बेलॉक, (झोझेफ – प्येअर) हिलेअर : (२७ जुलै १८७०-१६ जुलै १९५३). चतुरस्त्र इंग्रजी साहित्यिक. जन्माने फ्रेंच रोमन कॅथलिक खिश्चन. पॅरिसजवळील सॅं क्लोद येथे जन्मला. शिक्षण बर्मिंगहॅम येथील ओरेटरी स्कूल व ऑक्सफर्डचे बॅलिएल कॉलेज ह्या शिक्षणसंस्थांत. इतिहास ह्या विषयाचा पदवीधर. १९०२ मध्ये त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. १९०६ ते १९१० ह्या कालखंडात ब्रिटिश संसदेचा तो सदस्य होता. त्यानंतर तो पत्रकारीकडे वळला. पत्रकार ह्या नात्याने साम्राज्यवाद व राजकीय जीवनातील भ्रष्टाचार ह्यांवर त्याने प्रखर टीका केली.

 

आपल्या वाङ्‌मयीन जीवनाचा आरंभ वेलॉकने काव्यलेखनाने केला. व्हर्सेस अँड सॉनेट्‌स (१८९५), द मॅड चाइलड्‌स बुक ऑफ पीस्ट्‌स (१८९६) आणि कॉशनरी टेल्स (१९०७) हे त्याचे आरंभीचे काव्यसंग्रह. बालांसाठी लिहिलेल्या कवितांतून त्याच्या तल्लख विनोदबुद्धीचा विशेष प्रत्यय येतो. त्यानंतर प्रवासवर्णने (द पाथ टू रोम, १९०२ द फोर मेन , १९१२. ह्यात त्याने स्वत: आकर्षक रेखाचित्रे काढली), इतिहास (यूरोप अँड द फेथ, १९२० हिस्टरी ऑफ इंग्लंड , ४ खंड, १९२५-३१), चरित्रे (मेरी अंतोयनेत , १९०९ ओन ऑफ आर्क , १९२९), कादंबऱ्या (मिस्टर क्लटरबॅक्‌स इलेक्शन, १९०८ ए चेंज इन द कॅबिनेट , १९०९ द ग्रीन ओव्हरकोट , १९१२), समाजशास्त्रीय (द सर्व्हाइल स्लेट, १९१२) असे विविध प्रकारचे लेखन त्याने केले. मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर शैलीच्या दृष्टीने सुंदर परंतु आशयाच्या दृष्टीने हलकेफुलके ललितनिबंधही त्याने लिहिले आहेत.

व्हिक्टोरियन कालखंडातील ढोंगीपणावर प्रहार करण्याचे कार्य आपल्या वैविध्यपूर्ण आणि उपरोधप्रचुर लेखनाने त्याने केले. ह्या व इतर वैशिष्ट्यांत त्याचे जी.के. चेस्टर्टन याच्याशी साधर्म्य दिसते. गिल्डफर्ड, सरी येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Haynes, R. Hilaire Belloc, 1953. 2. Mandell, C. C. Shanks, E. Hilatre Belloc : The Man and His work, London, 1916.

वानखेडे, म. ना.