साईनाथ, पी. : (१९५७ – ). भारतीय ज्येष्ठ पत्रकार. त्यांचे पूर्ण नाव पालागुम्मी साईनाथ. त्यांचा जन्म सधन व सुशिक्षित कुटुंबात चेन्नई (तमिळनाडू) येथे झाला. भारताचे चौथे भूतपूर्व राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी यांचे ते नातू होत. त्यांनी लोयोला कॉलेज(चेन्नई) येथे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन इतिहास विषयात जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून (दिल्ली ) एम्.ए. पदवी संपादन केली (१९७९). विशेष म्हणजे ते आज त्याच विद्यापीठात कार्यकारी समितीवर कार्यरत आहेत. दिल्ली येथे शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी आपली कारकीर्द पत्रकारितेच्या माध्यमातून सुरू केली आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएन्आय्) वृत्तसंस्थेत ते नोकरीस दाखल झाले (१९८०–१९८३). त्यानंतर ते ब्लिट्झ या नामांकित साप्ताहिकामध्ये (मुंबई) सलग दहा वर्षे सहसंपादक (१९८३–१९९३) होते. त्याच सुमारास त्यांना टाइम्स ऑफ इंडिया या प्रसिद्घ इंग्रजी दैनिकाने शिष्यवृत्ती (फेलोशिप) दिली. त्यांनी पाच राज्यांतील गरिबांतील गरीब अशा दहा जिल्ह्यांतून सु. एक लाख किमी.चा प्रवास केला. त्यांतील पाच हजार किमी. अंतर पायी चालत ते फिरले आणि वंचित समाजाचे सूक्ष्म निरीक्षण व सर्वेक्षण केले. या जिल्ह्यांतील सामाजिक परिस्थितीवर त्यांनी अठरा महिन्यांतील काळात जे पाहिले व अनुभविले, त्यांवर एकूण ८४ शोधनिबंधात्मक लेख लिहिले. ते प्रसिद्घही झाले.

त्यांनी या शोधनिबंधात्मक लेखांधारे एव्हरीबडी लव्हज् ए गुड ड्राउट : स्टोरीज फ्रॉ इंडियाज पुअरेस्ट डिस्ट्रिक्ट्स या शीर्षकाने पुस्तक प्रकाशित केले (१९९५). त्यांच्या या ग्रंथातील ग्रामीण भागातील वंचितांची करुण कहाणी, जणू तत्कालीन समाजाचे जीवनचरित्रच जगासमोर उभे करते. या लेखांत त्यांनी गरिबांचे मूळ दुःख व दारिद्य केवळ अवर्षणात नसून निरक्षरता, जातिभेद आणि बेकारी हेही घटक तितकेच त्यास कारणीभूत आहेत, हे निदर्शनास आणले. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून त्याला तेरा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. ललित लेखनाव्यतिरिक्त (नॉन-फिक्शन) सर्वाधिक खपाचा (बेस्ट सेलर) मान त्याने मिळविला आहे. अलीकडे या पुस्तकाचा हेमंत कर्णिक यांनी दुष्काळ आवडे सर्वांना या शीर्षकार्थाने मराठीत अनुवाद केला आहे. या पुस्तकाच्या स्वामित्वाच्या हक्कांधून मिळालेले सर्व उत्पन्न ते ग्रामीण भागातील वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना उत्तेजन देण्यासाठी पारितोषिकाच्या रूपात देत असतात. त्यांचे पहिले पारितोषिक झारखंडमधील एका आदिवासी महिलेला देण्यात आले. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकातून ते अधूनमधून स्तंभलेखन करीत असतातच. द हिंदू या इंग्रजी दैनिकाने त्यांची नियुक्ती ग्रामीण भागातील समालोचन करणारा संपादक (रूरल अफेअर्स एडिटर) म्हणून केली असून, त्यासाठी ते वर्षातील जवळजवळ २७० –३०० दिवस विविध राज्यातील ग्रामीण भागांत भ्रमंती करतात. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये भारताच्या आर्थिक धोरणाला चालना देण्यासाठी मुक्त व्यापार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सुधारणा अंमलात आणण्याचे धोरण जाहीर केले. त्याची प्रसारमाध्यमांनी केवळ दखलच घेतली नाही, तर उदोउदो केला पण या माध्यमांनी भारताच्या ग्रामीण भागातील दारिद्र्याची, लक्षावधी वंचित लोकांची वास्तव परिस्थिती क्वचितच लोकांसमोर मांडली, अशी खंत साईनाथांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर ही प्रसारमाध्यमे समाजाच्या उच्च स्तरातील पाच टक्के लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतील, तर तळागाळातील पाच टक्के गरीब लोकांच्या समस्यांना मी वाचा फोडण्याचे काम करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. साईनाथ बराच काळ मुंबईबाहेर असले, तरी सवड काढून सॉफिया पॉलिटेक्निक (ब्री च कँडी-मुंबई) महाविद्यालयात गेली वीस वर्षे सामाजिक संदेशवहन माध्यम अभ्यासक्रम हा विषय अभ्यागत व्याख्याता म्हणून शिकवत आहेत. तसेच ते चेन्नई येथील एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचे आनुषंगिक विद्याशाखा सदस्य आहेत.

संगणकाचा वाढता वापर आणि माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती यांमुळे जग एक खेडे (ग्लोबल व्हिलेज) बनले आहे, ही संकल्पना दृढतर होत असताना भारतातील ग्रामीण भागातील उपेक्षित व वंचित समाज, ज्यांना या विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावे लागले आहे, त्यांची दु:खे शोधण्याचा प्रयत्न साईनाथ करीत असून त्यांनी शासकीय पातळीवरून होणाऱ्या उपाययोजनांवर परखड टीका केली आहे. यासंदर्भात द हिंदू मधील त्यांचा ‘इंडिया टुगेदर’ हा स्तंभ अतिशय बोलका असून तो खूप गाजला. त्यांच्या या स्तंभाचे अनुकरण करून या विषयावर सु. साठ एक वर्तानपत्रांनी अशा प्रकारचे स्तंभलेखन केले आणि जागतिकीकरणाचे ग्रामीण भागावरील दुष्परिणाम निदर्शनास आणले. राजस्थान, ओरिसा, मध्य प्रदेश आणि विशेषतः आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हे सत्य त्यांनी आकडेवारीसह उजेडात आणले. हा आश्चर्यकारक भयानक आकडा असून त्याची दखल केंद्र शासनाला घ्यावी लागली. त्यामुळे अलीकडे केंद्र शासन व राज्यशासने त्यांचा सल्ला घेतात. गरिबी, सामाजिक न्याय, शोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांवर त्यांनी जगभरातील अनेक विद्यापीठांत व्याख्याने दिली आहेत.

साईनाथ यांना अनेक मानसन्मान लाभले असून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील सु. तीस पुरस्कार लाभले आहेत. त्यांतील वृत्तपत्रविद्या, साहित्य आणि संदेशवहन या वर्गासाठीचा मागसायसाय पुरस्कार (२००७), द हॅरी चॅपिन मिडिया पुरस्कारांतील जजीस प्राइझ (वृत्तपत्रीय विभाग–२००५), ह्यूमन राइट्स जर्नलिझम अवॉर्ड (२००१) द ॲमनेस्टी इंटरनॅशनल ग्लोबल अवॉर्ड (२०००), बी. डी. गोएंका अवॉर्ड (२०००), बोर्मा जर्नलिझम प्राइझ (१९९४) वगैरे काही प्रतिष्ठित पुरस्कार-पारितोषिके होत. त्यांना अल्बेर्ता विद्यापीठाची सन्मान्य डी.लिट्. पदवी मिळाली (२०११). याशिवाय जो म्यूलिन्स (Joe Moulins) या कॅनडियन माहितीपट निर्मात्याने ‘ए ट्राइब ऑफ हीज ओन’ या नावाने त्यांच्यावर ध्वनिचित्रफित तयार केली. रामॉन मागसायसाय पुरस्काराच्या पत्रकात (सायटेशन) म्हटले आहे की, ‘त्यांनी (साईनाथ) पत्रकार म्हणून भारताच्या गरीब जनतेचे विविध प्रश्न आस्थापूर्वक बांधीलकीने जगासमोर मांडले’. नोबेल पुरस्कार मानकरी भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन साईनाथांविषयी म्हणतात की, ‘ही इज वन ऑफ द वर्ल्डस् ग्रे ट एक्सपर्टस् ऑन फॅमिन अँड हंगर’. साईनाथ यांनी रामॉन मागसायसाय पुरस्काराची रक्कम विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्याचे औदार्य दाखविले आहे.

देशपांडे, सु. र.