सेरार्जिराइट : चांदीचे अतिशय जड असे हॅलाइड खनिज. त्याचे स्फटिक घनीय समूहाचे आहेत. परंतु घनाकार व जुळे स्फटिक विरळाच आढळतात. ते मोत्यासारखे करडे किंवा रंगहीन असून पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी असतात. हे खनिज सामान्यपणे शिंगासारख्या किंवा मेणासारख्या दिसणाऱ्या पुंजांच्या संपुंजित आणि कधीकधी स्तंभाकार पापुद्य्रांच्या, लेपांच्या व पटलांच्या रूपांत आढळते. सूर्यप्रकाशात त्याचा करडा वा करडसर हिरवा रंग जलदपणे जांभळट उदी होतो. भंजन खडबडीत ते काहीसे शंखाभ चमक शिंगासारखी, तंतुक्षम व गलनक्षम [⟶ खनिजविज्ञान]. हे खनिज पूर्णपणे छेद्य असल्यामुळे ते सुरीने शिंगाप्रमाणे कापता येते म्हणून त्याला हॉर्न सिल्व्हर असेही म्हणतात. दिसायला व गुणवैशिष्ट्यांच्या बाबतीत हे शिंगासारखे असल्याने शिंग व चांदी या अर्थांच्या दोन ग्रीक शब्दांवरून त्याचे सेरार्जिराइट हे नाव पडले आहे. कठिनता २·३-२·५ वि. गु. ५·६ (सेरार्जिराइट) व ६·५ (ब्रोमिराइट) रा. सं. AgCl (सिल्व्हर क्लोराइड). रा. सं. AgCl (सिल्व्हर ब्रोमाइड) असलेल्या ब्रोमिराइट या खनिजाबरोबर सेरार्जिराइटाची पूर्ण अशी ⇨ घन विद्राव माला असून यामुळे संपूर्ण क्लोरिनाच्या जागी ब्रोमीन येऊ शकतो. सेरार्जिराइटात थोडे आयोडिन व क्वचित पारा असू शकतो. सेरार्जिराइट ब्रोमिराइटापासून भौतिक रीतीने वेगळे ओळखता येत नाही. परंतु सेरार्जिराइट जड व छेद्य असल्याने इतर खनिजांपासून वेगळे ओळखता येते.
सेरार्जिराइट व ब्रोमिराइट ही दोन्ही नंतरच्या क्रियांनी बनलेली म्हणजे द्वितीयक खनिजे आहेत. शुद्ध रूपातील चांदी, चांदीची सल्फाइडे व इतर खनिजे तसेच वातावरण प्रक्रियेने ऑक्सिडीभूत झालेल्या चांदीच्या निक्षेपांतील सल्फो लवणे यांच्यात बदल होऊन ही खनिजे तयार होतात. यामुळे ती चांदीच्या निक्षेपांच्या ऑक्सिडीभूत पट्ट्यांत आढळतात. सेरार्जिराइटाबरोबर शुद्ध रूपातील चांदी, चांदीची इतर खनिजे, वाड, लिमोनाइट, सेऱ्युसाइट आणि एकूणच द्वितीयक खनिजे आढळतात. जर्मनी, चिली, पेरू, बोलिव्हिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया (न्यू साऊथ वेल्स) आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने (कोलोरॅडो, नेव्हाडा, कॅलिफोर्निया, आयडाहो) या देशांत सेरार्जिराइट आढळते. हे चांदीचे महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे.
पहा : चांदी.
ठाकूर, अ. ना.