हेमॅटाइट : हे खनिज लोखंडाचे सर्वांत महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) असून ब्लडस्टोन, तांबडे हेमॅटाइट, तांबडे लोहधातुक व समांतर षट्फलकीय लोहधातुक ही त्याची पर्यायी नावे आहेत. त्याचेस्फटिकसमूह षट्कोणी-समांतर षट्फलकीय, षट्फलकीय विषम त्रिभुजफलकी असून विभाजन तले जवळजवळ घनीय कोनांत असतात [→ स्फटिकविज्ञान]. हे गुच्छाकार ते मूत्रपिंडाकृती (म्हणून वृक्काकार धातुक) रूपांत आढळते व त्याची संरचना अरीय असते. हे तंतुरूप पुंज किंवा तांबड्या मातीच्या रूपांतही आढळते. तसेच अभ्रकी, पर्णसम रूपांतही ते आढळू शकते. अनेक अग्निज खडकांत ते गौण खनिजाच्या रूपातही असते. मॅग्नेटाइटाच्या अष्टफलकीय छद्मरूपातील हेमॅटाइटाला मार्टाइट म्हणतात. कठिनता ५.५-६.५ वि. गु. ५.२६ चमक स्फटिकांची धातूसारखी व मातकट प्रकाराची मंद रंग लालसर तपकिरी ते काळा, तांबडा मातकट प्रकार म्हणजे रेड ऑकर कस फिकट ते गडद( इंडियन) तांबडा व तापविल्यावर काळा होतो. दुधी काचेप्रमाणे पारभासी [→ खनिजविज्ञान]. रा. सं. ऋश२ज३ (फेरिक ऑक्साइड, लोह ७०%). यात टिटॅनियम असू शकते. ते अगलनीय व क्षपणकारी [→ क्षपण] ज्योतीत तापविल्यास तीव्र चुंबकीय होते. हायड्रोक्लोरिक अम्लात सावकाशपणे विरघळते. कसामुळे त्याला वेगळे ओळखता येते. 

 

सर्व कालखंडातील व रूपांतील खडकांत हेमॅटाइट व्यापकपणे विखुरलेले आढळते. लोखंडाचे सर्वांत विपुल व महत्त्वाचे धातुक असल्याने सूक्ष्मकणांपासून ते प्रचंड राशींपर्यंतच्या रूपात ते आढळते. एल्बा बेट, सेंट गॉटर्ड (स्वित्झर्लंड) व व्हीस्यूव्हिअस लाव्हा येथे त्याचे चांगले स्फटिक आढळले आहेत. अमेरिका, व्हेनेझुएला, ब्राझील, कॅनडा इ. अनेकदेशांत त्याचे मोठे साठे आढळले आहेत. 

 

भारतात पत्रित व अभ्रकी रूपांत, तसेच कोणाश्म जांभा इ. खडकांत हेमॅटाइट आढळते. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांत हेमॅटाइट सामान्यपणे आढळते. महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली व रत्नागिरी जिल्ह्यांतही हेमॅटाइट आढळते. 

 

हेमॅटाइटाचा मुख्य उपयोग लोखंड मिळविण्यासाठी होतो. शिवाय ते रंगद्रव्य, तांबडे ऑकर व पॉलिश करण्याचे चूर्ण म्हणूनही वापरतात. चूर्णरूप हेमॅटाइटाच्या रक्तासारख्या रंगावरून त्याला रक्त अर्थाच्या ग्रीक शब्दावरून हेमॅटाइट हे नाव पडले आहे. 

 

पहा : मॅग्नेटाइट रंगीत माती लोखंड लोखंड व पोलाद उद्योग. 

बरीदे, आरती