. या भेटीत वर्तमानपत्राची कल्पना मांडण्यात आली. महाराजांना ती पसंत पडल्यामुळे त्यांनी लगेच डॉ. आंबेडकरांना अडीच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले. त्यातून मूकनायकचा जन्म झाला. ब्राह्मणेत्तरांची पत्रकारिता दलितांच्या प्रश्नाला न्याय देऊ शकली नाही, एवढे एकच कारण मूकनायक सुरु करण्यामागे नव्हते. १९१७ साली हिंदूस्थानातील विविध जातिजमातींच्या मताधिकाराविषयी चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘साउथबरो’ आयोग नेमला होता. या आयोगापुढे दलितांची कैफियत नीटपणे मांडली गेली नाही, या जाणिवेतून ते पत्रकारितेकडे वळले. मूकनायकाचे संपादकत्व त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या तरुणाकडे सोपविले. मूकनायकमधून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे प्रश्न मांडले, तरी त्या काळी ते चळवळीचे मुखपत्र बनू शकले नाही कारण मूकनायक सुरु झाल्यावर काही महिन्यांतच-म्हणजे ५ जुलै १९२० रोजी-अभ्यासासाठी डॉ. आंबेडकर लंडनला गेले. तेथून ते ३ एप्रिल १९२३ रोजी भारतात परतले. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली, त्यातूनच ३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक पत्र उदयाला आले.

मूकनायक दर शनिवारी प्रसिद्ध होई. शीर्षकाच्या डावीकडे वर्गणीचे दर, तर उजवीकडे जाहिरात असे. किरकोळ अंकाची किंमत दीड आणा होती. का. र. मित्र यांच्या मनोरंजन छापखान्यात ते छापले जाई. अंकात पहिल्या पानावर, शीर्षकाखाली (मास्टहेड) तुकाराम महाराजांच्या अभंगातील पुढील ओळी बिरुदावली म्हणून छापण्यात येत :

काय करु आता धरुनिया भीड I निःशंक हे तोंड वाजविले II

नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण I सार्थक लाजून नव्हे हित II

मूकनायकमध्ये डॉ. आंबेडकरांनी चौदा लेख लिहिले. डॉ. आंबेडकर परदेशात गेल्यावर मूकनायकची आबाळ झाली. पुढे भटकर यांच्याकडून ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांनी सूत्रे हाती घेतली तथापि १९२३ मध्ये मूकनायक बंद पडले.

बहिष्कृत भारतचे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक डॉ. आंबेडकर हेच होते. त्याचा उल्लेख त्यांनी पाक्षिक पत्र असा केला आहे. छापखाना बदलणे, वर्गणीदारांकडून वेळेवर वर्गणी न येणे, अंक वेळेवर न निघणे या अडचणींना सामोरे जावे लागले, तरी डॉ. आंबेडकरांनी निर्धाराने हे पत्र चालविले. एका शुक्रवारी बहिष्कृत भारत व एका शुक्रवारी समता असा प्रयोगही त्यांनी काही काळ केला. बहिष्कृत भारत सुरु करण्यापूर्वी बहिष्कृत फंडासाठी डॉ. आंबेडकरांनी आवाहन केले परंतु फारसा प्रतिसाद लाभला नाही. एकूण दोन वर्षांच्या काळात सु. नऊ महिने हे पत्र बंद राहिले. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पत्र बंद पडले.त्यानंतर एका वर्षात-म्हणजे २४ नोव्हेंबर १९३० रोजी-जनताचा पहिला अंक प्रकाशित झाला. देवराव विष्णु नाईक हे त्याचे संपादक होते. जनता प्रथम पाक्षिक होते मग ते ३१ ऑक्टोबर १९३१ रोजी साप्ताहिक झाले. जनताच्या किरकोळ अंकाची किंमत दीड आणा व वार्षिक वर्गणी दोन रुपये दहा आणे होती. जनता या शीर्षकाखाली इंग्रजीत द पीपल असे लिहिलेले असे. आपल्या व्यापामुळे डॉ. आंबेडकरांना लेखनासाठी पुरेशी सवड मिळत नसे परंतु सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात ते आवर्जून लिहीत. जनता पत्र पंचवीस वर्षे (१९५५ पर्यंत) नियमितपणे चालले. भा. द. कद्रेकर, गं. नी. सहस्रबुद्धे, बी. सी कांबळे आणि यशवंतराव आंबेडकर यांसारख्यांनी जनताचे संपादकपद सांभाळले. जनताचे प्रबुद्ध भारत असे नामांतर ४ फेब्रुवारी १९५६ रोजी करण्यात आले. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर या पत्रासाठी संपादक मंडळ नेमण्यात आले. संपादक म्हणून यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दा. ता. रुपवते, शंकरराव खरात व भा. द. कद्रेकर यांनी क्रमाक्रमाने जबाबदारी सांभाळली. ३ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर प्रबुद्ध भारत हे त्या पक्षाचे मुखपत्र बनले. १९६१ साली हे साप्ताहिक अंतर्गत वादामुळे बंद पडले.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक विषय हाताळले. धर्मसंस्था, धर्मविचार आणि जातींची उतरंड यांचा त्यांनी मागोवा घेतला. हिंदू समाजव्यवस्थेची आणि अस्पृश्यांच्या इतिहासाची त्यांनी बुद्धिवादी चिकित्सा केली. महाडचा सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह, महारांची वतने, गिरणीमालक व कामगार, खोतीचे प्रश्न, गुलामगिरी असे अनेक विषय त्यांनी हाताळले. वृत्तपत्र हे मतपत्र असते, असे ठामपणे सांगून डॉ. आंबेडकरांनी हे लेखन केले आहे. निखळ, लख्ख मराठी भाषेत ते लिहीत. त्यांचे विवेचन तर्कशुद्ध असे. ‘हिंदू धर्माला नोटीस’ व ‘अस्पृश्यता-निवारणाचा पोरखेळ’ यांसारखे त्यांचे लेख अविस्मरणीय ठरले आहेत.

स्वातंत्र्योत्तर कालखंड : स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी पत्रकारितेत आचार्य अत्रे यांच्या मराठा या दैनिकाची कामगिरी महत्त्वाची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मराठाचा जन्म झाला. १५ नोव्हेंबर १९५६ रोजीमराठाचा पहिला अंक प्रकाशित झाला. आचार्य ⇨प्रल्हाद केशव अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा खोलवर ठसा या दैनिकावर उमटला होता. अस्सल मराठी बाण्याचे वृत्तपत्र म्हणून मराठाने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात फार मौलिक कार्य केले आहे. प्रामुख्याने मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांचा या आंदोलनाला व भाषावार प्रांतरचनेला तीव्र विरोध होता. मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांचे मालक अमराठी भाषक व महाराष्ट्रद्वेष्टे होते. या पार्श्वभूमीवर आंदोलन संघटित करुन स्वतंत्र मराठी भाषिक राज्यासाठी लढा देण्याचे कार्य आचार्य अत्रे यांनी मराठाच्या रुपाने केले. ‘अत्रे म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे अत्रे’ असे समीकरण तयार झाले होते. संयुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर मराठाला निश्चित राजकीय उद्दिष्ट राहिले नाही, त्यामुळे या दैनिकाची वाटचाल भरकटत गेली. १९६९ मध्ये अत्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या शिरीष पै यांनी मराठाची संपादकीय जबाबदारी सांभाळली. परंतु मराठाचे स्थैर्य हळूहळू कमी होत गेले. १९७५-७६ मध्ये कामगारांचा संप झाला. १५ नोव्हेंबर १९७६रोजी अखेरचा अंक प्रकाशित होऊन हे वृत्तपत्र बंद पडले.

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी पत्रकारितेचे आणि वृत्तपत्र व्यवसायाचे स्वरुप उत्तरोत्तर बदलत गेले. पत्रकारिता हे राजकीय आणि सामाजिक प्रबोधनाचे साधन राहिले नाही. वृत्तपत्रे हा निखळ व्यवसाय बनला. मोठी भांडवली गुंतवणूक सुरु झाली. सुसज्ज अशी रोटरीची छपाईयंत्रे, जाहिरात, वितरण व विक्रीसंवर्धन यांसारखी खाती, सुसंघटित संपादकीय विभाग यांमुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीचा चेहेरामोहरा बदलला. हा चेहरामोहरा बदलण्याचे श्रेय दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राला द्यावे लागते. ज्ञानप्रकाश आणि सकाळ यांसारख्या वृत्तपत्रांमुळे मराठीत दैनिकांची पत्रकारिता रुजली असली, तरी या पत्रकारितेला एक सुसंघटित व व्यावसायिक रुप लोकसत्ताने दिले. शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांमुळे वृत्तपत्र ही सर्वसामान्यांची गरज बनली. शिक्षणाचा प्रसार व साक्षारता यांत लक्षणीय वाढ झाल्यामुळे शहरांबरोबर जिल्ह्यांच्या ठिकाणांहून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वृत्तपत्रे निघण्यास प्रारंभ झाला.

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रसमूहाने १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरु केले. त्र्यं. वि. पर्वते हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर ह. रा. महाजनी संपादक झाले. त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. तर्कशुद्ध विवेचन, स्वच्छ व परखड विचार आणि प्रौढ-गंभीर भाषा यांमुळे महाजनी यांचे लेखन ठसा उमटविणारे ठरले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. गडकरी यांच्या नंतर अरुण टिकेकर संपादक झाले. लोकसत्ताने पुणे व नागपूर येथूनही स्वतंत्र आवृत्त्या प्रकाशित करण्यास प्रारंभ केला आहे. याशिवाय मुंबईतून सांज लोकसत्ता हे सायंदैनिकही प्रसिद्ध होते. मुंबईतील फ्री प्रेस या वृत्तपत्र गटानेही नवशक्ती हे मराठी दैनिक सुरु केले. पां. वा. ग़ाडगीळ,⇨प्रभाकर पाध्ये, पु. रा. बेहरे, वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी या वृत्तपत्राच्या संपादनाची जबाबदारी सांभाळली.

स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय पक्षांना आपले स्वतःचे वृत्तपत्र असावे, असे वाटू लागले. सार्वत्रिक निवडणूकांमध्ये आपल्या राजकीय विचारांच्या प्रचाराचे साधन म्हणूनही वृत्तपत्रांकडे पाहिले जाऊ लागले. काँग्रेसचे ज्येष्ठ राजकीय नेते aयशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने पुण्यातून विशाल सह्याद्री हे दैनिक ३० मे १९५८ रोजी सुरु झाले. अनंतराव पाटील त्याचे संपादक झाले. ते १ जानेवारी १९८१ पर्यंत संपादकपदी होते. त्यांच्या नंतर शशिकांत टेंबे संपादक झाले परंतु अल्पावधीतच-म्हणजे १९८१ मध्ये-आर्थिक अडचणींमुळे हे वृत्तपत्र बंद पडले. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणूनच या दैनिकाने कामगिरी बजावली.

यशवंतराव चव्हाण यांच्याच प्रेरणेने महाराष्ट्र टाइम्स हे दैनिक १८ जून १९६२ पासून मुंबईतून सुरु झाले. या दैनिकाच्या निमित्ताने ‘टाइम्स गटाने’ मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. द्वा. भ. कर्णिक हे या वृत्तपत्राचे पहिले संपादक होत. त्यांच्या नंतर १९६७ साली गोविंद तळवलकर संपादक झाले. तळवलकर यांची संपादकीय कारकीर्द जवळजवळ पंचवीस/सव्वीस वर्षांची होती. त्यांच्या नंतर कुमार केतकर हे २००१ पर्यंत संपादक होते. मराठी भाषिक संस्कृतीवर या वृत्तपत्राने आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयांसंबंधीचे चौफेर, उद्‌बोधक व दर्जेदार लेखन यांमुळे सुशिक्षित, बुद्धिजीवी मराठी समाजात या वृत्तपत्राने आपली वेगळी प्रतिमा उमटविली आहे. मुख्य म्हणजे तळवलकरांच्या निर्भीड, परखड आणि शैलीदार अग्रलेखांमुळे या वृत्तपत्राने आपले वेगळेपण सिद्ध केले.

प्रमुख जिल्हापत्रे : गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतून व प्रमुख जिल्ह्यांतून अनेक वृत्तपत्रे प्रसिद्ध होत आहेत. पुणे-मुंबईच्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून प्रकाशित होत असतात. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपापल्या शहरांतून स्वतःची वृत्तपत्रे सुरु केली आहेत. या व्यावसायिक स्पर्धेत काही जिल्हापत्रे अद्यापही टिकून आहेत. सांगली येथून बाळासाहेब पाटील यांनी २१ मे १९२६ रोजी सत्यवादी हे साप्ताहिक रुपात सुरु केले. १९३० पासून ते कोल्हापूर येथून प्रकाशित होऊ लागले. १९४७ मध्ये या साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर झाले. पुढारी हे वृत्तपत्र गणपतराव गोविंदराव जाधव यांनी १३ मे १९३७ रोजी साप्ताहिक रुपात प्रसिध्द करण्यास सुरुवात केली. व्हि. टी. पाटील हे त्याचे पहिले संपादक होत. जानेवारी १९३९ मध्ये ते दैनिक झाले. गनपतराव जाधव हे १९३९ पासून संपादक होते. त्यांची परंपरा पुढे प्रतापसिंह  जाधव यांनी सांभाळली. स्थानिक राजकारण, शेती, सहकार-चळवळ या विषयींच्या बातम्यांना या जिल्हापत्रांनी आवर्जून प्राधान्य दिले. साक्षर ग्रामीण वाचक नजरेपुढे ठेवून जिल्हापत्रांनी आपला ढाचा ठरविला व तो यशस्वी केला. महाराष्ट्रातील जिल्हापत्रांत सोलापूरचे संचार व समाचार, सातारा येथील ऐक्य, नाशिकचे गावकरी, औरंगाबादचे मराठवाडा व अजिंठा, लोकमत, नागपूरचा तरुण भारत, गोव्यातील गोमंतक इ. दैनिकांची कामगिरी महत्त्वाची आहे. सोलापूर समाचार हे मराठीतील पहिले जिल्हापत्र ३ फेब्रुवारी १८८५ रोजी सुरु झाले. १९३० पासून ते दैनिक रुपात निघते. याच वृत्तपत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे रंगा वैद्य यांनी १३ ऑक्टोबर १९६१ रोजी संचार हे पत्र सोलापूर येथे सुरु केले. ऐक्य १९२३ पासून सातारा येथे सुरू झाले. सातारा जिल्यातील नेमस्त पुढारी व वकील रावबहादूर काळे हे त्याचे संस्थापक होत. ऐक्यचे पहिले संपादक नरहर गंगाधर जोशी हे होते. पुढे चं. ह. पळणीटकर हे या पत्राचे दीर्घकाळ संपादक होते. कालांतराने हे पत्र दैनिक रुपात निघू लागले. गोवा मुक्तीनंतर (१९६१) गोव्यात खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारिता सुरु झाली. २४ मार्च १९६२ रोजी उद्योगपती विश्वासराव चौगुले यांनी गोमंतक हे दैनिक सुरु केले. बा. द. सातोस्कर हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर त्र्यं. वि. पर्वते, माधव गडकरी, दत्ता सराफ, वामन राधाकृष्ण, नारायण आठवले, चंद्रकांत घोरपडे, लक्ष्मणराव जोशी हे संपादक होते. २००२ पासून सकाळ वृत्तपत्र समूहाने गोमंतक वृत्तपत्र सामील करुन घेतले आहे.

गोव्याप्रमाणेच मराठवाड्यातील मराठी पत्रकारितेचा हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाशी निकटचा संबंध आहे. मराठवाड्यातील पत्रकारितेवर निजामी राजवटीचे दडपण दीर्घकाळ होते. अमरज्योती, निजाम विजय आणि मराठवाडा यांसारखी मोजकी वृत्तपत्रे साप्ताहिक रुपात प्रसिद्ध होत होती. आनंद कृष्ण वाघमारे यांनी १० फेब्रुवारी १९३८ रोजी मराठवाडा साप्ताहिक रुपात सुरु केले. १९३९ मध्ये निजाम सरकारने वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यात वाघमारे यांना दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे मराठवाडाचे प्रकाशन स्थगित झाले. वाघमारे हैदराबादच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. लढ्यासाठी वृत्तपत्राची गरज होती, म्हणून त्यांनी १३ मार्च १९४८ रोजी पुन्हा नव्या स्वरुपात मराठवाडा साप्ताहिक सुरु केले. सुरुवातीला पुण्याहून व मग मुंबईहून मराठवाडा छापून मराठवाड्यात पाठविला जाई. निजामाची राजवट संपुष्टात आल्यावर १ एप्रिल १९४९ पासून मराठवाडा अर्धसाप्ताहिक म्हणून हैदराबादहून प्रसिद्ध होऊ लागले. १९५६ मध्ये मराठवाड्याचे पुन्हा स्थलांतर होऊन ते औरंगाबादहून प्रसिद्ध होऊ लागले. १९५३ मध्ये वाघमारे निवृत्त झाले. त्यांनी या पत्रासाठी विश्वस्त मंडळ (ट्रस्ट) स्थापन करुन त्याची जबाबदारी अनंतराव भालेराव यांच्याकडे सोपविली. १५ ऑगस्ट १९६८ रोजी मराठवाडा दैनिक झाले. या वृत्तपत्राशी वाघमारे यांच्याप्रमाणेच भालेराव यांचेही नाव निगडीत आहे. केसरीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जशी कामगिरी बजावली, तशीच मराठवाडा वृत्तपत्राने हैदराबादच्या लढ्यात बजावली. वाघमारे यांच्या नंतर भालेराव यांनी या वृत्तपत्राची स्वतंत्र प्रतिमा कायम ठेवली. भालेराव यांच्या नंतर पन्नालाल सुराणा, अरविंद वैद्य यांनी संपादकीय जबाबदारी सांभाळली. लोकमत हे सर्वाधिक खपाचे दैनिक जवाहरलाल दर्डा यांनी यवतमाळहून सुरु केले. हे दैनिक औरंगाबाद, नागपूर, नासिक, जळगाव आणि मुंबई येथून प्रसिद्ध होत होते.

महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रांची वाढ दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे. शहर, जिल्हा व राज्यपातळीवरील प्रसिद्ध होणार्याम वृत्तपत्रांची संख्याही अलीकडच्या काळात खूपच वाढली आहे.

पहा : नियतकालिके.

अकलूजकर, प्रसन्नकुमार

संदर्भ : 1. Bhatt, S. C. Indian Press Since 1955 , New Delhi, 1997.

2. Buzek, Antony, How the Communist Press Works, London, 1964.

3. Govt. of India, Ministry of Information and Broadcasting, Pub. Mass Media in India 1998-99 , New Delhi, 1999.

4. Govt. of India, Ministry of Information and Broadcasting, Pub. Press in India 1998 , New Delhi, 1999.

5. Herd, Herold, The March of Journalism, London, 1952.

6. Natarajan, J. History of Indian Journalism, New Delhi, 1954.

7. Natarajan, S. A. History of Press in India, Bombay, 1962.

8. Rau, M. Chalapathi, The Press in India, Bombay, 1968.

9. Sen, S. P. Ed. The Indian Press, Calcutta, 1967.

10. Smith, Anthony, Goodbye Gutenberg : The Newspaper Revolution of the 1980’s, Bombay, 1980.

11. Thomas, Denise, The Story of Newspapers, Chatham, 1965.

12. Williams, Francis, The Right to Know :The Rise of the World Press, London, 1969.

१३. कानडे, रा. गो. मराठी नियतकालिकांचा इतिहास, (१८३२-१९३७), मुंबई, १९३८.

१४. पानतावणे, गंगाधर, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९८७.

१५. पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिक : ब्राह्मणेतर पत्रकारिता विशेषांक, जुलै ते सप्टेंबर, अंक ३, १९९६.

१६. लेले, रा. के. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, पुणे, १९८४.

१७. शहा, मृणालिनी वष्ट, जयंत राशिनकर, श. वि. संपा. पत्रकार वा. रा. कोठारी : विचार आणि कार्य, १९९३.