शेलिंग, अर्नेस्ट हेन्री : (२६ जुलै १८७६ – ८ डिसेंबर १९३९). अमेरिकन पियानोवादक, संगीतरचनाकार व वादयवृंद-निर्देशक. बेल्व्हदिर (न्यू जर्सी) येथे जन्म. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने फिलाडेल्फिया येथे पियानोवादनाचा जाहीर कार्यक्रम करून सर्वांची वाहवा मिळविली. त्याने पॅरिसमध्ये मथीअसच्या हाताखाली (१८८२-८५) व पुढे पादेरव्हस्की, मॉइकोव्हस्कीप्रभृती संगीततज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अर्नेस्टसंगीताचे धडे घेतले (१९९८-१९०२). पहिल्या महायुद्धकाळात त्याने लष्करी सेवा बजावली (१९१४-१८). त्यानंतर वादयवृंद-निर्देशक व संगीतरचनाकार म्हणून त्याने अनेक ठिकाणी कार्य केले. त्याची अ व्हिक्टरी बॉल (१९२३) ही अद्‌भुतरम्य वादयवृंद रचना सर्वाधिक लोकप्रिय ठरली. अल्फेड नॉइझ याच्या उपरोधिक काव्यावर ही संगीत रचना आधारलेली होती. फँटॅस्टिक स्यूट (१९०७), इंप्रेशन्स फॉम ॲन आर्टिस्ट्स लाइफ (१९१५), डायव्हर्टिमेंटो (१९२५) इ. पियानोरचना तसेच सिंफनिक लेजंड (१९१६)ही वादयवृंदरचना ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय संगीतकृती होत. मुक्त कल्पनाविलास व स्वच्छंदतावादी शैली ही त्याच्या संगीतरचनांची खास वैशिष्ट्ये होत. त्याने आयुष्याच्या उत्तरार्धात संगीत-शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. ‘ न्यूयॉर्क फिल्हार्मोनिक सोसायटी ’ व अन्य वादयवृंद संघटनांमार्फत त्याने स्वतःच्या संगीत-निर्देशनाखाली मुलांचे वादयवृंद-जलसे अमेरिकेतल्या अनेक शहरांतून सादर केले (१९२४-३९).

न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.