वार्ताहर : वार्ता देतो तो वार्ताहर. आधुनिक वृत्तपत्र व्यवसायाच्या केंद्रस्थानी वार्ताहर असतो. घटना सर्वत्र घडतातपरंतु कोणती घटना बातमी ठरेल, याचा अचूक अंदाज वार्ताहरास येणे तसेच ती घटना योग्य त्या स्वरूपात लिहिता येणे आवश्यक असते. वार्ता जलद मिळविणे, त्यांचा खरा अर्थ समजून घेणे व त्या योग्य स्वरूपात लिहिणे, हे काम वार्ताहराने करावयाचे असते. त्याच्या ठिकाणी ‘वार्तेची दृष्टी’ असेल, तरच त्यास हे काम जमणार.

वृत्तपत्र व्यवसायाच्या इतिहासात वार्ताहरांचा स्वतंत्र इतिहास आढळत नाही कारण एकोणिसाव्या शतकापर्यंत वृत्तपत्राचा संपादक हाच सर्व जबाबदारी घेणारा होता. प्राचीन काळी दळणवळणाची अपुरी साधने असल्यामुळे ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत वार्ताहरांचे कार्य स्वतंत्रपणे विकसित होऊ शकले नाही. प्रवासी, इतर वृत्तपत्रे व अधूनमधून येणारे टपाल यांवरूनच बातम्या संकलित केल्या जाऊन छापल्या जात असत. जेम्स फ्रँक्लिन आणि बेंजामिन फ्रँक्लिन यांसारख्या व्यक्तींमध्ये वार्ताहराचे गुण दिसले, तरी त्या व्यक्ती संपादक म्हणूनच विशेषत्वाने गाजल्या. लंडनच्या मॉर्निंग हेरल्डचा जॉन विट हा पहिला स्थानिक वार्ताहर (१८२३), तर जेम्स पेरी हा पहिला विदेशी वार्ताहर म्हणून ओळखला जातो. त्याने फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रारंभीच्या वार्ता पॅरिसहून ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका या देशांकडे पाठविल्या. लंडनच्या टाइम्सने १८०७ मध्ये हेन्‍री क्रॅब रॉबिन्सन (१७७५-१८६७) ह्या ब्रिटिश वार्ताहराला नेपोलियनच्या युद्धाच्या राजकीय व आर्थिक परिणामांच्या वार्ता पाठविण्यासाठी नेमले होते. वार्ताहरपेशाची ती सुरुवात होती. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळाच हा पेशा झपाट्याने वाढला आणि ग्रेट ब्रिटन, अमेरिका ह्या देशांच्या नेत्यांनीही (सर विन्स्टन चर्चिल ड्‌वाईट डेव्हिड आयझनहौअर इ.) प्रारंभी युद्धवार्ताहर म्हणून काम केल्याचे दिसून येते.

वार्ताहराचे मूळ अथेन्समधील नट व रोममधील वार्तालेखक, पोवाडा-गायक यांच्यांत शोधता येते. भारतीय पुराणकथेतील नारद किंवा संजय हे वार्ताहराचे मूळ सांगता येते. मुसलमानी अमदानीत (७१२ – १५२६) स्वतंत्र अखबारनवीसही नेमलेले असत. मराठ्यांच्या सत्ता विस्ताराबरोबरच अखबार-नवीसही सर्वत्र पसरू लागले. निजामाच्या दरबारी गोविंदराव पुरुषोत्तम व दामोदर देवराव,महादजी शिंदे यांच्याकडे आपाजी राम,होळकरांकडे नारो हरी, नागपूरकर भोसल्यांकडे श्रीराम सदाशिव यांसारखे अखबारनवीस होते. या बातमीपत्रात व आधुनिक वार्तापत्रात फरक आहे. बातमीपत्रात फक्त ‘काय घडले’ एवढेच असे. भारतात इंग्रजी राजवट आल्यानंतर (१६००-१९४७) वृत्तपत्रे सुरू झाली,तरी ती मतपत्रेच होती.  बातमीपत्राचे विविध उपयोग आहेत, हे कळावयास १८४९ साल उजाडावे लागले. ज्ञानप्रकाश (१८४९),केसरी (१८८१) इत्यादींमधून बरीच पत्रे येऊ लागली. तेथून वार्ताहरपेशाचे काम सुरू झाले. साहित्यसम्राट न. चिं. केळकर (१८७२-१९४७) यांनी दिल्लीहून आणि विलायतेतून बातमीपत्रे पाठविली. दैनिके प्रकाशित होऊ लागल्यानंतर बातम्या मिळविण्याची गरज वाढू लागली व पगारी बातमीदार नेमण्यास सुरुवात झाली. बातमीदारांच्या कामगिरीकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासारखा प्रकार महाराष्ट्रात ⇨अच्युतराव कोल्हटकरांच्या (१८७९-१९३१) संदेश पत्राने निदर्शनास आणला. तत्पूर्वी गो. रा. बाळ, द. वि. ताम्हणकर, य. द. लोकुरकर,अनंतराव वैद्य, दा. सी. कोकजे, श्री. रा. टिकेकर यांसारख्यांची नावे बातमीदार म्हणून गाजली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरील परिस्थितीत फरक पडून स्वतंत्र बातमीदार अधिक प्रमाणात नेमले गेले. स्थानिक वार्ताहर, जिल्हा बातमीदार, राज्याच्या राजधान्यांमधील व केंद्रीय राजधानीतील प्रतिनिधी, विदेशी वार्ताहर तसेच गुन्हे व न्यायालयविषयक वार्ता देणारे वार्ताहर, राजकीय क्षेत्र, क्रीडा, नभोवाणी, युद्धक्षेत्र, रोखे बाजार, वाणिज्य मंडळे इत्यादींविषयी वार्ता देणाऱ्या बातमीदारांचे प्रकार वाढीस लागले. या काळात मा. वि. साने, वि. स. माडीवाले, गंगाधर इन्दूरकर, मो. ग. तपस्वी, का. ना. निमकर, दत्तोपंत केळकर, ज. पां. देशमुख, द्वा. भ. कर्णिक, ना. व्यं. दामले, चंद्रकांत ताम्हाणे, भि. ना. ठाकोर इत्यादींनी वार्ताहर म्हणून नावलौकिक मिळविला. अशा प्रकारे हा पेशा खूपच वाढला आणि पहिल्या वृत्तपत्र आयोगाच्या (१९५४) शिफारशींनुसार वेतनमंडळांच्या नेमणुका होऊन पत्रव्यवसायातील वार्ताहरासमवेत सर्वांच्याच वेतनश्रेण्या ठरवून देण्यात आल्या.

वार्ताहराचे काम करावयास मुख्यतः वृत्तसंवेदन असण्याची आवश्यकता भासते. भेटीगाठी, मुलाखती, संशोधन व शोधक तंत्राचा वार्ताहरास अवलंब करावा लागतो. सर्वच क्षेत्रांतील लाचलुचपती किंवा अवैध, अयोग्य कृतींचा मागोवा घेणे, हे वार्ताहराचे महत्त्वाचे कार्य ठरते. वृत्तसंकलन व वृत्तलेखन ही दोन अंगे चांगल्या वार्ताहराजवळ असतात. माणसे जोडण्याची कला ही यशस्वी वार्ताहार होण्याची गुरुकिल्ली होय. चांगली आकलनशक्ती, भाषेवरील प्रभुत्व, सार्वजनिक हिताची जाणीव, वस्तुस्थितीचा अचूक अंदाज, प्रेरक शक्ती इ.गुण त्याच्या अंगी असणे आवश्यक ठरते. वृत्तपत्र या मुद्रित माध्यमाप्रमाणेच नभोवाणी  व दूरचित्रवाणी यांचेही स्वतंत्र वार्ताहर असतात. वार्तासंकलनाची त्यांची सामग्री आणि त्यांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप यांमुळे वृत्तपत्रांच्या वार्ताहरांपेक्षा असणारा त्यांचा वेगळेपणा लक्षात घेण्यासारखा असला, तरी ‘वार्तेची दृष्टी’ हा या सर्वांमध्ये आवश्यक असणारा प्रमुख गुण होय.

संदर्भ : 1. Bradley, Duane, The Newspaper –Its place inDemocracy. New York, 1965.

           2. Campbell, Laurence RWolseley, Roland E. How to Report and Write the News,Englewood Cliffs,1961.

           3. James M.: Brown, Suzanne S.Newswriting and Reporting, New Delhi, 1976.

           ४. टिकेकर, श्री. रा. बातमीदार,सोलापूर १९३४.

पवार, सुधाकर