सेरीन : सर्वांत सामान्य अशा अनेक प्रथिनांच्या जलीय विच्छेदनांद्वारे मिळविता येणारे हे ⇨ ॲमिनो अम्ल आहे. कधीकधी एकूण उत्पादांत याचे वजनी प्रमाण ५-१० टक्के असते. सेरीन, ग्लायसीन, सिस्टाइन व ट्रिप्टोफेन या ॲमिनो अम्लांच्या कुलाला सेरीन कुल म्हणतात. सेरीन व त्यापासून तयार होणारे त्याचे काही अनुजात (उदा., एथॅलोनामाइन) जैव पटलांतील लिपिडांच्या (फॉस्फोलिपिडांच्या) वर्गाचे महत्त्वाचे घटक आहेत. सिस्टाइन, ग्लायसीन व कोलीन यांसारख्या अनेक चयापचयोत्पादांचे (चयापचयात म्हणजे शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत तयार होणाऱ्या पदार्थांचे) सेरीन हे पूर्वद्रव्य आहे. आल्फा- ॲमिनो बीटा-हायड्रॉक्सी (किंवा २-ॲमिनो ३-हायड्रॉक्सी) प्रॉपिऑनिक अम्ल या नावानेही सेरीन ओळखले जाते. एल्-सेरीन अनेक प्रथिनांमध्ये फॉस्फेट एस्टरांच्या रूपात आढळते आणि वनस्पतिज प्रथिनांपेक्षा प्राणिज प्रथिनांत ते जास्त प्रमाणात आढळते. १०० मिलि. मानवी रक्तामध्ये सेरीन १·१ –१·२ मिग्रॅ. असते. सेरिनाचा तथाकथित अत्यावश्यक ॲमिनो अम्लांच्या गटात समावेश केलेला नाही. म्हणजे सस्तन प्राण्यांत सेरीन ग्लुकोजापासून संश्लेषित होते आणि अन्नद्रव्यांमार्फत त्याची प्राण्यांना गरज नसते.

ई. क्रामर यांनी १८६५ मध्ये सेरेसीन या रेशमातील प्रथिनापासून सेरीन प्रथम वेगळे केले. रेशीम अर्थाच्या सेरिकम या लॅटिन शब्दावरून सेरेसीन व त्यावरून सेरीन हे नाव आले आहे. एमील हेरमान फिशर व ल्युक्स यांनी १९०२ मध्ये सेरिनाची संरचना निश्चित केली. सेरिनाचे रासायनिक सूत्र C3H7O3N हे असून यात हायड्रॉक्सिल गट (जक) असलेली ॲलिफॅटिक शृंखला [ HO-CH2·CH(NH2)·COOH] आहे. हायड्रॉक्सिल गटामुळे याचे ध्रुवण (पोलर) ॲमिनो अम्ल असे वर्गीकरण करतात. सेरिनाचे काही गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत. हे रंगहीन वा पांढरे, स्फटिकी संयुग असून त्याचा रेणुभार १०५·१० ग्रॅ./मोल १०० मिलि. पाण्यातील विद्राव्यता ५·०२ ग्रॅ. वितळबिंदू २२८° से. चव गोड असून ते अल्कोहॉल व ईथर यांच्यात विरघळत नाही.

सेरीन व ग्लायसीन यांच्या संरचनांमध्ये साधर्म्य असून त्यामुळे शरीरात ग्लायसिनापासून सेरीन व सेरिनापासून ग्लायसीन तयार होऊ शकतात. सलाश व ग्रीनबर्ग या शास्त्रज्ञांनी ३-फॉस्फोग्लिसरिक अम्ल या महत्त्वाच्या मध्यस्थ संयुगाद्वारे ३-फॉस्फोहायड्रॉक्सिपायरुव्हिक अम्ल तयार केले. नंतर त्याचे ॲमिनो संक्रमण (ॲमिनो गटाचे स्थानांतरण करून) फॉस्फोसेरीन हे संयुग मिळविले आणि त्याच्यापासून फॉस्फेटेज या एंझाइमाद्वारे सेरिनाचे संश्लेषण केले.

मिथिल ॲक्रिलेटापासून अनेक टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे रॅसेमिक (प्रकाशीय दृष्ट्या निष्क्रिय) सेरीन तयार करता येते. पाणी, मिथेनॉल, हायड्रोजन व अमोनिया यांचा संमिश्र असा साधा बर्फ जंबुपार प्रकाशाने प्रकाशित झाल्यास सेरीन नैसर्गिक रीत्या तयार होते. अवकाशातील थंड प्रदेशांत सेरीन सहजपणे निर्माण होत असणे शक्य आहे, असे यावरून सूचित होते.

सेरिनापासून निर्माण होणारी पुढील घटक द्रव्ये जैविक प्रक्रियांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत : सिस्टाइन, मिथिओनीन, कोलीन, एथॅनॉल अमाइन, फॉस्फोलिपिडे, ट्रिप्टोफेनमधील कार्बन माला, ग्लायसीन, फॉस्फोसिरीन, लायपोप्रथिन, फॉर्माल्डिहाइड व अमोनिया. सेरिनाची पर-आयोडेटाबरोबर विक्रिया केल्यास ग्लायऑक्झालेट, अमोनिया व फॉर्माल्डिहाइड ही संयुगे मिळतात. या फॉर्माल्डिहाइडावरून किंवा अमोनियावरून सेरिनाचे परिमाणात्मक आगणन (अंदाज) करतात.

प्यूरिने व पिरिमिडिने यांच्या जैव संश्लेषणामध्ये सेरीन सहभागी होते. त्यामुळे सेरीन चयापचयाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच सूक्ष्मजीवांतील ट्रिप्टोफेन हे ॲमिनो अम्ल, स्फिंगोलिपिडे यांसारखे अनेक चयापचयोत्पाद, शिवाय जैव संश्लेषणामध्ये एक-कार्बन खंडाचा प्रमुख दाता असलेले फोलेट यांचे सेरीन हे पूर्वद्रव्य आहे. कायमोट्रिप्सीन व ट्रिप्सीन यांसारख्या एंझाइमांच्या उत्प्रेरकी कार्यात [→ उत्प्रेरण] सेरिनाची भूमिका महत्त्वाची असते. मेंदूतील संदेशन कार्याच्या दृष्टीने सेरीन महत्त्वाचे आहे.

सायक्लोसेरीन व ॲझासेरीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांत सेरीन हा महत्त्वाचा घटक असतो. यांपैकी सायक्लोसेरीन हे स्फटिकी औषध क्षयरोग व मूत्रमार्गाचे विशिष्ट प्रकारचे संसर्ग यांवरील उपचारांसाठी वापरतात तर ॲझासेरीन हे औषध रक्ताच्या तीव्र स्वरूपाच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये वापरतात. अन्नपूरक घटक व संवर्धक माध्यम म्हणून सेरीन वापरतात. शिवाय जीवरसायनशास्त्रातील संशोधनामध्ये सेरीन उपयुक्त आहे.

पहा : ॲमिनो अम्ले सिस्टाइन.

ठाकूर, अ. ना.