वृत्तपत्रकारिता : (जर्नॅलिझम, प्रोफेशन ऑफ). वृत्तपत्राच्या किंवा नभोवाणी वा दुरचित्रवाणी यांसारख्या जनसंज्ञापनांच्या माध्यमातून वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या वृत्तविषयक गरजा भागवण्याचे कार्य म्हणजे ‘वृत्तपत्रकारिता’ असे म्हणता येईल.

लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. ही कल्पना प्रथम ⇨मेकॉलेने १८२८ मध्ये आपल्या ‘कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी’ या निबंधात मांडली. वृत्तपत्रांच्या संदर्भात त्याने ‘चौथी शक्ती’ असा शब्दप्रयोग केला होता. कार्लाइलने ऑन हीरोज, हीरो वरशिप ॲंड हिरोइक इन् हिस्टरी (१८४१ ) या आपल्या ग्रंथातील ‘द हिरो ॲज मॅन ऑफ लेटर्स’ या प्रकरणात ⇨एडमंड बर्कचे पुढील उदगार उदधृत केले आहेत. ‘मानवी जीवनाचे नियमन करणाऱ्या धर्मसत्ता (लॉर्डस स्पिरिच्युअल), राजसत्ता (लॉर्डस टेंपोरल) व लोकसत्ता (कायदेमंडळ) या तीन शक्तींप्रमाणे नव्हे, त्यांच्यापेक्षाही अधिक महत्वाची शक्ती म्हणजे पत्रकारिता (प्रेस गॅलरी) होय.’ या उदगारांतून पत्रकारितेचे महत्त्व व्यक्त झाले आहे.

पत्रकारितेची मुख्यत: तीन कार्ये असतात: माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन. ही कार्ये चांगल्या रीतीने पार पाडता यावीत म्हणून वृत्तपत्रे व पत्रकार यांना स्वातंत्र्याची आवश्यकता असते. वृत्तपत्रे व पत्रकार यांच्यावर सात प्रकारचे दवाब येत असतात : राज्यशासन, वृत्तपत्रसंस्थेचे व जनसंज्ञापन माध्यम संस्थेचे मालक, जाहिरातदार, समाजातील विविध हितसंबधी दबावगट, बातम्या व माहिती पुरविणारे स्रोत, वृत्तपत्राचा स्वार्थ आणि पत्रकाराचा वैयक्तिक स्वार्थ. या सात दबावगटांपैकी प्रत्येकाला वृत्तपत्राचा उपयोग करून आपले स्वत:चे हितरक्षण व हितसंवर्धन करावयाचे असते. या सर्व दबावगटांना खंबीरपणे तोंड देऊन पत्रकारितेला आपले कर्तव्य पार पाडायचे असते.

निर्मितिखर्चापेक्षा कमी किंमतीला विकली जाणारी एकमेव वस्तू म्हणजे वृत्तपत्र होय. वृत्तपत्राच्या विक्रीतून कागदाचा खर्च जेमतेम भरून निघतो. वृत्तपत्रांना आपले सर्व प्रकारचे खर्च जाहिरांतीच्या उत्पन्नातून भागावावे लागतात आणि आवश्यक असा फायदा कमवावा लागतो. वृत्तपत्राने आपला व्यवसाय यशस्वी केला, तर त्याला आपले स्वातंत्र्य जपता येते आणि त्यांने आपले स्वातंत्र्य निष्ठापूर्वक जपले तर त्याला आपल्या व्यवसायात यश मिळु शकते. व्यावसायिक यश व स्वातंत्र्याची जबाबदारी यांमध्ये समतोल साधणे हे वृत्तपत्राच्या यशाचे–म्हणजे विश्वासार्हतेचे, जाहिरातींच्या उत्पन्नाचे, प्रतिष्ठेचे-गमक असते.

भारताच्या राज्यघटनेत आविष्कारस्वातंत्र्य हा मूलभूत आधिकार म्हणून मान्य करण्यात आला आहे आणि आंतरराष्ट्रीय करारनाम्याचा कलम १९ (३) मध्ये मान्य करण्यात आलेल्या बंधनाचाच भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला आहे. [→ वृत्तपत्रविषयक कायदे ]. मात्र आंतरराष्ट्रीय करारनाम्यापेक्षा भिन्न अशी एक तरतूद भारतीय राज्यघटनेत आहे. आविष्कारस्वांतत्र्याचा अधिकार फक्त भारताच्या नागरिकांपुरताच मर्यादित करण्यात आला आहे. परदेशी पत्रकाराला तो भारतामध्ये उपलब्ध नाही. भारतीय पत्रकारितेच्या दृष्टीने मात्र सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय पत्रकारांच्या मूलभूत आविष्कारस्वातंत्र्याचे रक्षण करणारे ठरले आहेत.

पत्रकारितेचे विविध प्रकार : पत्रकारितेची उद्दिष्टे, स्वरूप, कार्य यांनुसार विविध प्रकार संभवतात. विकास पत्रकारिता, शोध पत्रकारिता, अन्वयार्थक पत्रकारिता, नवपत्रकारिता हे त्यांतील काही प्रमुख प्रकार होत.

विकास पत्रकारिता : (डेव्हलपमेंटल जर् नॅलिझम ). दुसऱ्या महायुध्दानंतर संयुक्त राष्ट्र संघटना (यूनेस्को) स्थापन झाली. आशिया, आफ्रिका,दक्षिण अमेरिका या भूभांगामध्ये असलेल्या आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे यूरोपमधील राष्ट्रांना भाग पडले. चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली आणि यूरोपमधील अनेक राष्ट्रांतही कम्युनिस्ट राजवटी स्थापन झाल्या. त्यामुळे प्रगत पाश्चात्य औद्योगिक राष्ट्रे, कम्युनिस्ट राष्ट्रे आणि नव्याने स्वतंत्र झालेली पण मागासलेली राष्ट्रे असे जगाचे तीन भाग किंवा तीन जगे अस्तित्वात आली. मागासलेल्या तिसऱ्या जगातील राष्ट्रांना मदत देऊन त्यांना आपल्या गोटात ओढण्याची स्पर्धा अमेरिका व राशिया या राष्ट्रांत सुरू झाली. तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या विकासाच्या वाटचाली मध्ये वृत्तपत्रे व अन्य जनसंज्ञापन माध्यमे महत्वाची भूमिका पार पाडू शकतील, अशा विश्वासातून १९५० च्या दशकात ‘विकास पत्रकारिते’चा जन्म झाला.

‘विकासा’ची संकल्पना पहिल्या महायुध्दानंतर यूरोपमध्ये  ⇨मार्शल   योजनेच्या रूपाने पुढे आली. दुसऱ्या महायुध्दानंतर तीच संकल्पना ‘तिसऱ्या’ जगातील राष्ट्रांच्या संदर्भात वापरण्याचा प्रयत्न झाला. परंतु पहिल्या महायुध्दानंतरची यूरोपीय राष्ट्रे आणि दुसऱ्या महायुध्दानंतर स्वतंत्र झालेली तिसऱ्या जगातील राष्ट्रे यांच्यात मूलभूत भेद असल्यामुळे ‘विकासा’ च्या संकल्पनेत व प्रक्रियेत वेळोवेळी बदल करावे लागले आणि त्यानुसार विकास पत्रकारितेच्या स्वरूपात व भूमिकेत वेळोवेळी बदल झाले.   विकास म्हणजे आर्थिक विकास, असे समीकरण १९५० च्या दशकात रूढ होते आणि त्यासाठी औद्योगिकीकरण, शिक्षण, आधुनिकिकरण व नागरीकरण ही चतु:सूत्री मानण्यात आली होती. या विकास कार्यक्रमाची सूत्रे जागतिक बॅंक, यूनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय नाणे निधी संस्थांमार्फत ठरविण्यात येत असत. या कार्यक्रमात लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम जनसंज्ञापन माध्यमांनी करावयाचे होते. म्हणजे प्रगत औद्योगिक राष्ट्रांकडून सरकारमार्फत मिळालेल्या माहितीचे वितरण करण्यापुरती विकास पत्रकारितेची भूमिका मर्यादित होती. परंतु १९६५ नंतर या प्रकारच्या ‘झिरप’ सिध्दांतवादी विकास कार्यक्रमांना मिळणारे अल्प यश आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या यांमुळे तिसऱ्या जगातील विचारी तज्ज्ञांमध्ये या कार्यक्रमांबद्दलचा भ्रमनिरास झाला. ‘विकास’ म्हणजे फक्त ‘आर्थिक’ विकास नव्हे तर सामाजिक, राजकीय, व सांकृतिक विकासाची जोड असेल तरच तो विकास टिकाऊ, तळागाळापर्यंत पोहोचणारा व मौलिक ठरतो. त्यासाठी विकास —प्रयत्नांत लोकांचा सहभाग आवश्यक आहे. पारंपरिक शेती, आरोग्य इ. विषयीच्या तळागाळातील लोकांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे विचार पुढे आले. पाउलो फ्रेरे या दक्षिण अमेरिकन कृतीशील – विचारवंताच्या द पेडॅगॉजी ऑफ द ऑप्रेस्ड ह्या ग्रंथाने विकासाच्या संकल्पनेत क्रांती घडवली. त्यामुळे विकास पत्रकारितेच्या भूमिकेतही बदल झाला. माहितीचे केवळ एकाच दिशेने (पाश्चात्य राष्ट्रे/सरकार/तज्ज्ञ यांच्याकडून शेतकरी, सामान्य माणूस यांच्याकडे) वितरण न करता सामान्य माणसाच्या विकासाबद्दलच्या कल्पना, अडचणी, अनुभव यांचा शोध घेणे, त्या माहितीचे उच्चपदस्थांना/सरकारला वितरण करणे, आणि लोकांनी आपला विकास आपणच घडवावा यासाठी त्यांना उद्युक्त करणे, त्यांना सहभागी करून घेणे ही सुद्धा विकास पत्रकारितेची भूमिका असली पाहिजे, असे १९७० व १९८० च्या दशकात मानण्यात येऊ लागले.

शोध पत्रकारिता : (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम). वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असुन उरलेल्या तीन आधारस्तंभांवर लक्ष ठेवण्याचे काम वृत्तपत्रांना करावे लागते. परंतु त्या क्षेत्रांत वावरणाऱ्या मंडळींची अपकृत्ये सहजपणे चव्हाट्यावर येतात असे नाही. अशी कृत्ये उघडकीस येईपर्यंत पत्रकारांनी वाट पहावी, की अशा अपकृत्यांचा वृत्तपत्रांनी आपणहून शोध घ्यावा आणि त्यांच्यावर प्रकाशझोत टाकावा असा प्रश्न आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेमध्ये आणि १९७० च्या दशकात भारतामध्ये शोध (वा शोधक) पत्रकारितेचा प्रारंभ झाला. अमेरिकेमध्ये १९६७ नंतर काही पत्रकारांनी व्हिएटनाममधील अमेरिकेच्या घोडचुकांबद्दल संशोधन करून लिहायला सुरूवात केली. परिणामत: जनमताच्या रेटयामुळे अमेरिकेला व्हिएटनाममधून माघार घ्यावी लागली. ‘पेंटॅगॉन पेपर्स या नावाने पत्रकारितेचा हा कालखंड प्रसिध्द आहे. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकातून गाजलेले वॉटरगेट प्रकरण पुढे उघड करण्यात आले व परिणामी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतातही मध्य प्रदेशातील आदिवासी भागात होणारी कमलासारख्या स्त्रियांची विक्री, भागलपूरच्या तुरूंगात कैदी गुन्हेगारांच्या डोळ्यात ॲसिड घालण्याचा प्रकार, क्युओ या कंपनीशी  भारत सरकारने केलेल्या तेल खरेदीचा व्यवहार, महाराष्ट्र राज्यांतील उच्च पदस्थांनी सिमेंटच्या कोट्याच्या बदल्यात मिळविलेल्या देणग्या आणि बोफोर्स खरेदी मध्ये उच्च पदस्थांनी घेतलेली लाच इ. प्रकरणांच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. वृत्तपत्रांनी शोध पत्रकारितेचा अवलंब केला.

शोध पत्रकारितेची काही पथ्ये आहेत : भक्कम पुरावा मिळविणे, माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणे, संशोधनाचा झोत विशिष्ट पक्षापुरता किंवा विशिष्ट व्यक्तींपुरता मर्यादित न ठेवणे, गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी (ब्लॅकमेलिंग) याचा उपयोग होणार नाही याची दक्षता घेणे आणि संशोधनाअंतीचे निष्कर्ष प्रांजळपणाने मान्य करणे इत्यादी. शोध पत्रकारितेमुळे संबधित व्यक्तींच्या अपकृत्यांबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. एवढेच नव्हे, तर अपकृत्यांना आळाही बसू शकतो. मात्र त्यासाठी शोध पत्रकारांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविणे आणि त्यांनी लिहिलेल्या मजकुराला जागा देणे, अशा तीन प्रकारे वृत्तपत्रांना अधिक खर्च करावा लागतो. काही प्रसंगी गैरकृत्ये करणाऱ्यांकडून धमक्या वा अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. परंतु वृत्तपत्राच्या प्रतिमेसाठी आणि जनमानसात आपुलकी, आदर व नैतिक दरारा निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रांना शोध पत्रकारितेचा उपयोग होऊ शकतो.

अन्वयार्थक पत्रकारिता : (इंटरप्रिटेटिव्ह जर् नॅलिझम). वस्तुनिष्ठ बातमीबरोबरच त्या बातमीतील घटना, घटना घडण्यामागे असलेले राजकीय सामाजिक व आर्थिक प्रवाह व शक्ती आणि घटनांचे संभाव्य परिणाम यांचे विश्लेषण करणे, वाचकांना सुजाण करणे, घटनांबद्दलची मर्मदृष्टी देणे आणि त्यांना आपले मत बनविण्यासाठी सहाय्य करणे या गोष्टींचाही आता पत्रकारितेत समावेश होतो. त्यासाठी तज्ज्ञांचे साहाय्य घ्यावे लागते. मात्र वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत व सोप्या पद्धतीने या गोष्टी वृत्तपत्रांना लिहाव्या लागतात. अशा लेखनाला अन्वयार्थक पत्रकारिता असे म्हणतात. सर्वसाधारणपणे संपादकीय पानावर किंवा त्या त्या विषयासाठी राखुन ठेवलेल्या पृष्ठांवर अन्वयार्थक लेखन छापले जाते. असे लेखन करण्यासाठी वृत्तपत्रांतील ज्येष्ठ पत्रकारांवर जबाबदारी टाकण्यात येते. त्याचबरोबर विविध विषयातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याकडून वेळोवेळी अन्वयार्थक लेख लिहुन घेणे यांचाही अवलंब करण्यात येतो. अशा लेखनाचा वाचकवर्ग संख्येने मर्यादित असला तरी तो समाजातील प्रभावी घटक असतो. वृत्तपपत्रांच्या तीन कर्तव्यांपैकी वाचकांचे उद्बोधन करण्याचे कर्तव्य अन्वयार्थक पत्रकारेतेमुळेच पार पडते.

अन्वयार्थक पत्रकारितेशी संबधित अशी काही नवी रूपे पुढे आली आहेत. वृत्तपत्रामध्ये अनेक विषय येतात. या विषयाचे वृत्तांकन, विश्लेषण आणि त्यावरील टीका–टिपणी करण्यासाठी तज्ञांची गरज असते. त्यामुळे अशा तज्ञ व्यक्तींना पत्रकारितेचे शिक्षण देणे, किंवा पत्रकारांनी अशा विषयांचा सखोल अभ्यास करणे, हे दोनच पर्याय असतात. त्यामुळे अनेक वेळा अशा विशेष विषयातील पत्रकारिता त्या त्या विषयाच्या नावे ओळखली जाते. उदा. व्यापार उद्योग–पत्रकारिता, अर्थविषयक पत्रकारिता, गुन्हेगारीविषयक पत्रकारिता, क्रीडाविषयक पत्रकारिता, नाटक-चित्रपट–चित्रकला, नृत्य, संगीत अशा कला व करमणुकीसंबधीची पत्रकारिता, स्त्रियांच्या प्रश्नांविषयीची पत्रकारिता असे पत्रकारितेचे काही प्रकार मानण्यात येतात, असे दिसते. त्या त्या विषयांचा वाचकांना परिचय व्हावा, त्यांचे रसग्रहण करता यावे, किंवा व्यवहारात त्यांचा उपयोग करून घेता यावा अशा रीतीने त्या विषयांबद्दल लिहिणे हे त्या त्या विषयाच्या पत्रकारितेचे उद्दिष्ट असते. त्यामुळे त्या विषयाचे मूलभूत स्वरूप, त्याची सद्यःस्थिती, त्याचे भवितव्य इ. गोष्टींचा पत्रकारितेच्या दृष्टीने सोप्या भाषेत वेध घेणे, असे त्या पत्रकारितेचे स्वरूप असते.

काही विषयांना काही विशिष्ट काळामध्ये विशेष महत्व प्राप्त होते. उदा. १९७० च्या दशकामध्ये भारतात व्यापार, उद्योग आणि एकूण अर्थ या विषयाला विशेष महत्व प्राप्त होऊ लागले. त्यामुळे या विषयांसाठी वृत्तपत्रात वेगळी पाने राखून ठेवायला सुरुवात झाली. त्यातून हळूहळू त्या विषयासंबंधीच्या स्वतंत्र दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके व मासिके जन्माला आली. तसेच वृत्तपत्रांतून या विषयांसाठी रोज किंवा आठवडयामधून काही दिवस जागा राखून ठेवण्यात येऊ लागली. त्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांची वृत्तपत्रांत भरती करणे किंवा वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा कल लक्षात घेऊन त्यांना या विषयातील विशेष ज्ञान मिळविण्यास उत्तेजन देणे, असे धोरण वृत्तपत्रांनी अवलंबिले. क्रीडा, गुन्हेगारी या विषयांच्याही संदर्भात असेच घडल्याचे दिसते. अशा विषयांत काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक वेळा त्या विषयांच्या नावे ओळखले जाते. उदा., क्रीडा-पत्रकार.

पीत पत्रकारिता : (यलो जर्नॅलिझम). खप वाढवण्यासाठी भडकपणाचा आश्रय घेणाऱ्या पत्रकारितेसाठी ‘पीत पत्रकारिता’ ही संज्ञा वापरली जाते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात अमेरिकेमध्ये या संज्ञेचा उगम झाला. त्यावेळी सुरु झालेली रंगीत छपाई प्रथम विनोदी चित्रपट्ट्यांच्या विभागासाठी वापरली जाऊ लागली आणि त्यासाठी पिवळ्या शाईचा उपयोग केला जाई.त्यावेळच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या विनोदी चित्रपट्टी- मालिकेचे शीर्षकही ‘यलो किड ऑफ होगन्स ॲली’ असे होते. प्रथम जोसेफ पुलिटझरचे न्यूयॉर्क वर्ल्ड आणि नंतर रँडॉल्फ हर्स्टचे न्यूयॉर्क जर्नल या दैनिकांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या या चित्रपट्टी-मालिकेतील मुलाच्या अंगात पिवळा गाऊन असे. त्यावरून ही संज्ञा प्रथम वापरात आली. मात्र पुढे ती पत्रकारितेतील अपप्रवृत्तीची निदर्शक म्हणुन रूढ झाली. भडक आणि भावनांना आवाहन करणाऱ्या मजकुरावर या पत्रकारितेचा भर असतो. गुन्हेगारी, लैंगिकता, मिथ्या-वैज्ञानिक लेख तथाकथित प्राचीन शोध, चमत्कार ठरावीत अशी औषधे यांच्या बरोबरच भ्रष्टाचार, फसवणुकीची कृत्ये आणि सामाजिक अपकृत्ये यांविरुद्धच्या मोहिमांचाही वापर ह्या पत्रकारितेत खप वाढविण्यासाठी केला जातो. वेगवेगळ्या स्पर्धा व त्यांतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे यांचाही समावेश पीत पत्रकारितेत होतो. वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्या त्या वेळी वापरात आलेली काही तंत्रे आता पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहाने स्वीकारली असल्याचे आढळते. उदा., दीर्घ वृत्तलेख, मोठी छायाचित्रे इत्यादी.

धनादेश पत्रकारिता : (चेकबुक जर् नॅलिझम). वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्या अधिकाधिक वाचनीय करुन वाचकांना आकर्षित करण्याची स्पर्धा वृत्तपत्रांमध्ये सुरु झाली. एखादी कादंबरी किंवा ग्रंथ रविवार आवृत्तीमध्ये क्रमशः छापणे, प्रसिद्ध नाट्य-चित्रपट कलावंतांचे आत्मवृत्त किंवा आठवणी क्रमशः छापणे यांसारखे उपक्रम वृत्तपत्रांनी सुरु केले. परंतु याची परिणती, विशेषतः पाश्चात्य राष्ट्रांमध्ये, गुन्हेगारांच्या अनुभवांसाठी किंवा कबुलीजबाबासाठी त्यांना मोठमोठ्या रकमा देण्याचा प्रघात सुरु होण्यात झाली. आर्थिक मोबदला देऊन असे लेखन मिळविणे हे वृत्तपत्रीय नीतीच्या दृष्टीने स्पृहणीय नाही. त्यामुळे अशा पत्रकारितेला ‘धनादेश पत्रकारिता’ असे म्हणण्यात येऊ लागले. व्हॅसा या ब्रिटिश नौदलातील कारकुनाने रशियाला गुपिते पुरविल्याबद्दल त्याला अठरा वर्षांची शिक्षा झाली. त्याचे आत्मवृत्त संडे मिरर या वृत्तपत्राने ‘मी माझ्या देशाचा विश्वासघात का केला’ या शीर्षकाखाली अनेक भागांत छापले. त्यावर इंग्लंडचे पंतप्रधान हॅरल्ड विल्सन यांनी टीका केली आणि वृत्तपत्र समितीने (प्रेस काउन्सिलने) या विषयाचा विचार करावा, अशी शिफारस ब्रिटिश पार्लमेंटच्या लॉर्डस सभागृहाच्या अध्यक्षांनी केली. १९६३ मध्ये जॉन प्रोफ्यूमो या ब्रिटिश युद्धमंत्र्याला क्रिस्तीन किलर या वेश्येबरोबरच्या संबंधांमुळे राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर द न्यूज ऑफ द वर्ल्डने ‘क्रिस्तीन किलरचा कबुलीजबाब’ या शीर्षकाखाली तिचे आत्मवृत्त छापले आणि त्याबद्दल तिला तेवीस हजार पौंड दिले. यासंबंधी इंग्लंडच्या ‘प्रेस काउन्सिल’ने अशा कुप्रसिद्ध व्यक्तींना आर्थिक मोबदला आणि प्राधान्य देण्यावर टीका केली. गुन्हेगारांना अशा रीतीने बक्षीस देणे आणि त्यातून वाचकांची करमणूक करणे हे अनैतिक आहे, असे ‘प्रेस काउन्सिल’ने आपल्या यासंबंधीच्या १९६५ मध्ये दिलेल्या निर्णयात म्हटले आहे. संपादकांनी केलेल्या सूचना आणि टीका-टिपणी लक्षात घेऊन इंग्लंडच्या ‘प्रेस काउन्सिल’ने निव्हेंबर १९६६ मध्ये एक फर्मान काढले आणि पुढील तीन तत्त्वांचा उद्घोष केला : (१) एखाद्या गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्यामधील साक्षीदाराला खटला संपेपर्यंत माहिती किंवा वृत्तकथा यांसाठी पैसे देण्यात येऊ नयेत, किंवा पैसे देण्याचे आश्वासन देण्यात येऊ नये. (२) खटला संपेपर्यंत गुन्हेगारी स्वरुपातील कोणत्याही साक्षीदाराला वृत्तपत्राच्या वतीने पुराव्याच्या संबंधी खटला संपेपर्यंत प्रश्न विचारले जाऊ नयेत. (३) गुन्हे किंवा अन्य प्रकारच्या दुष्कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना वृत्तकथेसाठी पैसे देण्यात येऊ नयेत.

इंग्लंडच्या वृत्तपत्र समितीने १९८३ नंतर वरील तीन तत्त्वांचा विस्तार करुन असे म्हटले, की गुन्हेगारांप्रमाणेच गुन्हेगारांचे सहकारी, नातेवाईक इत्यादींना तत्संबंधीच्या वृत्तलेखांसाठी पैसे देण्यात येऊ नयेत. वृत्तपत्रांनी या बाबतीत संयम बाळगला नाही आणि पत्रकारितेची नीतितत्त्वे आचरणात आणली नाहीत, तर शासनाला त्यासंबंधी कायदा करावा लागेल, असेही वृत्तपत्र समितीने म्हटले आहे.

नवपत्रकारिता : (न्यू जर् नॅलिझम). १९६० नंतरच्या कालखंडात धोरणे व घटना यांना प्रभावित करण्याचे एक साधन म्हणून वृत्तपत्राकडे तरुण पिढी पाहू लागली. अमेरिकेमध्ये दूरचित्रवाणीवरील वृत्तनिवेदकाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पत्रकाराचा दर्जा उंचावू लागला. दूरचित्रवाणीवरील पत्रकार व वृत्तनिवेदक हा राजकीय नेते, लोकप्रिय लेखक, नट, संगीतकार, चित्रकार इत्यादींच्या जवळ जाऊ शकतो, त्यांच्यात मिसळून वागू शकतो, आणीबाणीच्या प्रसंगात तो हजर असतो, हे दिसल्यामुळे पत्रकारितेच्या व्यवसायाबद्दल उच्चवर्गीय युवक-युवतींनाही आकर्षण वाटू लागले. त्यामुळे विद्यापीठीय शिक्षण घेतलेले तरुण-तरुणी वृत्तपत्रे, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी यांच्यात काम करु लागले. पत्रकारांच्या या बदलत्या सामाजिक दर्जामुळे पत्रकारितेचाही व्यावसायिक दर्जा उंचावू लागला.

पारंपारिक पत्रकारितेच्या काही ठळक मर्यादा नवपत्रकारितेने नेमकेपणाने हेरल्या. उदा., (१) तिच्यातील लवचिकतेचा आणि प्रमाणीकरणाचा अभाव, (२) अधिकृत माहितीच्या वितरणामुळे पत्रकाराच्या आविष्कार स्वातंत्र्यावर नकळतपणे येणारी बंधने, (३) तटस्थ भूमिकेमुळे बातमीच्या मूळ स्रोताला अभावितपणे होणारी मदत व त्यास दिले जाणारे झुकते माप, (४) संपूर्ण सत्य देण्याबाबत उदासीनता इत्यादी. नवपत्रकारितेचे समर्थक जॅक न्यूफिल्ड म्हणतात, की ‘सत्य आणि बातमीसुद्धा सर्वसाधारणपणे कुठल्याही घटनेच्या किंवा सामाजिक संघर्षाच्या पृष्ठभागावर नसते, तर त्याखाली लपलेली असते. असे असूनही पत्रकार मात्र कुठल्या ना कुठल्या तरी पदावर असलेल्या राजकारणी व्यक्तीच्या निवेदनाबद्दल त्याला कधीही प्रश्न विचारत नाही.’ अमेरिकन काँग्रेसचे सदस्य असलेल्या जोसेफ मॅकार्थी यांनी १९५० नंतरच्या दशकात बुद्धिवादी आणि कलावंत यांच्यावर केलेले कम्युनिस्ट आणि धार्जिणेपणाचे आरोप याचे उदाहरण म्हणून देता येते. अनेक वृत्तपत्रांनी हे आरोप कोणतीही चिकित्सा न करता प्रकाशित केले आणि त्यामुळे अनेक संवेदनशील व्यक्तींची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. समाजातील अनैतिकता, भ्रष्टाचार इत्यादींबाबत वृत्तपत्रांनी तटस्थ भूमिका घेणे योग्य नाही, असे नवपत्रकारितेला वाटत असे. या पत्रकारितेने वृत्तलेखनाची पारंपारिक पथ्ये धुडकावून लावली. ललित वाङ्‍‌मयातील अनेक युक्त्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. उदा., नाट्यमय प्रारंभ, उत्कंठावर्धक विवेचन, छोटे छोटे परिछेद, वृत्तनिवेदनात कथनशैलीचा उपयोग इत्यादी. या पत्रकारितेची गाजलेली उदाहरणे म्हणून नॉर्मन मेलरच्या ‘आर्मीज ऑफ द नाईट’ आणि ‘फायर ऑन द मून’ या वृत्तकथनांचा उल्लेख केला जातो. मराठीतही अनिल अवचट यांनी नवपत्रकारितेच्या पद्धतीचे चांगले लेखन केलेले आहे. उदा., ‘माणसं’.

युक्तिवादात्मक पत्रकारिता : (ॲड्व्होकसी जरनॅलिझम). तटस्थ पत्रकारितेला विरोध करुन एखाद्या समस्येची आपल्याला पटणारी बाजू घेऊन पत्रकाराने तिच्या समर्थनासाठी युक्तिवाद करावा, असे ही पत्रकारिता मानते. व्यवहारात तटस्थता अशक्य असते व म्हणून तिचा अट्टाहास पत्रकाराने बाळगू नये, असे या पत्रकारितेच्या समर्थकांचे म्हणणे आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांबाबत नैतिकदृष्ट्या न्याय्य असलेली बाजू उचलून धरण्यासाठी त्या घटनांमध्ये सहभागी व्हावे, असे ही पत्रकारिता मानते. समाजातील गरीब, अल्पसंख्य आणि सामाजिक न्यायासाठी धडपडणारे लोक यांना आपली मते व्यक्त करण्यासाठी प्रभावी प्रवक्ते मिळत नाहीत, म्हणून पत्रकारांनी अशा गटांच्या बाजूने घटनांत सहभागी व्हावे आणि संघर्षातील बाजू समान पातळीवर येतील, असा प्रयत्न करावा. मात्र युक्तिवादात्मक पत्रकारितेमुळे वाचक प्रेक्षकांवर अन्याय होतो, वस्तुस्थितीचे वर्णन दुर्लक्षित होते, शिवाय या पत्रकारितेतच अनेक गट संभवतात, त्यामुळे तिची विश्वसनीयता संपते व मुख्यतः पत्रकारितेची स्वायत्तताही नष्ट होते इ. आक्षेप या पत्रकारितेवर घेतले जातात.

विरोधक पत्रकारिता : (ॲड्व्हर्सरियल जरनॅलिझम). ज्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष निष्प्रभ असतात, त्या ठिकाणी पत्रकारांनी विरोधी पक्षांची भूमिका बजावली पाहिजे, असे काही पत्रकार मानतात, पं. नेहरुंनीही याच अर्थाचे विधान केलेले आहे. राजकीय नेते आणि संस्था यांच्या संदर्भात पत्रकारितेने सखोल समीक्षेची आणि प्रभावी टीकेची भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे मतदार जागृत होईल आणि लोकशाहीला बळकटी येईल. १९६० नंतरच्या प्रस्थापितांना विरोधी असणाऱ्या वातावरणात, विरोधक पत्रकारितेचा जन्म झाला. अमेरिकन पत्रकारितेच्या जगात हेरगिरी करणारी यू-टू विमाने, बे ऑफ पिग्ज’ मधील आक्रमण, व्हिएटनाम युद्ध आणि वॉटरगेट प्रकरण यांचा या संदर्भात उल्लेख केला जातो. या सर्व प्रकरणांत पत्रकारांनी उपलब्ध माहितीचा शोधक आणि संशयी वृत्तीने पिच्छा पुरवून सत्य उघडकीस आणले. पत्रकारितेने असे न केल्यास ती राजकारणी व्यक्तींच्या वाकड्या मार्गावरील सहप्रवासी होऊन जनतेची फसवणूक करण्यात सहभागी होते, असे ही पत्रकारिता मानते.

परांजपे, प्र. ना.

छायाचित्र पत्रकारिता : घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते. त्यास ‘छायाचित्र पत्रकारिता’ म्हणतात. यासाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.

वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात. आधुनिक पत्रकारितेत मात्र हे निकष धुडकावण्याची प्रवृत्ती बळावू लागली आहे. वलयांकित व्यक्तिंच्या खाजगी आयुष्यावरील आक्रमण हा छायाचित्र पत्रकारितेतील वादाचा विषय बनला आहे.

गोडबोले, आल्हाद. वा.

पत्रकारितेचे व्यावसायिक स्वरुप : समाजवैज्ञानिक कसोट्या लावल्यास पत्रकारितेला व्यवसायाचा दर्जा मिळेलच असे नाही. त्या कसोट्यांवर वकील, डॉक्टर, वास्तुरचनाकार यांचे व्यवसाय हे ‘व्यवसाय’ ठरतात पण पत्रकारिता हा व्यवसाय ठरत नाही. पत्रकारितेत शिरण्यासाठी कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेचे बंधन नाही. पत्रकारितेच्या नीतिनियमांची चर्चा होत असली, तरी  ज्यांची अंमलबजावणी करणे अनिवार्य ठरेल असे विशिष्ट नीतिनियम मान्यता पावलेले आहेत, असे दिसत नाही. भारतात फक्त द टाइम्स ऑफ इंडिया या संस्थेने आपल्या प्रकाशनांत काम करणाऱ्या पत्रकारांसाठी नीतिनियमावली लागू केली आहे. सर्वसाधाराणपणे सर्वांना मान्य असणाऱ्या नीतिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या पत्रकारांना व्यवसायबंदी करण्याचा किंवा शिक्षा देण्याचा अधिकार पत्रकारांच्या प्रातिनिधिक संघटनांकडे नाही. पत्रकारितेच्या शिक्षणाचे स्वरुप, कालावधी, परीक्षापद्धती इ. बाबींत, एखाददुसरा अपवाद वगळल्यास, पत्रकार संघटना लक्ष घालत नाहीत. शिवाय पत्रकारिता हा एकट्याने, स्वतंत्रपणे करता येणारा व्यवसाय नाही. त्यामुळे समाजवैज्ञानिक कसोट्यांवर व्यवसायाच्या दर्जास पत्रकारिता आज तरी पात्र ठरत नाही. मात्र तो दर्जा मिळविण्याकडे तिची वाटचाल चालू आहे असे म्हणता येईल.

पत्रकारितेचे मानक (नॉर्मॅटिव्ह) सिद्धांत : एखाद्या विशिष्ट देशात व विशिष्ट काळात पत्रकारितेचे स्वरुप कसे असते, हे सांगणारी तत्त्वे म्हणजे पत्रकारितेचे मानक सिद्धांत होत. देशातील शासनव्यवस्था, राजकीय विचारप्रणाली, आर्थिक व्यवस्था यांच्यावर त्या देशातील पत्रकारितेचे स्वरुप अवलंबून असते, असे सिद्धांत सांगतात. फ्रेड सीबर्ट, थिओडोर पीटर्सन आणि विल्बर श्रॅम या तीन तज्ञांनी १९५६ मध्ये फोर थिअरीज ऑफ द प्रेस ह्या पुस्तकात हे सिद्धांत प्रथम मांडले. पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास करुन निगमन-पद्धतीने ठरविलेल्या चार प्रणाली, असे या सिद्धांतांचे स्वरुप आहे. ते मुख्यतः राजकीय आहेत, कारण प्रचलित राज्यव्यवस्थेशी ते निगडीत आहेत. पत्रकारितेच्या इतिहासाच्या प्रारंभी युरोपमध्ये राजेशाही अस्तित्वात होती. त्यावेळी वृत्तपत्रासाठी राजाकडून परवानगी घ्यावी लागे. राजा व त्याचा अधिकारीवर्ग यांच्या विरुद्ध काहीही लिहिण्यास बंदी असे. एवढेच नव्हे, तर राजाच्या धोरणांना पाठिंबा देणे हेच पत्रकारितेचे उद्दिष्ट असे. वृत्तपत्रांची मालकी खाजगी किंवा सरकारी असे. या पद्धतीला ‘अधिकारवादी सिद्धांत’ असे नाव देण्यात आले. ज्या देशांत अधिकारशाही किंवा लष्करी हुकुमशाही आहे, त्या देशांतील पत्रकारितेला आजही हाच सिद्धांत लागू पडतो. कर, जमीन, दंड इ. आर्थिक उपाययोजना, यंत्रसामग्री, कागद, वीजपुरवठा इत्यादींवरील नियंत्रणे आणि तुरुंगवास अशा उपायांनी अधिकारवादी पद्धतीतील पत्रकारिता नियंत्रित केली  जाते. पत्रकारितेचा दुसरा मानक सिद्धांत म्हणजे ‘स्वातंत्र्यवादी सिद्धांत’. विसाव्या शतकातील युरोप-अमेरिकेतील पत्रकारितेला हा सिद्धांत लागू पडतो. बुद्धिप्रामाण्यवाद मानवाच्या नैसर्गिक हक्कांचे तत्त्वज्ञान मिल्टन, लॉक, मिल यांचे लेखन यांवर हा सिद्धांत आधारलेला आहे. स्वातंत्र्य या मूल्याला सर्वोच्च स्थान देणाऱ्या या सिद्धांतामध्ये माहिती देणे, करमणूक करणे आणि विक्रीतून नफा मिळवणे, ही पत्रकारितेची उद्दिष्टे मानली जातात. मात्र आर्थिक क्षमता असणाऱ्यांनाच तिचा उपयोग करता येतो. या पद्धतीत पत्रकारितेचे नियंत्रण करणाऱ्या तीनच बाबी असतात : न्यायालये, कल्पनांची मुक्त बाजारव्यवस्था आणि शेवटी ‘सत्याचाच विजय होतो’ हे तत्त्व. फक्त बदनामी, असभ्यपणा आणि युद्धकाळातील फुटीरतावाद यांनाच या पद्धतीत बंदी असते. तिच्यात वृत्तपत्रांची मालकी मुख्यतः खाजगी असते. वृत्तपत्रांवर काही सामाजिक जबाबदारी असते, असे पत्रकारितेचा तिसरा मानक सिद्धांत मानतो. त्यानुसार माहिती देणे, करमणूक करणे, विक्रीतून नफा मिळविणे यांबरोबरच सामाजिक संघर्षांसंबंधी  चर्चा घडवून आणणे हे पत्रकारितेचे उद्दिष्ट असते. तिचा उपयोग करण्याचा हक्क केवळ आर्थिक क्षमता असणाऱ्यांनाच नव्हे, तर ज्या व्यक्तीजवळ समाजाला सांगण्यासारखे काही आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आहे, असे सिद्धांत मानतो. या प्रणालीत समाजाचे मत, ग्राहकांची कृती आणि व्यावहारिक नीतिमत्ता यांचे पत्रकारितेवर नियंत्रण असते. महत्त्वाचे सामाजिक हितसंबंध आणि व्यक्तीचे खाजगी हक्क यांवर आक्रमण करण्यास हा सिद्धांत प्रतिबंध करतो. त्यामध्ये वृत्तपत्रांची मालकी मुख्यतः खाजगी असली, तरी सामाजिक हितरक्षणासाठी सरकार ती ताब्यात घेऊ शकते. पत्रकारितेच्या चौथ्या मानक सिद्धांताला साम्यवादी किंवा सर्वंकष हुकूमशाहीवादी सिद्धांत असे नाव देण्यात आले आहे. हेगेल, मार्क्स, लेनिन यांचे लेखन त्याचा आधार आहे. कामगारवर्गाच्या हातात सत्ता असावी आणि साम्यवादी राज्यशासन चालू रहावे हा या प्रणालीच्या पत्रकारितेचा प्रधान हेतू असतो. साम्यवादी पक्षाच्या धोरणावर टीका करण्यास या प्रणालीत बंदी असली, तरी धोरणांच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर टीका मुभा असते. या प्रणालीत वृत्तपत्रांची मालकी सरकारकडे असते आणि प्रकाशनपूर्व अभ्यवेक्षण, तुरंगवास, बडतर्फी, दंड अशा उपायांनी पत्रकारिता नियंत्रित केली जाते.

या चार सिद्धांतांची मांडणी दुसऱ्या महायुद्धोत्तर शीतयुद्धकाळात झाली आणि त्यांचा रोख भांडवलशाही अर्थव्यवस्था व लोकशाही शासनव्यवस्था यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याकडे होता, अशी टीका करण्यात आली. शिवाय दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पत्रकारितेचे विश्लेषण करण्यास ही वर्गवारी उपयुक्त असली, तरी शीतयुद्धोत्तर परिस्थिती आणि विकसनशील राष्ट्रांचे अग्रक्रम यांना ती लागू पडत नाही, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. औद्योगिक लोकशाही राष्ट्रांसाठी सामान्य माणसाच्या सहभागावर जोर देणारा आणि छोटी, स्थानिक वृत्तपत्रे, नभोवाणी केंद्रे, दूरचित्रवाणी केंद्रे यांचा पुरस्कार करणारा ‘लोकशाही सहभागकेंद्री’ सिद्धांत आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये विकासकार्यक्रमांना प्राधान्य देणारा, साहाय्य करणारा विकसनशील माध्यम सिद्धांत असे दोन सिद्धांत नंतरच्या काळात मांडण्यात आले.

शासन आणि पत्रकारिता : पत्रकारितेचे मानक सिद्धांत हे शासनव्यवस्था आणि पत्रकारिता यांच्या संबंधांवर आधारलेले आहेत. शासन आणि पत्रकारिता यांच्यामधील संबंध चार प्रकारचे असतात : (१) पत्रकारितेमध्ये शासन नियंत्रकाची भुमिका करते. त्यासाठी अश्लीलता, अब्रुनुकसानी, राष्ट्रविरोधी कारवाया यांना पायबंद घालणारे कायदे करुन आणि प्रकाशनपूर्व किंवा प्रकाशनोत्तर अभ्यवेक्षण लादून काही संदेश नागरिकांपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी प्रयत्न करते. (२) पत्रकारितेच्या संदर्भातील शासनाची दुसरी  भूमिका ही नियामकाची असते. माहिती आणि कल्पना यांच्या बाजारपेठांतील व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी योग्य ते नियम करुन त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासन करते. (३) पत्रकारितेला शक्य त्या प्रकाराने साहाय्य करणे ही शासनाची तिसरी भूमिका असते. टपाल, माहिती-वितरण, आरक्षण, प्रवाससोयी, निवाससोयी, प्राधान्यक्रम अशा सोयी-सवलतींच्या आधारे शासन पत्रकारितेचे कार्य सुकर करते. (४) शासनाची पत्रकारितेच्या संदर्भातील चौथी भूमिका ही सहभागाची असते. ‘हमारा देश’ सारखी भित्तिपत्रके, क्षेत्रीय प्रसिद्धी, लोकराज्यसारखी नियतकालिके, पुस्तिका, समाचार-चित्रपट इत्यादींमार्फत शासन पत्रकारितेच्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी होते आणि आपला संदेश जनतेपर्यंत थेटपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करते. एन्. टी. रामाराव, बॅ. अ. र. अंतुले यांनी तर आपल्या मुख्यमंत्री-पदाच्या काळात शासकीय वृत्तपत्रेही सुरु केली होती.

परांजपे. प्र. ना.

वृत्तपत्र-कार्यालय : वृत्तपत्र संस्थेचे तीन प्रमुख घटक असतात. (१) अधिकारांची रचना (२) मालक/संचालक मंडळ/ विश्वस्त मंडळ, (३) वृत्तपत्र कार्यालयातील विविध विभाग. (१) अधिकारांची रचना : वृत्तपत्राच्या कचेरीत सर्वाधिक मानाचे स्थान संपादकाचे असले, तरी अधिकारांच्या दृष्टीने संपादक सर्वोच्च असतोच असे नव्हे. त्या त्या वृत्तपत्राच्या संस्कृतीनुसार वृत्तपत्राच्या कार्यालयातील रचना वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात.

 

वृत्तपत्रे चालविणाऱ्या संस्थांच्या गरजांनुसार व स्वरुपानुसार या रचनांमध्ये बदल होतात. महत्त्वाचा मुद्दा हा संपादकीय स्थानाचा आहे. संपादकीय विभाग हा वृत्तपत्राच्या हृदयासारखा असतो. मात्र आधुनिक काळात वितरणाची चोख व्यवस्था करुन भरपूर जाहिराती मिळविल्याशिवाय वृत्तपत्रे टिकाव धरु शकत नाहीत. म्हणून अधिकाऱ्यांच्या रचनांमध्ये संपादकाची श्रेणी इतर विभाग प्रमुखांच्या बरोबरीची होते. मोठी ‘साखळी-वृत्तपत्रे’ चालविणाऱ्या व एकापेक्षा जास्त भाषेत पत्रे चालविणाऱ्या मोठ्या समूहांमध्ये समूहाच्या जाहिरात व प्रशासन प्रमुखांची स्थाने संपादकाच्या वरची असतात. उदा.,

या रचनेत प्रमुख संपादकाचेही स्थान अधिकार साखळीत समूहाच्या इतर विभाग प्रमुखांपेक्षा खालचे असते. मात्र प्रमुख संपादक अथवा संपादक यांच्या संपादकीय शक्तीमुळे त्यांचे जनमानसात, राजकीय, प्रशासकीय व सांस्कृतिक वर्तुळांमध्ये जे स्थान असते, त्यामुळे त्यांना आपल्या समूहात पुष्कळ अलिखित अधिकार प्राप्त होतात व सार्वजनिक समारंभात संपादक मालकाच्या बरोबरीने वावरु शकतात.

(२) मालक/संचालक मंडळ/विश्वस्त मंडळ : यांचे काम वृत्तपत्राची ढोबळ धोरणे ठरविणे, तसेच नवीन उपक्रम सुरु करणे हे असते. त्याबरोबर वृत्तपत्राच्या संपादकीय धोरणाची दिशाही हे मंडळ ढोबळपणेच सूचित करते. एखादा संपादक या मंडळाने आखून दिलेल्या चौकटीबाहेर जाऊ लागला, तर त्याला समजही देण्यात येते. संपादकाची नेमणूक करतानाच त्याने ही चौकट ध्यानी घ्यावी अशी अपेक्षा असते. मोठ्या समूहांमध्ये मंडळाच्या सदस्यांना कचेरीतच स्वतंत्र कक्ष असतात. मात्र वृत्तपत्रांच्या दैनंदिन कामकाजात ते हस्तक्षेप करु शकत नाहीत.

(३) वृत्तपत्र कार्यालयातील विविध विभाग : वृत्तपत्रव्यवसायातील गरजांनुसार वृत्तपत्र कार्यालयाचे सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे विभाग असतात : (१) संपादन विभाग, (२) मुद्रण विभाग, (३) वितरण विभाग, (४) जाहिरात विभाग, (५) प्रशासन विभाग.

संपादन विभाग : या विभागाचे ढोबळपणे दोन उपविभाग दिसतात. (अ) वार्ता विभाग, (ब) लेखन व संपादकीय विभाग. वृत्तपत्राचा आवाका मोठा असेल तर स्थानिक वार्ता ते आंतरराष्ट्रीय वार्ता यांचे तसेच क्रीडा, व्यापारादी विषयांचे उपविभाग असू शकतात. आपल्या वृत्तपत्रांतील बातम्यांची व लेखांची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि माहितीचा दर्जा उच्च प्रतीचा रहावा म्हणून त्या त्या विषयातील विशेषज्ञ या उपविभागांचे प्रमुख असतात.

जगातील सर्व ठिकाणांवरुन बातम्या मिळविणे, त्यांचे संकलन, संस्करण करणे, चालू घडामोडींचे विश्लेषण करणे किंवा करवून घेणे, त्यांबाबत अभ्यासपूर्ण व मार्गदर्शनपर मतप्रदर्शन करणे अशी कामे संपादन विभागास करावी लागतात. हा सारा मजकूर छायाचित्रे, नकाशे, आलेख यांच्यासह सुबक व आकर्षक रीतीने विविध पानांमध्ये छापण्यासाठी या विभागाला तयार करावा लागतो. थोडक्यात म्हणजे जाहिरातींव्यतिरिक्त अंकात प्रसिद्ध होणारा सर्व मजकूर तयार करण्याची जबाबदारी या विभागावर असते.या गोष्टी करण्यासाठी प्रमुख संपादकाच्या हाताखाली विविध श्रेणीच्या संपादकीय कर्मचाऱ्यांच्या सामान्यपणे पुढीलप्रमाणे फळ्या असतात.

वृत्तपत्राची व्याप्ती वाढेल तशा या शाखा प्रसरण पावून त्यातून पुष्कळ उपशाखा निघतात. विस्तृत प्रसार असलेल्या आधुनिक वृत्तपत्रात ही रचना पुढीलप्रमाणे वाढू शकते.

वार्ताहरांचे व वार्ताकक्षांचे काम बातम्या मिळवून त्या संकलित करण्याचे असते. साहाय्यक वृत्तसंपादकाच्या हाताखाली मुख्य उपसंपादकाचे व उपसंपादकांचे काम त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्व अधिकृत दिशांनी आलेला मजकूर (बातम्या, चित्रे, नकाशे, लेक, वार्तालेख, अग्रलेख) नीट तपासून त्यावर संस्कार करणे, बातम्यांमध्ये कोणत्या स्वीकारायच्या, नाकारायच्या, किती प्रमाणात व कोणत्या आकारात द्यायच्या याचा निर्णय करणे, मथळे देणे, पृष्ठांची रचना करणे व आपणास विहित केलेले पान योग्य वेळेत छापून घेणे हे असते.

पूर्वी वृत्तपत्रांमध्ये वृत्तकक्ष व संपादकीय लेखनकक्ष यांमध्ये फारशी देवाण-घेवाण नसे. आता एखादा साहाय्यक संपादक किंवा खुद्द संपादकही विशेष बातमी लिहितो. तर एखाद्या विषयाची विशेष माहिती असलेल्या वार्ताहराला त्याच्या विषयावर अभ्यासपूर्ण मते व्यक्त करणारा लेख लिहिण्याची संधी मिळते. त्यानुसार मोठ्या वृत्तपत्र कचेरीतील संपादन विभागांची रचनाही बदललेली असते.     मध्यवर्ती दालनात वार्ताहर बातम्या आणत असतात. बाहेरगावाहून बातम्या येत असतात, वृत्तसंस्थांच्या दूरमुद्रकांमधून जगभरच्या बातम्यांचा धबधबा चालूच असतो. आता बहुतेक वृत्तपत्रांनी संगणकीकरण केल्याने दूरमुद्रक व टंकलेखन यांचा कडकडात नसतो.

संपादकीय विभागाच्या कामाचे स्वरुप : येणाऱ्या बातम्यांचे दोन प्रकार असतात. आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घडणाऱ्या घटना व अनपेक्षित घडामोडी. पहिल्या प्रकारच्या बातम्यांचे आधी नियोजन करता येते. दुसऱ्या प्रकारच्या बातम्यांचे नाही. वेळापत्रकाबाहेर अनपेक्षित घडणाऱ्या घटनांमुळे धावपळ करावी लागते. ज्याला एखादे ठराविक क्षेत्र दिलेले नाही अशा सर्वसाधारण वार्ताहराचा प्रत्येक दिवस अनिश्चित असतो. वार्ताहर सहसा आपल्या बातम्या कचेरीत येऊन लिहून/टंकलिखित करुन किंवा संगणकावर देतात. फार घाई असेल तर बाहेरुनच दूरध्वनीवरुन किंवा फॅक्सद्वारे देतात. आता तारेचा उपयोग कमी झाला असून फॅक्स अथवा मोडेमच्या सहाय्याने संगणकावर तात्काळ बातम्या पाठविता येतात.

दररोज सकाळी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वृत्तपत्र कचेरीचे काम सुरु होते. या दृष्टीने संपादकाची सकाळची बैठक ही महत्त्वाची असते. या बैठकीला वृत्तसंपादक, वृत्तकक्ष प्रमुख, मुख्य वार्ताहर, सहसंपादक तसेच गरजेप्रमाणे इतर संपादक उपस्थित असतात. आदल्या दिवसाच्या कामाची या बैठकीत तपासणी होते. इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत आपण कोठे मागे पडलो वा कोठे आघाडी मारली याची कसून छाननी होते. आज घडणाऱ्या संभाव्य गोष्टींची चर्चा होते व त्या आधारावर आजच्या कामाचे नियोजन सुरु होते. याच माहितीच्या आधारे सहसंपादकांच्या बैठकीमध्ये संभाव्य अग्रलेख-विषयांची चर्चा होते. पुढील काही दिवसांसाठी कोणाचे व कोणते लेख मागवावे लागतील याचे, तसेच सदरांचे नियोजन होते.

प्रमुख वार्ताहर आपल्या दैनंदिनीनुसार वार्ताहरांमध्ये कामाचे वाटप करतो. एखादा अपघात फारच मोठा असल्यास मुख्य वार्ताहर व वृत्तसंपादकास सावध करुन जादा कुमक मागवून घेण्यात येते. परगावी फार मोठी दुर्घटना घडली असेल, तर मुख्य कार्यालयातून वार्ताहर व छायाचित्रकार यांची कुमक पाठविली जाते.

वृत्तपत्राच्या ग्रंथालयात चालू घडामोडींची कात्रणे, विविध विषयांचे कोश, नियतकालिके, पुस्तके वगैरे असतात. अग्रलेख वा स्फुटे लिहिणारा ग्रंथालयाचे सहाय्य तर घेतोच, पण गरज पडेल तशी अद्ययावत माहिती अधिकृत व्यक्तींकडून अथवा त्या विषयाच्या वार्ताहराकडून देखील मिळवतो.

वृत्तसंपादकाच्या टेबलावर चोवीस तास जगभरातून येणाऱ्या बातम्यांचा ओघ चालू असतो. प्रमुख बातम्या नजरेखाली घालून तो त्यांच्या महत्त्वानुसार कोणती बातमी कोणत्या पानावर यावी व तिचा मथळा किती मोठा असावा, लांबी किती असावी याबाबतीत ढोबळ दिग्दर्शन करतो. दिवसाच्या शेवटी वृत्तसंपादकाचे काम संपते तेव्हा वृत्तपत्राच्या बहुतेक पानांचे नियोजन झालेले असते. सर्वसाधारण बातम्यांची काही पाने व पहिले पान पूर्णपणे तयार व्हायचे असते. ते काम रात्रपाळीच्या मुख्य उपसंपादकाचे असते.

आता संगणकीकरण झालेल्या वृत्तपत्रात बहुतेक मजकूर मुख्य उपसंपादकाच्या संगणकावर येतो व तेथूनच तो योग्य त्या कळा दाबून उपसंपादकाच्या संगणकावर पाठवितो. संस्कारित मजकूर त्याच मार्गाने परतीचा प्रवास करुन संगणकावरच मुख्य उपसंपादक पानाचा नकाशा तयार करतो व संगणकावरुनच तो मुद्रण खात्यात पाठवितो. पूर्वी छापलेल्या मजकुरास लिहिलेल्या मजकुराशी ताडून बघण्यासाठी व शुद्धलेखन तपासण्यासाठी मुद्रिते वाचण्याचे खाते असे, आता संगणकीकरणामुळे ही पायरी कमी झाली आहे.

वृत्तपत्राचे पहिले पान व सर्वसाधारण बातम्यांची काही पाने तयार करणाऱ्या रात्रीच्या मुख्य उपसंपादकाचे काम अत्यंत महत्त्वाचे असते व पूर्वी त्यास त्या दिवशीच्या वृत्तपत्राचा ‘शिल्पकार’ समजले जाई. त्याच्या कौशल्यावरच त्या दिवशीच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता, गुणवत्ता व आकर्षकता अवलंबून असते. या कामात त्याला वेळोवेळी आपल्या वरिष्ठांचा दूरध्वनीवरुन सल्ला मिळत असतोच. अचानक महत्त्वाची बातमी आल्यास छपाई थांबवून तिचा समावेश करण्याचाही त्यास अधिकार असतो.

छायाचित्र बिभाग : बहुतेक वृत्तपत्रांत स्वतःचा छायाचित्र विभाग असतो. वार्ताहरांप्रमाणेच वृत्तपत्राच्या छायाचित्रकारासही  धावपळ करावी लागते. छायाचित्रकारांनी आणलेल्या चित्रफितींवर वेगाने प्रक्रिया करण्यासाठी वृत्तपत्राची सुसज्ज प्रयोगशाळा असते. आता छायामुद्रण पद्धतीत चित्र थेट वापरता येते.

संदर्भ ग्रंथालय : वृत्तपत्राचे स्वतःचे मोठे ग्रंथालय असते. त्यामध्ये विविध विषयांवरील पुस्तकांबरोबरच विविध प्रकारचे कोश, विविध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये छापून आलेल्या बातम्यांची आणि लेखांची कात्रणे संगतवार लावून ठेवलेली असतात. जुन्या घटनांची व महत्त्वाच्या व्यक्तींची छायाचित्रेही व्यवस्थित नोंद करुन ठेवलेली असतात. देशातील व परदेशातील महत्वाच्या व्यक्तींची जीवनचरित्रे व छायाचित्रे या ग्रंथालयात तयार करून ठेवलेली असतात, त्यांपैकी कोणाचे निधन झाले तर ती तात्काळ उपयोगी पडतात, म्हणून या संदर्भ विभागाला वृत्तपत्रीय परिभाषेत ‘शवागार’ (मॉर्ग) असे म्हणतात. साहजिकच हे ग्रंथालय चोवीस तास खुले असावे लागते.

मुद्रण विभाग : वृत्तपत्र कचेरीतील सर्वांत जास्त बदललेले खाते म्हणजे मुद्रण विभाग. वृत्तपत्रांमध्ये संगणकाचा वापर होऊ लागल्यावर छपाईचे तंत्र अमुलाग्र बदलले. ट्रेडल यंत्र, एकाक्षर मुद्रणयंत्र (मोनोटाइप), पंक्ती मुद्रणयंत्र (लायनोटाइप) या क्रमाने वृत्तपत्रीय मुद्रणात बदल होत गेलेले आहेत. अलीकडे तर प्रतिरुप मुद्रण तंत्राचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे पूर्वीच्या चक्रगती मुद्रण तंत्रापेक्षा अधिक वेगाने वृत्तपत्रांची छपाई होऊ शकते. संगणकावर तयार केलेला मजकूर अथवा जुळविलेले संपूर्ण पान थेट छायाचित्राच्या फिल्ममध्ये उतरविले जाते व त्या त्या यंत्राच्या रचनेप्रमाणे त्या पानाचा फिल्मवर ऋण अथवा धन ठसा घेऊन छायाप्रतिरुप पद्धतीने छपाई होते. ही पद्धत अत्यंत वेगवान आहे. बातम्या व इतर सर्व मजकूर मिळविण्यापासून ते त्यांच्या अंतिम छपाईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया संगणकाच्या साहाय्याने होऊ लागलेल्या आहेत.या प्रक्रियेत कोठेही कागद वापरण्याची गरज पडत नाही. फक्त शेवटची छपाई कागदावर होते.

वितरण विभाग : छापलेले वृत्तपत्र लवकरात लवकर वाचकांच्या हाती देणे हे या विभागाचे काम असते. त्यासाठी वृत्तपत्र ताज्या बातम्यांसह लवकरात लवकर छापून तयार होणे आवश्यक असते.

वृत्तपत्रांचे वितरण गावोगावच्या स्थानिक एजंटांमार्फत होते. यासाठी वृत्तपत्रांच्या बहुधा स्वतःच्या गाड्या व वाहने असतात. दूर परगावी जाणारी वृत्तपत्रे आधी छापून घ्यावी लागतात. दूरवरच्या ठिकाणी जाणारी वृत्तपत्रे रेल्वेने अथवा विमानांतूनही पाठविली जातात. पूर्वी जलद वाहनांच्या सोयी नसल्याने दूरच्या ठिकाणी डाक आवृत्ती पाठवत. एकेका वृत्तपत्राच्या पाच-सहा डाक आवृत्त्या असत. वितरण व्यवस्था कार्यक्षम राखण्यासाठी वितरण विभागाचे निरीक्षक व प्रवासी प्रतिनिधी त्यात लक्ष घालतात. वितरण व्यवस्थापकास संपादकीय, छपाई, जाहिरात विभाग व गावोगावचे प्रतिनिधी यांच्या कायम संपर्कात रहावे लागते. खप वाढविण्यासाठी अनेक आकर्षक योजना व उपक्रम सुरु करणे आवश्यक असते.

जाहिरात विभाग : वृत्तपत्रांना खरे उत्पन्न जाहिरातींमधून मिळते. त्यामुळे आधुनिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात खात्याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. वृत्तपत्रांची मालकी व्यापारी वृत्तीच्या लोकांच्या हाती गेल्याने जाहिरात विभाग हाच जणू वृत्तपत्राचा प्राण आहे, असे काही मालक मानू लागले. त्यामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांत जाहिरात विभाग अधिक समृद्ध व सोयी-सवलतींनी सुसज्ज असा होत गेला आहे. जाहिरात विभागातील कर्मचाऱ्यांच्या श्रेण्या व पगारही वाढले. प्रत्येक वृत्तपत्र कचेरीत संपादकीय विभाग व जाहिरात विभाग यांच्यामध्ये द्वंद्व चालू असते.

जाहिरात विभागाच्या प्रमुखाचा मान व त्याचा पगार तसेच सवलती अनेक वृत्तपत्रांमध्ये संपादकापेक्षाही अधिक असतात.जाहिरात प्रमुखाच्या हाताखाली साहाय्यक व प्रतिनिधींचे ताफे असतात. मोठ्या वृत्तपत्रांचे जाहिरात अधिकारी व प्रतिनिधी गावोगावी नेमलेले असतात. काही छोट्या वृत्तपत्रांमध्ये बाहेरगावच्या वार्ताहरांनाच जाहिराती आणण्यास सांगितले जाते. त्यांना पत्रकार म्हणून पगार देण्याऐवजी जाहिरातींवर अडत दिली जाते. या पद्धतीला पत्रकारांचा आक्षेप असून पत्रकारांनी जाहिराती मिळविण्याचे काम केल्यास त्यांचे व्यावसायिक स्वातंत्र्य खूपच संकुचित होते.

जाहिरात प्रमुखाचे काम म्हणजे वृत्तपत्राच्या पृष्ठांवरील जागा विकणे. पत्राच्या खपाप्रमाणे त्या त्या पत्राचे जाहिरातीचे दर ठरविले जातात. त्यामुळे खपात वाढ व्हावी, खप वाढविण्यासाठी मजकूरही आकर्षक असावा याकडे जाहिरात प्रमुख लक्ष देतात. परिणामतः सु. १९७५-८० पासून वृत्तपत्रांतील जाहिरात प्रमुखाचा संपादकीय, वितरण व छपाई विभागांतील हस्तक्षेप वाढू लागला. वृत्तपत्रांतील पृष्ठांची जास्तीत जास्त जागा व्यापून पत्रातील बातम्या व इतर मजकूर जाहिरातींना पोषक असावा, असा जाहिरात प्रमुखाचा प्रयत्न असतो. त्यामुळे जाहिरात विभाग व संपादन विभाग यांतील परस्परसंबंध हा संघर्षाचा नाजूक विषय आहे. हा संघर्ष टाळून पत्रकारिता व आवश्यक असा धंदा यांचा समतोल साधण्याचे काम मालकाला करावे लागते.

वृत्तपत्रात जाहिराती किती प्रमाणात असाव्यात ते ठरविण्याचा प्रयत्न सरकारी संस्थांकडून होतो. मात्र अशा संस्थांनी घालून दिलेले दंडक (उदा., मजकूर व जाहिराती ६०-४०% व ५० ते ५०% हे प्रमाण) सर्वच पत्रे पाळतात असे नव्हे. वृत्तपत्रांतील जाहिराती व संपादकीय मजकूर यांचे योग्य संतुलन ज्या वृत्तपत्रात साधले जाते तेच सहसा वाचकांच्या पसंतीस उतरते.

प्रशासन विभाग : वृत्तपत्राच्या निरनिराळ्या शाखांत मिळून अनेक कर्मचारी काम करीत असतात. त्यांच्या हितसंबंधांची जपणूक करणारे निरनिराळे कायदे अस्तित्वात असतात व वृत्तपत्रचालकांना ते पाळावे लागतात. कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची वार्षिक वाढ, त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या रजा, कामाचे तास हा सारा गुंतागुंतीचा व्याप प्रशासन विभाग नियंत्रित करतो. हा विभाग मुख्य व्यवस्थापकाच्या अधिकाराखाली असतो किंवा वृत्तपत्रचालकातर्फे तो स्वतंत्रपणे सांभाळला जातो. निरनिराळ्या खात्यांमार्फत येणारे उत्पन्न व होणारा खर्च यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी असतो. आपले वार्षिक हिशोब तपासण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्राने हिशोब-तपासनीसही नेमलेला असतो.

साधू, अरुण

बातम्यांचे संपादन : वृत्तपत्र-कचेरीत वृत्तसंस्थांकडून, परगावच्या आणि शहरातील वार्ताहरांकडून, तसेच इतर मार्गांनी दूरमुद्रक, दूरध्वनी, तारा, फॅक्स, निवेदन आदी माध्यमांद्वारे घटनांचे वृत्तांत येत असतात. वृत्तपत्राच्या आकारानुसार त्यातील आवश्यक आणि योग्य बातम्यांची निवड मुख्य उपसंपादक करतात. वृत्तपत्र प्रादेशिक भाषेत असेल, तर बातम्यांचे भाषांतर करावे लागते. तसेच वार्ताहराने दिलेल्या वृत्तांताचे पुनर्लेखन, संपादन आदी संस्कार करावे लागतात.

नेमके काय घडले घटना केव्हा, कशी, का, कोठे घडली तसेच कोणामुळे घडली किंवा कोणी घडवली या मूलभूत प्रश्नांची उत्तरे बातमीत अपेक्षित असतात. बातमीची रचनाही ‘उलट्या पिरॅमिड’ प्रमाणे असते. म्हणजे घटनाक्रमातील शिखरपरिणाम सर्वांत आधी, कमीत कमी शब्दांत, सोप्या पद्धतीने परंतु प्रभावीपणे सांगावयाचा असतो. त्यानंतर पूरक तपशील आणि शेवटी दुय्यम माहिती दिली जाते.

बातमीतील तपशील वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. त्यामुळे बातमीतील सत्यासत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी उपसंपादकावर येते. वृत्तपत्रातील उपलब्ध जागेनुसार प्रत्येक बातमीचे अंकातील स्थान ठरवावे लागते. त्यानुसार भाषांतरित अथवा लिखित वृतांतातील अनावश्यक भाग वगळून त्याची लांबी कमी करणे, शब्द आणि वाक्यांची फेररचना करणे, आवश्यकतेनुसार बातमीचे पुनर्लेखन करणे, वृत्तपत्रांच्या धोरणानुसार तसेच शैलीनुसार संपादन करणे, उचित शीर्षक देणे, योग्यतेनुसार वृत्तपत्रातील पानात तिला स्थान देणे हे सर्व संस्कार छपाईच्या वेळेचे भान ठेवून उपसंपादक करीत असतो.

गोडबोले, आल्हाद वा.

पत्रकारितेची  भाषा : वृत्तपत्रात लिहिली जाणारी भाषा ग्रांथिक भाषेपेक्षा आणि बोली  भाषेपेक्षा भिन्न असते. सर्वांना समजेल अशी भाषा वृत्तपत्रांना योजावी लागते, ती व्यक्तीची भाषा नसून वृत्तपत्र या संस्थेची भाषा आहे, तिच्यात शैलीच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांना वाव नसतो. शिवाय आपल्या वृत्तपत्राची भाषा इतर वृत्तपत्रांच्या भाषेपेक्षा वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक वृत्तपत्र करीत असते. वृत्तपत्रीय भाषेला आणखीन काही पथ्ये सांभाळावी लागतात. ती म्हणजे अल्पाक्षरत्व. शक्यतो लांब, अपरिचित शब्द टाळावे लागतात. त्यासाठी कधी कधी शास्त्रीय काटेकोरपणाकडे कानाडोळा करावा लागतो. व्यक्तिगत शैली टाळण्यासाठी वृत्तपत्रांच्या भाषेत कर्मणी वाक्यांचा उपयोग अधिक केला जातो. यांमुळे काही वेळा वृत्तपत्राची भाषा यांत्रिक व कृत्रिम होण्याचा धोका असतो. अशा बिनचवीच्या, बिनरंगाच्या सपक भाषेला ‘जर् नॅलीझ’ असे नावही देण्यात आले आहे. ही भाषा मुख्यतः बातम्यांमध्ये वापरली जाते. त्यात माहितीचे स्रोत अन्य आहेत हे दर्शविण्यासाठी ‘असे समजते’, ‘असे सांगण्यात आले’, ‘अशी बोलवा आहे’, अशा प्रकारची वाक्ये वापरली जातात. परंतु संपादकीये, वृत्तलेख किंवा अन्वयार्थ लावणारे लेख यांमध्ये वृत्तपत्रे वेगळी भाषा वापरु शकतात. विशेषतः मानवी आस्थाविषयक वृत्तकथनात (ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी) नाट्यमय, लालित्यपूर्ण भाषा वापरण्यास वाव असतो. भाषा मुख्यार्थावर भर देते आणि व्यक्त होणाऱ्यां आशयाचे वाचकाच्या मनात विश्लेषण व्हावे असा तिचा उद्देश असतो. याला अपवाद म्हणजे ‘नवपत्रकारिता’.

पत्रकारिताविषयक संस्था : भारतात पत्रकारितेशी संबंधित अशा काही शासकीय आणि अशासकीय संस्था महत्त्वाचे कार्य करीत आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

भारताचे वृत्तपत्र निबंधक : (रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया). ही संस्था १ जुलै १९५६ रोजी अस्तित्वात आली. कायद्याने ठरवून दिलेल्या आपल्या कर्तव्यांखेरीज मुद्रणासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि वृत्तपत्रांना लागणारी इतर सामग्री यांच्या आयातीबद्दल शिफारशी करण्याचे कामही निबंधक करतात. ‘प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट, १८६७’ या कायद्यामध्ये आणि त्या कायद्याखाली करण्यात आलेल्या नियम आणि त्यांतील दुरुस्त्या यांमध्ये वृत्तपत्र निबंधकाची कर्तव्ये आणि कार्ये यांचा समावेश करण्यात आला आहे [→वृत्तपत्रविषयक कायदे]. वृत्तपत्राविषयीची माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्याआधारे आकडेवारी तयार करुन लोकसभेला आपला अहवाल देणे हे वृत्तपत्र निबंधकाचे काम असते. वृत्तपत्र सुरु करताना त्याच्या शीर्षकाला वृत्तपत्र निबंधकांकडून संमती घ्यावी लागते.

प्रेस इंफर्मेशन ब्यूरो : मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सरकारची  धोरणे, कार्यक्रम, पुढाकार आणि कामगिरी यांबद्दल माहिती देण्यासाठी ही संस्था अस्तित्वात आली. वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमधून व्यक्त झालेले जनमत सरकारपर्यंत पोहोचविणे, म्हणजेच सरकारी कार्यक्रमांना लोकांकडून मिळणारा प्रतिसाद सरकारकडे पोहोचविणे हे काम ही संस्था करते. पत्रसूचना कार्यालयाची (पीआयबी) आठ क्षेत्रीय कार्यालये असून ३२ ठिकाणी शाखा कार्यालये व माहिती केंद्रे आहेत. प्रसिध्दिपत्रके, वृत्तलेख, पार्श्वभूमिलेख, पत्रकार परिषद, मुलाखती आणि पत्रकारांचे दौरे अशा विविध मार्गांनी हे कार्यालय माहितीचे वितरण करते. हिंदी, उर्दू आणि अन्य तेरा प्रादेशिक भाषांमध्ये ते माहिती देते आणि ती सु. ७,००० वृत्तपत्रे व माध्यमसंस्थांपर्यंत पोहोचविते. संगणक, संगणकीय महाजाल यांचाही उपयोग माहिती प्रसारणासाठी केला जातो. माध्यमसंस्थांत काम करणाऱ्या पत्रकारांची अधिस्वीकृती (ॲक्रेडिटेशन) करण्याचे कामही हे कार्यालय करते. त्याची प्रादेशिक कार्यालये मुंबई, चेन्नई, चंडीगढ, कोलकाता, लखनौ, गौहाती, भोपाळ आणि हैदराबाद या ठिकाणी आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, संगणकामार्फत छायाचित्रे पाठविणे, पत्रकार परिषदेसाठी सभागृह आणि दूरमुद्रकांचे जाळे इ. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयींमुळे या कायार्लयाला आपले काम सुलभपणे करता येते. या कार्यालयाचे प्रमुखपद शासनाचा सर्वोच्च माहिती अधिकारी सांभाळतो.

इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन : जनसंज्ञापनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विशेष अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ही कामे करण्यासाठी या संस्थेची स्थापना १९६५ मध्ये झाली. ही एक स्वायत्त संस्था असून तिला भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून निधी उपलब्ध होतो. ही संस्था शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम चालविते, चर्चासत्रे आयोजित करते आणि देशाला आवश्यक असलेले पायाभूय माहितीविषयक व्यवस्थापन निर्माण करण्यास साहाय्य करते. सरकारी नोकरीतील, विशेषतः माहिती व प्रसरणाशी संबंधित अशा केंद्रीय सेवांमधील अधिकाऱ्यांना अल्प व दीर्घ कालावधीचे शिक्षण व प्रशिक्षण देते आणि पत्रकारिता, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी-पत्रकारिता, वृत्तसंस्थांसाठीची पत्रकारिता आणि जाहिरात या विषयांचे पदविका अभ्यासक्रम चालविते. त्यांपैकी काही अभ्यासक्रमांत अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीतील उमेदवारांनाही प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. याशिवाय अनेक उद्बोधन वर्गांचेही आयोजन ही संस्था करते. त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये काम करणारे अधिकारीही सहभागी होतात. या संस्थेने भारताच्या चार कोपऱ्यांत चार केंद्रे किंवा उपसंस्था सुरु करण्याचे ठरविले असून त्यांपैकी ओरिसातील धेनकानाल व केरळमधील कोट्टयम् येथील केंद्रे सुरु झाली आहेत. उरलेली दोन केंद्रे मध्य प्रदेशातील झाबुआ आणि नागालँडमधील दिमापूर येथे सुरु करण्यात येणार आहेत. कम्युनिकेटर हे इंग्लिश नियतकालिक आणि संचार माध्यम हे हिंदी नियतकालिक ही संस्था प्रकाशित करते. त्याचप्रमाणे अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण करुन त्यांचे अहवाल ती सरकारला सादर करते आणि त्यातील काही अहवाल पुस्तिकांच्या रुपाने प्रकाशित करते.

प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया : या संस्थेची स्थापना १९६३ मध्ये भारतातील वृत्तपत्रांनी एकत्र येऊन केली. पत्रकारितेच्या उच्च आणि जबाबदारीच्या कसोट्यांना भारतीय वृत्तपत्रांना उतरता यावे, हा तिच्या स्थापनेमागील मुख्य हेतू होता. आशियातील अशा प्रकारची ही पहिलीच संस्था होय. या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंध जोडले असून त्यांमध्ये इंटरनॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ प्रेस, युनेस्को, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यू. एन्. डी. पी.), प्रेस फाउंडेशन ऑफ एशिया, फोर्ड प्रतिष्ठान, रॉयटर, फ्रीड्रिख एबर्ट फाउंडेशन इ. संस्थांचा समावेश आहे. संस्था विदुर  या नावाचे नियतकालिक प्रकाशित करते आणि तिने आतापर्यंत २१ पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी अल्प मुदतीचे उद्बोधन व प्रशिक्षण कार्यक्रम चालविणे, आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या कार्यक्रमांसाठी भारतीय पत्रकारांची निवड करणे, पत्रकारितेतील नवीन यंत्रसामुग्री, तंत्रे आणि विकसित होणाऱ्या पद्धती यांचा भारतीय वृत्तपत्रांना परिचय करून देणे इ. कामे ही संस्था करते. वृत्तपत्रांच्या तंत्रज्ञानामध्ये संशोधन करणारी ‘रिसर्च इन न्यूजपेपर डेव्हलपमेंट’ (आर्. आय्. एन्. डी.) ही चेन्नईची १९७४ मध्ये स्थापन झालेली संस्था प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये १९९० मध्ये विलीन झाली. प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे आणि परिसंवादही आयोजित करते.

वृत्तपत्रकारिता आणि महाजाल (इंटरनेट) : भारतात १९९५ नंतर जागतिक संगणकीय महाजालातील पत्रकारिता अस्तित्वात आली. तिचे पूर्ण स्वरूप अजून पूर्णपणे लक्षात आलेले नाही. विसाव्या शतकाच्या सातव्या दशकात लष्करी उपयोगासाठी महाजालाच्या प्राथमिक रूपाचा वापर अमेरिकेत सुरू झाला. १९८४ मध्ये अमेरिकेतील शिक्षण व संशोधनसंस्थांना ते खुले झाले. १९९० पासून त्याचा जागतिक विस्तार सुरू झाला. १९९३-९४ मध्ये ते व्यापारी उपयोगासाठी खुले झाले. हे महाजाल एकविसाव्या शतकातील जगावर काय परिणाम करील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुतर्फा संदेशवहन हे महाजालाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्यामुळे पत्रकारितेच्या रूढ स्वरूपामध्ये त्यामुळे क्रांती होत आहे. प्रत्येक वाचकाला आपल्या आवडीनुसार वैयक्तिक वृत्तपत्र उपलब्ध होणे महाजालामुळे शक्य होत आहे. भारतातील जवळजवळ सर्व महत्त्वाची वृत्तपत्रे आता महाजालात उपलब्ध आहेत. रोमन, जपानी व चिनी लिपींप्रमाणेच आता भारतीय लिपीही महाजालात उपलब्ध होत आहे.

महाजालातील वृत्तपत्रांमध्ये लांबी-रुंदीच्या संकल्पनांनाच थारा नसल्यामुळे तेथे अमर्याद जागा उपलब्ध असते. त्यामुळे मजकुराला कात्री लावण्याची गरज उरत नाही. महाजालातील मजकुराला कोणत्याही प्रकारचे अभ्यवेक्षण लागू होत नाही. त्यामुळे कोणतेही दबाव तेथे व्यर्थ ठरतात. महाजालातील बातम्यांना विशेष दुव्याने (हाइपरलिंक) जोडून परिपूर्ण असा संदर्भकोश तयार करता येतो. महाजालातील कोणत्याही संकेतस्थळावरील (वेबसाइट) माहिती विशेष दुव्याने उपलब्ध करून देता येत असल्यामुळे ‘स्वामित्व हक्का’चा प्रश्न निकालात निघतो. दुतर्फा संदेशवहनामुळे (विशेषत: रिअलटाइम चॅटमुळे) महाजालातील वृत्तपत्राच्या संपादक -पत्रकारांशी तात्काळ संपर्कही साधणे शक्य असते. मात्र अजूनतरी महाजालातील वृत्तपत्र मुद्रित वृत्तपत्रापेक्षा फारसे वेगळे झालेले नाही; पण येत्या काही वर्षांतच ते अपरिहार्यपणे वेगळे होईल असे दिसते.

महाजालातील वृत्तपत्रामुळे मुद्रित वृत्तपत्र संपुष्टात येईल असे मात्र नाही. मुद्रित वृत्तपत्र जितक्या सहजपणे मिळू शकते तितक्या सहजपणे महाजालातील वृत्तपत्र उपलब्ध होत नाही. संगणक, मोडेम, दूरध्वनी व महाजाल-सेवा (आणि विद्युतपुरवठा) उपलब्ध असेल, तरच महाजालातील वृत्तपत्राचा लाभ घेता येतो. मुद्रित वृत्तपत्र सर्व ठिकाणी नेता येते, वाचता येते [बाथरूम, बेडरूम, बस आणि बीच (विश्रांती स्थळ) अशा चार ‘बी’] तसे महाजालातील वृत्तपत्राच्या बाबतीत शक्य नाही. महाजाल हे माध्यम आज तरी अनिर्बंध आहे. त्यामुळे स्वामित्व हक्क, बदनामी, अश्लीलता, हिंसाचार, फुटीरता, विश्वासार्हता इ. बाबतींत महाजालातील वृत्तपत्रकारितेत अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाजालात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती व वृत्तपत्रांची नोंदणी यांबाबतीतले निकष सध्या अस्तित्वात नाहीत आणि ते ठरविणे अवघड असल्यामुळे त्याबाबतीतही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

परांजपे, प्र. ना.

संदर्भ : 1. Brucker, Herbert, Journalist, New York, 1962.

2. Butler, E. H. Introduction to Journalism, Peterborough, 1955.

3. Critchfield, Richard, The Indian Reporter’s Guide, Bombay, 1962.

4. Gerald, J, Edward, The Social Responsibility of the Press, Honolulu, 1966.

5. Goulden, J. F. Newspaper Management, London, 1967,

6. Hodgson, F. W. Modern Newspaper Practice, 1984.

7. Howard, Philip, Weasel Words, London, 1978.

8. International Press Institute, The Active Newsroom, Zurich, 1961.

9. Kamath, M. V. The Journalist’s Handbook, New Delhi, 1983.

10. Mansfield, F. J.; Weaver, Denis, Ed., Mansfield’s Complete Journalist, London, 1962.

11. Mott, G. F. New Survey of Journalism, 1959.

12. Neal, R. M. News Gathering and News Writing, Englewood Cliffs (N. J. ), 1963.

13. Padhi, K. S.The Muzzled Press, New Delhi, 1995.

14. Parikh, R. D. The Press and Society, Bombay, 1965.

15. Rau, M. Chalapathi, Journalism and Politics, New Delhi, 1984.

16. Stephen, Neil, Journalism, London, 1963.

17. Teel, Leonard Ray; Taylor, Ron, Into the Newsroom, New Delhi, 1985,

18. Varma, Adarsh Kumar, Advanced Journalism, New Delhi, 1993,

19. Wainwright, David, Journalism Made Simple, 1982.

20. Waterhouse, Keith, Waterhouse on Newspaper Style, New York, 1989.

21. Westley, Bruce, News Editing, Bombay, 1968.

२२. पाध्ये, प्रभाकर; अनु. परांजपे, प्र. ना.; परांजपे, वसुधा, पत्रकारितेची मूलतत्त्वे, पुणे, १९९१.