वृत्तसंस्था : (न्यूज एजन्सी) वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी, व्यापारी संस्था इत्यादींना शुल्क आकारुन वृत्त पुरविणाऱ्या संस्थांना ‘वृत्तसंस्था’ म्हणतात. त्यांचे जागतिक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक असे प्रकार केले जातात. जगाच्या कोनाकोपऱ्यांतून वृत्त गोळा करणाऱ्या आणि जगाच्या कोनाकोपऱ्यांपर्यंत ते वितरित करणाऱ्या वृत्तसंस्थांना ‘जागतिक’ वृत्तसंस्था म्हणतात. उदा., अमेरिकेतील ‘ॲसोसिएटेड प्रेस’ (एपी) व ‘युनायटेड प्रेस इंटरनॅशनल’ (यूपीआय्‌) या संस्था इंग्लंडची ‘रॉयटर’ ही संस्था आणि फ्रान्सची ‘Agence France Presse’ (एएफ्‌पी) इत्यादी. जगाच्या विशिष्ट भागातच प्रभावी असणाऱ्यांत जर्मनीची ‘Deutsche Presse-Agentur’ (डीपीए), जपानची क्योडो न्यूज व रशियाची इन्फर्मेशन टेलिग्राफिक एजन्सी ऑफ रशिया [आय्‌टीएआर्‌-टीएएस्‌एस्‌ (टास)] अशा वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय असल्या, तरी जगातल्या सर्व राष्ट्रांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. आपापल्या देशापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय वृत्तसंस्था म्हणतात. उदा., प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय्) व युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएनआय्) या भारतातील राष्ट्रीय वृत्तसंस्था. भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या देशांच्या राजधान्यांमध्ये (उदा., वॉशिंग्टन, लंडन, मॉस्को, डाक्का, इस्लामाबाद, बीजिंग इ.) त्यांचे प्रतिनिधी असले, तरी जगाच्या कोनाकोपऱ्यांतील बातम्यांसाठी त्या जागतिक वृत्तसंस्थांवर अवलंबून असतात. काही वृत्तसंस्था देशातील विशिष्ट भागात किंवा विशिष्ट विषयांना वाहिलेल्या (उदा., पर्यावरण, विज्ञान इ.) किंवा विशिष्ट वृत्तपत्रांसाठीच कार्यरत असतात. त्यांना प्रादेशिक वृत्तसंस्था असे म्हणतात. १९७० नंतरच्या दशकात पाश्चात्य देशांच्या मालकीच्या व परिणामतः पाश्चात्य दृष्टिकोनाचा प्रभाव असलेल्या चार जागतिक वृत्तसंस्थांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी काही वृत्तसंस्था अस्तित्वात आल्या. ‘नॉनअलाइन्ड न्यूज एजन्सीज पूल’ (एन्‌एएन्‌एपी), ‘कॅरिबियन न्यूज एजन्सी ’ (कना – सीएन्‌ए) आणि ‘आसिन’ (एएस्‌आय्‌एन्‌) या संस्था कोणत्याही एका विशिष्ट देशाच्या मालकीच्या नसून आपापल्या प्रभावक्षेत्रात त्या काम करतात. जगात वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी  इ. सर्व माध्यमांमध्ये वृत्तसंस्थांनी पुरविलेल्या बातम्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणून वृत्तसंस्थांकडे पाहिले जात असल्याने वृत्तसंस्थांनी पुरविलेल्या बातम्या वस्तुनिष्ठ, परिपूर्ण आणि अचूक असाव्यात, अशी अपेक्षा असते. कोणत्याही विशिष्ट हितसंबंधांपासून मुक्त राहून वस्तुनिष्ठ वार्तांकन करणे, हे चांगल्या वृत्तसंस्थेच्या यशाचे गमक असते. घटनांचा तपशील देणे हे वृत्तसंस्थांचे काम असते. त्यावर भाष्य करणे हा मात्र संबंधित वृत्तपत्रांचा हक्क असतो.

वृत्तसंस्थेच्या बातम्या संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम दूरमुद्रकाच्या (टेलिप्रिंटर) साहाय्याने केले जाते. दूरमुद्रकाच्या स्वरुपात काळानुरुप बदल होत गेले परंतु आजही दूरमुद्रकाद्वारे किंवा मोडेमद्वारे (दूरध्वनी व संगणकाच्या साह्याने) बातम्या पाठविल्या जातात. बातम्या लिहिण्याची वृत्तसंस्थांची विशिष्ट अशी पद्धत असते आणि त्या पाठविताना काही संकेत पाळले जातात. बातम्या पाठविताना अंक किंवा शब्द इत्यादींमध्ये चुका होण्याचा संभव असतो. म्हणून बातम्या पाठविताना विशिष्ट शब्दांची पुनरुक्ती करणे, संख्या अक्षरी लिहिणे इ. संकेत वृत्तसंस्था पाळतात. छोट्या परिच्छेदांत (टेक) त्या असतात. वृत्तपत्राचा ग्राहक, वृत्तपत्राचे उत्पन्न, क्षेत्रीय विस्तार इ. निकषांच्या आधारे वृतसंस्था आपल्या सेवांचे वर्गीकरण करुन वृत्तपत्राची गरजपूर्ती आणि पैशांची काटकसर दोन्ही साधण्याचा प्रयत्न करतात. बातम्यांची पार्श्वभूमी स्पष्ट करणारे विस्तृत लेख, आकडेवारी, आर्थिक, औद्योगिक बाजारपेठा यांचे विश्लेषण इ, अन्य सेवाही वृत्तसंस्था वृत्तपत्रांकडून जादा वर्गणी घेऊन पुरवितात.

बातमीचे स्वरुप, बातम्यांची निवड, घटनांचे विश्लेषण व मूल्यमापन इ. बाबतींत वृत्तसंस्थांचा प्रभाव वृत्तपत्रांवर पडतो. प्रारंभी बातम्या तारेने पाठविल्या जात. त्यामुळे त्या कमीत कमी शब्दांत, सर्व मुख्य घटक प्रारंभीच सांगणाऱ्या उलट्या पिरॅमिडच्या (आधी कळस, मग पाया) पद्धतीने लिहिल्या असाव्यात, असा संकेत प्रस्थापित झाला. तिसऱ्या जगातील स्थानिकेतर घडामोडींच्या बातम्यांच्या आशयाचा अभ्यास करताना विल्बर श्रॅमला चार जागतिक वृत्तसंस्था व आशियातील चौदा वृत्तपत्रे यांमध्ये लक्षणीय एकरुपता आढळली, असे इंटरनॅशनल न्यूजवायर्स अँड द थर्ड वर्ल्ड न्यूज इन एशिया (१९७८) या पुस्तकावरुन दिसते.

वृत्तसंस्थांचा इतिहास : जगातील पहिली वृत्तसंस्था ‘हवस’ (Havas) ही १९३५ मध्ये फ्रान्समध्ये स्थापन झाली. तिची वारसदार संस्था ‘एएफ्‌पी’ ही जगातील सर्वांत ज्येष्ठ वृत्तसंस्था होय. एपी, रॉयटर व यूपीआय् ह्या वृत्तसंस्था अनुक्रमे १८४८, १८५१ व १९०७ मध्ये स्थापन झाल्या. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका अशा विकसित राष्ट्रांतच जागतिक वृत्तसंस्थांचा जन्म व विकास झाला, सत्ताधीशांशी असलेल्या संबंधांमुळे त्यांना प्रतिष्ठा, सवलती, दळणवळणाची साधने, वर्गणीदार व बातम्यांचे स्रोत यांचा लाभ झाला. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांचा साम्राज्यविस्तार आणि वृत्तसंस्थांचा विकास हे परस्परांशी निगडीत असल्याचे आढळते. काही वृत्तपत्रांनी १८३५ साली एकत्र येऊन संयुक्तपणे आपले प्रतिनिधी परदेशी नियुक्त केले, तेव्हापासून एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने पाठविलेल्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी वापरण्याची पद्धत रुढ झाली. १८४८ साली न्यूयॉर्क येथील काही वृत्तपत्रांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन मेक्सिको विरुद्धच्या युद्धाच्या बातम्या मिळविण्यासाठी संयुक्तपणे वार्ताहर नेमले.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी पाठविलेल्या एकूण बातम्यांमुळे विकसनशील देशांसंबंधींच्या बातम्यांचे प्रमाण फारच कमी असे. १९८० च्या सुमाराला रॉयटर, एएफ्‌पी, यूपीआय् या वृत्तसंस्थांनी पाठविलेल्या एकूण मजकुरापैकी फक्त तीन ते सहा टक्के मजकूर आशिया खंडाविषयी होता, असे एका पाहणीत निष्पन्न झाले. मजकुराच्या शब्दसंख्येच्या अत्यल्प प्रमाणापेक्षाही या मजकुरातील आशय अधिक आक्षेपार्ह आहे, असे विकसनशील देशांचे म्हणणे होते. या देशांबद्दलच्या बातम्यांमध्ये फक्त तेथे झालेले भूकंप, दुष्काळ, उपासमार, लष्करी उठाव, मनुष्यहानी इ. नकारात्मक गोष्टींनाच पाश्चात्य वृत्तसंस्था महत्त्व देत. त्यामुळे या देशांची जगातील प्रतिमा मलीन होते, या आरोपात बरेचसे तथ्यही होते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आणि उमेदीने नवीन राष्ट्र घडविणाऱ्या या देशांमधील विधायक सामाजिक-आर्थिक सुधारणांची दखलही या संस्था घेत नसत. विकसनशील राष्ट्रांदरम्यान स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वृत्तवितरण-सेवा अस्तित्वात नसल्याने हे देशही अन्य आशियाई, आफ्रिकी, दक्षिण अमेरिकी राष्ट्रांसंबंधीच्या बातम्यांसाठी पाश्चात्य वृत्तसंस्थांवरच अवलंबून असत. या असंतुलनावर उपाय म्हणून १९७५ साली अलिप्त राष्ट्रांची वृत्तसंस्था ‘एन्‌एएन्‌एपी’ ची स्थापना करण्यात आली. आशिया, आफ्रिकी, यूरोप आणि दक्षिण अमेरिका या खंडांमधील सदस्य-देशांदरम्यान या वृत्तसंस्थेच्या रुपाने बातम्यांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होते. भारतातील ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय्) ही वृत्तसंस्था एन्‌एएन्‌एपीची सभासद आहे. ‘ऑर्गनायझेशन ऑफ एशियन न्यूज एजन्सी’ (ओएएन्‌ए), आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेची-एएस्‌ईएएन्‌-संयुक्त वृत्तसंस्था, आशिया-पॅसिफिक वृत्तसंस्थांची संघटना (ओपीएन्‌ए) यांसारख्या वृत्तसंस्थांच्या स्थापनेमुळे जागतिक स्तरावरचे माहितीचे असंतुलन कमी मदत झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (यूनेस्को) १९७७ साली सीन मॅक्‌ब्राईड यांच्या अध्यक्षतेखाली संज्ञापन-समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयोगाची नेमणूक केली. या आयोगाने १९७९ साली संज्ञापनसमस्यांसंबंधी आपला अहवाल सादर केला.

भारतीय वृत्तसंस्थांचा इतिहास : भारतात वृत्तसंस्था सुरु करण्याची कल्पना सर्वप्रथम केशवचंद्र रॉय यांना सुचली. उषानाथ सेन यांच्या साहाय्याने त्यांनी १९१० साली ‘असोशिएटेड प्रेस ऑफ इंडिया’ (एपीआय्) ही वृत्तसंस्था स्थापन केली. या संस्थेला ब्रिटिश सरकारचे चांगले सहकार्य मिळाले आणि थोड्याच अवधीत अनेक प्रस्थापित वृत्तपत्रे ‘एपीआय्‌’ ची वर्गणीदार झाली. पुढे रॉय यांचे काही मतभेद झाल्याने त्यांनी ‘इंडियन न्यूज ब्यूरो’ नावाची वेगळी संस्था सुरु केली. तत्पूर्वी एडवर्ड कोट्स या इंग्रजाने ‘इंडियन न्यूज एजन्सी’ ची स्थापना केली  होती. १९१९ साली रॉयटरने या तीनही वृत्तसंस्था आपल्या अधिपत्याखाली घेतल्या. या नवीन रुपात एपीआय्‌चे काम १९४९ पर्यंत चालू होते.


स्वातंत्र्य-चळवळीविषयीच्या बातम्यांना एपीआय्‌ पुरेसे प्रतिनिधित्व देत नाही, असे वाटल्याने एस्‌. सदानंद यांनी १९२७ साली ‘फ्री प्रेस ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेची स्थापना केली. ‘फ्री प्रेस’ च्या बातम्यांचे ब्रिटिश सरकारच्या वतीने प्रसिद्धीपूर्व परिक्षण केले जात असे. या संस्थेच्या अनेक बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत नसत. त्यामुळे १९३० साली सदानंद यांनी फ्री प्रेस जर्नल नावाचे स्वतःचे वृत्तपत्र सुरु केले. वृत्तसंस्थेच्याच मालकीचे एखादे वृत्तपत्र असणे, ही गोष्ट इतर वर्गणीदार वृत्तपत्रांना न पटल्याने त्यांनी ‘फ्री प्रेस’ वृत्तसंस्थेची सेवा घेणे बंद केले. आर्थिक समस्यांमुळे १९३५ साली ही वृत्तसंस्था बंद पडली.

कलकत्त्यात विधुभूषण सेनगुप्ता यांनी १९३३ साली स्थानिक वर्तमानपत्रांच्या साहाय्याने ‘युनायटेड प्रेस ऑफ इंडिया’ (यूपीआय्) ही वृत्तसंस्था सुरु केली. स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देणारी ही वृत्तसंस्था असल्याने ब्रिटिश सरकारकडून तिला सापत्नभावाची वागणूक मिळायची. ‘रॉयटर’ ने चालविलेल्या एपीआय्‌ला १९३७ साली दूरमुद्रक सेवा उपलब्ध झाली, तर यूपीआय्‌ला त्यासाठी १९४८ पर्यंत वाट पाहावी लागली, हे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. पुढे १९५८ साली यूपीआय्‌ बंद पडली.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्र भारतीय वृत्तसंस्था स्थापन करण्याविषयी विचार सुरु झाला. ‘रॉयटर’ शी करार करुन ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या सरकारी संस्थेने १ फेब्रुवारी १९४९ रोजी एपीआय्‌ वृत्तसंस्था चालवायला घेतली. पीटीआय्‌ ही कोणा एका व्यक्तीच्या किंवा सरकारच्या मालकीची वृत्तसंस्था नाही, तर भारतातील वृत्तपत्र संपादक आणि मालक यांच्या संचालक मंडळाने चालविलेली सहकारी संस्था आहे. एपीआय्‌च्या हस्तांतरणासाठी ‘रॉयटर’शी बोलणी करण्यात कस्तुरी श्रीनिवासन यांनी पुढाकार घेतला होता. पीटीआय्‌चे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही संस्था देशातील आणि आशिया खंडातील अग्रणी वृत्तसंस्था मानली जाते. देशात जवळजवळ सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी पीटीआय्‌चे प्रतिनिधी/वार्ताहर नियुक्त करण्यात आले आहेत. परदेशांतही पीटीआयने स्वतःचे जाळे उभारले आहे. दूरमुद्रक सेवेचे देशातील सर्वांत मोठे जाळे उभारण्याचे श्रेय पीटीआय्‌कडे जाते. पीटीआय्‌ने ‘रॉयटर’, ‘एएफ्‌पी’ आणि ‘यूपीआय्‌’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांबरोबर बातम्यांच्या देवाणघेवाणीसंबंधी व्यापारी स्वरुपाचा करार केला आहे. पीटीआय्‌ला परदेशांत प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येते.

हिंदुस्थान समाचार : अखिल भारतीय स्तरावरील वृत्तसंस्थाच्या बातम्यांमधील प्रादेशिक किंवा स्थानिक अडचणी दूर करण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एस्. एस्. आपटे यांच्या पुढाकाराने १९४८ साली ‘हिंदुस्थान समाचार’ या बहुभाषी वृत्तसंस्थेची स्थापना करण्यात आली. देशी भाषांतून वृत्त पाठविणारी ही पहिली वृतसंस्था होती. देवनागरी लिपीतील दूरमुद्रक सेवा सुरु करण्याचे श्रेयही या वृत्तसंस्थेकडे जाते. या वृत्तसंस्थेने ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी नेमले. १९५७ साली कामगारांची सहकारी संस्था स्थापन होऊन ‘हिंदुस्थान समाचार’ची मालकी त्या संस्थेकडे गेली.

युनायटेड न्यूज ऑफ इंडिया : भारतातील स्टेट्समन, हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया अशा सु. ४० प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी एकत्र येऊन ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’ (यूएन्‌आय्‌) या वृत्तसंस्थेची स्थापना १९६१ साली केली. परदेशी बातम्यांच्या वितरणासाठी यूएन्‌आय्‌ने एपीआय्‌बरोबर व्यापारी करार केला आहे. देशातील बहुतेक सर्व मोठी वृत्तपत्रे पीटीआय्‌ आणि यूएन्‌आय्‌ ह्या दोन्ही वृत्तसंस्थांची वर्गणीदार आहेत.

समाचार भारती : देशी भाषांतील वृत्तपत्रांना आपापल्या भाषांतून बातम्या पुरविण्याच्या हेतूने १९६६ साली ‘समाचार भारती’ या वृत्तसंस्थेची स्थापना करण्यात आली. देशांतर्गत आणीबाणीच्या काळात १ फेब्रुवारी १९७६ रोजी पीटीआय्, युएन्‌आय्, हिंदुस्थान समाचार आणि समाचार भारती ह्या चार संस्थांचे विलीनीकरण करुन ‘समाचार’ नावाची एकच राष्ट्रीय वृत्तसंस्था स्थापन करण्यात आली होती. ती जेमतेम वर्ष-सव्वावर्षच टिकली. आणीबाणी उठविल्यानंतर सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने याविषयी समिती नेमून समितीच्या निर्णयानुसार चारही वृत्तसंस्थांची पुनःस्थापना केली. यानंतर ‘हिंदुस्थान समाचार’ आणि ‘समाचार भारती’ या वृत्तसंस्था अल्पावधीतच बंद पडल्या.

देशात विविध ठिकाणी अनेक लहानमोठ्या स्वरुपाच्या वृत्तसंस्था स्थापन झाल्याची नोंद आहे. नीअर अँड फार ईस्टर्न न्यूज (एन्‌एएफ्‌ईएन्‌, १९५२) ही वृत्तसंस्था विशेषकरुन मानवी स्वभावाला रुचतील अशा (ह्यूमन इंटरेस्ट) बातम्या पाठवीत असे. ‘धीमन प्रेस ऑफ इंडिया’ (१९३५) ही फिरोझपूरची वृत्तसंस्था स्थानिक बातम्यांचे वितरण करीत असे. ‘इंडिपेंडंट न्यूज सर्व्हिस ऑफ लखनौ’ आणि ‘नॅशनल प्रेस’ या लखनौच्या वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रांना हिंदी भाषेत बातम्या पुरवीत असत.

त्याचप्रमाणे कलकत्त्याची ‘हिंद न्यूज एजन्सी’, हैदराबादच्या ‘डेक्कन न्यूज एजन्सी’ आणि ‘ॲसोशिएटेड प्रेस ऑफ हैदराबाद’ या वृत्तसंस्था, ‘केरळ प्रेस सर्व्हिस’, मद्रासची ‘युनिव्हर्सल प्रेस सर्व्हिस’, मुंबईची ‘इंडियन न्यूज सर्व्हिस’ अशा अनेक वृत्तसंस्था आपल्या प्रदेशातील वृत्तपत्रांना प्रादेशिक बातम्या पुरवीत असत. याशिवाय अनेक शहरांतून व अनेक भाषांतून वृत्तपत्रे प्रसिद्ध करणाऱ्या ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्सप्रेस’ अशा वृत्तसंस्थांनी आपल्या स्वतःच्या वृत्तसंस्था सुरु केल्या आहेत. 

                       बर्वे, उज्वला